डाकिया बच्चा लाया... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Postman

‘डाकिया डाक लाया... खुशी का पयाम कही... कही दर्दनाक लाया...’ अथवा ‘ खत लिख दे साँवरिया के नाम बाबू ’ यांसारख्या चित्रपट गीतांमधून टपाल सेवा आणि जनमानस यांचं नातं अधोरेखित करण्यात आलेलं दिसतं.

डाकिया बच्चा लाया...

- राहुल हांडे handerahul85@gmail.com

‘डाकिया डाक लाया... खुशी का पयाम कही... कही दर्दनाक लाया...’ अथवा ‘ खत लिख दे साँवरिया के नाम बाबू ’ यांसारख्या चित्रपट गीतांमधून टपाल सेवा आणि जनमानस यांचं नातं अधोरेखित करण्यात आलेलं दिसतं. संपर्काच्या आधुनिक साधनांचा प्रसार आणि सहज उपलब्धता होण्यापूर्वी पोस्ट ऑफिस आणि पोस्टमन हे भारतीय समाजाचं जणू काही अविभाज्य अंग बनलं होतं. १९९० च्या दशकापर्यंत गुरुजींप्रमाणे पोस्टमन हीदेखील आपल्या खेड्यांतील एक महत्त्वाची व्यक्ती होती. १७६६ मध्ये ‘ईस्ट इंडिया कंपनी’ने कंपनी मेल नावाने भारतीय पोस्ट खात्याची प्राथमिक पायाभरणी केली. १८५४ मध्ये तत्कालीन व्हॉइसरॉय लॉर्ड डलहौसी याने ‘पोस्ट ऑफिस ॲक्ट १८५४’ ला मान्यता दिली. त्यानुसार संपूर्ण देशात टपालसेवेचे समान दर निश्चित करण्यात आले, तसंच ‘पोस्ट मास्टर जनरल’ या पोस्ट खात्यातील सर्वोच्च पदाची निर्मिती करण्यात आली.

१८ व्या व १९ व्या शतकाचा विचार करता टपालसेवा ही सर्वसामान्यांसाठी अभूतपूर्व संपर्कक्रांती होती. तोपर्यंत राजेरजवाडे, सरंजामदार, सावकार - व्यापारी अशा स्तरांतील लोक वगळता सर्वसामान्यांना एकमेकांशी संपर्क साधण्याचा किंवा ख्यालीखुशाली कळवण्याचा मार्ग उपलब्ध नव्हता. पोस्ट खात्यामुळे अत्यंत नाममात्र शुल्कात सामान्य माणसालाही एकमेकांशी संपर्क साधता येऊ लागला. पुढे मनीऑर्डर करून पैसेदेखील पाठवता येऊ लागले. दरम्यानच्या काळात तारायंत्र आलं. तार हे त्या काळातील अत्यंत जलद संपर्काचं साधन ठरलं. तार या प्रकाराचा उपयोग प्रशासकीय कारभार अधिक प्रभावी होण्यास, तसंच व्यापार-उद्योगासारख्या आर्थिक क्षेत्राचा विकास होण्यास खूप मोठ्या प्रमाणात झाला.

सर्वसामान्य माणूस मात्र दारात उभं राहून पोस्टमनने ‘तारऽऽऽ’ असा आवाज दिला, तर अंतर्बाह्य हादरून जायचा. कारण एकतर सामान्य माणसाला तार सहजासहजी येतच नव्हती. आलीच तर ही तार म्हणजे ‘फादर सिरियस कम इमिजिएट’ अथवा ‘फादर इज...’ असल्याच आशयाची असायची, त्याशिवाय सामान्य माणसाचा तार ह्या प्रकाराशी संबंध नव्हता. कारण हा संपर्काचा प्रकार त्याकाळाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत जलद असला, तरी सामान्य माणसाला न परवडणारा होता.

शब्दसंख्येवर तारेचं मूल्य ठरवलं जात असल्याने सामान्य माणूस कमीत कमी शब्दांत आपला निरोप देण्याचा प्रयत्न करत असे. मराठीचा अभिमान असला तरी तारेसाठी आर्थिकदृष्ट्या इंग्रजीच परवडणारी होती. अशी ही भारतीय टपाल सेवा भारतीय जनमानसाच्या मनातील एक आगळा-वेगळा स्मृतींचा ठेवा आहे. भारताप्रमाणेच थोड्याफार फरकाने जगातील प्रत्येक देशातील टपालसेवेच्या संदर्भातील अनुभूती अशीच सांगता येते. अशाच प्रकारे अमेरिकन टपाल सेवेच्या इतिहासात एक अत्यंत मजेदार किस्सा नोंदवला गेला आहे. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध यशस्वी होण्यापूर्वी आणि अमेरिकेने स्वतःला एक स्वतंत्र राष्ट्र घोषित करण्यापूर्वी तेथील टपाल व्यवस्था एकदम प्राथमिक अथवा आदिम अवस्थेत होती. त्याकाळात अमेरिकेत अस्तित्वात असणारी टपाल व्यवस्था ब्रिटिश सरकारच्या आधीन असल्यामुळे स्वातंत्र्ययुद्धात क्रांतिकारकांनीदेखील स्वतःची म्हणून एक गुप्त टपाल व्यवस्था विकसित केली होती. उत्तर अमेरिकेतील १३ वसाहतींमध्ये तिचा अत्यंत प्रभावी वापर क्रांतिकार्यासाठी त्यांनी केला.

अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धातील जॉर्ज वॉशिंग्टन यांच्यानंतर महत्त्वाचं नाव म्हणजे बेंजामिन फ्रँकलिन. या प्रतिभावंत वैज्ञानिकाने स्वतःला स्वातंत्र्ययुद्धात झोकून दिलं. अमेरिकन क्रांतिकारकांनी जो स्वातंत्र्याचा जाहीरनामा घोषित केला, त्याच्या लेखनातही त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. या बेंजामिन फ्रँकलिन यांनी ब्रिटिश टपाल व्यवस्थेचा सखोल अभ्यास केला. स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात त्यांनी क्रांतिकारकांना प्रोत्साहित करण्यासाठी स्वतः टपाल रस्त्यांवरून जाणीवपूर्वक प्रवास केला. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी टपाल वितरणाच्या वेळेत कपात कशी करता येईल यासंदर्भात निरीक्षणं नोंदवली. त्यांनी ‘फिलाडेल्फिया ते न्यूयॉर्क’ या टपाल वितरणवेळेत तब्बल ३३ तासांची बचत करण्याचं प्रात्यक्षिकदेखील करून दाखवलं. १७५३ ते १७७४ या प्रदीर्घ काळात त्यांनी केलेला अभ्यास यासाठी कामी आला. तसंच नव्या अमेरिकेच्या विकासात पोस्ट खातं महत्त्वाची कामगिरी बजावणार हेदेखील त्यांनी हेरलं होतं.

जेव्हा एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून अमेरिकेच्या स्वातंत्र्याची घोषणा झाली, त्या वेळी फ्रँकलिन टपाल खात्याचे पहिले पोस्ट मास्टर जनरल झाले. त्यांनी अमेरिकन टपाल व्यवस्थेची संपूर्ण घडी घालून दिली. त्यानंतरचा अमेरिकन टपाल व्यवस्थेच्या विकासाचा इतिहास मोठा रंजक आहे. असं असलं तरी १९१० च्या दशकात एका गमतीशीर टपाल प्रकाराचा सामना अमेरिकन पोस्टाला करावा लागला.

१९१० च्या दशकात अमेरिकेत मुलांना सोबत घेऊन प्रवास करणं खर्चीक होतं. अशावेळी काही डोकेबाज पालाकांनी पोस्टाने मुलांना आपल्या आजी-आजोबांकडे पाठवण्याची शक्कल लढवली. १९१३ मध्ये एक जानेवारीला अमेरिकन पोस्ट खात्याने डाक पाठवण्यासाठी केलेल्या एका नियमाचा लाभ या पालकांनी उठवला. पूर्वीच्या नियमानुसार केवळ १ किलो ८०० ग्रॅम वजनाचं डाक पाठवता येत होतं. नवीन नियमानुसार ही मर्यादा २३ किलो करण्यात आली. याचा फायदा घेत एका पालकाने आपलं १० पौंड वजनाचं ८ महिन्यांचं बाळ १५ सेंटचं तिकीट लावून आजीच्या घरी पाठवलं. तसंच, पोस्टाच्या नियमानुसार या डाकला ५० डॉलरचं विमा संरक्षणदेखील लाभलेलं होतं.

१९१४ मध्ये १९ फेब्रुवारीला पाच वर्षांचा मेय पिअर्सटॉर्फ याला त्याच्या आई-वडिलांनी ग्रॅनविले येथून ५३ सेंटची डाक तिकिटं लावून लुईस्टन इथे पार्सल करून पाठवलं होतं. टपाल तिकीट त्याच्या जॅकेटवर लावून मेयला रेल्वेच्या पोस्ट पार्सल बोगीत बसवण्यात आलं. मेल क्लर्कने त्याला त्याच्या आजीच्या घरी पोहोचवलं. सहा वर्षांच्या एडना नेफ नावाच्या मुलीला तर फ्लोरिडावरून व्हर्जिनियाला म्हणजे सुमारे ७२० किलोमीटरवर डाकद्वारे पाठवण्यात आलं. अखेर १९१५ मध्ये अमेरिकेतील काही महत्त्वाच्या वृत्तपत्रांनी या प्रकाराची दखल घेतली. अमेरिकेचे तत्कालीन पोस्ट मास्टर जनरल यांना हा प्रकार जेव्हा समजला, तेव्हा त्यांनी हा प्रकार तात्काळ बंद करण्याचा आदेश दिला. अन्यथा, अमेरिकेतील पोस्टमन ‘डाकिया डाक लाया..’ असं म्हणण्याऐवजी ‘डाकिया बच्चा लाया..’ असं म्हणत फिरले असते. पोस्टाने मुलांना डाक म्हणून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्याचे हे प्रकार अमेरिकेत तसे मोजक्या प्रमाणातच घडले. एवढं मात्र खरं की, हे फक्त अमेरिकेतच घडलं.

Web Title: Rahul Hande Writes Postman Child

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..