esakal | गोडसेच गांधींचा मारेकरी नाही... | Nathuram Godse
sakal

बोलून बातमी शोधा

Nathuram Godse Mahatma Gandhi
गोडसेच गांधींचा मारेकरी नाही...

गोडसेच गांधींचा मारेकरी नाही...

sakal_logo
By
राहुल गडपाले

सामाजिक अध:पतनाच्या वाटचालीची कारणमीमांसा करताना सिद्धांतपूर्ण विचारांचे मारेकरी शोधावे लागतात. जेव्हा भारतीय समाजव्यवस्थेच्या सामाजिक जाणिवेचा आणि नैतिक आदर्शाचा विषय येतो तेव्हा गांधींचा विषय सोडून आपल्याला पुढे जाता येत नाही. गांधी ही भारतीय समाजाची जगातली ओळख आहे. तो आपल्या समाजाचा मानवी चेहरा आहे. आज गांधी आपल्यात नाहीत. नथुराम गोडसे नावाच्या माणसाने त्यांची हत्या केली; मात्र त्यात धारातीर्थी पडले ते केवळ एक शरीर. गांधींचे विचार कधीच मरत नाहीत; पण तरीही त्यांची हत्या थांबत नाही. त्यांची रोज हत्या होते. त्याचे मारेकरी रोज बदलतात. या मारेकऱ्यांच्या यादीत आता आणखी एका नावाची भर पडली आहे. ते नाव आहे महेश मांजरेकर...

सामाजिक घटनांच्या क्रिया-प्रतिक्रियांच्या परस्परसंबंधांचे विश्लेषण करताना आपण ज्या समाज नावाच्या एका व्यवस्थेत वावरतो, त्याचा पोत तर बिघडत नाही ना, याचा सतत विचार व्हावा लागतो. ज्या जाणिवेच्या आणि सामाजिक तत्त्वज्ञानाच्या अंत:प्रेरणेतून समाजविकासाच्या संवेदना जागृत होत असतात, त्याची पाळेमुळे आपल्याच अंतरंगाच्या भूगर्भात खोलवर रुतलेली असतात. मातीच्या पुतळ्यांना आकार देताना कुणी त्यात फक्त पाणी घालतं, तर कुणी कस्तुरीचा सुगंध. ज्याची मशागत करण्याची पद्धत संस्कारक्षम आणि शुद्ध असते, त्या पुतळ्यांचा सामाजिक विकास सुगंधी होतो; तर पाण्याच्या अतिवापराने काही मुळे कुजतात, सडतात, अविचारांच्या अविवेकी साखळदंडात बांधली जातात. परिणामी अशा मुळांमधून अविचारांचा जन्म होतो. तेच पुढे सामाजिक अध:पतनाच्या प्रक्रियेचे भवितव्य बनतात. सामाजिक अध:पतनाच्या वाटचालीची कारणमीमांसा करताना सिद्धांतपूर्ण विचारांचे मारेकरी शोधावे लागतात. जेव्हा भारतीय समाजव्यवस्थेच्या सामाजिक जाणिवेचा आणि नैतिक आदर्शाचा विषय येतो तेव्हा गांधींचा विषय सोडून आपल्याला पुढे जाता येत नाही. गांधी ही भारतीय समाजाची जगातली ओळख आहे. तो आपल्या समाजाचा मानवी चेहरा आहे. आज गांधी आपल्यात नाहीत. नथुराम गोडसे नावाच्या माणसाने त्यांची हत्या केली; मात्र त्यात धारातीर्थी पडले ते केवळ एक शरीर. गांधींचे विचार कधीच मरत नाहीत; पण तरीही त्यांची हत्या थांबत नाही. त्यांची रोज हत्या होते. त्याचे मारेकरी रोज बदलतात. या मारेकऱ्यांच्या यादीत आता आणखी एका नावाची भर पडली आहे. ते नाव आहे महेश मांजरेकर...

