हिंदुत्व की हिंदवी स्वराज्य?

भारतीयत्व आणि हिंदुत्व जणू एकच असल्याचा भास निर्माण केला जातोय. तसा प्रयत्न करणार्‍यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या हिंदुत्वाचे ब्रॅंड ॲम्बेसेडर ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
chhatrapati shivaji maharaj
chhatrapati shivaji maharajsakal
Summary

भारतीयत्व आणि हिंदुत्व जणू एकच असल्याचा भास निर्माण केला जातोय. तसा प्रयत्न करणार्‍यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या हिंदुत्वाचे ब्रॅंड ॲम्बेसेडर ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

भारतीयत्व आणि हिंदुत्व जणू एकच असल्याचा भास निर्माण केला जातोय. तसा प्रयत्न करणार्‍यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या हिंदुत्वाचे ब्रॅंड ॲम्बेसेडर ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन महाराजांनी हिंदवी स्वराज्याची संकल्पना मांडली आणि ती खरी करून दाखवली. मुळात त्यांचा सर्वसमावेशक विचारच त्यांच्या यशाचं खरं गमक होता. शुद्ध व सत्त्वशील विचारांचे महाराज चुकीच्या संकल्पनांपासून कायम अलिप्त राहिले. राष्ट्रभक्त, आदर्श पुत्र, युद्धनीतीधुरंधर, स्वराज्य संस्थापक, राजनीतिज्ञ, स्फूर्तिप्रद, कुशल प्रशासक, मानवतावादी आणि रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज आजही आदर्श राज्याचे खरे नायक ठरतात. आजही कुठलाही विशेष बदल न करता शिवाजी महाराजांचा राजकीय आदर्श जसाच्या तसा अंगीकारण्यासारखा आहे; पण तसे करण्याऐवजी स्वार्थी राजकारणासाठी महापुरुषांच्या नावाचा वापर करण्याचा आणि स्वार्थापोटी चुकीच्या शिकवणींमधून भक्तसंप्रदाय तयार करण्याचा प्रयत्नच अधिक होताना दिसतो.

अलिकडच्या भारतीय राजकारणाच्या पटलावरची कुठलीही घटना-घडामोड इतिहासाच्या दाव्यांशिवाय पूर्णच होत नाही. घडामोडीचे नागमोडी रस्ते मुळात ज्या धर्म नावाच्या उत्तुंग पर्वतशिखरांमधून वळण घेत जातात, तिथे प्रत्येक वळणावर एक नवा सामना वाट पाहत असतो. या सामन्यात माणूस माणसासमोर उभा असला आणि सामन्याचे पटांगण कुठल्याही प्रदेशात असले, तरी कुठली तरी एक बाजू ही धर्माचीच असते. जेथे धर्म येतो तेथे खरे तर समतोल यायला हवा; पण धर्मधुरिणांनी धर्मांना मानवतेच्या चष्म्यातून पाहायचे केव्हाच सोडून दिले आहे. त्यामुळे आपल्याकडे धर्मांचे अर्थ निव्वळ रंगांवर अवलंबून आहेत की काय, असे वाटायला लागते. विशेषत्वाने भारतीय राजकारणाचा सारीपाट हा तर एक प्रकारची धार्मिक लढाई भासू लागला आहे. भारतीयत्व आणि हिंदुत्व जणू एकच असल्याचा भास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. तसा प्रयत्न करणार्‍यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या हिंदुत्वाचे ब्रॅंड ॲम्बेसेडर ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे; पण महाराजांनी कधीही कुठल्याही एका धर्माची तळी उचलून धरली नाही. अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्याची संकल्पना मांडली आणि ती खरी करून दाखवली. मुळात त्यांचा सर्वसमावेशक विचारच त्यांच्या यशाचं खरं गमक होता. आपण मात्र चुकीच्या संकल्पनांसाठी महाराजांचा हवा तसा वापर करतोय. शुद्ध व सत्त्वशील विचारांचे महाराज चुकीच्या संकल्पनांपासून कायम अलिप्त राहिले. राष्ट्रभक्त, आदर्श पुत्र, युद्धनीतीधुरंधर, स्वराज्य संस्थापक, राजनीतिज्ञ, स्फूर्तिप्रद कुशल प्रशासक, मानवतावादी आणि रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज आजही आदर्श राज्याचे खरे नायक ठरतात. सर यदुनाथ सरकार म्हणतात त्याप्रमाणे आजही कुठलाही विशेष बदल न करता शिवाजी महाराजांचा राजकीय आदर्श जसाच्या तसा अंगीकारण्यासारखा आहे; पण तसे करण्याऐवजी स्वार्थी राजकारणासाठी महापुरुषांच्या नावाचा वापर करण्याचा आणि स्वार्थापोटी चुकीच्या शिकवणींमधून भक्तिसंप्रदाय तयार करण्याचा प्रयत्नच अधिक होताना दिसतो.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना अस्तित्वात आणली. ते स्वराज्याचे संस्थापक होते; मात्र या कल्पनेचे संकल्पक होते शहाजी राजे. मुघलांच्या सत्तेला धैर्याने तोंड देणारे पहिले जहागीरदार म्हणजे शहाजी. शिवाजी महाराजांना पराक्रमी बनवण्यात सर्वांत मोठा वाटा होता तो जिजाऊंचा. वडिलांची संकल्पना आणि धीरोदात्त, राजकारणधुरंधर जिजाऊंची शिकवण यातून शिवाजी नावाचे अभेद्य रसायन तयार झाले. कुठलीही जोखमीची मोहीम हातात घेऊन फत्ते करण्यासाठी लागते धाडस आणि हे धाडस महाराजांच्या अंगी जिजाऊंच्या शिकवणुकीतून आले होते.

