काळजात घर केलेलं ‘तुफान’...

‘सम्राटपद हे एकच असतं, त्याचा किरीट केवळ असामान्य अशाच गुणवत्तेच्या मस्तकावर चढवला जातो. नाट्य अभिनयातील या पदाचे अधिकारी निर्विवाद नानासाहेब फाटक हेच आहेत.
Natsamrat Drama
Natsamrat DramaSakal
Summary

‘सम्राटपद हे एकच असतं, त्याचा किरीट केवळ असामान्य अशाच गुणवत्तेच्या मस्तकावर चढवला जातो. नाट्य अभिनयातील या पदाचे अधिकारी निर्विवाद नानासाहेब फाटक हेच आहेत.

‘सम्राटपद हे एकच असतं, त्याचा किरीट केवळ असामान्य अशाच गुणवत्तेच्या मस्तकावर चढवला जातो. नाट्य अभिनयातील या पदाचे अधिकारी निर्विवाद नानासाहेब फाटक हेच आहेत. बालगंधर्वांनंतर मराठी रंगभूमीवर गौरीशंकरासारखं आकाश व्यापून कोणी उभं राहिलं असेल, तर ते नानासाहेब फाटक!...’ हे शब्द आहेत वि. वा. शिरवाडकरांचे. नानासाहेबांविषयी त्यांच्या मनात इतक्या गौरवाच्या भावना असल्यामुळेच त्यांनी त्यांच्यासाठी शेक्सपिअरच्या ‘किंग लियर’चं रूपांतर करण्याचं ठरवलं होतं.

खरंतर मुंबईच्या साहित्य संघाच्या कट्ट्यावरील गप्पांमध्ये खुद्द नानासाहेबांनीच त्यांना सुचवलं होतं की, त्यांच्यासारख्या वयोवृद्ध नटांसाठी शिरवाडकरांनी काही तरी लिहायला हवं; पण ‘लियर’च्या रूपांतरावर विचार करताना काही निराळंच झालं.. ‘लियरच्या तीरावर रेंगाळत असतानाच केव्हा तरी वेगळाच विचार मनात आला. नानासाहेबांसारखाच रंगभूमीवरचा एक राजा घेऊन नवंच काही का लिहू नये?...’ ते पुढं म्हणतात की, ‘नानासाहेबांसारखा महान नट माझ्या मनात उभा राहून लियरचं नायकत्व स्वतःसाठी मागत होता!’ शिरवाडकरांनी या नायकाला गणपतराव अर्थात अप्पासाहेब बेलवलकर हे नाव दिलं आणि नाटकाला दिलं - नटसम्राट!

नटश्रेष्ठ गणपतराव जोश्यांचं शिष्यत्व, गद्य नटांमधलं अग्रेसरत्व, तिन्ही सप्तकांत चित्त्यासारखा झेपावणारा आवाज, स्वगतांना मंत्रमुग्ध करणारा अंदाज, व्यक्तिमत्त्वातला देखणेपणा, स्वभावातला ताठरपणा, झटकन उसळणारा संताप, अभिमान अन् अहंकार… हे सारं अप्पासाहेब बेलवलकरांना नानासाहेब फाटकांनी दिलं. पण हा बेलवलकर स्वतः मात्र नानासाहेबांच्या वाटणीला आला नाही. नाटक शब्दांनी कागदावर उतरेपर्यंत नाटककाराच्या मनीमानसीचा बुलंद नायक प्रकृतीनं प्रत्यक्षात ढासळला होता.. आपल्या विचार आणि स्वभावाने त्याने कुंडली पाहिली नसली तरी डॉ. श्रीराम लागू या उच्च रंगप्रतिभेच्या तरुण देखण्या नटाच्या कुंडलीत हा ‘सम्राट’योग लिहिलेला होता!...

अप्पासाहेब बेलवलकरांच्या उत्तुंग भूमिकेसाठी डॉ. लागूंना घेऊन पुरुषोत्तम दारव्हेकरांच्या दिग्दर्शनात २३ डिसेंबर १९७० या सुदिनी ‘धी गोवा हिंदू असोसिएशन’च्या कला विभागाने ‘नटसम्राट’चा पहिला प्रयोग सादर केला. सत्तरीच्या दशकाच्या ऐन उंबरठ्यावर भावी नाट्यवैभवाची ही नांदीच ठरली!

