गोष्ट एका प्रेमाची...

सातत्याने नव्या आव्हानांचा शोध घेणारा उद्योजक आणि एंजल गुंतवणुकदार राहुल नार्वेकरची पत्नी सी पल्लवी राव हिला कर्करोग व ऑटोइम्यून आजाराने हिरावून नेले.
Rahul Narvekar
Rahul NarvekarSakal
Updated on

सातत्याने नव्या आव्हानांचा शोध घेणारा उद्योजक आणि एंजल गुंतवणुकदार राहुल नार्वेकरची पत्नी सी पल्लवी राव हिला कर्करोग व ऑटोइम्यून आजाराने हिरावून नेले. धैर्य, तग धरून राहणे, दृढता, निश्चय आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रेम यांची ही कथा त्याच्या स्वतःच्याच शब्दात.

मे १८, २०२१ पूर्वीच्या माझ्या उभ्या आयुष्यात मी मोजून चार वेळा रडलो असेन. मी शेवटी रडलो ते २००५ साली, जेव्हा आम्ही- मी आणि माझी पत्नी- आम्ही डॉ. विनित सुरींना भेटण्यासाठी अपोलो हॉस्पिटलमध्ये धाव घेतली अणि जेव्हा त्यांनी उच्चारलेले दोन शब्द कानावर पडले, जे पुढील १६ वर्षे आमच्या आयुष्यांना ग्रासून टाकणार होते. ते शब्द होतेः मायस्थेनिया ग्रॅव्हिस.

माझ्या मनात आलेला पहिला विचार होता ‘अमिताभ बच्चन’यांचा. कारण मला आठवले की या कलाकारालादेखील याच ऑटोइम्यून आजाराच्या सौम्य प्रकाराने ग्रासलेले आहे. पण मग मी डॉक्टरांचे पुढचे शब्द ऐकले - दाखल होणे, शस्त्रक्रियेची शक्यता, मग कदाचित रेडिएशन आणि केमोथेरपी. मला आठवतंय मी हॉस्पिटलच्या स्वच्छतागृहात उभा होतो आणि अचानक माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू उभे राहिलेले माझ्या लक्षात आले. सगळ्यात प्रबळ भावना होती ती भीतीची.

१८ मे नंतर मी किती वेळा धीर सोडून रडलो आहे त्याची गणती करणे अशक्य आहे. पण ही कथा रोगाची भीती, शस्त्रक्रिया, हॉस्पिटल्स आणि आयसीयूजबद्दल नाहीये. ही कथा आहे प्रेमाची...

ही कथा आहे डोळ्यांसमोर स्वप्ने असलेल्या एका तरुण मुलीची. ही कथा आहे एका लग्नाची, कुटुंबाची, एका लेकीची, बहिणीची, मैत्रिणीची, शिक्षिकेची, आईची आणि लढवय्या स्त्रीची. कारण माझी पत्नी या सर्व भूमिकांमध्ये आहे. मी ‘होती’असे म्हणणार नाही कारण ती ‘आहे’आणि कायम असणारच आहे. ही कथा आहे माझ्या रॉकस्टार बीवीची, सी पल्लवी राव नार्वेकर उर्फ सीपीआर. माझी लढवय्यी राणी.

पूर्वी २००० मध्ये जेव्हा मी मुंबईतच होतो तेव्हा मी चॅनेल- ऑक्सिजन या स्टार्ट-अपचा भागीदार म्हणून काम करत होतो. आम्हाला म्हणायला आवडायचे तसा हा आशियातील पहिला इंटरअॅऑक्टीव्ह म्युझिक चॅनेल. या टीममधला मी सगळ्यात खोडकर माणूस होतो आणि त्यामुळे माझी खोडी काढण्यासाठी भागीदारांनी माझी प्रोफाईल जीवनसाथीवर टाकली. त्याकाळात ऑनलाईन लग्न जमवणे ही एक नवीन संकल्पना होती.

