
रशियाचा राजा झार याची राजधानी असलेल्या सेंट पीटसबर्ग शहरानजीकच्या जंगलात १८३७ मध्ये २७ जानेवारीला घडलेली घटना मोठी विलक्षण होती.
रशियन महाकवीची शोकान्तिका!
- राहुल हांडे handerahuk85@gmail.com
रशियाचा राजा झार याची राजधानी असलेल्या सेंट पीटसबर्ग शहरानजीकच्या जंगलात १८३७ मध्ये २७ जानेवारीला घडलेली घटना मोठी विलक्षण होती. द्वंद्वयुद्धाचे आव्हान दिलेले दोन पुरुष एकमेकांसमोर बंदुका ताणून उभे होते. दोघांनी एकाच वेळेस गोळी झाडणे, हा तत्कालीन द्वंद्वयुद्धाचा नियम होता. हॉलिवूडच्या काऊबॉय धाटणीच्या व बॉलिवूड चित्रपटांमध्ये हा प्रसंग आपण पाहत आलेलो आहोत. युरोपात मात्र दोन व्यक्तींच्या कोणत्याही रीतीने संपुष्टात न येणाऱ्या वैराचा अंतिम निकाल लावण्याची अशी पद्धत समाजमान्य होती. त्यानुसार या दोघांनी बंदुका रोखून समोरच्यावर निशाणा साधला. यातील एकाचा नेम चुकला, मात्र दुसऱ्याचा अचूक ठरला. गोळी लागलेल्याच्या पोटात ती गोळी तिरपी घुसली. जखम भयंकर होती. त्याला उभे राहवत नव्हते. अशाही अवस्थेत त्याने झाडलेल्या गोळीने त्याच्या शत्रूला किरकोळ दुखापत झाली. मरणासन्न झालेल्या या व्यक्तीला घोडा गाडीत घालून घरी नेण्यात आले. दोन दिवस मरणप्राय यातना सहन करून अखेर २९ जानेवारीला त्याचा मृत्यू झाला. ही व्यक्ती म्हणजे रशियाचा महाकवी म्हणून इतिहासात अजरामर झालेला अलेक्झांडर पुष्किन.
रशियन साहित्यात साहित्यिक म्हणून आपले स्वत्व व व्यक्तिस्वातंत्र्य ज्याने सदैव जपले तो म्हणजे पुष्किन. ज्याच्या साहित्यनिर्मितीने आधुनिक रशियन साहित्याला आणि साहित्यिकांच्या येणा-या प्रत्येक पिढीला घडवले. आईकडून निग्रो रक्त आणि वडिलांकडून रशियन स्लाव्ह रक्त घेऊन १७९९ मध्ये २६ मे रोजी मॉस्कोत एका खानदानी श्रीमंत सरंजामशाही घराण्यात पुष्किन जन्माला आला.
त्याच्या आईचा आजा अब्राहम हनिबल हा नीग्रो गुलाम स्वतःच्या हुशारीवर रशियन झार पीटर दि ग्रेटच्या दरबारी मोठया हुद्यावर पोहचला होता. आईकडून पुष्किन हनिबलचा पणतू. त्यामुळे रशियन खानदानीपणा आणि नीग्रो रासवटपणा यांचा मिलाफ पुष्किनच्या व्यक्तिमत्त्वात होता. मोठी बहीण ओल्गा आणि भाऊ लिओ ही पुष्किनची भांवडे. लहानपणी नकटा, चपटा, कुरळया केसांचा पुष्किन अगदी मंद वाटायचा. तसाच संकोची अन् लाजरा-बुजरा, घुम्या म्हणता येईल असाच होता.
पुष्किनची आई अत्यंत उथळ व लहरी बाई होती, तिचे पुष्किनच्या वडलांशी कधीच पटले नाही. लष्करात फार मोठया पदावर असणाऱ्या त्याच्या वडिलांची पीटसबर्ग येथे बदली झाली. त्यावेळी पुष्किन दोन - अडीच वर्षांचा होता. त्याला सांभाळण्यासाठी अत्यंत प्रेमळ व विश्वासू दाई मिळाली. तिच्याकडे कल्पनारम्य गोष्टींचा खजिनाच होता. त्याच्यातल्या साहित्यिक प्रतिभेचं बीज त्यामुळे नकळतपणे अंकुरले. एका नोकराकरवी गंमत म्हणून करण्यात आलेल्या अक्षर ओळखीनं या अंतर्मुख मुलाला जणू जादूनगरीचं दार खुलं झालं. घरात फ्रेंच भाषा बोलली जात असल्याने तो या भाषेत निष्णात झाला.
वयाच्या अकराव्या वर्षी त्याला कित्येक अभिजात फ्रेंच साहित्यकृती मुखोद्गत होत्या. पुष्किनला आपल्या आईकडचा पणजोबा अब्राहम हनिबलचा सेनानी म्हणून अत्यंत अभिमान होता. १८२८ मध्ये त्यानं आपल्या पणजोबांवर ''महान प्योत्रचा काळा हशबी'' ही ऐतिहासिक कादंबरी लिहिली. घरात आईवडलांचे वितुष्ट व उदास वातावरण असले, तरी पुष्किन ग्रंथांच्या सहवासात निखळ आनंद उपभोगत होता. झार पहिला अलेक्झाण्डर याने उच्चकुलीन व बुद्धिमान मुलांना शिक्षण देऊन अत्यंत कार्यक्षम अधिकारी म्हणून घडविण्यासाठी स्थापन केलेल्या शाळेत पुष्किनला त्याच्या वडिलांनी आपले वजन वापरून दाखल केले.
