अपेक्षा आणि वास्तव 

अपेक्षा आणि वास्तव 

मी कॉलेजमध्ये असताना एक अमेरिकन विनोद खूप प्रसिद्ध होता. त्या विनोदाचं मराठी भावांतर असं होऊ शकेल, ‘प्रत्येक तरुण मुलाला हवी असते ‘काँटेसा क्लासिक’ मुलगी. पण तो लफडं करतो ‘ॲम्बेसेटर’शी आणि लग्न करतो ‘मारुती ८००’बरोबर...’ 

स्त्रीला ऑब्जेक्टिफाय करण, वस्तूसारखं वागवणं हे तेव्हा सर्रास चालायचं. त्यावेळी विनोद करणाऱ्याला आपण नारीद्वेष्टे विधान करत आहोत, हेदेखील माहीत नव्हतं. हे जरी असलं, तरी अपेक्षा आणि वास्तव यातली तफावत दाखवणारी ही मार्मिक वाक्यं होती. 

स्थायी भावात कधीच आनंद न मानणं आणि आहे त्याच्यापेक्षा थोडं तरी अजून मिळायला हवं असणं, हाच मुळी मानवाचा स्थायीभाव आहे. अनेक अध्यात्मिक लोक, धर्मगुरू ‘आम्ही वैराग्य पत्करलं आहे, आम्हाला अजून काहीच नकोय,’ असा दावा करतात पण त्यांनाही आश्रमासाठी किंवा धर्मस्थळासाठी जास्त जमीन, आणखी अनुयायी हे हवेच असतात. अगदी हिमालयाच्या गुहेत बसलेला सच्चा संन्यासीही निर्वाण, मोक्ष वगैरे याची अपेक्षा करत असतो, काही नाही तर देवानं त्याच्याकडं ‘फ्लाईंग व्हिजिट’ करावी, साक्षात्कार द्यावा, अशी आशा ठेवून असतो! अगदी साधी राहणी आणि उच्च विचार असणाऱ्या लोकांचीही माफक अपेक्षा असते, की आहे त्याच्यापेक्षा आणखी काही लोकांनी उच्च विचार आणि साधी राहणी अवलंबावी आणि यात काही गैर नाही. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आणि म्हणूनच लॉकडाउनच्या सुरुवातीलाच मिळालेला वेळ, एकांत याचा सदुपयोग करायचा, असं अनेकांनी ठरवलं. गरीब बिचारे शेकडो मैल डोक्यावर अख्या संसाराचं ओझं घेऊन चालतात, तर आपण किमान आपल्या वाढलेल्या पोटाचं गाठोडं कमी करण्यासाठी घरच्या घरी सूर्यनमस्कार करावेत. गरिबांचं नेमकं म्हणणं सरकारपर्यंत नीट पोचत नाहीये, त्यांचं म्हणणं सरकारला नीट कळत नाहीये. अशावेळी आपण आपल्या निकाटच्यांना कळणार नाही, अशी संस्कृत किंवा फ्रेंच भाषा शिकून घ्यावी. तांदूळ मिळतोय, पण डाळ नाही. माणसांच्या रंगावरून भेद नाही, पण रेशन कार्ड पांढरं की पिवळं की केशरी याच्यावरून शिधेच्या शिदोरीचा आकार ठरतोय. अशावेळी आपण एकदाचं ते कॉन्टिनेन्टल कुकिंग काय असतं ते शिकून घ्यावं. आता दोन महिने शॉपिंग करायलाच मिळालं नाही, म्हणून वाचलेल्या पैशाची स्टॉक मार्केट गुंतवणूक कशी करायची असते म्हणजे फायनान्शिअल प्लॅनिंग शिकून घ्यावं. अशा काही माफक महत्त्वाकांक्षा किंवा अपेक्षा मनात ठेवून २४ मार्चला प्रवास सुरू झाला. 

मी स्वतःला मोटिव्हेट करण्यासाठी आरशासमोर स्वतःला उद्देशून भाषणं केली, पण स्वयंपाक करणं किती अवघड आहे हे समजल्यावर त्यापेक्षा ब्रेड, बटर, बिस्कीट, मॅगी, चिप्स या गोष्टी खाऊन पोटाचा गाठोडं अजून वाढलं. इतकं की, आता धोबी घरी आल्यावर तो आपल्याला सदऱ्यात गुंडाळलेले दीड महिन्याचे कपडे आहेत, असं समजून घेऊन जाईल की काय ही भीती वाटू लागली आहे. थोडं वजन कमी झालं की मग नीट व्यायाम करता येईल, हा तर आमचा जुना सिद्धांत आहे. नवीन भाषा शिकणं किती अवघड असतं, हे समजल्यावर आपोआप मातृभाषेबद्दलचं प्रेम उफाळून येतं आणि आपण जरा मराठीवर ‘फोकस’ केला पाहिजे, फ्रेंच काय कधीही शिकता येईल, हे कळून चुकतं. 

हे कळलं, तरी माझं आरशात स्वतःला उद्देशून भाषण मात्र सुरुच आहे. मी रोज सकाळी करोडो लोकांना झोपेतून उठवायचं काम करतो. उठून उभं राहायचं स्फुरण देतो! मग स्वतःला भाषण तो बनता है यार! 

पु. ल. देशपांडे यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’मध्ये अंतू बरवा नावाचं पात्र गावात नेहरू भाषण करायला आले आहेत, हे कळल्यावर म्हणतात ‘अरे भाषणे कसली देतो? तांदूळ दे!’ मी आरशातल्या संग्रामला हेच सांगतोय. वास्तव काय, तू बोलतोयस काय!??’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com