या धाडसाच्या जोरावर सर्वसमावेशक स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. स्वतःच्या सैन्याची उभारणी करताना महाराजांनी केव्हाही फक्त महाराष्ट्राचा विचार केला नाही. त्यांच्या सैन्यात राष्ट्रीयत्वाची झलक पाहायला मिळत होती. त्यांच्या सैन्यात कृषकवर्गाचा जास्त समावेश होता. शिवाय त्यामध्ये मराठे, ब्राह्मण, कुणबी, शेणवी, महार, न्हावी, मुसलमान, धनगर, कोळी, भंडारी, रामोशी अशा विविध ५६ जातींच्या लोकांचा समावेश होता. देशातल्या विविध जाती-धर्मांमधील लोकांना शिवाजी महाराजांच्या सैन्यात स्थान होते. मग आता महाराजांना हव्या त्या हिंदुत्वाच्या संकल्पनेशी बांधून ठेवून कसे चालेल? पुढच्या पिढ्यांना हा इतिहास सांगताना, महाराजांच्या एकीच्या बळाचे दाखले देताना त्यांनी जपलेली सर्वधर्मसमभावाची शिकवणदेखील सांगण्याची गरज आहे; मात्र वारंवार त्याकडे दुर्लक्ष केले जाते. महापुरुषांना कुठल्या विशिष्ट गटासोबत बांधण्याने कुणाचा राजकीय फायदा होत असेलही कदाचित; पण त्यामुळे होणारे सामाजिक नुकसान कधीही भरून न निघणारे ठरते. राजकारणाच्या माध्यमातून हिंदुत्व ठसवण्याचा आणि त्यासोबत महाराजांचे नाव जोडण्याचा प्रयत्न करणे, हा सामाजिक अपराध आहे. केवळ मंदिर उभारण्याच्या वल्गना करून हिंदुत्व ठसवता येत नाही. ते हिंदुत्व संकुचित असेल, त्यात संदिग्धता असेल आणि कुठलीही विशिष्ट चौकट नसताना केवळ माणसामाणसांत भेद करण्यासाठी त्याचा वापर होत असेल, तर अशांनी महाराजांचा आदर्श समोर ठेवण्याची गरज आहे.

