
आजच्या कर्नाटकातील भटकळ, कानूर, मिरजान, अंकोला या परिसरातील उच्चप्रतीच्या काळ्या मिरीची, या मिरीच्या निर्यातीतील आर्थिक लाभ यासोबतच अल्फान्सो मेक्सी गेरुसोप्पाच्या राणीचा उल्लेख करतो.
प्रदीर्घ राजवटीची मिरपूड राणी !
- राहुल हांडे handerahuk85@gmail.com
‘बाटिकाला (भटकळ) आणि गोव्याच्या दरम्यान ओनोर (कानूर), मारझेन (मिरजान) आणि अंकोला नावाची ठिकाणं आहेत. मी ऐकलं आहे की, येथून दरवर्षी ५ हजार क्रुझेडो (पंधराव्या शतकातील पोर्तुगीज सोन्याचं नाणं) किमतीची मिरपूड निर्यात केली जाते. या ठिकाणांवर गेरुसोप्पाच्या राणीचं आधिपत्य आहे. ही मिरी कोचीनच्या काळी मिरीपेक्षा जाड, जड आणि चटपटीत असते. मला असं वाटतं की, ही ठिकाणं आपल्या ताब्यात घ्यावीत.’ अशा आशयाचं पत्र भारतातून पोर्तुगालच्या सम्राटाला अल्फान्सो मेक्सी याने पाठवलं. तो पोर्तुगिजांच्या कोचीन बंदराचा कॅप्टन होता.
आजच्या कर्नाटकातील भटकळ, कानूर, मिरजान, अंकोला या परिसरातील उच्चप्रतीच्या काळ्या मिरीची, या मिरीच्या निर्यातीतील आर्थिक लाभ यासोबतच अल्फान्सो मेक्सी गेरुसोप्पाच्या राणीचा उल्लेख करतो. कारण अशी दर्जेदार मिरी उत्पादन होणारा भूभाग तिच्या आधिपत्याखाली होता. यासाठी अल्फान्सो मेक्सी हा भूभाग आपल्या ताब्यात घेण्याची आवश्यकतादेखील अधोरेखित करतो.

आपलं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पोर्तुगिजांनी या राणीसोबत दोनदा म्हणजे इ.स. १५५९ आणि १५७० मध्ये युद्ध केलं. मात्र, तिने दोन्ही वेळेस पोर्तुगिजांचा पराभव केला आणि आपला भूभाग, बंदरं आणि व्यापार बळकावण्याचा त्यांचा इरादा सफल होऊ दिला नाही. ही राणी जोपर्यंत राज्यकर्ती होती, तोपर्यंत पोर्तुगीज यशस्वी होऊ शकले नाहीत. दरम्यान, बलाढ्य अशा विजयनगर साम्राज्याचं पतन झालं. त्यानंतर या राणीने पोर्तुगिजांशी अत्यंत मुत्सद्दीपणे व्यवहार केला, कारण तिचा मुख्य आधार निखळला होता. राणीचा पराक्रम आणि मुत्सद्देगिरी पाहून पोर्तुगीज नोंदीमध्ये तिच्याबद्दल सावध, विनम्र व मुत्सद्देगिरीने जिंकता येऊ शकणारी व्यक्ती, असा उल्लेख नोंदवण्यात आला आहे. तसंच तिला ‘रैना डी पिमेंटा’ म्हणजे पेपर क्वीन, म्हणजेच मिरपूडची राणी असं टोपणनावदेखील दिलं. या भारतीय राणीचं नाव होतं चेन्नभैरदेवी.
सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात राणी चेन्नभैरदेवी यांनी उत्तर कर्नाटकच्या बऱ्याच मोठ्या भूभगावर राज्य केलं. सलुवा राजवंशाची ही राणी इसवी सन १५५२ ते १६०६ पर्यंत म्हणजे सुमारे ५४ वर्षं या भूभागाचं आधिपत्य करत होती. एवढी प्रदीर्घ राजवट करणाऱ्या चेन्नभैरदेवी या बहुधा एकमेव भारतीय महिला असाव्यात. ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ प्रथम यांची राजवट इसवी सन १५५८ ते १६०३ पर्यंत होती. चेन्नभैरदेवी व एलिझाबेथ प्रथम या प्रदीर्घ राजवट करणाऱ्या महिला समकालीन असाव्यात हा एक योगायोग सांगता येतो. विकेंद्रित विजयनगर साम्राज्यात महामंडलेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजघराण्यांनी विविध प्रदेशांवर राज्य केलं. त्यापैकी एक उत्तर कर्नाटकातील शरावती नदीच्या काठावर वसलेलं गेरुसोप्पा होतं. विजयनगर साम्राज्याच्या आधिपत्याखाली असलेलं हे एक मांडलिक राज्य होतं. एका शिलालेखानुसार गोव्याच्या दक्षिणेपासून, उत्तर कन्नडा व दक्षिण कन्नडा जिल्हे आणि मलबारपर्यंत राणी चेन्नभैरदेवी यांचं राज्य विस्तारलेलं होतं. त्यांच्या राज्यात भटकळ, होन्नावर, मिरजन, अंकोला आणि बैंदूर अशी महत्त्वाची बंदरं होती, तरी हा प्रदेश प्रामुख्याने आपल्या दर्जेदार मिरपुडीसाठी विशेषकरून ओळखला जातो.
चेन्नभैरदेवी यांची राणी होण्याची कहाणी अशी सांगितली जाते की, विजयनगरच्या सुलवा घराण्याच्या एका शाखेतील राजांनी गेरुसोप्पावर राज्य केलं, तर दुसऱ्या शाखेने हदुवल्लीवर राज्य केलं. गेरुसोप्पाची राणी चेन्नादेवी ही चेन्नभैरदेवी यांची मोठी बहीण होती. चेन्नादेवी यांचा पती राजा इम्मादी देवराया होता. त्यावेळेस चेन्नभैरदेवी या हदुवल्लीचा राज्यकारभार पाहत होत्या. इसवी सन १५४२ मध्ये पोर्तुगिजांनी गेरुसोप्पावर आक्रमण केलं. गोव्यात झालेल्या भयंकर युद्धात राजा इम्मादी देवराया याचा पराभव झाला. इम्मादी देवरायाच्या पराभवानंतर पोर्तुगीज सेनापती अल्फान्सो -डिसोझा याने त्याची राजधानी भटकळ जाळून बेचिराख करून टाकली. इम्मादी देवरायाची पत्नी आणि चेन्नभैरदेवीची मोठी बहीण राणी चेन्नादेवीने पोर्तुगिजांशी लढा देण्याचा प्रयत्न केला. अखेर भटकळ पडलं आणि बेचिराख झालं. यानंतर चेन्नभैरदेवीकडे हदुवल्लीसह गेरुसोप्पाचादेखील राज्यकारभार सोपवण्यात आला.
इतिहासकारांनी विखुरलेल्या अवशेषांमधून राणी चेन्नभैरदेवीचा हा इतिहास सिद्ध केलेला आहे. उपलब्ध माहितीवरून राणी चेन्नादेवी आणि राणी चेन्नभैरदेवी ह्या दोघी स्त्रीसत्ताक अथवा मातृसत्ताक शासनपद्धतीचं प्रतिनिधित्व करताना दिसतात. विशेष म्हणजे, त्याच काळात ब्रिटनमध्ये महाराणी एलिझाबेथ प्रथम यांच्यानिमित्ताने स्त्रीसत्ताक शासनपद्धती अस्तित्वात आली होती. इसवी सन १५५९ आणि १५७० मध्ये राणी चेन्नभैरदेवी यांनी पोर्तुगिजांना रणभूमीत धूळ चारली होती. इसवी सन १५७१ मध्ये त्यांनी एका संयुक्त सैन्याचं सेनापतिपददेखील समर्थपणे सांभाळलं होतं. या संयुक्त सैन्यात गुजरातचा सुलतान, बिदरचा सुलतान, विजापूरची आदिलशाही आणि केरळचे झामोरिन राजे यांच्यासह अनेक राजे सहभागी होते. मध्ययुगीन भारतात एक स्त्री पुरुषांचं आणि हिंदू-मुस्लिम अशा बहुधर्मी सैन्याचं नेतृत्व करते, हे निश्चितच उल्लेखनीय म्हणावं लागेल. राणी चेन्नभैरदेवी यांचा धर्म जैन होता. असं असलं तरी प्रत्येक धर्माला त्यांच्या राज्यात प्रतिष्ठा आणि समान न्याय दिला जात होता.
