बोलभांड तोंडांची टकळी बंद करायला हवीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vidhan Bhavan

राजकीय महत्त्वाकांक्षेची फुटकी पणती घेऊन आपला प्रकाश पाडण्याच्या नादात काही जण महाराष्ट्राच्याच पोलादी छातीवर वार करायला लागले आहेत.

बोलभांड तोंडांची टकळी बंद करायला हवीत

राजकीय महत्त्वाकांक्षेची फुटकी पणती घेऊन आपला प्रकाश पाडण्याच्या नादात काही जण महाराष्ट्राच्याच पोलादी छातीवर वार करायला लागले आहेत. उपराजधानीत झालेल्या विधानसभा अधिवेशनाचे दोन आठवडे निव्वळ गोंधळ, गदारोळ आणि चिखलफेक करण्यात गेले. निष्काम बरळणाऱ्या बोलभांड तोंडांची ही टकळी आता बंद व्हायला हवीत...

न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपल्याला माहिती आहेच. कुठलीही गोष्ट उंचावरून पडली की जणू काही तिला पृथ्वी खेचते आहे, अशा वेगाने ती खाली येते. न्यूटनला झाडावरून पडलेल्या सफरचंदाला पाहून प्रश्न पडले आणि त्याचे उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात त्याला गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत गवसला. न्यूटनला जसा गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला अगदी तसाच आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा आणखी एक शोध या प्रयोगातून लागला. यातून माणसाला शोधले की सापडते याची जाणीव झाली. आपल्याला प्रश्न पडले की, त्याची उत्तरे शोधता येतात, निष्कर्ष काढता येतात आणि आपल्याविषयी, आयुष्याविषयीचे कयास लावता येतात. आता माणूस सुधारला, पुढारलादेखील. रोज तो एक नवी उंची गाठतो. त्याची यशाची कमान दिवसेंदिवस वर जाते. तो रोज नवी शिखरे पादाक्रांत करतोय. आपल्या अस्तित्वाला पैलू पाडून तो रत्ने तयार करतोय. अशी असंख्य रत्ने आता तयार होत आहेत; मात्र रत्नमाळ काही त्याला साधता येत नाही. दरवेळी तो जेवढा उंचावर जातो तितक्याच वेगाने खालीही येतो आणि त्याने तयार केलेली उत्कृष्ट रत्ने उकिरड्यात मिसळून जावी अशी मातीमोल होतात.

राजकारणाच्या आखाड्यातही जणू काही गुरुत्वाकर्षणाचा नियम लागू पडावा अशी माणसे घरंगळत खाली येतात, पडतात, मातीच्या गाऱ्यात लोळतात, मातीमोल होतात. गेल्या काही वर्षांमध्ये राजकारणाच्या पातळीने जो काही नीचांक गाठलाय तो पाहिला की हा जणू एकमेकांची लाज काढण्यासाठी काढलेला नवा शेअर बाजार आहे की काय, असे वाटायला लागते. इथे एकमेकांविरोधात बोली लागते. कुणाची किंमत वाढते, कुणाची पडते. रोज इथे नवा किस्सा घडतो. आज घडले ते वाईट होते असे वाटत असतानाच दुसरा कुणीतरी त्याहीपेक्षा खालच्या पायरीवर उतरतो. जणू काही सर्वांची तळ गाठण्याची शर्यत लागली असावी. बरं, हे सगळे नुसते पडत असते तर हरकतही नव्हती. मात्र ते पडताना आपल्यासोबतच आपल्या अस्मितांचे मनोरेही खाली आणायचा प्रयत्न करतात. कुणीही उठतं, काहीही बरळतं. कुणालाच कुणाचा पायपोस नाही. अस्मितांचा अभिमान तर सोडाच, कुणाला आपल्या अस्तित्वाची घमेंडही वाटत नाही. निष्काम बरळणाऱ्या बोलभांड तोंडांची ही टकळी आता बंद व्हायला हवीत.