गांधी हा भारतीयांसाठी एक विचार म्हणून महत्त्वाचा आहे, तसाच तो कायम वादातीतही आहे. त्याची दोन मूळ कारणे आहेत. लोक गांधींना दोन वेगवेगळ्या अंगाने अभ्यासतात. गांधी एक व्यक्ती म्हणून, त्यांच्या सत्याच्या प्रयोगांतून जसे समोर आले तसे; आणि दुसरे त्यांनी भारताची सामाजिक आणि राजकीय बांधणी करताना वेळोवेळी ज्या भूमिका घेतल्या त्यातून त्यांच्याबद्दल समाजात तयार झालेल्या प्रतिमेतून. अनेक प्रसंगांमध्ये गांधींच्या व्यक्तिमत्त्वाचे अंतर्विरोधी पैलू समोर आले आहेत; पण परिस्थितीतील बदलांचा सामना करीत गांधींना नव्या भारताची उभारणी करायची होती. त्या वेळी घडणाऱ्या घटनांना राजकीय प्रेरणा होती, तशीच समाजातील वेगवेगळ्या विचारधारांच्या घुसळणीतून बाहेर पडत त्यांना देशबांधणीच्या एका धाग्यात ओवण्याचे महत्त्वाचे काम गांधींकडे होते. गांधींनी भारताची बांधणी करतानाच त्याचे सामाजिक स्वास्थ्य कसे अबाधित राहील, याचीदेखील काळजी घ्यायची होती. त्यातून त्यांच्या हातून काही चुकाही झाल्या. त्यातल्या काही चुका अजाणतेपणी; तर काही गोष्टी गांधींनी निश्चित भूमिका ठरवून केल्या होत्या. पण म्हणून गांधींनी समाजबांधणीचे केलेले काम इतिहासाच्या पटलावरून पुसून टाकता येणार नाही; पण हे महत्त्वाचे ऐतिहासिक संदर्भ आणि त्यांची देशाच्या बांधणीतील धाटणी समजून घेणे मांजरेकरांसारख्यांना झेपणारे नाही. गांधी समजून घेताना सदाचाराचे पाठ शिकायची तयारी लागते.

पच्चास तोला संस्कृतीचे नाट्यमय आणि गुन्हेगारी पांडित्य समाजासमोर मांडणाऱ्या आणि त्याला ‘वास्तवा’चे लेबल लावणाऱ्यांना ते कधीही परवडणारे नाही. गांधीतत्त्वाचा पायाच मुळात नैतिकतेच्या भरवशावर उभा आहे. माणसाने नैतिकतेने वागावे आणि नीतीने चालावे, असे सांगणारे गांधी मात्र आजही भारतीय समाजव्यवस्थेच्या नैतिक आदर्शाचा परमोत्कर्ष बिंदू गाठू शकले नाहीत. कारण सत्याच्या अंतस्थ प्रेरणेतून त्यांनी स्वत:ला एखाद्या पुस्तकासारखे सर्वांसमोर उघडून ठेवले. त्यामुळे आजही आम्हाला नोटेवर गांधी चालतो. त्याचा ब्रँड म्हणून केलेला वापर चालतो; पण जेव्हा गांधी आचरणाची वेळ येते तेव्हा उजवीकडून येणारे विरोधी प्रवाह आक्रमक होतात. तात्त्विक विचारांच्या लढाईत विरोधालाही तेवढेच महत्त्व असते आणि आहे. गांधींनीही विरोधी विचारांना कायम स्थान दिले; पण त्यामुळे आपण रोज ऊठसूट गांधींची हत्या करणार असू, तर आपली नैतिकता कुठल्या तरी बाह्य तत्कालिक परिणामांवर अवलंबून आहे, असेच म्हणावे लागेल. जगाला अहिंसेचा संदेश देणाऱ्या, विश्वाला पूजनीय असणाऱ्या महात्म्याच्या देशात त्याच्या मारेकऱ्याचे गुणसंकीर्तन व्हावे. त्याच्या जयंत्या-मयंत्या साजऱ्या व्हाव्यात, हे फारच खेदजनक आहे. अलिकडच्या काळात तर काहींनी महात्म्यांच्या नावांचा हवा तसा वापर करायला सुरुवात केली आहे. निवडणुकांच्या काळात विरोधात आणि जगाला दाखवताना गांधींसमोर नतमस्तक होऊन आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न होतो; पण गांधींचे विचार त्यांच्या मूल्यांमध्ये आहेत, चरख्यात नाहीत, हे त्यांना कसे कळणार.

मांजरेकरांचे निर्मितीमूल्य त्यांच्या कलाकृतीने मिळवलेल्या यशापयशातून सर्वांनी पाहिले आहे. त्यांच्या चित्रपटांमधून विशेषत: गुन्हेगारांचे उदात्तीकरणच अधिक पाहायला मिळते. मागणी तसा पुरवठा, असे कारण ते यावर देऊ शकतील. त्यांच्या ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटांतून त्यांनी मराठी माणसाला झोपेतून उठवण्याचा चांगला प्रयत्न केला होता; मात्र त्यानंतर त्यांची तत्त्वजिज्ञासा झोपी गेली की काय, असा प्रश्न पडतो. गेल्या काही काळामध्ये मांजरेकरांनी सामाजिक विषयांची ज्या पद्धतीने हाताळणी केली, ते पाहिले तर त्यांना केवळ काही विशिष्ट समाजातल्या आणि आज हद्दपार झालेल्याच प्रथा-परंपरांमध्ये गुंतून पडण्याची भारी हौस असल्याचे जाणवते. चित्रपटाचा विषय काय निवडावा आणि तो कसा मांडावा, हा त्यांचा अधिकार आहे. त्याचे त्यांना स्वातंत्र्य आहेच; पण विचारांच्या माणसाची लढाई लढताना त्याच्या मारेकऱ्याला हिरो करण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांनी करू नये, एवढीच काय ती अपेक्षा. तिकडे दक्षिणेत मंडेला आणि कर्ननसारखे सिनेमे सामाजिक विषयांना हात घालूनही व्यावसायिक बाजूदेखील भक्कमपणे सांभाळतात. विशेष म्हणजे अशा विषयांवर बोलण्याची आणि अत्यंत बोल्डपणे तो मांडण्याची हिंमत कुणीतरी दक्षिणेकडे करतंय आणि महाराष्ट्र मात्र पुरोगामित्वाच्या फुशारक्यांमध्येच अडकतोय की काय, अशी परिस्थिती आहे. त्यातून मग ‘एफ-यू’सारखे टुकार विषय हाताळले जातात. एक बाजू फसली की आधीच जहरी असलेली दुसरी अशी बाजू शोधून काढायची की वातावरण ढवळून निघेल. असे मार्केटिंगचे नवे तंत्र हल्ली काहींनी आत्मसात केलेले दिसते. त्याला हरकतही नसते; मात्र त्यातून आपण आपल्या बांधणीच्या पायालाच हात घालत असू तर विषय संपला.