कथा थोडक्यात सांगायची तर सीपीआर आणि मी पहिल्यांदा ऑनलाईन भेटलो आणि मग मुंबईतील माटुंग्याच्या सुंदर कॅफेमध्ये. आम्ही दोघेही सुरवातीला चाचपडत होतो पण मग आमचे जमून गेले खरे. मुंबईतल्या लोकलमधून चार दिवस प्रवास केल्यावर सीपीआर म्हणायला लागली ‘‘मुंबई फार धावपळीची आहे’’ आणि ‘‘तुम्ही मंडळी तुमचे आयुष्य लोकल ट्रेन्समध्येच घालवता’’ आणि मग ‘‘आपण एक वर्ष दिल्लीला रहायला जाऊयात आणि मग पुढच्या वर्षी आपण मुंबईला परत येऊयात.’’

म्हणून मी तेच केलं. तोपर्यंत चॅनेल ऑक्सिजन हा स्टार्टअप राहिला नव्हता. मी दिल्लीला पोचलो आणि चांगले पैसे कमवायला लागलो. आम्ही दिल्लीतले आमचे पहिले घर विकत घेतले, मोठी गाडी घेतली, एकदोन वेळा पेज-३ वरही झळकलो. आणि मग शोना,आमचा लॅब्रेडॉर आणि आमच्या आयुष्यातले प्रेम आमच्यात आले. आणि मग २००५ मध्ये आले आमचे सर्वोत्तम जॉइंट व्हेंचर- आमचा मुलगा- रिआन राव नार्वेकर. आयुष्य यापेक्षा आणखी काय सुंदर असू शकते? निदान आम्हाला तसे वाटत होते.

एक दिवस सीपीआर बोलताना अडखळायला लागली, तिची डावी पापणी खाली झुकायला लागली. मायस्थेनिया ग्रॅव्हिस हे निदान झाल्यावर दिल्लीच्या अपोलोमध्ये एक शस्त्रक्रिया पार पडली ज्यात तिचा एक स्वर-तंतू कापला गेला आणि दुसऱ्याला लकवा भरला. ती आपला आवाज गमावून बसली. अपोलोमधले इएनटीचे प्रमुख तिला म्हणाले: “आता यापुढे आरजे बनणे विसरून जा.” ते म्हणाले की कधीकाळी सीपीआरला तिचा आवाज परत मिळाला तर तो एक चमत्कार असेल. मला त्याचा अगदी संताप आला होता, पण सीपीआरने शांतपणे एका कागदावर लिहिले: “एक दिवस मी परत ऑन-एअर असेन”

तिच्यावर कोणीच विश्वास ठेवला नाही - ना तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी ना नंतर इतरांकडून घेतलेल्या मतांनी. तिच्या गळ्याभोवती एक घंटा बांधलेली होती जेणेकरून ती मदत मागू शकेल. कारण तिला साधे कुजबुजतासुद्धा येत नव्हते. तिला आणि आमच्या तान्ह्या मुलाला वेळ देण्यासाठी मी माझी नोकरी सोडली. लवकरच एक फार चमत्कारिक परिस्थिती आमच्या लक्षात आली. आत्तापर्यंत आमचा मित्र आणि हितचिंतकांचा एक भला मोठा परिवार होता, पण अचानक त्यातले ९९.९९ टक्के लोक गायब झाले. लोकांनी आमचे कॉल्स घेणे बंद केले आणि आम्हाला समारंभांची निमंत्रणे मिळणे बंद झाले. बहुतांश लोक आम्हाला अचानक भेटलेच तर नजर चुकवायला लागले. असो, नाहीतरी आम्ही रेडिएशन, केमोथेरपी, केस गळणे आणि शक्तिपात होणे या गोष्टींमध्ये व्यग्र होतो. कारण शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांच्या असे लक्षात आले की सीपीआरला ऑटो इम्यून डिसऑर्डर व्यतिरिक्त एक दुर्मिळ प्रकारचा कर्करोगही झालेला होता. सुदैवाने अनोळखी व्यक्ती, सहकारी आणि उपचार करणारे यांच्या रूपात आमच्या आयुष्यात काही देवमाणसे आली. त्यातील एक होता पवन नावाचा तरुण योग शिक्षक. सकारात्मकता, प्राणायाम आणि योग्य पोषणाच्या मदतीने अडीच वर्षांनंतर २००७ मध्ये सीपीआरला तिचा आवाज परत गवसला आणि ती परत ऑन-एअर गेली.