गेल्या वर्षभरात महाराष्ट्राच्या राजकारणाने बरीच उलथापालथ पाहिली. गेल्या तीस-चाळीस वर्षांतील राजकारणाला कलाटणी देणारा हा प्रवास होता. साहजिकच पायवाट तुडवली गेली की धूळ उडणारच! त्यामुळे त्यातून झालेला कोलाहल अमान्य करण्यात काहीच हशील नाही. महाराष्ट्राकडे लोक मोठ्या अपेक्षेने पाहतात. एक पुढारलेले, आधुनिक आणि विवेकी राज्य म्हणून देशात महाराष्ट्राची शान आहे. अस्मितेच्या विषयात हे राज्य संवेदनशील आहे.

आपल्या अस्मितेवर झालेला कुठलाही घाव झेलण्याची आणि तो दामदुप्पट परतवून लावण्याची क्षमता असलेले हे राज्य आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रेरणास्थानांना हात लावण्यास सहसा कुणी धजावत नाही, पण राजकीय महत्त्वाकांक्षेची फुटकी पणती घेऊन आपला प्रकाश पाडण्याच्या नादात काही मराठी बांधवच महाराष्ट्राच्या पोलादी छातीवर वार करायला लागले आहेत. दिल्लीच्या दाढ्या कुरवाळून सत्तेची लाळ चाटण्यासाठी महाराष्ट्राची मान मोडायची नवी कला त्यांनी आत्मसात केलेली दिसते. दोन आठवडे उपराजधानीत झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनातील चिखलफेक पाहिली, तर लोकशाहीच्या मंदिरात जणू मल्लांची कुस्ती रंगली की काय, असे वाटते. अवघी सभा सजली, माणसे जमलीत, सर्वांच्या पुढ्यात टेबलावर मातीचे ढिगारे लागलेत आणि प्रत्येकजण एकमेकांवर चिखलाच्या गोळ्यांचा मारा करताहेत, असेच ते दृष्य. आम्हीही माती खातो आणि तुम्हालाही भरवतो, अशीच काहीशी ही तऱ्हा; पण तत्त्ववेत्तेपणाची घमेंड मिरवणाऱ्या एकाही सुजाण माणसाला यात काहीही वावगे वाटत नाही. संपूर्ण अधिवेशन निव्वळ गोंधळ, गदारोळ आणि चिखलफेक करण्यात गेले. नागपुरात अधिवेशन भरवण्याची काही कारणे आहेत.

त्यानिमित्ताने त्या परिसरातील अनुशेष दूर करण्यासाठी, तिथल्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारने काही करणे अपेक्षित असते. मात्र तसे काहीही झाले नाही.

नागपुरातल्या रस्त्यांवर आदिवासींपासून ते पोलिस पाटलांपर्यंत अनेकांचे मोर्चे निघाले. अनेक मागण्या झाल्या; पण त्याचे कुणाला काय? भूतदया, विश्वबंधुत्व वगैरे संकल्पनांना विधान भवन परिसरात फिरकायलाही मनाई असावी कदाचित. इथे फक्त विवेकाशी फारकत घेतलेल्यांनाच प्रवेश मिळेल, अशा अभिनिवेशात सर्वजण विधान भवनाच्या परिसरात वावरताना दिसतात. सभागृहात चर्चा कशावर होते तर ती सुद्धा केवळ राजकीय अंतर्विरोधावरच. त्यामुळेच आलेले मोर्चे आणि सभांच्या गोंगाटाचा आवाज सरकार आणि विरोधी पक्ष कुणाच्याही कानावर पडला नाही. राजकीय स्थित्यंतर हे जरी सत्तासंघर्षाच्या केंद्रस्थानी असले तरी जेव्हा कोट्यवधी रुपये खर्चून लोकहितासाठी चर्चा करण्यासाठी सभागृहाचे इमले रचले जातात तिथे निदान काही ठोस गोष्टींवर चर्चा होणे अपेक्षित होते. दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन झाले नाही. त्यामुळे यंदाच्या अधिवेशनात अधिक चर्चा होतील. लोकांचे प्रश्न मांडले जातील. विदर्भातील अनेक विषयांना न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र तिकडे तसे काहीही घडले नाही. उलट एकमेकांवर कुरघोडी करण्यातच सत्ताधारी आणि विरोधकांनी वेळ वाया घालवला. उन्हाच्या झळा सोसत आशाळभूत नजरेने विधानसभेच्या दाराशी मोर्चे घेऊन आलेल्यांच्या पारड्यात मात्र अधिवेशनातून काहीही पडले नाही.

