गोष्ट मेंदूच्या ‘हार्डवेअर’ची! 

गोष्ट मेंदूच्या ‘हार्डवेअर’ची! 

वादातून संवादाकडे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे असं भलं मोठं आश्वासन मी मागच्या सदरात दिलं. त्यातली मार्केटिंग हाइप बाजूला ठेऊन कामाला लागूया. 

एखाद्या मुद्द्यावर वाद घालायच्या आधी, तो मुद्दा, त्या विषयवार असलेलं आपलं मत हे नेमकं बनतं कसं? 

मनुष्य हा बुद्धिप्रामाण्यवादी प्राणी आहे, असं आम्हाला शाळेत शिकवलं होतं. म्हणजे आपण मत बनवण्याआधी किंवा निर्णय घेण्याआधी आपल्या मेंदूत कोर्ट भरतं. रोजचे छोटे निर्णय खूप आधीच घेतलेले असतात. आज डिनरला काय बनवायचं, कुठले कपडे घालायचे, रस्त्यावर ओव्हरटेक करायचं की नाही वगैरे निर्णय मेंदूच्या तलाठी लेवलच्या quasi judicial authority कडे सोपवलेले असतात. या सगळ्या गोष्टी आपोआप सुरळीत चालू असतात आणि जोपर्यंत आपण एकेदिवशी उपाशीपोटी, कपडे न घालता गर्दीत उलट्या दिशेने स्कूटर चालवतो तोपर्यंत याबद्दल कोणी फार विचार करत नाही. 

खरा बुद्धिप्रामाण्यवाद हा मोठ्या केसेससाठी राखीव असतो. धर्म, देश, राजकारण, नैतिकता, इतिहास, अर्थव्यवस्था, प्रेम, लग्न, मुलांचं संगोपन, वगैरे विषय आणि त्यात बरं चांगलं वाईट बरोबर चूक बरोबर भ्रष्ट पाप पुण्य खरं खोटं ठरवायला आपल्या मेंदूत सुप्रीम कोर्टाची फुल कॉन्स्टिट्युशनल बेंच बसलेली असते. आता काही लोकांची बेंच उच्च दर्जाची असते, तर काहींची थोडी खिळखिळी. मात्र, न्यायप्रक्रिया चालूच असते आणि यामुळेच मनुष्य हा सगळ्या प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहे... 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

...हे म्हणणं फसवं आहे. कारण गुंतागुंतीचे निर्णय सोडवण्यासाठी मुळात आपला मेंदू बनलेला नाही. 

हे वाक्य अनेकांना पटणार नाही. ‘माणूस चंद्रावर गेलाय, कॉम्पुटरचा आविष्कार केलाय, गगनचुंबी इमारती बनवल्यात... हे काय बिनडोक लोकांचं काम आहे काय?,’ असा युक्तिवाद तुम्ही कराल. 

उत्क्रांतीद्वारे मानवी मेंदूची जडणघडण झाली. natural selection म्हणजे (अगदी ढोबळपणे), ज्या गुणांमुळे आपण जिवंत राहू आणि पुढची पिढी तयार करू, तेच गुण पुढच्या पिढीत genes द्वारे टिकून, अधिक विकसित होऊन जोपासले जातात. याला हजारो लाखो वर्षं लागली आणि अर्थात तेव्हाच्या काळात जे गुण महत्त्वाचे होते तेच टिकले, विकसित झाले. 

कल्पना करा- पन्नास हजार वर्षांपूर्वी माझे खापर सुपर पणजोबा दंडकारण्यात सकाळच्या मॉर्निंग वॉकला गेलेत. त्या काळी फुकट ऊर्जा खर्च करून चरबी जाळायची फॅशन नव्हती म्हणून ते नाश्ता आणायला वस्ती सोडून दाट जंगलात गेले असतील, असं आपण गृहीत धरूया. जवळपासच्या नेहमीच्या ठिकाणी काही मिळेना म्हणून ते लांबवर गेले. किर्रर्र आणि घनदाट जंगल! या एरियात वनस्पती आणि प्राण्यांचे आवाज थोडे अनोळखीच. आमचे सुपर आजोबा धीट, त्यांची आगेकूच चालूच. समोरच्या झाडीतून सर सर आवाज, अचानक एक अजस्त्र प्राण्याची आकृती दिसलायला लागली. 

‘‘अरे, हा कुठला प्राणी आहे? आधी कधी बघितला नाही! आपल्या शेजारचा सुर्वेश हा खूप हुशार आणि होतकरू मुलगा आहे. त्याच्याइतकं दगडाला दगड घासून ठिणगी काढण्याचं कौशल्य पंच-जंगलात कोणाकडे नाही. त्याला प्राण्यांचं ज्ञानदेखील आहे. परवा तो काय म्हटला होता बरं? हां! मांसाहारी प्राणी आणि शाकाहारी प्राण्यांचे दात वेगळे असतात. चला, या प्राण्याच्या जवळ जाऊन त्याचे दात बघूया आणि मगच याला घाबरायचं का नाही हे ठरवूया. उगाच भीती वाटून पळून जाण्यात काही पॉईंट नाही. नवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत. त्याचे दात आणि नखं एकदा तपासून बघूया, त्याचं वागणं आणि मॅनर्स जवळून बघूया, आणि मगच त्याच्याबद्दल मत बनवूया. पुराव्याशिवाय निर्णय घायला लागलो तर आपल्यात आणि neanderthal मध्ये काय फरक राहील!?....’’ असा जर विचार माझ्या खापर सुपर पणजोबांनी केला असता, तर त्या ‘आदी-संग्राम’चा आजचा संग्राम झाला असता का? एक म्हण आहे - first impression is the last impression. खरंतर मूळ इंग्रजी म्हणीत last म्हणजे ‘शेवटचे’ ऐवजी lasting म्हणजे ‘दीर्घकाळ टिकणारे’ असं अपेक्षित आहे; पण ‘शेवटचे’ हा मराठी अर्थ असलेली म्हणच अधिक उपयुक्त आहे. उत्क्रांतीमध्ये जे पब्लिक तडकाफडकी, prima facie पुराव्यावर निर्णय घायचे, तेच टिकले आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांमध्ये हाच गुण अधिक प्रबळ होत गेला. 

आपल्या मेंदूचं हार्डवेअर हे प्राचीन काळातलं आहे. हजारो, लाखो वर्ष, ज्यावेळी आपली टोळी, १०० -१५० गावकरी/ जंगलकारी हेच आपलं संपूर्ण विश्व होतं, आपला प्रोसेसर, रॅम आणि हार्डडिस्क पुरेशी होती; पण गेली दोनशे- तीनशे वर्ष आपण (आणि गेली १०-१५ वर्ष जरा जास्तच) आधुनिक सॉफ्टवेअर त्यावर लोड करत आहोत. एरर तर येणारच! 

पुढच्या सदरात आपण रिपेअरिंगचं काम चालू करूया! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com