पाठलाग ती अखंड करते...! (राज जाधव)

राज जाधव meettheraj@gmail.com
रविवार, 3 जून 2018

"पुष्पवल्ली' (Pushpavalli) ही काही केवळ "स्टॉकिंग'वर भाष्य करणारी वेब सिरीज नव्हे. स्टॉकिंग अर्थात मागावर असणं, पाठलागावर असणं याच्याही पलीकडं जाऊन ती प्रेक्षकाला काही वेगळं सांगू पाहते. आयुष्यात जवळपास प्रत्येकच जण एकतर्फी प्रेमातून कधी कळत, कधी नकळत वेगवगेळ्या प्रकारे कुणाच्या ना कुणाच्या स्टॉकिंगवर असतोच... अशा प्रकारामुळं प्रेम नावाची तरल भावना खुलू शकते? नसेल तर मग का केलं जातं असं?

"पुष्पवल्ली' (Pushpavalli) ही काही केवळ "स्टॉकिंग'वर भाष्य करणारी वेब सिरीज नव्हे. स्टॉकिंग अर्थात मागावर असणं, पाठलागावर असणं याच्याही पलीकडं जाऊन ती प्रेक्षकाला काही वेगळं सांगू पाहते. आयुष्यात जवळपास प्रत्येकच जण एकतर्फी प्रेमातून कधी कळत, कधी नकळत वेगवगेळ्या प्रकारे कुणाच्या ना कुणाच्या स्टॉकिंगवर असतोच... अशा प्रकारामुळं प्रेम नावाची तरल भावना खुलू शकते? नसेल तर मग का केलं जातं असं?

आयुष्याच्या कुठल्याशा वळणावर आपल्यापैकी जवळपास प्रत्येकानं एकतर्फी प्रेम केलेलं असतं. एखाद्या प्रिय मैत्रीच्या नात्याला प्रेम समजून आणि हवेत स्वप्नांचे इमले बांधून आपण मोकळे झालेलो असतो. मग अचानक एक दिवस तो भ्रमाचा भोपळा फुटतो, स्वप्नांचा बंगला कोसळतो आणि आपण जमिनीवर येतो. कधी आपण या अनुभवानं शहाणे होतो किंवा कधी कधी शहाणे न होता त्या व्यक्तीवर प्रेम करतंच राहतो, कुठल्याही अपेक्षेशिवाय.

पुष्पवल्ली अशीच एक सामान्य तरुणी. भोपाळमध्ये राहणारी. तमीळ ब्राह्मण. फूड सायन्सची डिग्री घ्यायची आणि आपल्या आईच्या मर्जीनुसार चांगल्या पगाराच्या एनआरआय मुलाशी लग्न करायचं - जो तिला तिच्या स्थूलपणासह स्वीकारेल - हा अजेंडा तिच्या आईनं आधीच ठरवून दिलेला असतो. सगळं त्याप्रमाणे झालंही असतं कदाचित; पण... हा "पण' खूप महत्त्वाचा असतो प्रत्येक प्रेमकथेत. जसं, "डीडीएलजे'मध्ये काजोलचं लग्न परमित सेठीशी झाल्यातच जमा होतं; "पण' तिला युरोप टूर करण्याची परवानगी मिळते आणि पुढं जे होतं ते सगळ्यांना माहीत आहेच. तसाच "पण' इथंही आहे. भोपाळमध्ये एका फूड कॉन्फरन्समध्ये एका राजबिंड्या तरुणाशी - निखिल राव याच्याशी (मनीष आनंद) - तिची ओळख होते आणि ती नकळत त्याच्या प्रेमात पडते. सुरवातीला हलकेसे वाद, मग ओळख, मित्रत्वाच्या नात्यानं गप्पागोष्टी होतात आणि कॉन्फरन्सच्या शेवटी निखिल निरोप घेऊन बंगळूरला निघून जातो...जाता जाता तिच्यासाठी आशेची एक ठिणगी सोडून!

त्याचाच परिणाम म्हणून पुढच्या काही दिवसांत पुष्पवल्ली तिच्या मैत्रिणींना आणि लग्न करून सेटल होण्यासाठी पिच्छा पुरवणाऱ्या तिच्या आईला, जुना मित्र पंकज याच्या लायब्ररीत (जी निखिलच्या ऑफिसजवळच आहे) जॉब मिळाल्याचं सांगत, भोपाळहून बंगळूरकडं रवाना होते.