एखाद्या पारंपरिक ‘कहाणी’ची महती प्राप्त झालेलं ‘नटसम्राट’चं कथानक रसिकांनाच काय, सर्वसामान्यांनाही सुपरिचित आहे. विद्यापीठीय अभ्यासक्रमातही त्याचा पुढे समावेश झाल्यामुळे नेहमीच्या नाट्यपरिघाबाहेरही त्यावर भरपूर बोललं व लिहिलं गेलं. नाटक सुरू होतं ते एखाद्या भासासदृश फ्लॅश बॅकपासून. सत्तरीतल्या अप्पासाहेब बेलवलकरांच्या स्मृतीत दहा वर्षांपूर्वीचा त्यांचा गौरव सोहळा आजही ताजाच आहे आणि पुनःपुन्हा तो त्यांच्या डोळ्यांसमोर उभा राहतो. साफल्याच्या कृतार्थतेच्या समाधानात ते पुनःपुन्हा रमतात.

रंगभूमीवरचा एक नट आणि एक बाप म्हणूनही इतिकर्तव्यतेची भावना त्यात असते, कारण आजवर त्यांनी जे कमावलं आणि सरतेशेवटी त्यांच्याकडे जे होतं, ते सारं त्यांनी आपल्या मुलामुलीमध्ये वाटून टाकलं आहे. आयुष्यभर जिने सुख-दुःखात सावलीसारखी सोबत केली, त्या आपल्या पत्नीसह उरलं आयुष्य आता आपल्या मुलामुलीच्या संसाराच्या गोकुळात घालवायचं आहे. पण... दहा वर्षांपूर्वीच्या सुखद स्मृतीतून ते बाहेर येतात आणि बदलेल्या कोरड्या रखरखीत वास्तवाची त्यांना जाणीव होते. पुढची कहाणी त्यांच्या दारुण स्वप्नभंगाची व करुण परवडीची आहे. सुनेसमोर घुम्या झालेल्या मुलाच्या घरातून व जिवापाड लळा असलेल्या नातीपासून तुटून ते बाहेर पडतात. आरंभीचा उमाळा ओसरल्यावर मुलीच्या घरातूनही अप्पा व कावेरी अडगळीच्या खोलीत येऊन पडतात... खरं हे असतं की, नाटकाच्या दुनियेतून बाहेर पडून खऱ्या जगात आलेल्या अप्पांची स्थिती पाण्याबाहेर पडलेल्या माशासारखी असते.

गोल छिद्रात चौकोनी खुंटी बसत नसते.. आणि त्यातून म्हातारपण! ‘माणसं नसतात कावेरी, म्हातारपण वाईट असतं..’ हतबल क्षणी ते हे बोलूनही जातात. पण कायम आपलं कोकरूच वाटणाऱ्या मुलीलाही आपल्यावर क्षुल्लक चोरीचा वहीम यावा या पराकोटीनं ते मोडून पडतात. तोवर खंबीर साथ देणारी कावेरीही जेव्हा या जगात त्यांना एकटं सोडून पुढं जाते, तेव्हा ते घर नावाच्या छपराखालून उघड्या जगात येतात. निजधामास जाण्याचीच जेव्हा वेळ येते, तेव्हा ते आपल्या जगाच्या काठीच, एका नाट्यगृहाबाहेर शेवटचा श्वास घेतात....

‘ही शोकांतिका एक वृद्धाची की नटाची?’ कॉलेजला ‘नटसम्राट’वरच्या प्रश्‍नपत्रिकेतला हा कायमचा प्रश्न असायचा. शरीराने वृद्ध व मनाने नट असलेल्या एका ‘माणसा’ची ही कथा होती, या उत्तराला गुण मिळाले असते का माहीत नाही!.. मराठी रंगभूमीवर ‘नटसम्राट’ ही ‘एकच प्याला’नंतरची सर्वोत्कृष्ट शोकांतिका मानली जाते. या दोन्हींआधी कदाचित एखाद्या ‘सवाई माधवरावांचा मृत्यू’लाच नाट्यविद्वान शोकांतिका मानतात,

अन्यथा मराठी रंगभूमीवर शोकांतिकांची परंपरा नाही. केवळ दुःखी करुण शेवट म्हणजे ‘शोकांतिका’ नव्हे! आरंभापासूनच एका अटळ शोकांताकडे वाट चालणाऱ्या कथेची ही विशिष्ट विधा आहे. (सोप्या भाषेत म्हणजे हा वेगळा ‘जॉनर’ आहे!) त्यादृष्टीने दिग्गज नाटककार प्रा. वसंत कानेटकर म्हणत तो ‘शोकात्मिका’ हा शब्द जास्त चपखल वाटतो.

