
जिब्रानचं जग !
- राहुल हांडे
‘‘तुम्ही मला विचारत आहात, की मी वेडा कसा झालो? त्याचे झाले असे की एक दिवस सकाळी मी गाढ झोपेतून जागा झालो आणि पाहतो तर मी माझ्या चेहऱ्यावर चढवलेले सर्व मुखवटे चोरीला गेले होते.’’
दैनंदिन जीवनात अनेक मुखवट्यांमध्ये स्वतःचा चेहरा हरवलेल्या प्रत्येक माणसाची व्यथा आपल्या ‘पागल’ (द मॅडमॅन) या कथेत व्यक्त करणारा भाववादी चिंतक, कवी, कथाकार आणि चित्रकार म्हणजे खलिल जिब्रान. काव्य, कथा आणि चित्र यांना भावनिक चिंतनाच्या कोंदणात प्रस्थापित करण्याचा यशस्वी प्रयत्न हीच जिब्रानची कलानिर्मिती.
उच्च कोटीचा तत्त्वज्ञानी असणाऱ्या जिब्रानने तेवढ्याच उच्च कोटीच्या कलानिर्मितीतून मुखवट्यांमागील खऱ्या मानवी चेहऱ्याचे सुंदर चित्रच रेखाटले आहे. जिब्रान तत्त्वज्ञ होता; परंतु त्याचे तत्त्वज्ञान रुक्ष आणि अतिवास्तवाच्या काटेरी कुंपणात जखडलेले नव्हते. माणसाच्या माणूसपणावर त्याचा गाढ विश्वास होता. जन्मजात कलावंत असलेल्या जिब्रानला, बालपणापासून चित्रकलेचे अंग लाभले होते.
विविध आकार-आकृत्या त्याच्या मनःपटलावर तरळत असत. जन्माने लेबनानी असलेला जिब्रान जगण्यासाठी आपल्या आई व भांवडांसोबत अमेरिकेला स्थलांतरित झाला. १८९७ ला अरबी भाषेचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर, त्याने लेबनानला परतण्याचा विचार पक्का केला. आपल्या मुलाची रुची व कुशाग्र बुद्धी यांचा आवाका असणाऱ्या त्याची आई कामिला हिने त्याला त्याची अनुमती दिली. देवदारांच्या वृक्षांनी बहरलेल्या निसर्गरम्य लेबनानच्या भूमीत जिब्रानमधील चित्रकार अधिक आखीव-रेखीव आणि तरल होत गेला. तेथील पारंपरिक, स्थिर व शांततामय समाजजीवनाने त्याच्यातील तत्त्ववेत्त्याची मर्मभेदक दृष्टी नितळ व निर्मळ केली.
रुक्ष निसर्गाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेले तत्त्ववेत्ते आणि सृष्टीवरचा निसर्गरम्य स्वर्ग अनुभवलेले तत्त्ववेत्ते यांची यादी सहज जरी आपण डोळ्यांसमोर आणली, तर आपल्याला हा भेद लक्षात येऊ शकतो. बेरूतच्या ‘मदरसात-अल-हिकम’ या ख्रिश्चन मिशनरी शाळेत शिकत असताना, शाळेचे मुख्याध्यापक फादर फ्रान्सिस मंसूर यांच्या हातात जिब्रानने रेखाटलेले एक चित्र पडलं. जिब्रानने या चित्रात एका पादरीसमोर गुडघे टेकवून बसलेली एक नग्न मुलगी चितारली होती. याचा फादरला प्रचंड राग आला आणि त्यांनी त्याला शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिली. बालपणीच्या या चित्रात पावित्र्याचा मुखवटा धारण करणाऱ्या लोकांचा खरा चेहरा नेमकेपणाने रेखाटण्याचे सामर्थ्य जिब्रानच्या कुंचल्यातील रंग-रेषांमध्ये असलेले जाणवते.
लेबनानमधील शालेय जीवनाच्या पाच वर्षात त्याने आपला मित्र युसूफ अल-हवाइक याच्या सहकार्याने ''अल-मनर'' (आकाशदीप) नावाचे एक पत्रक संपादित करण्यास सुरुवात केली. पत्रकाच्या संपादनासोबतच आपल्या चित्रांनी त्याची सजावट करण्याचे जबाबदारी जिब्रानने स्वीकारली. १८९८ मध्ये वयाच्या पंधराव्या वर्षीच त्याचे चित्रं पुस्तकांची मुखपृष्ठ म्हणून झळकण्यास सुरुवात झाली. १९०३ मध्ये आपली आई व भाऊ पीटर यांच्या निधनाने आणि दारिद्र्याने खचलेल्या जिब्रानला क्षयरोगाने ग्रस्त असलेल्या मारियाना या त्याच्या बहिणीने खंबीर साथ दिली. ‘‘परमेश्वराला मला तरी वाघाचे भक्ष्य बनव, नाही तर एक ससा तरी पोट भरण्यासाठी दे’’ किंवा ‘‘नाही, आम्ही कदापि व्यर्थ जगलो नाही, या गगनचुंबी इमारती आमच्या हाडांनीच उभ्या करण्यात आल्या आहेत.’’ अशा दैववादी ते साम्यवादी विचारध्रुवांमध्ये जिब्रानचा विचारलंबक दोलायमान होत होता.