एकंदरीत काय तर आता राजकारण हा केवळ आरोप-प्रत्यारोपांचा खेळ बनून राहिलाय. काही लोकांचे मूळ कामच चिखलफेक करण्याचे आहे. प्रत्येक पक्षात असे दोन-चार वाचाळवीर मोकाट सोडलेले दिसतात. एकही पक्ष त्याला अपवाद नाही. त्यांना जणू विवादांचे कंत्राट दिलेले असावे अशा रितीने ते अगदी पद्धतशीरपणे एकएका विषयाला फाटे फोडत असतात. टीव्हीतल्या चर्चा, समाजमाध्यमांवर उघडपणे लोकांना चिथावणारी भाषणे केली जातात. त्यावर ट्रोलर्सच्या फौजा उतरतात आणि सामाजिक वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करतात. समाजमाध्यमांवर जी चीड आणि वैफल्यग्रस्तता आली आहे ती निदान प्रत्यक्षात तेवढी तिखट नसेल असे आजवर वाटत होते; मात्र अधिवेशनात ज्या पद्धतीने राजकीय कंपू एकमेकांविरोधात उभे झाले ते पाहता महाराष्ट्राच्या राजकारणाला असलेली मैत्रीपूर्ण राजकारणाची परंपरा मोडीत निघाली, असे म्हणायला काहीच हरकत नाही. आपल्याकडे जे जे चांगले आहे ते सर्व तातडीने बंद करायची कुणाला इतकी घाई झाली आहे कुणास ठाऊक; मात्र जो तो नीतिमत्तेवर तुळशीपत्र ठेवायच्या तयारीत दिसतोय.

नागपूर अधिवेशनात झालेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर गिरीश गांधी यांनी नागपुरात आलेल्या लोकप्रतिनिधींना थेट शहरातून निघून जावे, अशी मागणी केली. तत्पूर्वी कोबाड गांधी यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकाला दिलेला अनुवादाचा पुरस्कार रद्द केल्यावरूनही बरीच ओरड झाली होती. मात्र सरकार आणि विरोधी बाकावरल्या कुणालाही त्याविषयी फार काही बोलण्याची गरज वाटली नाही. गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या कारणांवरून राजकीय द्वंद्वांमध्ये झालेली शब्दफेक रोज जणू नीचांकी पातळी गाठत होती. त्यातून केवळ राजकीय कुरघोडी एवढाच विषय असता तर काही हरकतही नव्हती; मात्र आता राजकारणी एकमेकांच्या विरोधात व्यक्तिगत कुरघोड्या करताना दिसतात. त्यात सर्वसामान्य माणसांच्या व्यथा मात्र त्यांना दिसत नाहीत, हे विशेषत्वाने अधोरेखित होते आहे. त्यातच आपसी भांडणांचा समाचार घेताना महापुरुषांचादेखील अवमानकारक उल्लेख केला जातो. तरीदेखील कुणाच्याही धमण्यांमधले थंड पडलेले रक्त पेटून उठत नाही. साम्राज्यसत्ता हे राजकारणाचे अंतिम ध्येय असू शकेल कदाचित; पण देशाच्या भाग्योदयाचा मार्ग निष्कंटकपणे चोखाळायचा असेल तर सर्वसमावेशक विचार करण्याशिवाय गत्यंतर नसते. महाराष्ट्राच्या राजकारणाला एक चांगली परंपरा आहे आणि म्हणूनच महाराष्ट्राकडे इतर राज्य थोरल्या भावाच्या नजरेने पाहतात. मराठी मातीची ही इभ्रत सांभाळण्याची जबाबदारी आता मोठी आहे.