ख्रिस्तपूर्व आठव्या शतकाच्या सुमारास लिहिल्या गेलेल्या तांत्रिक कामात हिंदू शब्दाचा पहिल्यांदा वापर झाल्याचे दाखले दिले जातात; पण मुळात हिंदू शब्दाचा धर्मासाठी वापर करण्याला अगदी अलिकडच्या काही वर्षांमध्ये सुरुवात झाली. मुळात हिंदूचा अर्थ धर्म असा नसून, लोक असा आहे. मात्र हा शब्द अतिशय प्राचीन आहे, यात वाद असण्याचे कारण नाही. प्राचीन पर्शियन ग्रंथामध्ये तसेच अवेस्तामध्येदेखील या शब्दाचा उल्लेख आहे. पाश्चात्त्य आणि मध्य आशियायी लोक सिंधू नदीच्या दुसऱ्या बाजूला राहणाऱ्या लोकांचा हिंदू असा उल्लेख करीत. त्याला वर्णद्वेशी छटादेखील होती. हिंदू धर्माची एक ठराविक अशी कुठलीही व्याख्या नाही. मुळात ही व्याख्या नेमकी करावी तरी कुणी, यावरूनही अनेक वाद होऊ शकतात. जॉन डेवी यांनी धर्माची अत्यंत उत्तम व्याख्या केली आहे. धर्म अस्तित्वाच्या तुकड्या-तुकड्यांच्या आणि सतत बदलत राहणाऱ्या भागांचे प्रामाणिक, यथार्थ दर्शन घडवणारे चित्रण करतो, असे डेवी म्हणतात. महात्मा गांधी म्हणतात, त्याप्रमाणे अहिंसात्मक साधनांच्या माध्यमातून घेतलेला सत्याचा शोध म्हणजे हिंदू होय. आता ही व्याख्या योग्य मानायची की जॉन डेवी यांनी केलेली व्याख्या सुसंगत मानायची, याचा निर्णय घेणे फारच कठीण आहे. अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आत्मसात केलेली सर्वसमावेशक आदर्श राज्याची संकल्पना पुन:पुन्हा आदर्श सिद्ध होते.

छत्रपतींचा राजकीय लाभासाठी उपयोग करणारे मुस्लिमद्वेष्टेपणाचे बळी ठरले आहेत. अशा वेळी महाराजांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न अनेकदा होताना दिसतो. महाराज कधीच मुस्लिमद्वेष्टे नव्हते; मात्र तरीदेखील अनेक जण त्यांच्याविषयी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यासाठी शिवाजी महाराजांनी इतर धर्मांतील लोकांचा केलेला सन्मान आणि त्यांना दिलेली वागणूक लक्षात घेतली पाहिजे. शिवाजी महाराजांनी रायगडावर मुसलमानांसाठी मशीद बांधली होती. स्वराज्यातील मशिदींची निगा राखण्याचे कामदेखील प्रशासनाकडे देण्यात आले होते. महाराजांनी अनेक मुस्लिम संतांना जमिनीदेखील इनाम दिल्या होत्या. नूर खान बेग हा महाराजांचा १६५७ पर्यंत सरनौबत होता. शिवाजी महाराज अफजलखानाच्या भेटीला गेले तेव्हा त्यांच्या दहा अंगरक्षकांमध्ये सिद्दी इब्राहीम नावाच्या मुस्लिम अंगरक्षकाचाही समावेश होता. मुल्ला हैदर शिवाजी महाराजांचा परराष्ट्रप्रमुख होता; तर दौलतखान, सिद्धी मिस्त्री व इब्राहीम खान हे महाराजांचे आरमारप्रमुख होते. स्वतःचा जीव धोक्यात टाकून शिवाजी महाराजांना औरंगजेबाच्या मगरमिठीतून सोडवणारा मदारी मेहतर हा मुसलमान होता आणि आजही मीर मुहम्मद याने काढलेले चित्र हे शिवाजी महाराजांचे एकमेव अस्सल चित्र मानले जाते, या गोष्टी दुर्लक्ष करण्यासारख्या नाहीत. काही पाश्चात्त्य लोक सर्व भारतीयांना हिंदूच समजतात आणि त्यात चुकीचे असे काहीच नाही.

