अजब स्वयंवर

विवाह, विवाहसंस्था, त्यामधील स्त्री-पुरुषसमानता, जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य यासंदर्भात प्राचीन काळापासून वर्तमानापर्यंत अनेक दृष्टिकोन जगाच्या कानाकोपऱ्यात अस्तित्वात आहेत.
cambodia love hut
cambodia love hutsakal
Summary

विवाह, विवाहसंस्था, त्यामधील स्त्री-पुरुषसमानता, जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य यासंदर्भात प्राचीन काळापासून वर्तमानापर्यंत अनेक दृष्टिकोन जगाच्या कानाकोपऱ्यात अस्तित्वात आहेत.

- राहुल हांडे handerahul85@gmail.com

तबकडीच्या आकाराचा आणि पर्वतराजीनं चौफेर वेढलेला प्रदेश. उत्तर-दक्षिण वाहणारी मिकांग नदी आणि पश्चिमेला तांगले नावाचं विशाल सरोवर. निसर्गसंपन्नतेची अशी अनोखी अनुभूती भरभरून देणारा देश म्हणजे कम्बोडिया. या देशात वास्तव्य करणारी क्रेउंग नावाची एक आदिवासी जमात, स्वतःला आधुनिक शहरी समजणाऱ्या समाजापेक्षा, स्त्री-पुरुषसमानतेत सर्वात अग्रेसर असलेली दिसते.

विवाह, विवाहसंस्था, त्यामधील स्त्री-पुरुषसमानता, जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य यासंदर्भात प्राचीन काळापासून वर्तमानापर्यंत अनेक दृष्टिकोन जगाच्या कानाकोपऱ्यात अस्तित्वात आहेत. यासंदर्भात जगात सातत्यपूर्ण मंथनही सुरू आहे. विवाहसंस्थेच्या संदर्भात समाजनियमन आणि व्यभिचारनियत्रंण हे दोन निकष अत्यंत महत्त्वाचे मानले गेले. स्त्री-पुरुषांच्या संबंधांना सामाजिक मान्यता देणं, त्यांना विशिष्ट आचारसंहिता प्रदान करणं आणि जन्माला येणाऱ्या संततीची जबाबदारी पार पाडण्यासाठी कुटुंब हे व्यवस्थेच्या चौकटीत बसवणं हा विवाहसंस्थेचा गाभा सांगितला जातो. असं असलं तरी जोडीदार निवडण्याची विवाहसंस्थेतील प्रक्रिया नेहमीच वादग्रस्त राहिली आहे. पुरुषसत्ताक मानसिकतेचा प्रभाव तिथं कामय जाणवतो. स्त्रीला आपला जोडीदार निवडण्याची मुभा देणारी अत्यंत मोजकी उदाहरणं विवाहसंस्थेच्या इतिहासात आढळतात. ‘स्वयंवर’ या भारतीय संकल्पनेसंदर्भातही यामुळे प्रश्नचिन्ह उभं केलं जातं.

असं असलं तरी क्रेउंग ही जमात विवाहसंस्थेतील निवडीचं स्वातंत्र्य आणि स्त्री-पुरुषसमानता याबाबत सर्वात आघाडीवर असल्याचं जाणवतं. क्रेउंग जमातीतील माता-पिता आपल्या मुलीला प्रतिबंध करणं तर दूरच; सुयोग्य जोडीदार निवडण्यासाठी शारीरिक संबंध ठेवण्याचं अमर्याद स्वातंत्र्य बहाल करतात. याला आपण या समाजाची प्रगत मानसिकता म्हणू शकतो अथवा नियमबाह्य नैसर्गिक जीवनव्यवहार म्हणू शकतो. एवढं मात्र खरं की, अशी सामाजिक संस्कृती जगात अन्यत्र आढळत नाही. शेतीवर व पशुपालनावर उदरनिर्वाह करणाऱ्या क्रेउंग जमातीत स्त्री-पुरुषसमानता श्रमापासून ते व्यसनापर्यंत असलेली दिसते. मुलगा-मुलगी असा कोणताही लैंगिक भेद या जमातीत अस्तित्वात नाही.

क्रेउंग जमातीत मुलगी वयात आल्यानंतर तिच्यासाठी आई-वडील घरापासून दूर एक स्वतंत्र झोपडी बांधतात. या झोपडीला ‘लव्ह हट’ असं संबोधलं जातं. यानंतर त्या मुलीला जमातीतील विवाहयोग्य मुलांना भेटण्याची मुभा दिली जाते.

ही मुलगी आपल्या आवडीच्या मुलाची निवड करण्यासाठी, त्याच्याशी शरीरसंबंध ठेवण्यास स्वतंत्र असते. मुलगी आपल्या बॉयफ्रेंडबरोबर या झोपडीत राहते. मुलींच्या या झोपडीत एकाच वेळी त्यांचे एकापेक्षा अधिक बॉयफ्रेंडही असू शकतात. मुलीनं त्यांच्यापैकी एकाची वर म्हणून निवड केल्यानंतर कोणत्याही प्रकाराचा वाद अथवा हिंसक प्रकार घडत नाही. याला कारण या जमातीत मुलांना तशी शिकवणच दिलेली असते. घटस्फोट हा प्रकार या जमातीत अस्तित्वात नाही, तसंच कुलटा हा शब्दही या जमातीच्या भाषेत अस्तित्वात नाही. लैंगिक हिंसा अथवा बलात्काराचे प्रसंग क्रेउंग जमातीत घडत नाहीत.

