‘फक्त माझा गुन्हा सांगा!’

दक्षिण कॅरोलिनातील कारागृहात ता. १६ जून १९४४ रोजी एका गुन्हेगाराला मृत्युदंड देण्याची तयारी सुरू होती. सायंकाळचे साडेसात वाजलेले होते. इलेक्ट्रिक खुर्चीद्वारे हा मृत्युदंड देण्यात येणार होता.
George Stinney
George StinneySakal
Updated on
Summary

दक्षिण कॅरोलिनातील कारागृहात ता. १६ जून १९४४ रोजी एका गुन्हेगाराला मृत्युदंड देण्याची तयारी सुरू होती. सायंकाळचे साडेसात वाजलेले होते. इलेक्ट्रिक खुर्चीद्वारे हा मृत्युदंड देण्यात येणार होता.

- राहुल हांडे handerahul85@gmail.com

दक्षिण कॅरोलिनातील कारागृहात ता. १६ जून १९४४ रोजी एका गुन्हेगाराला मृत्युदंड देण्याची तयारी सुरू होती. सायंकाळचे साडेसात वाजलेले होते. इलेक्ट्रिक खुर्चीद्वारे हा मृत्युदंड देण्यात येणार होता. त्याची उंची खुर्चीच्या हिशेबानं खूपच कमी असल्यानं तिथं उपलब्ध असलेल्या बायबलच्या प्रतींचा वापर बूस्टर सीट म्हणून करण्यात आला होता. बायबलची एक प्रत हातात घेऊन गुन्हेगार खुर्चीवर बसला. त्याच्या वडिलांना त्याच्याशी अंतिम संवाद साधण्याची परवानगी देण्यात आली होती. एका अधिकाऱ्यानं गुन्हेगाराला विचारलं : ‘मृत्यूपूर्वी तुला काही सांगायचं आहे का?’ त्यानं नकारात्मक मान हलवली. जल्लादानं त्याच्या चेहऱ्यावर काळा मास्क घातला तेव्हा गुन्हेगाराला अश्रू अनावर झाले. खुर्चीतून प्राणघातक वीज वाहू लागली आणि गुन्हेगाराच्या चेहऱ्यावरील मास्क घसरून खाली पडला. तेव्हाही त्याच्या डोळ्यांत केवळ अश्रूच होते.

काही वेळातच १४ वर्षांच्या कोवळ्या जॉर्ज स्टिनी याला मृत्यूनं आपल्या कवेत घेतलं. क्राउली इथल्या एका साध्याशा कबरीत त्याला दफन करण्यात आलं. अल्पवयीन मुलाला देण्यात आलेली ही जगातली एकमेव फाशी आहे. एवढी भयंकर शिक्षा देण्याइतका असा कोणता मोठा गुन्हा १४ वर्षांच्या जॉर्जनं केला होता, या विचारानंच कुठलाही संवेदनशील माणूस अस्वस्थ होईल.

ता. २३ मार्च १९४४ रोजी दक्षिण कॅरोलिनातील अल्कोलू इथं बेटी जून बिन्नीकर आणि मेरी एम्मा थेम्स या ११ वर्षांच्या दोन मुलींचे मृतदेह सापडले. या मुली आदल्या दिवशी घरातून बेपत्ता झाल्या होत्या. कोणत्या तरी अवजड आणि बोथट वस्तूनं त्यांच्या डोक्यावर आघात करण्यात आला होता. ता. २२ मार्चला आपली सायकल घेऊन बेटी व मेरी घरातून बाहेर पडल्या होत्या. संध्याकाळपर्यंत त्या परतल्या नाहीत. पालकांनी शोधाशोध सुरू केली. त्या दोघी कृष्णवर्णीयांच्या वस्तीत जॉर्ज नावाच्या मुलाबरोबर अखेरच्या दिसल्या होत्या अशी माहिती पालकांना मिळाली. पालक जॉर्जच्या घराचा शोध घेत आले. त्याचे वडील जॉर्ज स्टिनी-सिनिअर हे एका सॉमिलमध्ये कामगार होते आणि मालकानं दिलेल्या घरात राहत होते. त्या कुटुंबात जॉर्ज स्टिनी-सिनिअर, त्यांची पत्नी, २१ वर्षांचा थोरला मुलगा जॉन, १४ वर्षांचा जॉर्ज, १२ वर्षांचा चार्ल्स, १० वर्षांची कॅथरिन आणि धाकटी, सात वर्षांची एमे एवढे जण होते.

अल्कोलू हे गिरणीकामगारांचं एक छोटं शहर. शहराच्या मध्य भागातून जाणारा लोहमार्ग म्हणजे गोऱ्यांच्या आणि कृष्णवर्णीयांच्या वस्तीला विभागणारी सीमारेषा. त्यांच्या शाळा आणि चर्चदेखील वेगवेगळं. त्यामुळे, या दोन वर्णांमध्ये ‘गोरे मालक’ आणि ‘काळे कामगार’ एवढाच मर्यादित संवाद होता.

बेटी व मेरी यांच्याविषयी जॉर्जकडे चौकशी करण्यात आली.

‘मी आणि माझी धाकटी बहीण एमे घरासमोर सकाळी खेळत असताना दोन मुली सायकलवर आल्या आणि त्यांनी, ‘मेम्पॉस (पॅशनफ्लॉवर) कुठं मिळतील,’ अशी चौकशी केली. ‘आमच्या घराला लागून असलेल्या जंगलात मेम्पॉस मिळू शकतात,’ असं मी त्यांना सांगितलं. त्यांना मी ते शोधूनही दिले आणि त्या दोघी निघून गेल्या,’ अशी माहिती जॉर्जनं दिली.