...आणि मग सुरू होतो एक गमतीदार खेळ, स्टॉकिंगचा. निखिलच्या येण्या-जाण्याची खबर मिळवण्यासाठी एका चायवाल्याला टिप देणं, ठरवून निखिलच्या समोर येऊन "अचानक भेटलोय' असं दाखवणं, त्याच्यासोबत वेळ व्यतीत करता यावा म्हणून बॉसशी आणि खुद्द निखिलशीही खोटं बोलणं... हे आणि असे अनेक अतरंगी प्रकार पुष्पवल्ली शेवटपर्यंत करत राहते आणि त्यातून ती वेगवेगळ्या प्रसंगांत अधिकाधिक फसत जाते. पुढच्या काळात निखिलला सत्य कळतं का? निखिलच्या आसपास राहण्यासाठी पुष्पवल्ली अजून कोणत्या पातळीवर जाते? ती या ऑब्सेशनमधून बाहेर पडते का? या आणि अशा आणखी अनेक प्रश्नांची उत्तरे सिरीज पाहिल्यानंतर मिळतात.

"अनोळखी व्यक्तीचा पाठलाग करणं चुकीचं असतं; ओळखीच्या नव्हे,' असं म्हणत पुष्पवल्ली "स्टॉकिंग' करत नसल्याचा युक्तिवाद करते. आकर्षण, मैत्री, एकतर्फी प्रेम हा प्रवास हळूहळू जेलसी आणि पझेसिव्हनेसच्या मार्गानं पुढं जाऊ लागतो आणि आपल्यालाही तात्पुरत्या गमतीच्या पलीकडं जाऊन, ही एक गंभीर बाब असल्याचं जाणवतं. प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ग्रे शेड्‌स जशा नक्की दिसतात, तशाच त्या पुष्पवल्लीच्या कॅरेक्‍टरमध्येही कमी-अधिक प्रमाणात असतातच.
सुरवातीच्याच एका एपिसोडमध्ये प्रेक्षकाला यासंदर्भात पहिला धक्का बसतो, तो प्रसंग म्हणजे जेव्हा ती हसत-खेळत खोटं बोलून तिच्या कलीगलाच लायब्ररीमधून काढून टाकायला भाग पाडते. शेवटच्या एपिसोडमध्ये जेव्हा पुष्पवल्लीचं कॅरेक्‍टर ग्रे शेडवरून काळ्या रंगाकडं अधिक झुकत आहे असं वाटतं, नेमका तेव्हाच तिचा एक "मोनोलॉग' आहे. तिच्या अशा वागण्यामागची नेमकी भूमिका काय होती हे त्यातून स्पष्ट होते. हे काही अंशी पटण्याजोगं असलं तरी अशा प्रयत्नांनी शेवटी निराशाच पदरी पडते, हेही तितकंच खरं.

एकतर्फी प्रेमावर आजवर अनेक चित्रपट पाहण्यात आले. अशा चित्रपटांत प्रामुख्यानं नायकानं या भूमिका साकारलेल्या दिसतात. "डर' आणि "अंजाम' या चित्रपटांनी एकतर्फी प्रेमाची काळी बाजू प्रेक्षकांसमोर आणली, तशीच ती "प्यार तूने क्‍या किया'मध्ये नायिकेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनंही समोर आली. पुष्पवल्लीमध्ये याच नायिकेचं ह्यूमरस एक्‍स्टेन्शन पाहायला मिळतं. "डर'ची टॅगलाईन होती "अ व्हायलंट लव्हस्टोरी.' तशा प्रकारची पूर्णतः "व्हायलंट' परिस्थिती इथं दिसत नाही. इथं प्रत्येक प्रसंगात नर्मविनोदी पद्धतीनं भाष्य केलेलं दिसेल. पाठलाग करण्याच्या या खेळात उभे राहिलेले बरेच प्रसंग सुरवातीला प्रेक्षकाला गुदगुल्या करतात; पण सिरीज शेवटच्या एपिसोडपर्यंत येते तोवर पुष्पवल्लीचं कॅरेक्‍टर बऱ्यापैकी डार्क झालेलं जाणवतं. तिच्या वागण्यातही अनेक बदल जाणवतात. तिच्याही नकळत ती निखिलच्या रुटीनवर नजर ठेवू लागते. तो कुणाशी बोलतो, कुणाला भेटतो असे प्रश्न विचारून त्याच्यावर अधिकार गाजवण्याचे प्रकारही होऊ लागतात. प्रेमाच्या वेडापायी ती मैत्रीच्याही काही रेषा, काही अलिखित नियम आणि मर्यादा ओलांडते.

खरं तर आपल्याही अजाणत्या वयात आपण कुणाचा तरी पाठलाग केलेला असतोच. शाळा, कॉलेज किंवा इतर ठिकाणी हे घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही; पण त्या व्यक्तीला याचा त्रास व्हावा हे आपल्याला अपेक्षित नसतं, नसावंच. कारण, तसं झालं तर ती व्यक्ती आपोआप दुरावते.