१९३२ मध्ये प्रकाशित ''सॅड अॅन्ड फोम'' या कथासंग्रहात त्याची ही दारिद्र्याने हतबल व नैराश्यपूर्ण विधानं नमूद करण्यात आली आहेत. अशा परिस्थितीतही जिब्रानमधील कवी मानवी जीवनातील प्रेम, सत्य, सुंदरता, चांगुलपणा, वाईटपणा मृत्यू इत्यादींविषयी अत्यंत निर्मळ भाव व्यक्त करत होता. १९२३ मध्ये जिब्रानचे जगप्रसिद्ध ‘द प्रोफेट’ ज्याचे प्रकाशनपूर्व नाव ‘द काउन्सल्स’ प्रकाशित झाले. द्वितीय महायुद्धात सैनिकांना वाटण्यासाठी त्याची अतिरिक्त आवृत्ती काढण्यात आली. याचे कारण भारतीय दर्शनं, सूफी अरब कवी जलाल-अल-दीन रूमी, नीत्शे, कार्ल गुस्ताव युंग आणि बहाई संप्रदाय संस्थापक बहाउल्ला अशा सर्व मानवतावादी विचारांचे प्रतिबिंब जिब्रानमध्ये होते. १९०८ मध्ये आपल्या ‘अल-अरवाः अल-मुत्मर्रिद:’ (स्प्रिट्स रिबेलिअस) या तिसऱ्या अरबी पुस्तकात जिब्रानने पेन व शाईचा वापर करून स्वतःचे एक चित्र छापले होते. विवाहित स्त्रीचे आपल्या पतीशी निर्माण झालेला दुरावा, स्वातंत्र्यासाठी विद्रोह, मनाविरुद्ध होणाऱ्या लग्नातून वधूचे पलायन करून आत्महत्या करणे, १९व्या शतकातील लेबनानी शासकांची क्रूरता यांचे चित्रण असणारे विषय जिब्रानने मांडल्यामुळे बुरसटलेल्या लेबनानी समाजात त्याला टीका व निंदा सहन करावी लागली.
जिब्रान आपल्या पहिल्या इंग्रजी पुस्तकाच्या प्रकाशनापासूनच प्रकाशझोतात आला आणि त्याची गणना दर्जेदार अमेरिकन लेखकांमध्ये होऊ लागली. कथाकार म्हणून जागतिक साहित्यात जिब्रानचे स्थान अनन्यसाधारण असे आहे. त्याच्या कथा सर्वग्राह्य व सर्वकालिक असल्याने स्थळ-काळ-देश यांच्या सीमा त्यांना कधीच पडल्या नाही. जिब्रानच्या कथा वाचताना गीतेतील तत्त्वज्ञान व विचार यांची प्रत्यक्ष दैनंदिन जीवनात आपल्याला अनुभूती मिळतेय असे वाटते. या कथा वाचकाला अचंबित करत नाहीत, तर प्रभावित करतात आणि लेखकाच्या प्रती वाचकाचे समर्थन प्राप्त करतात. द मॅडमॅन (पागल)सारखीच उंचीच्या ‘ईश्वर’ नावाच्या कथेत मनातील द्वैत जोपर्यंत नष्ट होत नाही, तोपर्यंत सृष्टीच्या चराचरांत, निसर्गात घडणाऱ्या प्रत्येक घटनेत असलेले त्याचे अस्तित्व आपल्याला जाणवणार नाही. हे सांगताना जिब्रान स्वतःला आस्तिक वा धार्मिक म्हणून मिरविणाऱ्या दांभिकांचाही समाचार घेतो.
