का आहे ‘मनोहर’ तरीही?

छत्रपती शिवाजी महाराज हे जर भिडेंचे अभिमानस्थान असेल तर त्यांच्या प्रवृत्तीतून ते प्रतित व्हायला हवे; मात्र त्यांच्या वर्तनातून तसे जाणवत नाही. हा माणूस नेहमी विखारी टीकेचे फुत्कार टाकतो.
Sambhaji Bhide Guruji
Sambhaji Bhide Gurujisakal

छत्रपती शिवाजी महाराज हे जर भिडेंचे अभिमानस्थान असेल तर त्यांच्या प्रवृत्तीतून ते प्रतित व्हायला हवे; मात्र त्यांच्या वर्तनातून तसे जाणवत नाही. हा माणूस नेहमी विखारी टीकेचे फुत्कार टाकतो. समाजात विष पसरवण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रवृत्तींना समाजविघातक घोषित करायला पाहिजे. मुळात भिडेंचा स्वभाव आक्रमक आहे. ही आक्रमकता वैचारिक नसून विद्‌ध्वंसक आहे.

आपल्या बोलण्यातून काहीतरी चांगले घडावे, अशा प्रयत्नातून ही व्यक्ती कधीच व्यक्त होताना दिसत नाही. उलट वाद-प्रतिवाद व्हावेत, भांडणे लागावीत, लोकांनी एकमेकांची डोकी फोडावीत हा एकच हेतू घेऊन हे भिडे काम करतात.

तुम्ही कुठल्याही विचारधारेचे असा; पण सर्वशक्तीनिशी तुमच्या विचारांशी प्रामाणिक असाल, तर तुम्हाला तुमच्या विचारांची पेरणी करण्यासाठी इतरांच्या विचारांवर विषारी रासायनिक फवारणी करायला लागत नाही. तुमच्या विचारांमध्ये ताकद असेल आणि त्या विचारांनी तुमच्या बुद्धीचे वैचारिक पोषण झाले असेल, तर त्यानंतरच्या वैचारिक सिद्धतेसाठी असावा लागतो तो वाणीचा संयम.

हे आजवर एकाच माणसाला जमले आहे आणि त्या माणसाचे नाव आहे मोहनदास करमचंद गांधी. हा संयम आचरण्यासाठी खुद्द विनोबांनाही प्रचंड मेहनत घ्यावी लागली. तेथे इतरांकडून अशा काही अपेक्षा करणे चूकच. तोंड झाकेल एवढ्या मिशा ठेवून आणि डोईवर पांढरी टोपी चढवून कुणी विद्वान पंडित होत नाही. हे मनोहर भिडे नावाचे रसायनदेखील असेच अर्धवट हळकुंडात पिवळे झालेल्या पाप्याचे पितर आहे.

स्वधर्माचरणाच्या नावाखाली भिडेंकडून केला जाणारा राजकीय बुभुक्षितपणा किळसवाणा आणि गलिच्छ तर आहेच; शिवाय अशा तोंडाळपणातून भिडेंची अस्तित्वहीनतेची भीतीही अधोरेखित होत आहे. मुळात वाट्टेल तेव्हा वाट्टेल ते बरळण्याची ही बोलभांड तोंडं तयार झाली आहेत ती प्रसिद्धीच्या हव्यासापायीच. त्यामुळे या माणसांना किती आणि कसे महत्त्व द्यायचे, हे ठरवण्याची हीच ती वेळ.

मुळात मनोहर असे काहीच करण्याचे सामर्थ्य या माणसात दिसत नाही. सांगायला म्हणून हा उच्चविद्याविभूषित वगैरे आहे म्हणतात; पण त्यांच्या देहबोलीतून तसे काहीच प्रतित होत नाही. मुळात आपल्या उच्चविद्याविभूषित असण्याचे कुठलेही पुरावे आजवर भिडेंना देता आले नाहीत. ज्या विद्यापीठात जो विषय शिकवलाच जात नाही, त्या विषयात पदवी मिळविण्याचे प्रावीण्य भिडे यांचे आहे.

आपल्या तोंडाळपणाने शक्य तेवढे वाद निर्माण करायचे आणि स्वतःला चर्चेच्या केंद्रस्थानी ठेवायचे एवढाच प्रताप बहुदा या माणसाला करता येतो. त्यामुळे कायम विवादित मुद्द्यांवर भाष्य करून हा माणूस समाजमन कलुषित करण्याचा वारंवार प्रयत्न करतो. ही व्यक्ती कुठल्या वैचारिक परंपरेला मानते, याविषयीदेखील शंकाच जास्त आहेत. संघाशी जमले नाही म्हणून ते संघातून बाहेर पडले. स्वतःची संघटना स्थापन केली.