जगात ग्रीक ट्रॅजेडीज व शेक्सपेरियन ट्रॅजेडीजची परंपरा सर्वार्थाने मोठी आहे. जगभरातल्या इतर भाषांप्रमाणे मराठीतही त्यांची रूपांतरं विपुल आली आहेत; मात्र मूळ मराठी पिंडाची शोकांतिका म्हणून ‘नटसम्राट’चं महत्त्व कायम मोठंच राहणार. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याशी अपरिहार्यपणे निगडित व आपल्या ठायीच्या चिरंतन भावनांना समर्थपणाने स्पर्श करणारा आशय ज्या सजीव संवेदना व शब्दसामर्थ्याने ‘नटसम्राट’मध्ये उतरला आहे, त्यानेच हे नाटक जनमानसाच्या आतवर उतरलं आणि उरलं. नटांचा प्रत्ययकारी अभिनय व प्रभावी प्रयोगातील जीवनानुभवामुळे ते अविस्मरणीय बनलं. साहित्यमूल्य व नाट्यमूल्य समसमान प्रबळ असणारं नाटक दुर्लभच; पण ते असतं कसं याचा ‘नटसम्राट’ हा वस्तुपाठच आहे. रंगभूमीवरील मान्यतेची सगळी शिखरं पादाक्रांत करत असतानाच ‘नटसम्राट’वर साहित्य अकादमीच्या सन्मानाचीही उमटलेली मोहोर हेच सिद्ध करणारी होती.

ज्या नानासाहेब फाटकांना डोळ्यांसमोर ठेवून शिरवाडकरांनी हे नाटक लिहिलं होतं, ते नाही करू शकले हे नाटक; पण डॉ. श्रीराम लागूंनी ज्या ताकतीने अप्पासाहेब बेलवलकर रंगभूमीवर जिवंत केला, ते पाहून शिरवाडकरांनी लिहिलंय की, ‘आपल्या मनातील चित्र रंगमंचावर यथार्थ रूपात पाहण्याचं समाधान लेखकाला क्वचितच मिळतं. डॉ. श्रीराम लागू या प्रतिभाशाली कलावंताने हे दुर्मीळ समाधान मला दिलं आहे....लागू यांच्यानंतर ही संधी दत्ता भटांना मिळाली. बहुतांश मराठी अभिनेत्यांना ही भूमिका खुणावत कायम आव्हान देत राहिली. सतीश दुभाषी, चंद्रकांत गोखले, यशवंत दत्त, राजा गोसावी, प्रभाकर पणशीकर... पुढे मधुसूदन कोल्हटकर, उपेंद्र दाते... अनेकांनी या भूमिकेचा धन्य करणारा अनुभव घेतला व हे नाटक पुढे नेत ठेवलं. ‘वऱ्हाड’कार प्रा. लक्ष्मण देशपांडेंनी द्विपात्री ‘नटसम्राट’चा वेगळा प्रयोगही करून पाहिला... ‘नटसम्राट’ करून पाहण्याची ओढ हौशी रंगकर्मींमध्येही आज पन्नास-त्रेपन्न वर्षांनंतरही कायम असल्याचं नाट्यस्पर्धांमधून दिसतं. एखाद्या आडगावच्या एकपात्री अभिनय स्पर्धेमध्ये आजही ‘नटसम्राट’ची अजरामर स्वगतं कानी पडतातच...

कुणी घर देता का घर

एका तुफानाला,

कुणी घर देता का घर!

एक तुफान भिंतीवाचून, छपरावाचून

माणसाच्या मायेवाचून, देवाच्या दयेवाचून

जंगलाजंगलात हिंडतं आहे...

जेथून कुणी उठवणार नाही,

अशी जागा धुंडतं आहे...

कुणी घर देता का घर!

आपल्या चिरंतन वेदनेने काळजात घर करणारं ‘नटसम्राट’ अप्पासाहेब बेलवलकर नावाचं तुफान मराठी रंगभूमी आणि रसिक आपल्या मनात आणि स्मृतीत जपतच राहणार आहे!

(सदराचे लेखक नाटककार व चित्रपट लेखक आणि नाट्य-चित्रपट विषयाचे जाणकार अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com