‘पवित्र नगर’सारख्या आपल्या प्रसिद्ध लघुकथेत त्याने पोथीनिष्ठ वा मूलतत्त्ववादी यांचा मूर्खपणा अतिशय सुंदरपणे अधोरेखित केला आहे. ‘कागदाची कैफियत’सारख्या कथेत आपल्या भोवतालच्या समाजाकडे स्वत;ला श्रेष्ठ मानत तुच्छपणे पाहणाऱ्या ‘व्हाइट कॉलर’ वा उच्चभ्रू लोकांची अवस्था अतिशय मार्मिकपण व्यक्त झाली आहे. पांढऱ्याशुभ्र कागदाची दर्पोक्ती ऐकून शाई आणि रंगीत पेन्सिलींनी त्याच्या जवळ जाण्याचे टाळले. त्याचा परिणाम सांगताना जिब्रान म्हणतो, ‘‘बर्फासारखा तो सफेद कागद आजीवन निष्कलंक आणि पावनच राहतो...शुद्ध,पवित्र...आणि कोरा.’’ जिब्रानच्या प्रत्येक कथेत आपल्याला कोणते ना कोणते दार्शनिक सूत्र गुंफलेलं दिसतेच. एवढेच नाही तर एकाच सूत्राची विविध कथांमध्ये पेरणी करून, ते सूत्र अधिकाधिक अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे .त्याच्या कथेतील प्रत्येक सूत्राला सखोल सात्त्विकता असलेली दिसते.
‘चतुर कुत्रा’ किंवा ‘कथा कटोऱ्याची’ या सारख्या कथांमध्ये कुत्रा, बोका अशा प्रतीकांमधून समाजातील मोहमायेत गुंतलेले भोगी लोक आणि दुसऱ्या बाजूला त्यागात विश्वास ठेवणारे त्यागी लोक या सूत्राचे यथार्थ चित्रण जिब्रान करतो. अंधश्रद्धा पाप व अपराध आहे, तसेच पूर्वग्रहदूषित व विनाकारण असलेली अश्रद्धादेखील तेवढेच पाप-अपराध आहे. हे अतिशय नेमकेपणाने ‘महात्मा’ या कथेत तो चितारतो. लेबनानच्या दुर्गम निसर्गरम्य प्रदेशात आपले निरागस अनाथपण समाधानाने जगणाऱ्या रेहानाची फसवणूक करून तिला शहरातील वेश्यावस्तीच्या नरकात मरण देणाऱ्या समाजाची दांभिकता ‘आत्म्याची भेट’ या कथेत जिब्रान दाखवतो.
कोणतेही संवेदनशील मन ही कथा वाचताना गलबलून गेल्याशिवाय राहत नाही आणि दांभिक समाजाविषयी चिड निर्माण झाल्याशिवाय राहू शकत नाही. रेहानाचा अंधारात उपभोग घेणारा समाज, उजेडात तिला पतित म्हणून कब्रस्तानात चिरनिद्रा नाकारतो. या वेळी कथेचा नायक म्हणतो, ‘‘रेहाना तू अत्याचारपीडित आहेस, अत्याचारी नाही. एखाद्या अत्याचारी आपल्या संपत्ती-सत्ता यांच्या बळावर कितीही मोठा भासत असला तरी आत्मा म्हणून तो अत्यंत पतित असतो. मनुष्यासाठी अत्याचार पीडित असणे अत्याचारी असण्यापेक्षा कधीही श्रेष्ठच असते. भौतिकदृष्ट्या गरीब-दुर्बल असणे अशाप्रकारे बलवान असण्यापेक्षा कधीही चांगले असते.’’ जिब्रानच्या कथांमधील प्रतीकांनी अरबी साहित्यातील शुष्कता व जडता यांच्यावरही प्रहार केला आहे. यासाठी अरबी साहित्यात पिंजरा, जंगल, वादळ, धुकं, लहान मुलं, समुद्र, सूर्योदय अशा प्रतीकांचा सौंदर्यपूर्ण वापर त्याने सर्वप्रथम केला. ‘द मॅडमॅन’, ‘द फ्रॉरेनर’, ‘सॅड अॅन्ड फोम’ , ‘द वॉण्डरर’ आणि ‘टिअर्स अॅन्ड लाफ्टर’ हे कथासंग्रह म्हणजे ‘सत्य-शिव-सुंदर’ मानवाचा चित्रकथी असणाऱ्या जिब्रानचा अक्षय व चिरंतन असा खजिनाच आहे. याचा मनःपूर्वक आस्वाद घेताना आपले मुखवटे कधी चोरीला जातील हे सांगता येत नाही. ते चोरीला गेल्याची खंत मनातून नष्ट होताना मात्र कथेतील नायकाप्रमाणे, ‘‘सुखी रहा, सुखी रहा माझे मुखवटे चोरणाऱ्यांनो.’’ असे कृतज्ञ उद्गार आपल्या मनात उमटल्याशिवाय राहणार नाहीत आणि कथांमागे देवदूतासारखा उभा असलेला जिब्रानदेखील आपल्यासमोर प्रकट झाल्याशिवाय राहणार नाही.