ट्रेन्टाइन ते क्वारन्टाइन

क्वारन्टाइन म्हणजे ‘विलगीकरण’ असा ढोबळ अर्थ आपण लावलेला आहे. क्वारन्टाइनचं महत्त्व, गांभीर्य यांच्याबरोबरच गमतीदार अनुभवही आता आपल्या गाठीला जमा झाले आहेत.
Quarantine
QuarantineSakal
Summary

क्वारन्टाइन म्हणजे ‘विलगीकरण’ असा ढोबळ अर्थ आपण लावलेला आहे. क्वारन्टाइनचं महत्त्व, गांभीर्य यांच्याबरोबरच गमतीदार अनुभवही आता आपल्या गाठीला जमा झाले आहेत.

- राहुल हांडे handerahul85@gmail.com

कोरोना व्हायरस आणि ठरावीक काळानंतर जन्माला येत असलेली त्याची विविध वाणा-गुणाची भांवडं यांनी आजच्या ‘सुपरफास्ट’ जगाला पार ‘पॅसेंजर’ गाडी करून टाकलं आहे! मानवानं आपल्या सोईसाठी अविरत कालचक्राचे विविध कालखंड करून इतिहासाची मांडणी केलेली आढळून येते. आता ‘कोरोनापश्चात जग’ या नव्या कालखंडाचा विविध स्तरांवर अन्वयार्थ लावला जात आहे. आधीच्या सर्व कालखंडांपेक्षा हा कालखंड सगळ्यात निराळा आहे असं म्हणता येतं. कोरोनापर्यंत सर्व कालखंडांनी मानवी जीवनाची गती वाढवत नेली. कोरोनानं मात्र, अफाट गती प्राप्त झालेल्या मानवी जीवनाच्या चाकाला अशी खीळ बसवली की सर्व काही कोलमडून पडेल की काय असं वाटू लागलं. याशिवाय, नव्या संकल्पनांमुळे आणि संज्ञांमुळे आपल्या ज्ञानात व शब्दकोशात भर पडली ती वेगळीच. त्यातीलच एक शब्द म्हणजे ‘क्वारन्टाइन’.

क्वारन्टाइन म्हणजे ‘विलगीकरण’ असा ढोबळ अर्थ आपण लावलेला आहे. क्वारन्टाइनचं महत्त्व, गांभीर्य यांच्याबरोबरच गमतीदार अनुभवही आता आपल्या गाठीला जमा झाले आहेत. अनेकांना वाटतं की, कोरोनाबरोबरच क्वारन्टाइन हे प्रकरण आपल्या आयुष्यात आलं. मात्र, क्वारन्टाइनला सुमारे सातशे ते आठशे वर्षांचा इतिहास आहे. मराठीत ‘विलगीकरण’ हा क्वारन्टाइनसाठीचा पर्यायी शब्द. तो या संकल्पनेतील केवळ कृतीलाच पर्याय ठरतो. विलगीकरण शब्दातून क्वारन्टाइन शब्दाचा नेमका अर्थ मात्र निसटून जातो.

चौदाव्या शतकात इटलीतील व्हेनिस शहरात क्वारन्टाइन शब्द व त्यात अंतर्भूत संकल्पना यांची उत्पत्ती सापडते. हा शब्द इटालीयन भाषेतील ‘क्वारंतिनो’ या शब्दापासून निर्माण झाला. क्वारंतिनो म्हणजे ‘४०’. त्यापासून क्वारन्टाइन म्हणजे ‘४० दिवस’ असा शब्द तयार झाला. सन १३७४ मध्ये व्हेनिस शहराच्या विशेष स्वास्थ्य परिषदेनं जहाजं आणि त्यांच्यावरील प्रवाशांना व्हेनिस बंदरात प्रवेशबंदी केली. जहाजांना प्रवाशांसह व्हेनिसजवळील सॅन लाझारो बेटावर थांबण्यास सांगण्यात आलं. यामागचं कारण १३४८-१३५९ या काळात युरोपला प्लेगच्या महामारीनं घातलेला विळखा. ‘ब्लॅक डेथ’ म्हणून इतिहासात ओळखल्या जाणाऱ्या या महामारीनं युरोपच्या ३० टक्के लोकसंख्येचा बळी घेतला. ब्लॅक डेथनं आफ्रिका-युरोप खंड मिळून अंदाजे साडेसात ते वीस कोटी लोक मृत्युमुखी पडले असावेत. व्यापारी-जहाजांच्या माध्यमातून प्लेगनं युरोपात प्रवेश केला आणि थैमान घातलं. याचा विचार करूनच व्हेनिसच्या विशेष आरोग्य परिषदेनं हा निर्णय घेतला. निर्णय योग्य होता; परंतु काही काळानंतर काही देशांच्या जहाजांसाठी आणि काही विशेष प्रवाशांसाठी नियमांना बगल दिली जाऊ लागली. हे कोरोनाच्या विद्यमान महामारीतसुद्धा अनुभवायला मिळालं.

इटली व क्रोएशिया हे देश ॲड्रिआटिक समुद्रानं विभागलेले आहेत. त्याच्या दक्षिण तटावर क्रोएशियामधील ऐतिहासिक शहर रागुजा म्हणजे आजचे ड्युब्रोन्विक वसलेलं आहे. महामारी रोखण्यासाठी या शहराच्या महापरिषदेत सन १३७७ मध्ये एक नवा कायदा करण्यात आला. या कायद्यात रागुजा शहरानं समुद्रापल्याड व्हेनिसच्या नियमाचं अनुकरण केलं; परंतु त्यातील त्रुटी दूर करत कायदा अत्यंत कठोर, न्यायसंगत व पक्षपातरहित असा तयार केला.