आता काय तर यांना सर्व देशाचा रक्तगट बदलायचाय म्हणे; पण शिवाजी महाराजांचे विचार लोकांमध्ये रुजवण्यासाठी रक्तगट कशाला बदलायला लागतो. त्याला महाराज समर्थ आहेत. त्यांनी आपल्या कामाच्या कर्तृत्वाची मोहोर प्रत्येक भारतीय मनावर उमटवली आहे.

महाराजांना मोठे करण्यासाठी इतर उपटसुंभांनी खटाटोप करण्याची गरज नाही, हे आता तरी आपल्याकडील अतिशहाण्यांना कळायला हवे; पण अर्धवट बुद्धिप्रदर्शनाच्या हेतूने भिडे वारंवार बेताल वक्तव्य करतात. तो त्यांना स्वतःला जिवंत ठेवण्याचा यत्न असेल, असे आपण समजू; पण सरकार कुणाचेही असो ते भिडे प्रवृत्तीला घाबरते, हे मात्र यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. त्यामुळेच भिडेंची मुजोरी दिवसेंदिवस वाढतेच आहे.

मनोहर हे नाव बदलून त्यांनी स्वतःचे नाव संभाजी ठेवले. त्याविषयीही अनेक मतप्रवाह आहेत; पण तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मुळात भिडेंचा स्वभाव आक्रमक आहे. ही आक्रमकता वैचारिक नसून विद्‌ध्वंसक आहे. आपल्या बोलण्यातून काहीतरी चांगले घडावे, अशा प्रयत्नातून ही व्यक्ती कधीच व्यक्त होताना दिसत नाही.

उलट वाद-प्रतिवाद व्हावेत, भांडणे लागावीत, लोकांनी एकमेकांची डोकी फोडावीत हा एकच हेतू घेऊन हे भिडे काम करतात, असे दिसते. मानसशास्त्राच्या दृष्टीने थोडा विचार करायचा प्रयत्न केला, तर या माणसाचे वर्गीकरण हे परपीडक (sadist) किंवा परात्मपीडक (Sado masochistic character) या दोन प्रकारात करायला पाहिजे.

पहिल्या प्रकारातील व्यक्ती शारीरिक व मानसिक वर्तनातून अभिव्यक्त होत असते. एखाद्यावर पूर्ण नियंत्रण मिळविण्यासाठी प्रसंगी ती छळाचा मार्गदेखील अवलंबायला मागेपुढे पाहत नाही; तर परात्मपीडक स्वभावाची व्यक्ती ही एकाच वेळी हुकूमत गाजवणारी आणि आज्ञा पाळणारी असतात. एकंदरीत काय तर मानसिक उपचाराची गरज असलेली अशी मंडळी हल्ली तुमच्या - आमच्यासारख्यांना कामाला लावतात आणि मग मजा बघत बसतात.

गांधींवर बोलण्यासाठी भिडेंना बरेच विषय निवडता आले असते; मात्र त्यासाठी त्यांना अभ्यास करावा लागला असता. तो करण्याची कुवत असती, तर त्यांनी असला लांच्छनास्पद विषय निवडला नसता; पण त्यांच्या विषयाच्या निवडीवरून त्यांनी स्वतःचे वैचारिक करंटेपण सिद्ध केले.

छत्रपती शिवाजी महाराज हे जर भिडेंचे अभिमानस्थान असेल तर त्यांच्या प्रवृत्तीतून ते प्रतित व्हायला हवे; मात्र त्यांच्या वर्तनातून तसे कधीही जाणवत नाही. हा माणूस नेहमी विखारी टीकेचे फुत्कार टाकतो आणि समाजात विष पसरवण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रवृत्तींना समाजविघातक घोषित करायला पाहिजे; मात्र कुठल्याही सरकारला ते आजवर करता आले नाही.

आज जे विरोधी पक्षातले लोक भिडेंच्या नावाने आकांततांडव करताना दिसतात, त्यांनीदेखील त्यांचे सरकार असताना त्यांना धडा शिकवला नाही. त्यामुळे राजकारण्यांकडून असल्या विष पसरविणाऱ्यांचा बंदोबस्त होणार नाही, हे आता स्पष्टच आहे. त्यात जगात मिरवण्यासाठी गांधींचा वापर करायचा आणि देशात त्याच विचारांची वारंवार हत्या करायची, असा नवा राजकीय डावपेच सत्ताधाऱ्यांनी अवलंबला असल्यामुळे ते अशा वेळी काहीच न करण्याची सोईस्कर भूमिका घेतात.