मेरी क्लेअर या अमेरिकी समाजसंशोधिकेनं क्रेउंग जमातीचा अभ्यास केल्यानंतर ही धक्कादायक वस्तुस्थिती त्यांना समजली. जगात सर्वात आधुनिक समजल्या जाणाऱ्या अमेरिकी समाजाचं प्रतिनिधित्व करणारी ही संशोधिकाही क्रेउंग जमातीची ही पद्धत पाहून अंचबित झाली. उपवर मुलीला ज्या मुलाशी शारीरिक संबंध ठेवणं अधिक भावतं त्याच्याशी तिचा विवाह करण्याचा निर्णय तिच्या कुटुंबीयांकडून घेतला जातो. सुयोग्य जोडीदार निवडण्याचा हा सर्वोत्तम पर्याय आहे, अशी क्रेउंग जमातीची धारणा आहे. या परंपरेत काही नियम मात्र काटेकोरपणे पाळले जातात. समजा, उपवर मुलगी एका मुलाकडून गर्भवती राहिली आणि तिला विवाहासाठी दुसराच मुलगा आवडला, तर अशा वेळी भले तो दुसरा मुलगा बाळाचा पिता नसला तरी, जन्माला येण्याऱ्या त्या बाळाला स्वतःचं नाव देणं हे त्या दुसऱ्या मुलावर बंधनकारक असतं.

या परंपरेचा प्रभाव क्रेउंग जमातीवर एवढा सखोल आहे की, उपवर मुलीनं एखादा मुलगा वर म्हणून निवडल्यानंतर त्या दोघांच्याही घरच्यांना त्यांच्या विवाहाला मान्यता द्यावी लागते, त्यात कुणीही कोणत्याही कारणावरून आडकाठी आणू शकत नाही; तसंच सगळे जण विवाहसमारंभात कोणतीही खंत, दुःख, वैरभाव न बाळगता आनंदानं सहभागी होतात. आपल्याला हा प्रकार अथवा परंपरा स्त्री-पुरुषसमानतेचं सर्वोच्च शिखर अथवा स्वातंत्र्याची व स्त्रीसबलीकरणाची परिसीमा वाटणं स्वाभाविक आहे.

असं असलं तरी या परंपरेची दुसरी बाजूही तेवढीच विचार करायला लावणारीदेखील आहे. आधुनिकतेचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून जरी आपण या प्रथेकडे पाहिलं तरी आधुनिक आरोग्यशास्त्र याला अनुमती देत नाही. असली प्रथा एचआयव्ही-एड्ससारख्या रोगाच्या प्रसाराला कारणीभूत ठरण्याची शक्यता असते, तसंच मुलींचं वय कमी असल्यानं अनेक प्रकारच्या मानसिक व शारीरिक आरोग्यसमस्या त्यांच्यात उद्भवू शकतात.

यासंदर्भात कंबोडियन सरकार क्रेउंग जमातीमध्ये जागृती आणण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारच्या अथक् प्रयत्नांनंतर हा समाज आज शारीरिक संबंधांत सुरक्षितता राखण्यास अनुकूल झाला आहे. मात्र, आपली ही परंपरा मोडण्यास तो अद्यापही तयार नाही. अशा परंपरेचं समर्थन करणं अथवा तिला विरोध करणं दोन्ही अवघडच आहे. त्यामुळे आपण नेमके सुधारणावादी की प्रतिगामी हे निश्चित करणं कठीण होऊन बसतं. क्रेउंग जमातीची परंपरा एकाच वेळी प्रगतही वाटते आणि विचित्रदेखील वाटते. क्रेउंग जमातीतील काही लोक, त्यांच्या या परंपरेत आरोग्यविषयक ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत त्यांना, कोरियातील ख्मेर संस्कृतीशी आलेल्या संपर्काचा प्रादुर्भाव मानतात, तर काही जण आधुनिक तंत्रज्ञानाला दोष देतात.

‘आमच्या खेड्यांत मोबाईलनं प्रवेश केला आणि त्याद्वारे मिळालेल्या चुकीच्या लैंगिक ज्ञानानं हे सर्व घडत आहे,’ असंही अनेकांचं म्हणणं आहे. आजही आपल्यासारख्या विकसनशील देशांमध्ये शालेय शिक्षणात लैंगिक शिक्षण देण्याबाबत गोंधळात असणारी शिक्षणव्यवस्था...मुलांशी वास्तववादी आणि मोकळपणानं बोलू न शकणारे पालक...मुलीनं मर्जीविरुद्ध, जात-धर्मबाह्य विवाह केल्यास ऑनर किलिंगपर्यंत जाणारे पुरुषसत्ताक मानसिकतेचे पालक...हे वास्तव नाकारता येत नाही.

आपला समाज बदलला आहे आणि बदलत आहे हेदेखील वास्तव आहे. मात्र, मुलींच्या ‘स्वयंवरा’विषयी आपल्यात अधिक प्रगल्भता येणं आवश्यक आहे, असं वाटतं असलं तरी, क्रेउंग जमातीत असलेलं असलं ‘अजब स्वयंवर’ आपल्याला मानसिक पातळीवरसुद्धा सहजासहजी स्वीकारता येण्याजोगं नाही हेही तितकंच खरं.

(सदराचे लेखक धर्म, इतिहास व साहित्य यांचे अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com