राहिला प्रश्न गोडसेचा... तर त्याने गांधींची हत्या का केली, याची विस्तृत भूमिका खटल्याच्या दरम्यान आपली बाजू मांडताना केली होती. त्या वेळची परिस्थिती पाहता ती माहिती बराच काळ सर्वसामान्यांपासून लपवून ठेवण्यात आली होती आणि त्यासाठी काँग्रेसला निश्चितच दोषी ठरवायला पाहिजे. ‘व्हाय आय असॅसिनेटेड गांधी’ या पुस्तकात हा विषय सविस्तरपणे मांडला आहे. अगदी अॅमेझॉनवरदेखील हे पुस्तक सहज उपलब्ध आहे. गांधीहत्येची चर्चाच मुळात सुरू होते, ती ‘हत्या की वध’ या वादातून. तसे पाहिले तर भारतीय कायद्यानुसार हत्या आणि वध अशा दोन वेगळ्या व्याख्या केल्या जात नाहीत; मात्र ज्या विचारधारेतून गोडसेने गांधीहत्येची कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न केला, त्याचा संबंध थेट पुराणकाळापर्यंत जाऊन पोहोचतो. कुठल्याही प्रकारच्या विरोधी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी हिंसा हे एक दैवी शस्त्र आहे, असे मानणाऱ्या काही विचारधारा आहेत. त्या विचारांच्या प्रेरणेतून गोडसेने गांधीहत्या केली, असे मानले जाते. या घटनेनंतर आजही या विषयावर वारंवार ऊहापोह केला जातो. जगासमोर स्वतःची सेक्युलर परंपरा दाखवणाऱ्या देशात हा प्रश्न मात्र कायम अनुत्तरित राहिला आहे. गांधीहत्येची जबाबदारी गोडसेने स्वीकारली. त्याची शिक्षाही भोगली. कायद्याच्या राज्यात कायद्याला मान्य असलेल्या पद्धतीने गोडसेने शिक्षा झाली; मात्र तरीही गांधींची हत्या थांबलेली नाही. गोडसेच्या गुन्ह्याचे पापक्षालन करण्यासाठी अनेक गट आजही झटताहेत. त्यांची अंतस्थ प्रेरणा तरी नेमकी काय आहे, याचा अंदाज बांधणेही कठीण आहे. गांधी सांगतात त्या संस्कार आणि स्वानुभावाधारित विवेकाच्या शोधाची जबाबदारी कुणीतरी घ्यायला हवी होती; पण त्याऐवजी गोडसेच्या कृत्याचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न मांजरेकरांसारख्या काहींनी चालवला आहे. त्यांना गांधींच्या सदाचाराच्या तत्त्वाची शिकवण देण्यासाठी गांधीगिरी करायला आता कुठला तरी रघु शोधून काढायला लागेल. गांधींच्या विचारांचा विरोध समजण्यासारखे आहे. त्यावर चर्चा होऊच शकते; पण त्यासाठी गांधीहत्येच्या उदात्तीकरणाचे पाप मांजरेकरांनी आपल्या माथी घेऊ नये. नैतिकता कुठल्याही बाह्य तत्कालिक परिणामांवर अवलंबून न राहता मानवी अंतरंगात शुद्ध आणि निर्भेळ नीती प्रादुर्भूत करू शकते. या धीरोदात्त महामानवाच्या तत्त्वांचा, चांगल्या संस्कारक्षम विचारांचा सामाजिक विकासाला आधार द्यायची गरज आहे. ते करण्याऐवजी जर रोज गांधीविचारांचा खून होणार असेल, तर भवितव्याची भेसूर स्वप्ने मन:चक्षूपुढे उभी राहिल्याशिवाय राहत नाही.

rahulgadpale@gmail.com

loading image
go to top