अशा विषयात कुठलीही भूमिका न घेता मौनव्रत घेण्याचे एक नवे तंत्र सत्ताधारी सेवकांनी आत्मसात केले आहे, त्याला तोडच नाही. कमी बोलतात म्हणून मनमोहन सिंगांना डिवचणाऱ्यांना मौनीसेवक मात्र चालतात. कारण बोलून काम तमाम करण्यासाठी भिडेंसारखे आहेतच.

मुळात जेव्हा जेव्हा विषय गांधींचा येतो तेव्हा तेव्हा उजव्या विचारांशी गांधी विचारांचा संघर्ष होणार, हे अटळ असते. ते काही केल्या टाळता येत नाही, कारण हे भांडण आजचे नाही. गांधींना भारताच्या अखंडतेचे खुनी ठरवण्यात ज्या लोकांनी अवघे आयुष्य घालवले त्यांच्याकडून त्यांच्या विचारांची स्फुरणे कशी भरली जातील. त्यामुळे वैचारिक वाद हे समजू शकतात.

प्रत्येक वादाला स्वतःची अशी एक बाजू असते आणि ती ज्याची त्याची योग्य असते, असे मानून पुढे जायला पाहिजे. मुळात ज्या पद्धतीच्या वैचारिक आणि सामाजिक जडणघडणीच्या व्यवस्थेत आपण राहतो, तेथे वाद-प्रतिवाद होणे काही नवे नाही; मात्र या व्यवस्थेसाठी आपण लोकशाही नावाची एक प्रणाली अंगीकारली आहे.

त्या व्यवस्थेत स्वतःसोबतच आपण इतरांचेही अस्तित्व मान्य करायचे असते, याचा सर्वांना विसर पडतोय. त्यामुळे वैचारिक भांडणांमध्येही विचारांपेक्षा विकारांनी जास्त जागा घेतलेली दिसते. आपल्या इतिहासावर कायम धर्माचा आणि धार्मिक तत्त्वज्ञानाचा पगडा राहिला आहे.

त्यामुळे साहजिकच आपल्या वैचारिक पठड्यांमध्ये जागोजागी धर्माचा उल्लेख होतो; पण धर्माच्या नावाने मोठमोठ्याने हेल काढून रडणाऱ्यांना आपला नेम धर्मावरून चुकून राजकारणावर जातोय आणि त्याचा परिणाम जातीय तणावांमध्ये दिसतो, याची जाणीव राहिलेली दिसत नाही. त्यातच आपण जेवढे विचित्र बोलू, तेवढी अधिक प्रसिद्धी, हे नवे समीकरण या लोकांच्या ध्यानात आले आहे. त्यामुळे भिडेप्रवृत्ती वाढीस लागली आहे.

राजकीय जीवनात असलेल्या व्यक्तीदेखील अलिकडे बेताल वक्तव्य करतात. बोलताना निदान आपण कुणाविषयी आणि काय बोलतोय, याचे साधे भानही त्यांना राहत नाही. परिणामी स्वतःची अभिमानस्थाने भक्कम करण्याच्या नादात ते इतरांच्या श्रद्धास्थानांना ढासळवण्याचा प्रयत्न करतात.

राजकीय आणि सामाजिक जीवनात वावरताना संयमी वागणे आवश्यक असते. जेव्हा तुमचे अनुकरण करणारे वाढतात तेव्हा तर तुमचा स्वतःवर अधिक संयम असायला हवा; मात्र तसे करण्याऐवजी भिडेंसारखे लोक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतात.

गांधींचा बाप काढायचा, त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचे, देशातील लोकांच्या श्रद्धास्थानाला मुस्लिम म्हणून हिणवायचे, फुल्यांना शिव्यांची लाखोली वाहायची, असले प्रताप करून भिडे आपल्या सटकलेल्या डोक्याचे जाहीर प्रदर्शन भरवतात. त्यांच्यासारख्याकडून पश्चात्तापाची अपेक्षा करण्याची सोय नाहीच; पण निदान सरकारने तरी त्यांना आता जाहीर तंबी द्यायला हवी; अन्यथा अशा लोकांमुळे सामाजिक सालोख्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

rahulgadpale@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com