गुंतवणूकदार काय पाहतो? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Investment

गुंतवणूकदार काय पाहतो?

आजकाल प्रत्येकाला पैसा कमवायचाय, यशस्वी व्हायचंय. परंतु, यशाला शॉर्टकट नसतो, हे मी तुम्हाला आधीही सांगितलं आहे. स्टार्टअप बाबतीत खूपदा असं होतं, की स्टार्टअप सुरू केल्यानंतर अनेक तरुण-तरुणी ‘सुपरफास्ट’ यश कधी मिळेल, फंडिंग कधी मिळेल, याचा विचार करायला लागतात. स्टार्टअप म्हणजे काही दोन मिनिटांत मॅगी बनविण्यासारखं नसतं. इन्व्हेस्टर अर्थात गुंतवणूकदार तुमच्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करतो, म्हणजे तो समाजसेवा करतो असं नसतं. गुंतवणूक हे त्याच्यादृष्टीनं अधिकाधिक नफा मिळविण्यासाठी आखलेलं एक गणित असतं. जसं - आपण एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घेतो, अर्थात आपण त्यात ती गुंतवणूक केलेली असते.

कंपनीला नफा झाला, की आपल्या शेअर्सची किंमत वाढेल व आपल्याला नफा मिळेल, असा त्याचा साधा अर्थ असतो. स्टार्टअपला फंडिंग करण्याआधी इन्व्हेस्टर हाच विचार करतो, की ही माझी गुंतवणूक नफ्यात कशी रूपांतरित होईल ! याबाबतीत प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे शब्द मोलाचे ठरतात. रतन टाटा यांनी देशातील अनेक यशस्वी स्टार्टअप्समध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. असं असतानाही ते स्वतःला ‘अक्सिडेंटल इन्व्हेस्टर’ मानतात. परंतु, त्यांनी ज्या स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली, त्यापैकी बहुतांश कंपन्या यशस्वी झाल्या असून, त्यांचा व्यवसाय अब्जावधींमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करण्याआधी, म्हणजेच फंडिंग देण्याआधी नेमकं काय पाहिलं, हे महत्त्वाचं ठरतं.

रतन टाटा यांचा असा विश्वास आहे, की जे नवे प्रयोग करतात, त्या स्टार्टअपचं भविष्य उज्ज्वल असतं, त्यामुळे इनोव्हेशन करीत राहिलं पाहिजे. टाटा स्वतः स्टार्टअपसाठी इनोव्हेशनवर जास्त भर देतात. त्यांची बहुतांश गुंतवणूक नवं काही तरी करून दाखविण्याची जिद्द ठेवणाऱ्या स्टार्टअपमध्येच आहे.

दुसरं म्हणजे, स्टार्टअप किंवा त्याचे फाउंडर व को-फाउंडरच्या नैतिक मूल्यांनाही खूप महत्त्व असतं. टाटा ग्रुपविषयी बोलायचं झालं, तर या ग्रुपची व्हॅल्यू म्हणजेच मूल्य खूप जास्त आहे, हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळं अशा परिस्थितीत रतन टाटा आशा करतात, की स्टार्टअप्सनंही व्हॅल्यू फॅक्टरला महत्त्व दिलं पाहिजे. फंडिंग करण्याआधी टाटांनी व्हॅल्यू फॅक्टरचीदेखील चाचपणी केली. अन्य इन्व्हेस्टरदेखील तेच करतात. हा मुद्दा अगदी साधा आहे. जसं - आपण बँकेत कर्ज घेण्यासाठी जातो तेव्हा आपण डिफॉल्टर तर नाही ना, याची चाचपणी बँकेचे अधिकारी करतात. आपले जामीनदार कोण आहेत, यालाही महत्त्व असतं. म्हणजे ते आपला व्हॅल्यू फॅक्टर तपासतात व नंतरच आपल्याला कर्ज देतात. फंडिंग करताना इन्व्हेस्टरदेखील हेच पाहतो.

तिसरी आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुमची आयडिया किती नवी आहे किंवा त्याची अंमलबजावणी तुम्ही कशी करणार आहात, याला प्रचंड महत्त्व असतं. टाटांच्या म्हणण्यानुसार, त्यांना नव्या कंपनीत गुंतवणूक करायला आवडतं. त्यातही विशेष करून नवी संकल्पना असलेल्या स्टार्टअपला ते विशेष प्राधान्य देतात. जर आपण पाहिलं तर अशाच स्टार्टअपला मोठी फंडिंग मिळाली आहे.