घरापासून दूर, समवयस्क मित्रांचा सहवास, उंची गणवेष या कल्पनेने भारावलेल्या पुष्किनने भरपूर अभ्यास करून प्रवेश परीक्षा दिली. राजवाडयातच असलेल्या, केवळ तीसच विद्यार्थ्यांना प्रवेश देणा-या या शाळेत अखेर पुष्किनचा प्रवेश १८११ मध्ये झाला. शिक्षणाच्या कालखंडात त्याने सुमारे १२० कविता लिहिल्या. शाळेतील इतर विषयांच्या शिक्षकांना पुष्किन एक उथळ, बडबडया व उडाणटप्पू विद्यार्थी वाटत असला,तरी रशियन भाषेच्या शिक्षकांनी त्याची काव्यप्रतिभा ओळखली होती. त्याच्यासारखा वाचनवेडा अन्य कोणता विद्यार्थी शाळेत नव्हता. १८१७ मध्ये त्याचे शालेय शिक्षण पूर्ण झाले, तोपर्यंत तो साहित्य वर्तुळात प्रसिद्ध झाला होता.
लष्करी अधिकारी होण्याची इच्छा असलेल्या पुष्किनला आईवडलांमुळे परराष्ट्र खात्यात ज्युनिअर सेक्रेटरी म्हणून नोकरी पत्करावी लागली. त्याच्या स्वातंत्र्य, खेडे, चाआदायेवला अशा कवितांमुळे झारची त्याच्यावर खफ्फा मर्जी झाली. त्याच्या काव्यामुळे तरुण बिघडतील अशी भिती वाटली म्हणून रशियाच्या दक्षिण सीमाप्रदेशात त्याची बदली करण्यात आली. तिकडे जाण्यापूर्वी १८२० ला त्याने ''रासुलार लुडमिला'' हे खंडकाव्य पूर्ण केले. रशियन साहित्याच्या स्थित्यंतराच्या मार्गाचा आरंभ या खंडकाव्यानं झाला. त्यानंतर ‘कॉकेशसचा कैदी’, ‘बख्चीसरायचे कारंजे’, ''जिप्सी'' या त्याच्या रोमांचवादी कवितांनी प्रस्थापित समाजव्यवस्थेवर घणाघात करत, रशियन साहित्यात व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार सर्वप्रथम केला.
काव्यासोबतच रशियन गद्य साहित्यात ही पुष्किनने नवयुगाचा प्रारंभ केला. ''बेल्कीनच्या कथा'' या कथासंग्रहातून महाकवी पुष्किन कथाकार म्हणूनही प्रसिद्ध झाला. कवीचा द्रष्टेपणा असलेल्या बेल्कीनच्या कथांनी रशियन गद्य प्रकाराला काव्यात्मकता, सौंदयवाद, शैली आदी अंगानं समृद्ध केलं. ‘बरीस गोदूनोव’ आणि ‘येवगेनी ओनेगिन’ या त्याच्या पद्यात्मक कादंबऱ्यांना रशियाचे श्रेष्ठ समीक्षक बेलन्स्की यांनी रशियन जीवनाचा ज्ञानकोश संबोधले आहे. पुष्किनच्या नाटयकृतींनी देखील रशियन नाटय वाड्मयाला नवी परिमाणं दिली. व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार आणि क्रांतिकारकांविषयीचं प्रेम यामुळे झार व पुष्किन यांच्यातील वैर वाढतच गेले. बंदुकीने द्वंद्वयुद्ध बेकायदा असल्याने मृत्यूनंतर ही सरकारने पुष्किनला क्षमा केली नाही. त्याच्या अंत्ययात्रेची परवड केली.
मॉस्कोतील सौंदर्यवतींपैकी एक पण भावनाशून्य-निर्बुद्ध नताल्या गोन्चारोवाशी १८३१ मध्ये केलेला विवाह पुष्किनचे वैवाहिक जीवन व भावविश्व उध्वस्त करणारा ठरला. चार अपत्य झाल्यानंतर तिच्या जीवनात आलेल्या बॅरन जॉर्ज अन्थीस या फ्रेंच अधिका-यामुळे आधीच आर्थिक अडचणीनं, भावंडांच्या आर्थिक मागणीने त्रस्त पुष्किन वैफल्यग्रस्त झाला. यातूनच त्यानं अन्थीसला बंदुकीनं द्वंद्व करण्याचं आव्हान दिलं आणि स्वतःचं जीवन पणाला लावलं. एका हितशत्रूने निनावी पत्रं लिहून नालायक नवरा, बाईलबुद्धया अशा उपमा वापरून मनःशांती गमावलेल्या पुष्किनला द्वंद्व युद्धाच्या निर्णयापर्यंत पोहचवले.
वयाच्या अवघ्या सदतिसाव्या वर्षी हाताने ओढवलेल्या या अकाली अंताने रशिया आपल्या महाकवीला कायमचा पारखा झाला. पुष्किन कलंदर वृत्ती, स्वतंत्र बाणा, संवेदनशीलता, बेफिकीर मनस्वी वृत्ती अशा गुणांनी युक्त असा अलौकिक प्रतिभेचा महाकवी होता. झारने अवघ्या ३-४ जणांच्या उपस्थितीत पुष्किनचा देह मातीखाली दडवला, तरी त्याच्या मृत्यूनंतर त्याला प्राप्त झालेली अफाट व चिरंतन लोकप्रियता तो रोखू शकला नाही. रशियन साहित्याच्या आजवरच्या सर्व वाटा-वळणांची बीजं पुष्किनच्या साहित्यातच सापडतात. रशिया बदलला; परंतु त्याच्या मनातील महाकवी पुष्किन अढळ राहिला. पुष्किनची जीवनश्रद्धा आणि प्रेम आजही रशियन माणसाला जगण्याची प्रेरणा देत आहे.