हिज मास्टर्स व्हॉईस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

his masters voice

सन १८७० च्या दशकात थॉमस अल्वा एडिसन यांनी ‘डिस्क ग्रामोफोन’ म्हणजे फिरत्या तबकड्यांच्या उपकरणाचा शोध लावला.

हिज मास्टर्स व्हॉईस

- राहुल हांडे handerahul85@gmail.com

सन १८७० च्या दशकात थॉमस अल्वा एडिसन यांनी ‘डिस्क ग्रामोफोन’ म्हणजे फिरत्या तबकड्यांच्या उपकरणाचा शोध लावला. लाखेच्या किंवा तत्सम पदार्थांपासून तयार केलेल्या एका चक्राकार तबकडीवर चिरा पाडून ध्वनिमुद्रित केलेल्या आवाजाचं ध्वनीमध्ये रूपांतर करणारं उपकरण म्हणजे ‘ग्रामोफोन.’यालाच काही जण ‘फोनोग्राफ’ असंही म्हणत.

एडिसन यांनी ‘मेरी हॅड ए लिट्ल लँब’ हे सुप्रसिद्ध इंग्लिश बालगीत स्वतःच्या आवाजात ध्वनिमुद्रित करून ग्रामोफोनचा वापर सुरू केला. ग्रामोफोनमुळे श्राव्य मनोरंजनाच्या क्षेत्रात अभूतपूर्व क्रांती घडली. ग्रामोफोनचा सर्वाधिक लाभ संगीतक्षेत्राला होणं स्वाभाविक होतं. या तबकड्यांमुळे जगातील संगीतक्षेत्र सर्वप्रथम जोडलं गेलं. सन १८७० ते १९८० पर्यंत ग्रामोफोन या उपकरणानं जगातील संगीतरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. फिरत्या तबकड्यांच्या या सुमधुर दुनियेचा राजा ठरली ‘एचएमव्ही’ ही कंपनी. सन १८९० च्या दशकात सुरू झालेल्या, डिस्क ग्रामोफोन तयार करणाऱ्या एका छोट्याशा उद्योगाचा विशाल विस्तार म्हणजे एचएमव्ही ही कंपनी. भारतीय संगीतरसिकांच्या संदर्भात विचार करता अमिन सयानी यांच्या ‘बिनाका गीतमाला’ या कार्यक्रमाच्या आणि एचएमव्हीच्या कर्णमधुर संगीताच्या रंगात रंगून गेलेल्या पिढ्या आजही पाहायला मिळतात.

सन १९०७ च्या फेब्रुवारी महिन्यात पश्चिम ब्रिटनमधील मिडलसेक्स प्रांतातील ‘हेस’ या शहरात एचएमव्ही ग्रामोफोन कंपनीची स्थापना झाली. सन १९२१ मध्ये कंपनीनं लंडनमधील ‘३६३, ऑक्सफर्ड स्ट्रीट’वर ग्रामोफोनविक्रीचं स्वतःचं अधिकृत दुकान (ब्रँडेड स्टोअर) थाटलं. प्रख्यात संगीतकार एडवर्ड एल्गर यांच्या हस्ते दुकानाचं उद्घाटन झालं.

काळाच्या ओघात केवळ काही पिढ्यांच्या स्मरणात राहू शकली असती अशी गायकी आणि संगीत ध्वनिमुद्रित करून ते अजरामर करण्याचं काम या कंपनीनं केलं. यासंदर्भात जागतिक पातळीवर या कंपनीचं योगदान मान्यच करावं लागतं.

कंपनीचा हा व्यवसाय असला तरी अमूल्य असा जागतिक वारसा जतन करण्याचं बहुमोल कार्यही या कंपनीनं केलं. स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय संगीतक्षेत्रातील मानदंड असलेल्या दिग्गजांच्या कलेचा आज आपण आस्वाद घेऊ शकतो, यात एचएमव्हीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. जुलै २०२१ मध्ये कंपनीनं आपला शतकमहोत्सव साजरा केला. एचएमव्ही कंपनीप्रमाणेच तिचा ‘लोगो’ही (बोधचिन्ह) जगाच्या मनात कायमचा घर करून बसला आहे.

कंपनीच्या शताब्दीच्या कालावधीत भारतात तिचा लोगो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘लोगो’त ग्रामोफोनच्या भोंग्याला कान लावून ‘हिज मास्टर्स व्हॉईस’ ऐकणारं ‘श्वान’ हे इंग्लडचं आहे की भारताचं हा मुद्दा या सर्व चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.

