विचार ते 'फेरविचार'

विचार ते 'फेरविचार'

एकदा आपण एखाद्या विषयावर आपलं मत बनवलं, की ते पुन्हा तपासून बघण्याऐवजी फक्त त्याच घटना किंवा पुराव्यांकडे बघायचं, विश्वास ठेवायचा जे आपल्या भूमिकेच्या बाजूनं आहेत याला ‘कन्फर्मेशन बायस’ (पुष्टीकरण पूर्वग्रह) म्हणतात हे आपण मागच्या लेखात बघितलं.

याला आपण सगळेच बळी पडतो. यातून कोणीही सुटलेलं नाही; कारण उत्क्रांतीनं आपल्याला तसं घडवलं आहे. अर्थात, मनुष्य आणि इतर प्राण्यात फरक एवढाच, की आपण आपल्या विचारांबद्दल विचार करू शकतो. प्राणीदेखील विचार करतात, कुत्री, हत्ती, डॉल्फिन वगैरे तर खूपच करतात म्हणे. म्हणजे एखादा कुत्रा, घरात कोणी खाताना दिसलं, की विचार करतो, ‘अरे वाह! आपली मजा आहे बुवा. मला आत्ताच खायला दिलं होतं; पण तरीही मी त्यांच्यासमोर बसलो, लाडात आलो, की परत खायला मिळेल. मालकीण आधी ‘नो नो’ म्हणेल; पण, थोड्या वेळानं काहीतरी मिळेलच.....’’ कुत्रा मर्यादित विचार करतो; पण मनुष्य मात्र विचाराबद्दल विचार करतो. मीच घ्या ना. 

रात्रीच्या जेवणाआधी मी ‘पोटाचा वॉर्म-अप’ व्हावा म्हणून तासभर आधी नाश्ता करतो. पोटावर एकदम लोड येऊ नये म्हणून! हे बायकोला कळू न देता करायचं म्हणजे कसरतीचं काम! फ्रिज, कपाटामधल्या सगळ्या पदार्थांचा थोडा थोडा अंश घ्यायचा- म्हणजे काहीतरी खूप कमी झाल्यासारखं वाटत नाही. खाल्ल्यावर भांडी धुवून पुसून ठेवायची, आणि ओटा, मायक्रोवेव्ह असे साफ करायचे, की ते आत्ताच साफ केलंय हेही कळलं नाही पाहिजे.

एवढं सगळं करूनदेखील, ऑफिसवरून परत आलेली व्हिलनरूपी बायको आणि जेम्स बॉंडरूपी माझी नजर जेव्हा भिडते...  टॅण्ट ढॅण! तेव्हा माझ्या मनात येतं ‘आता मालकीण जेवायला बसली, की आधी नो नो म्हणेल; पण शेवटी आपल्याला पुन्हा खायला देईल. कुत्र्यांना पुनःपुन्हा एवढं खायला मिळतं! मी तर एक प्रसिद्ध आरजे अहे. अरे, आपण आपलीच तुलना कुत्र्याशी करत आहोत. काय दिवस आलेत. तसंही आपण आत्ताच चहा, चपाती, वेफर्स, दोन चमचे वरणभात आणि मूठभर चिवडा खाल्ला आहे, हे तिला माहीत असणारच. आणि तिला माहीत आहे हे मला माहीत आहे, हेही तिला माहीत असणार. खरंतर तिला माहीत आहे हे मला माहीत आहे, हे तिला माहीत आहे हेही मला माहीत आहे!...’’

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तात्पर्य काय, की आपण आपल्या विचारांकडे बघू शकतो, त्यावर विचार करू शकतो. त्यामुळे या पुष्टीकरण पूर्वग्रहावर मात करू शकतो; पण तसं करायचं म्हणजे आपला ‘कॉन्फिडन्स’ थोडा कमी करावा लागेल. प्रचंड आत्मविश्वास असणारे लोक आपल्याला आवडतात. एखादा पुढारी जेव्हा छाती ठोकून बोलतो, तेव्हा आपला उर भरून येतो. सौम्य, मृदुभाषी नेते आपल्याला मिळमिळीत वाटतात.... पण बऱ्याच वेळा, कमी अभ्यास केलेल्या लोकांमध्येच कमालीचा आत्मविश्वास असतो. तज्ज्ञ मंडळी जरा दबकत, थांबत, विचार करत बोलतात, वागतात. व्हॉट्सॲपवर, आणि संसदेतसुद्धा. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आपलंच खरं आणि वेगळं काही असूच शकत नाही, हे ‘टोमॅटो, भाजी की फळ’, ‘मिसळ पुण्याची की कोल्हापूरची’ अशा विषयांसाठी ठीक आहे; पण देशप्रेम, राजकारण, धर्म, प्रशासन, विज्ञान, आधुनिक वैद्यकशास्त्र वगैरे विषयांवर नाही. पुष्टीकरण पूर्वग्रहांवर मात करायची म्हणजे आपल्या विपरीत मतं असलेल्या लोकांचं म्हणणं ऐकून घायचं, समजून घ्यायचं; पण यासाठी आधी आपला कॉन्फिडन्स थोडा बाजूला ठेवावा लागतो, नाहीतर समोरच्याच्या युक्तिवादामुळे आपला कॉन्फिडन्स कमी होईल, या भीतीनं आपण आपले कान बंद करतो. आइनस्टाइन म्हणायचे, ‘मी जितकं जास्त समजून घेतोय, तितकं जास्त मला समजायला लागलंय, की मला किती कमी समजतं.’ खरंतर हे कदाचित सॉक्रेटिसनं म्हटलं होतं; पण मी तुम्हाला ठामपणे नाही सांगू शकणार!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com