गेरुसोप्पाच्या चतुर्मुख बासादीची निर्मिती इसवी सन १६६२ मध्ये राणी चेन्नभैरदेवी यांनी केली. करकला येथे ग्रॅनाइट खडकांमध्ये कोरलेली ही बासादी आज कर्नाटकातील प्रमुख ऐतिहासिक मंदिरांपैकी एक मानली जाते. अकलंका आणि भट्टकालका यांच्यासारखे जैन विद्वान हे राणीच्या आश्रयाला होते. स्वतः जैन असली तरी राणीने शैव आणि वैष्णव मंदिरांना मोठ्या प्रमाणात अनुदान दिलं. पोर्तुगिजांच्या छळापासून वाचण्यासाठी गोव्यातील अनेक सारस्वत ब्राह्मण, व्यापारी आणि कुशल कोकणी कारागिरांनी राणी चेन्नभैरदेवींच्या राज्यात आश्रय घेतला होता. राणी चेन्नभैरदेवी यांच्या राज्यात सुरक्षेसोबतच समृद्धीदेखील नांदत होती, त्यामुळे हे लोक त्यांच्या राज्यात आश्रय घेण्यास उत्सुक असावेत. होन्नावर व भटकळ ही ठिकाणं राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्रं होती.
अरबी घोडे आणि शस्त्रं यांची आयात याठिकाणी केली जात असे. त्याचबरोबर मिरपूड, सुपारी आणि जायफळ यांची युरोपीय आणि अरब देशांमध्ये निर्यात केली जात होती. गोकर्णजवळील आगनाशिनी नदीच्या जवळ असलेला मिरजान किल्ला चेन्नभैरदेवी यांनी बांधला. त्यांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग ह्या किल्ल्यातच घालवला. दहा एकरांवर पसरलेला हा किल्ला उंच छत, टेहळणी बुरूज आणि एकमेकांशी जोडलेल्या विहिरींसाठी प्रसिद्ध होता. राणी चेन्नभैरदेवी यांना कायम शेजारील प्रतिस्पर्धी राज्यं आणि पोर्तुगीज यांच्याशी संघर्ष करावा लागला.
राणीला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी शेजारील केलाडी राजे आणि बिलगी सरदारांनी अनेकवेळा प्रयत्न केला. पोर्तुगीजदेखील असला प्रयत्न करतच होते. अखेर केलाडी राजे आणि बिलगी सरदारांनी एकता हीच ताकद हे सूत्र स्वीकारलं. वैवाहिक संबंधातून हे दोन परिवार एकत्र आले. त्यांच्या संयुक्त सैन्याने गेरुसोप्पावर हल्ला केला आणि शेवटी राणीचा पराभव केला. गेरुसोप्पाचं राज्य केलाडींच्या ताब्यात आलं. राणी वृद्ध झाली होती, तिला केलाडी येथे नेण्यात आलं आणि राणीने तेथील तुरुंगातच अखेरचा श्वास घेतला. अशी एकजूट पोर्तुगिजांविरोधात वापरली असती, तर इतिहास वेगळा असू शकला असता. असं असलं तरी राणी चेन्नभैरदेवी म्हणजे सशक्त व समर्थ भारतीय स्त्रियांच्या इतिहासातील आणखी एक सोनेरी पान आहे.
(सदराचे लेखक धर्म, इतिहास व साहित्य यांचे अभ्यासक आहेत.)