हल्ली भारतात समाजमाध्यमांमध्ये एक कथा सांगण्यात येत आहे, त्या कथेनुसार लोगोवरील कुत्रा हा भारतीय आहे. भारतीय शास्त्रीय संगीतातील एका मोठ्या नावाचा वापरही ही कथा सांगताना करण्यात येत आहे. हे नाव म्हणजे किराणा घराण्याच्या संस्थापकांपैकी एक उस्ताद अब्दुल करीम खाँसाहेब. सांगण्यात येत असलेली कथा अशी : ‘बडोदा इथं वास्तव्यास असताना खाँसाहेबांनी एक कुत्रा पाळला होता. त्याचं नाव ‘टिपू’ असं ठेवण्यात आलं होतं. खाँसाहेबांचं टिपूवर खूप प्रेम होतं. खाँसाहेबांचा टिपू हे एक अजब रसायन होतं. खाँसाहेब रोज जेव्हा रियाजाला सुरुवात करतं तेव्हा त्यांचा स्वर कानावर पडताच टिपू जिथं असेल तिथून त्यांच्याजवळ येऊन बसत असे. त्यांचा रियाज संपेपर्यंत त्यांचं गायन तो ऐकत बसे. खाँसाहेब जेव्हा ‘पियाबिन आवत नाही चैन’ ही त्यांची प्रख्यात ठुमरी गात तेव्हा अखेरीस टिपूच्या डोळ्यांतून अश्रू ओघळताना अनेकांनी पाहिलं असल्याचंही सांगितलं जातं.’ मुक्या प्राण्याचीदेखील संवेदना जागवण्याची ताकद खाँसाहेबांच्या स्वरात होती, असा याचा अर्थ होतो.

खाँसाहेबांच्या टिपूची प्रसिद्धी एके दिवशी ‘एचएमव्ही’पर्यंत पोहोचली. खातरजमा करून घेण्यासाठी कंपनीनं खाँसाहेबांना टिपूसह आपल्या कार्यालयात बोलावलं. तिथं एक प्रयोग करण्यात आला. टिपूला खाँसाहेबांपासून एका वेगळ्या खोलीत ठेवण्यात आलं. दुसऱ्या खोलीत ग्रामोफोनवर खाँसाहेबांची ‘पिया बिन...’ ही ठुमरी लावण्यात आली. हा स्वर कानी पडताच टिपू त्या खोलीत गेला आणि ग्रामोफोनच्या भोंग्याला कान लावून ऐकू लागला. त्या वेळी छायाचित्रकार सज्जच होता. त्यानं हा क्षण कॅमेऱ्यात बद्ध केला. या छायाचित्राला नाव देण्यात आलं ‘हिज मास्टर्स व्हॉईस.’ हे चित्र आणि त्याचं शीषर्कच पुढं एचएमव्हीचा लोगो झाला...’ अशा प्रकारची ही कहाणी समाजमाध्यमांवर आपापल्या परीनं मालमसाला लावून सध्या वाढण्यात येत आहे.

खाँसाहेबांच्या टिपूची कहाणी खरी आहे; परंतु तिच्यातील एचएमव्हीशी संबंधित भाग मात्र कपोलकल्पित आहे. सत्यासत्यता पडताळण्यासाठी कंपनीचा अधिकृत इतिहास पाहावा लागतो. त्यानुसार इंग्लंडमधील ब्रिस्टॉल शहरातील ‘निपर’ नावाचा कुत्रा त्यांच्या लोगोमध्ये आहे. सन १८९८ मध्ये इंग्लंडचे प्रसिद्ध चित्रकार फ्रान्सिस बररॉड यांनी निपर हा इलेक्ट्रिक एडिसन-बेन सिलिंडर फोनोग्राफ लक्षपूर्वक ऐकत असल्याचं चित्र रेखाटलं आहे. हे चित्र एचएमव्हीचा कंपनीचा लोगो म्हणून स्वीकारण्यात आलं. हा लोगो जगातील आजवरच्या सर्वोत्कृष्ट ट्रेडमार्कपैकी एक मानला जातो.

निपरचा संपूर्ण जीवनपट आणि एचएमव्हीच्या लोगोवर तो झळकण्याची सर्व कहाणी उपलब्ध आहे. तेव्हा, खाँसाहेब आणि त्यांचा टिपू यांचा एचएमव्हीच्या लोगोशी संबंध असल्याचं इतिहासाच्या कोणत्याच कसोटीवर खरं ठरत नाही. अर्थात्, यामुळे खाँसाहेबांच्या मोठेपणाला कोणतीही बाधा येत नाही. मात्र, यावरून एकच लक्षात घ्यावं लागतं की, आज कुणालाही अभिव्यक्त होण्याचं अत्यंत सहज-सुलभ-सुगम साधन म्हणून विविध समाजमाध्यमं मिळाली आहेत. याचा अर्थ अभिव्यक्त होताना ऐतिहासिक तथ्यांशी प्रतारणा करावी असा होत नाही. असली प्रतारणा ही अखेर आपल्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाशीच प्रतारणा ठरत असते.

(सदराचे लेखक धर्म, इतिहास व साहित्य यांचे अभ्यासक आहेत.)

Web Title: Rahul Hande Writes His Masters Voice

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :saptarang
go to top