काही अंशी स्वतःवर बेतलेल्या या कथेचा विस्तार, सुमुखी सुरेश हिनं नवीन रिचर्डच्या मदतीनं स्क्रिप्ट लिहून केला. व्हर्सटाईल सुमुखी, ऍक्‍टर, स्केच आर्टिस्ट आणि स्टॅंड अप कॉमेडियन असल्यानं पुष्पावल्लीला एका वेगळ्याच पातळीवर नेण्यात ती कमालीची सफल झाली आहे. तिचं हसू येतं, चीड येते, कीव येते आणि अखेरी रागही येतो.

सुमुखीशिवाय नवीन रिचर्डनं साकारलेला अँग्री बॉस पंकज, पुष्पवल्लीशी कन्नड टोनमध्ये इंग्लिश बोलून धमाल करणारी घरमालकीण वासू (आरजे श्रद्धा), लग्नासाठी पुष्पवल्लीच्या डोक्‍यावर बसलेली तिची टिपिकल आई, तिच्या मैत्रिणी आणि खबरीलाल चायवाला ही सपोर्टिंग कास्ट प्रत्येक एपिसोडची लज्जत आणखीच वाढवते.

बरेचसे हेच कलाकार घेऊन आलेली "बेटर लाईफ फाउंडेशन' ही वेब सिरीज दिग्दर्शित करणारी डेबी राव हिनंच "पुष्पवल्ली'देखील दिग्दर्शित केली आहे. या सिरीजच्या एडिटिंगचं विशेष कौतुक करायला हवं. प्रत्येक भागाच्या पूर्वी निखिल आणि पुष्पवल्ली यांच्या फूड कॉन्फरन्सच्या दरम्यानचा एखादा प्रसंग फ्लॅशबॅकमध्ये दाखवून त्यातले संदर्भ घेत सध्याच्या बंगळूरमधल्या घटना रिलेट होत जातात...आणि हे खूप परिणामकारक वाटतं. इथं संगीताला जास्त वाव नाहीये, तरीही टायटल थीम कॅची आहे, मनात घोळत राहते.

"पुष्पवल्ली' हे नावदेखील अगदी परफेक्‍ट आहे. तिच्या स्वभावाला साजेसं. पुष्पवल्ली म्हणजे जरासा आधार मिळाला की त्या आधाराला लपेटून वाढत जाणारी फुलवेल. साधारणतः 20 ते 25 मिनिटांचा एकेक भाग असल्यानं, आठ भागांची ही सिरीज एकसलग, ऍमेझॉन प्राईमवर पाहता येऊ शकेल. या आधी बिस्वा कल्याण रथ या स्टॅंड अप कॉमेडियननं "लाखों में एक' ही वेब सिरीज काढून, कॉमेडीव्यतिरिक्त स्वतःचं वेगळेपण सिद्ध करून दाखवलं होतं. "पुष्पवल्ली' हीच परंपरा पुढं न्यायला मदत करते. याचाच परिणाम म्हणून झाकीर खान, नुकत्याच आलेल्या "चाचा विधायक है हमारे'मधून एक वेगळा प्रयत्न करताना दिसत आहे.

हलक्‍याफुलक्‍या पद्धतीनं "स्टॉकिंग' या विषयावर भाष्य करणारी पुष्पवल्ली ही सिरीज हळूहळू प्रेक्षकाला त्याचा गंभीरपणे विचार करायलाही भाग पाडते आणि त्या क्षणी आपल्याला त्याचे दुष्परिणामसुद्धा दिसतात. जितक्‍या लवकर अशा एकतर्फी नात्यातून आपण बाहेर पडू, तितक्‍या लवकर आयुष्य सुरळीत होत जातं.
काही व्यक्तींचा आपल्या आयुष्यात काही काळापुरताच "गेस्ट ऍपिअरन्स' असतो, हे स्वीकारायला हवं. अशा नात्यांचं एक विशेष स्थान असतं. त्याची लांबी न मोजता, त्या क्षणांचं तुमच्या आयुष्यातलं अस्तित्व मोजता यायला हवं. अशी नाती खेचून मोठी करता येत नाहीत, करूही नयेत. ती जबरदस्तीनं ओढून-ताणून आयुष्यभर पुरवतादेखील येत नाहीत. प्रेम ही एक नाजूक आणि तरल भावना आहे. ते ऋणानुबंध आपसूक जुळून यावे लागतात. लादले गेले की त्याची किंमत कमी होते!

Web Title: raj jadhav write article in saptarang