आमचा ‘इंडिया एंजल फंड’ दरवर्षी २५ लाखांपासून तीन कोटींपर्यंतची फंडिंग करतो. विशेषत: जे स्टार्टअप महिला लीड करतात किंवा चालवितात अशांवर आमचा फोकस असतो. आतापर्यंत अशा प्रकारच्या अनेक स्टार्टअप्सना आम्ही फंडिंग केलं आहे आणि आनंदाची बाब म्हणजे सर्वच स्टार्टअपची घोडदौड सुरू आहे. नावीन्यपूर्ण संकल्पना असलेल्या स्टार्टअप्ससाठी आम्ही ‘स्टार्टअप स्टुडिओ’ सुरू केलं असून, कोरोनामुळं पहिल्या बॅचचं प्रशिक्षण लांबणीवर पडलं; परंतु आता ते लवकरच सुरू होईल. याचं मार्गदर्शन मराठी भाषेतही उपलब्ध असेल.

स्टार्टअप स्टुडिओ पहिल्या राउंडमध्ये नावीन्यपूर्ण संकल्पना असणार्‍या २५ स्टार्टअप्सची निवड करणार असून, त्यांना प्रशिक्षण देईल. त्यानंतर ईडीआयआय, अहमदाबाद इथं फंडिग दिलं जाईल. त्यानंतर दुसर्‍या राउंडमध्ये सिलेक्ट होणार्‍या स्टार्टअप्सना अमेरिका, इस्राईल, कॅनडा किंवा जपान या देशांमध्ये जाण्याची संधी दिली जाणार आहे. ज्यांच्याकडं नवी संकल्पना आहे, त्यांना स्टार्टअप सुरू करण्यासाठी किंवा सुरू असलेले स्टार्टअप मोठे करण्यासाठी केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारनंदेखील एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. मोदी यांनी स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी एक हजार कोटी रुपयांच्या स्टार्टअप फंडाची घोषणा केली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयातर्फे स्टार्टअप इंडिया सीड फंड स्कीमअंतर्गत हे फंडिंग केलं जाणार आहे. या अंतर्गत केवळ योग्य स्टार्टअप्सनाच योग्य इन्क्युबेटर्सच्या माध्यमातून फंड दिले जाणार आहेत. यासाठी त्यांनी काही नियमावलीदेखील प्रसिद्ध केली आहे.

फंडिंग प्राप्त करण्यासाठी स्टार्टअप डीपीआयआयटीकडून मान्यताप्राप्त असणं गरजेचं आहे. आवेदनाच्या वेळी स्टार्टअपची सुरुवात दोन वर्षांपेक्षा आधी सुरू झालेली नसावी. स्टार्टअपकडं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसच्या विकासासाठी बिझनेस आयडिया असणं गरजेचं आहे. आपल्या कोर प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस किंवा बिझनेस, डिस्ट्रिब्युशन मॉडलसाठी तंत्रज्ञानाचा आधार घेणार्‍या स्टार्टअप्सना फंड देण्यास प्राथमिकता दिली जाणार आहे. जसं - वेस्ट मॅनेजमेंट, सोशल इम्पॅक्ट, जल व्यवस्थापन, शिक्षण, कृषी, खाद्य प्रसंस्करण, बायो टेक्नोलॉजी, हेल्थ केअर, ऊर्जा, मोबिलिटी, डिफेन्स, स्पेस, रेल्वे, तेल, गॅस, टेक्सटाईल आदी क्षेत्रांत इनोव्हेटिव्ह सोल्यूशन प्रदान करणारे स्टार्टअप्स यांना प्राधान्य असणार आहे. यासोबतच स्टार्टअपद्वारे कोणत्याही केंद्र किंवा राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत दहा लाख रुपये किंवा यापेक्षा अधिकची मदत घेतलेली असावी. यात स्पर्धेत जिंकलेली रक्कम, फाउंडर मंथली अलाउन्स आदींचा समावेश आहे. स्टार्टअपमध्ये भारतीय प्रमोटर्सची शेअर होल्डिंग आवेदनाच्या वेळी किमान ५१ टक्के असणं अनिवार्य आहे. कोणत्याही स्टार्टअपला एकापेक्षा अधिक सीड सपोर्ट दिला जाणार नाही. योग्य स्टार्टअप्सना इन्क्युबेटर्सच्या माध्यमातून २० लाख रुपयांपर्यंत सीड फंड दिला जाऊ शकणार आहे. माझ्या तरुण मित्र- मैत्रिणींनो, हे शतक डिजिटल क्रांती आणि नवीन युगातील नवोन्मेषाचं आहे आणि या शतकाला आशियाचं शतकदेखील म्हटलं जातं आणि म्हणूनच भविष्यातील तंत्रज्ञान आपल्या देशाच्या प्रयोगशाळेतून, भविष्यातील उद्योजक तयार झाले पाहिजेत, ही काळाची गरज आहे. या काळात तुमच्या नव्या संकल्पनांना सज्ज ठेवा. सातत्यानं प्रयत्न करा, छोट्याशा यशानं हुरळून जाऊ नका व अपयशानं खचू नकात, यश तुमचंच आहे.

टॅग्स :Rahul Narvekar