त्यानंतर बेटी व मेरी यांच्या पालकांसमवेत जॉर्जचे वडील दोघींचा शोध घेण्यासाठी रात्रभर फिरले. लोहमार्गाला लागून असलेल्या कृष्णवर्णीयांच्या वस्तीनजीकच्या एका खंदकात दोघींचे मृतदेह सकाळी आढळले. अल्कोलू पोलिसांना तिथं कोणतेच पुरावे सापडले नाहीत. पोलिस जॉर्जच्या घरी पोहोचले आणि त्याला व त्याचा भाऊ जॉन याला पकडून घेऊन गेले. पोलिसांनी चौकशी केली असता, मुलींच्या पालकांना जे सांगितलं होतं त्याचीच पुनरावृत्ती जॉर्जनं केली. जॉनला काही तासांनी सोडण्यात आलं. जॉर्जला मात्र तीन महिने पालकांनादेखील भेटू देण्यात आलं नाही. संपूर्ण चौकशीदरम्यान जॉर्जच्या हातात बायबल होतं.

जॉर्जनं आपला गुन्हा कबूल केल्याचं त्याच्या स्वाक्षरीशिवाय लिखित स्वरूपात पोलिसांकडून जाहीर केलं गेलं. त्याच्या वडिलांना कामावरून काढून टाकण्यात आलं. मालकानं दिलेलं घरही त्यांना सोडावं लागलं. तीन महिन्यांनंतर खटला न्यायालयात सुरू झाला. ज्युरी म्हणून पाच गोऱ्या लोकांचीच निवड एका दिवसात केली गेली. केवळ अडीच तासांत खटल्याचं कामकाज उरकण्यात आलं.

ऐपत नसतानाही जॉर्जच्या वडिलांनी एक कृष्णवर्णीय वकील दिला. त्या वकिलाला गोऱ्यांचा रोष पत्करायचा नव्हता; त्यामुळे, ‘जॉर्जकडे अल्पवयीन म्हणून पाहण्यात यावं आणि त्यानुसार तशी शिक्षा त्याला मिळावी,’ एवढीच मागणी त्यानं अडीच तासांच्या सुनावणीदरम्यान केली.

त्या वेळी अमेरिकेत १४ वर्षांचं वय हे सज्ञान मानण्यात येत असे. त्यामुळे, वकिलाचा हा युक्तिवाद तोकडा पडला. खटल्यात केवळ तीन गोऱ्यांची साक्ष घेण्यात आली. एक होता मुलींचे मृतदेह सर्वप्रथम पाहणारा आणि अन्य दोघं शवविच्छेदन करणारे डॉक्टर होते. जॉर्जच्या बाजूनं कुणाचीही साक्ष घेण्यात आली नाही. पुरावे सादर करण्यात आले नाहीत. त्याला त्याचा पक्षदेखील मांडू दिला गेला नाही. अडीच तासांनंतर अर्ध्या तासाचा विराम घेण्यात आला. त्या कालावधीत ज्युरींनी आपला निर्णय न्यायाधीशांकडे सोपवला. त्यानुसार, न्यायाधीशांनी जॉर्जला गुन्हेगार मानून त्याला मृत्युदंडाची शिक्षा पुढच्या दहा मिनिटांत ठोठावली. वरिष्ठ न्यायालयात अपील करण्याचा त्याचा हक्कही नाकारण्यात आला. जॉर्जच्या कुटुंबाला अल्कोलू शहर सोडून जाण्यास भाग पाडण्यात आलं. कुटुंबानं केलेली क्षमायाचना गव्हर्नरनं धुडकावून लावली. एक वर्षं आणि दोन महिन्यांनंतर जॉर्जला यातनामय पद्धतीनं मृत्युदंड देण्यात आला.

सन २००४ मध्ये जॉर्ज स्टिनीचा खटला न्यायालयीन पुनरावलोकनासाठी घेण्यात आला. त्या वेळी, ‘१४ वर्षांचा मुलगा १९ किलोंचा रेल्वेमार्गाचा स्पाईक म्हणून वापरला जाणारा धातूचा तुकडा उचलून कसा काय मारू शकतो,’ असा प्रश्न उपस्थित झाला. शवविच्छेदनाच्या अहवालानुसार, मुलींवर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झालेला नव्हता, हेही स्पष्ट झालं. सन २०१४ मध्ये जॉर्जला दोषमुक्त ठरवण्यात आलं! आणि त्याची शिक्षा माफ करण्यात आली! सत्तर वर्षांनंतरही, दहा वर्षांची न्यायालयीन लढाई लढावी लागली, त्यानंतर जॉर्जवरचा कलंक पुसला गेला. हे पाहायला त्याची धाकटी बहीण एमे मागं उरली होती आणि तीच घटनेची एकमेव खरी साक्षीदार होती. तिचा भाऊ निर्दोष होता हे केवळ तिलाच माहीत होतं. त्या वेळी सात वर्षांची असलेली एमे ही आता सत्तर वर्षांची होती.

खरंच, हा न्याय होता का? तेव्हा, देव-धर्म-कायदा यांनी ज्याच्याकडे पाठ फिरवली होती तो जॉर्ज आजही अश्रुभरल्या नजरेनं हात जोडून एकच प्रश्न विचारू पाहील... ‘फक्त माझा गुन्हा काय ते सांगा!’

(सदराचे लेखक धर्म, इतिहास व साहित्य यांचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com