या कायद्यानुसार साथीचा रोग पसरलेल्या प्रदेशातून रागुजामध्ये येणाऱ्या प्रत्येक जहाजाला जवळच्या ‘म्रकान’ बेटावर आणि रस्तामार्गे येणाऱ्या व्यापारी-तांड्याला त्याच्याजवळील ‘कॅवेट’ या नावाच्या गावात ३० दिवस थांबणं बंधनकारक होतं. या काळात कुणाला प्लेगची लागण झालेली आहे की किंवा कसं याकडे बारकाईनं लक्ष दिलं जात असे. कायद्यानं बंधनकारक करण्यात आलेलं जगातील हे पहिलं विलगीकरण.

तसंच साथीच्या रोगांनी संक्रमित प्रदेशांतून जल व स्थलमार्गे येणाऱ्या माणसांना, पशूंना आणि व्यापारी-मालाला आरोग्यपूर्ण व संक्रमणरहित लोकसंख्येपासून विलग ठेवणारं आणि साथीच्या रोगाला प्रतिबंध करणारं मध्य सागरातील ड्युब्रोन्विक हे पहिलं बंदर ठरलं. या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईची व दंडाची तरतूद करण्यात आली. कायद्याचं अत्यंत काटेकोरपणे पालन केल्याचा क्रोएशियाला झालेला फायदा पाहून अनेक युरोपीय देशांनी हा कायदा स्वीकारला. ३० दिवसांच्या अवधीमुळे त्याला ‘ट्रेन्याइन’ म्हणजे ‘३० दिवस’ असं संबोधलं जाऊ लागलं. कोरोनासंक्रमणाच्या प्रारंभकाळात हवाई व जलवाहतुकीसंदर्भात ड्युब्रोन्विक शहरानं चौदाव्या शतकात दाखवलेली दक्षता जगभरात दाखवली गेली असती तर संक्रमणाचा प्रसार व वेग रोखता आला असता.

कोरोनाच्या काळात सर्वार्थानं थरकाप उडवणारा दुसरा शब्द म्हणजे ‘लॉकडाउन’. लॉकडाउनचे विविध प्रकार आपण अनुभवले आहेत. व्हेनिसमध्ये जगातील पहिला लॉकडाउन लावण्यात आला होता. अविचारीपणाचा व कडकडीत लॉकडाउन करून व्हेनिस शहारानं आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा मोडून घेतला होता, तसंच सर्वसामान्य जनजीवन विस्कळित करून टाकलं होतं.

यासंदर्भात भरपूर अनुभव आता आपल्याही गाठीला आहेत, त्यामुळे अधिक बोलण्याची गरज नाही. त्यापेक्षा ड्युब्रोन्विक शहरात जन्माला आलेली ट्रेन्टाइन ही संकल्पना क्वारन्टाइनमध्ये कधी व कशी परावर्तित झाली याचा शोध घेणं मोठं रंजक ठरावं. सन १४४८ मध्ये विलगीकरणाची मुदत ३० दिवसांवरून ४० दिवस करण्यात आली. ही मुदतवाढ होण्यामागं धार्मिक कारणं असावीत असं काही अभ्यासकांचं मत आहे. यासाठी त्यांनी काही दाखले दिलेले दिसतात. ज्यू, ख्रिश्चन व इस्लाम या धर्मांतील ४० दिवसांच्या महत्त्वाशी याचा संबंध काही तज्ज्ञांनी जोडला आहे. ज्यू धर्मप्रवर्तक मोझेस यांनी सिनाई पर्वतावर ४० दिवस परमेश्वराची आराधना केली आणि त्याच्याकडून दशाज्ञांचं दान मिळवलं...बायबलनुसार, नोहानं ज्या परमेश्वरी महाप्रलयातून मानवासह सृष्टीतील प्रत्येक सजीवाला वाचवलं तो ४० दिवसांचा होता...ईस्टरपूर्वी ४० दिवसांचं ‘लेंट सीजन’ नावाचं व्रत केलं जातं...इस्लामनुसार, महंमद पैगंबर यांनी वयाच्या ४० व्या वर्षी अल्लाहच्या आज्ञेनुसार स्वतःला प्रेषित म्हणून घोषित केलं...प्रेषित इब्राहिम यांनी ४० दिवस आगीत घालवले...सुरा बकराहच्या ४० व्या आयतेवर अल्लाह संदेशाचा विषय बदलतो...मृत्यूनंतर ४० दिवस दुःख व्यक्त केलं जातं... ४० दिवसांचे असे अनेक दाखले देता येतात. कदाचित लोकांनी विलगीकरणाचे नियम ४० दिवस काटेकोरपणे पाळावेत यासाठी त्याला अशी धार्मिक किनार दिली गेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं असलं तरी एक शास्त्रीय कारणदेखील काही अभ्यासक लक्षात आणून देतात. एखाद्या व्यक्तीला प्लेगची लागण झाल्यानंतर ३७ दिवसांच्या आत रुग्ण दगावतो...हा काळ पार केलेला रुग्ण आजारावर मात करतो आणि त्याच्यापासून इतरांना संक्रमण होत नाही, असं निरीक्षणान्ती लक्षात आलं होतं. त्यामुळे विलगीकरणाचा काळ ४० दिवसांचा करण्यात आला असावा. प्लेगसारख्या साथीच्या रोगापासून कुष्ठरोगापर्यंत विलगीकरणाचा आणि विलगीकरणकेंद्रांचा एक वेगळाच रंजक इतिहास आहे एवढं मात्र खरं. ‘क्वारन्टाइन’ हा शब्द फक्त विलगीकरणाच्या काळाचा निर्देश करतो. क्वारन्टाइन म्हणजे विलगीकरण असं मात्र नाही.

(सदराचे लेखक धर्म, इतिहास व साहित्य यांचे अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com