मुळात धर्म हा एक मूलभूत शब्द असून एकत्र बांधून ठेवणे, असा त्याचा अर्थ आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचं बिरूद मिरवताना सर्वसमावेशकतेचा पहिला परिपाठ आपल्याला घालून दिलाय तो खुद्द शिवाजी महाराजांनीच. आज मात्र त्यांच्या विचारांना तिलांजली देण्याचे काम काही मंडळी करताना दिसतात. हिंदुत्वाचा धर्माधारित अर्थ अपेक्षित असता, तर महाराजांच्या फौजांमध्ये अठरापगड जातीचे लोक दिसले नसते. त्यामुळे हिंदुत्व म्हणजे एकसंधत्व, असा नवा अर्थ शोधण्याची खरी गरज आहे. आज आपण लादू पाहतोय ते धार्मिक हिंदुत्व आणि महाराजांच्या स्वराज्याच्या संकल्पनेतले हिंदवी स्वराज्य याचा विवेकबुद्धीने विचार करायला लागणार आहे. श्रींच्या कृपेने राज्य मिळाले, हे राज्य श्रींचे आहे, असे महाराज म्हणत. म्हणजेच हे जनतेचे राज्य आहे, असा अर्थ त्यांना अभिप्रेत होता. त्यांनी आपल्या राज्याचे नाव हिंदवी स्वराज्य असे ठेवले. हिंदवीचा अर्थ हिंदूंचे असा नसून या शब्दाचा अर्थ भारतीय, असा समजण्यात येत होता.

देशाचा, राज्याचा विचार करताना, लोकहिताची धोरणे आखताना आजही महाराजांच्या शासनव्यवस्थेच्या आधारभूत तत्त्वांचा आदर्श समोर ठेवला जाऊ शकतो. छत्रपती, त्यांचे अष्टप्रधानमंडळ, सैन्यातील शिस्त, परराष्ट्र न्याय व धर्मखाते, प्रांतिक प्रशासन, परगणा, तर्फ, मौजा, अर्थखाते, महसूल व चौथाई अशा कित्येक प्रशासनिक गोष्टींचा आदर्श शिवाजी महाराजांनी केव्हाच घालून दिलाय. महाराष्ट्रासारख्या महाराजांचे राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्यात तरी महाराजांच्या या अभ्यासाची हवी तशी दखल घेतली गेली की नाही, याचे उत्तर तुम्हीच तपासून पाहा. किल्ल्यांच्या सहाय्याने राज्याच्या रक्षणाचे पोलादी खांब उभारणाऱ्या राजांनी कुलवंतांऐवजी गुणवंतांना नोकऱ्या दिल्या आणि वतनाऐवजी वेतन देण्याची प्रथा तेव्हाच सुरू केली होती. महाराजांच्या स्वराज्यातील २४० किल्ल्यांमधील १११ किल्ले त्यांनी स्वत: बांधले होते. यावरून महाराज किती भविष्यवेधी होते याचा अंदाज येतो. जातीधर्मांचे भेदभाव पाळल्याचे एकही चुकीचे उदाहरण महाराजांनी घडू दिले नाही. उलट कल्याणकारी, सर्वसमावेशक, कार्यक्षम आणि निर्दोष प्रसासनावर त्यांचा भर होता. यावरून राज्यकारभार चालवणाऱ्यांनी धडे घेण्याची गरज आहे.

आज शिवजयंती. शिवजयंती साजरी करायची म्हणजे नेमकं काय करायचं? पताका, झेंडे, तोरणं आणि महाराजांच्या नावाचा जयघोष इतक्यानेच भागणार आहे का? बेंबीच्या देठापासून छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणणाऱ्यांना महाराजांच्या कार्याची, त्याच्या शिकवणीची खरंच काळजी आहे का? का निव्वळ दिखाऊ अस्मितेचे राजकीय डावपेच म्हणून गर्जना करायच्या आणि आपल्या कर्तव्यापासून दूर पळायचे. एकमेकांच्या मनात शंका-कुशंकांच्या लाल मुंग्या सोडायच्या आणि चुकीच्या दांभिकतेचे गोडवे गायचे, हे ज्याने त्याने आपापले ठरवावे; पण आज शिवजयंतीच्या दिवशी जर तुम्ही महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर नतमस्तक होताना तुमची चित्तवृत्ती प्रफुल्लित ठेवून आपल्या मनश्चक्षूंसमोर महाराजांच्या आदर्श राज्याची संकल्पना ठेवणार असाल, तर त्यांना तोच खरा मानाचा मुजरा ठरेल.

rahulgadpale@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com