अचानक दिल्ली एनसीआरमध्ये सर्वत्र होर्डिंग्ज लागली-आणि त्यांवर "पल्लवी परतली आहे”हा मजकूर आणि तिचे छायाचित्र होते. सगळ्यात भव्य होर्डिंग अंसल प्लाझावर होते. आणि अंदाज बांधा काय घडले असेल? परत आमचे फोन घणघणायला लागले आणि आम्ही पाहुण्यांच्या याद्यांमध्ये परत विराजमान झालो.

आयुष्य परत रुळावर आले होते. आता आयुष्य अगदी मजेत चालले आहे असे आम्हाला वाटायला लागले तेव्हाच मायस्थेनिया ग्रॅव्हिसने परत उचल खाल्ली. यावेळी तिच्या फुफ्फुसांभोवती पाच ट्यूमर्स होते. परत एकदा अपोलो हॉस्पिटल, शस्त्रक्रिया, रेडिएशन, केमोथेरपीची चक्रे.

परत एकदा मी तिच्यासह राहण्यासाठी माझ्या स्टार्टअपमधून बाहेर पडलो. परत एकदा मित्रपरिवार आटला, पण खरे सांगायचे तर आम्हाला त्याची पर्वा नव्हती. परत सगळे पूर्वीसारखेच घडले, आम्ही अपोलो हॉस्पिटलमध्ये आणि सीपीआर आयसीयूमध्ये.

मी २०१३ मध्यें एनडीटीव्हीसोबत Indianroots.com हा एक नवीन व्यवसाय सुरू केला. एक दिवस डॉ.प्रणय रॉय मला म्हणाले “मी तुला काय मदत करू शकतो?” मी त्यांना विनंती केली की सीपीआरच्या तब्येतीवर आणखी कोणाचे तरी वैद्यकीय मत हवे आहे. त्यांच्या मदतीनं मुंबईतल्या डॉक्टरांकडे पोहोचलो. त्यांनी सांगितलं, तिचे फारच थोडे महिने शिल्लक आहेत.

मी पार खचून गेलो होतो, पण सुदैवाने पोषणतज्ञ आणि आरोग्य गुरु ल्यूक कौटिन्होच्या रूपात आयुष्यात आणखी एक देवमाणूस आला. केवळ काही महिने दिले गेलेली सीपीआर २०१९ आणि २०२० मध्ये एकदाही हॉस्पिटलमध्ये दाखल करायला न लागता तगून राहिली.

पण त्याआधी २०१५ मध्ये मायस्थेनिक क्रायसीस (मायस्थेनिया ग्रॅव्हिसमधील एक गुंतागुंत) मुळे तिला आयसीयूमध्ये हलवले होते. नेहमीप्रमाणे मी अपोलोमधील कॅफे कॉफी डे मधून काम करत होतो आणि सीपीआरशी फोनवर चॅट करत होतो तर तिने अचानक विचारले “मीच का म्हणून? देव माझी अशी अवस्था का करत आहे?”

मी तिला म्हटले की खरेतर आपण भाग्यवान आहोत आणि गणपतीचे आभार मानायला हवेत की आपण एम्सबाहेरच्या फूटपाथवर नाहीतर शहरातल्या सर्वोत्तम हॉस्पिटलमध्ये आहोत, आपल्याला घरात मदत उपलब्ध आहे इ.

आयुष्यातल्या देवमाणसांमुळे सीपीआर लढत राहिली, ध्यानधारणा आणि योग्य पोषण यांच्या मदतीने तिने आपले मनोधैर्य उच्च राखले, तिने ३ टेडएक्स टॉक्स केले, अनेक कार्यक्रमांमध्ये भाषणे दिली आणि ती आता बरी होण्याच्या वाटेवर आहे असे वाटायला लागले होते. २००५ सालानंतर २०१९ हे पहिलेच असे वर्ष होते ज्यात सीपीआरला एकदाही हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले नाही.

जेव्हा २०२० मध्ये कोविड-१९ चा प्रकोप चालू झाला तेव्हा आम्ही दोघेही सावध होतो. पण डिसेंबर २०२० मध्ये सीपीआरची कोविड-१९ चाचणी पॉझिटीव्ह आली. सुदैवाने तिला लक्षणे उद्भवली नाहीत आणि ती उत्तम बरी झाली. आम्ही परत मार्गावर आलो आणि यावर्षी तर तिने कामासाठी अहमदनगरचा प्रवास करणे सुद्धा जमवले.

दुसरी लाट आली आणि लोक प्रेमाची माणसे गमावू लागली तेव्हा तिच्या मनोधैर्यावर विपरित परिणाम झाला आणि मग तिला छातीत धडधड आणि भास व्हायला लागले. माझ्या लक्षात आले की तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ आलेली आहे. ती आयसीयूत असताना दुसऱ्यांदा हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टर्स तिला वाचवू शकले पण तिला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. तिला निदान दोन आठवडे व्हेंटिलेटरवर ठेवावे लागेल, असे जरी डॉक्टर्स म्हणालेले असले तरी सीपीआर काही दिवसांमध्येच त्यातून बाहेर आली. १७ मेच्या सकाळी जेव्हा मी तिला आयसीयूमध्ये भेटायला गेलो तेव्हा तिने काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला ज्याचा अर्थ नर्सने “मला साध्या खोलीत कधी हलवणार?” असा सांगितला. मी तिला म्हणालो की तू बरे होण्यावर लक्ष दे, बाकीची काळजी माझ्यावर सोड.

ती हसली आणि नर्सला म्हणाली, "माझ्या नवऱ्याला सांग तो वेडा आहे.”

मी फटकळ उत्तर दिले की हे तिने २१ वर्षांपूर्वी लक्षात घ्यायला हवे होते. “अभी क्या फायदा?”

मी परत आलो आणि ती आता लवकरच घरी परतेल या विचाराने मला बऱ्याच दिवसांनंतर हायसे वाटले. झोप यावी म्हणून मी मेलॅटोडिनची एक गोळी घेतली, पण ३० मिनिटांमध्ये मला हॉस्पिटलमधून फोन आला की इकडे परत या. सीपीआरला आणखी एक हृदयविकाराचा झटका आला होता आणि ती झोपेतच गेली होती.

मला आठवते, मी हॉस्पिटलच्या पार्किंग लॉटमध्येच कोसळून पडलो आणि मला रडू फुटले...

आता दोन महिने लोटले आहेत पण अजूनही हे अवघडच जात आहे. आता मला झोपेसाठी औषधे घ्यावी लागतात आणि मधेच मला रडू फुटते आणि ते मुलगा रिआनला घाबरवून सोडणारे असते. मी अनेक अवघड प्रसंग हसत हसत झेलले आहेत आणि त्यांच्यावर मात केलेली आहे. पण याची काही एकच एक टेमप्लेट नसते...

मला आता पल्लवी राव फाउंडेशनच्या माध्यमातून तिचा वारसा पुढे नेण्यावर काम करायचे आहे. देशभरातील वंचित स्त्रियांना आवाज मिळवून द्यायचा आहे. गेली काही वर्षे गणपतीनेच आम्हाला सोबत वेळ घालवायची संधी देऊन एक वरदानच दिले होते या विचारापोटी “मी अपयशी ठरलो आहे” या भावपोकळीतून मी हळूहळू बाहेर येतो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com