Rajashree Patil
Rajashree Patilsakal media

राजश्री पाटील : महिलांच्या चळवळीचे केंद्र

‘जागर सावित्रीचा’ या माझ्या लेखमालेत मी आज राजश्री पाटील यांच्याविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी आपल्याला माहिती करून देणार आहे. राजश्री पाटील यांचे माहेर यवतमाळ. यवतमाळमध्ये विशुद्ध शिक्षण संस्थांची शाळा आणि त्याच संस्थेचे बाबाजी दाते कॉलेज येथे राजश्री यांची जडणघडण झाली. आता त्या नांदेडला स्थायिक आहेत. संघटन कौशल्याच्या जीवावर आपल्याला ज्या ज्या विषयांमध्ये रुची आहे त्या त्या प्रत्येक विषयात महाराष्ट्रामध्ये चळवळ उभी करण्याचे काम राजश्री पाटील यांनी केले आहे. समाजकारण, सहकार, उद्योग अशा अनेक चळवळीत हिरीरीने इतिहास निर्माण करणाऱ्या राजश्री पाटील यांनी राज्यात सत्तेचाळीस हजार बचत गटांची स्थापना केली आहे. आज राज्यभरात सहकाराच्या माध्यमातून दीड लाख घरांतील चुली सन्मानाने पेटविण्याचे श्रेय राजश्री पाटील यांना जाते.

टेनिक्वाईटमध्ये सात वेळा नॅशनल, बास्केट बॉलमध्ये तीन वेळा राज्यस्तरावर राजश्री यांनी लीड केली आहे. ‘मी स्त्री बोलते’ या नाटकाच्या माध्यमातून तमाम मराठी रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या राजश्री यांची कलाकार आणि खेळाडू म्हणून घराघरांत ओळख आहे. या वर्षी नीती आयोगाने भारतामधल्या शंभर महिलांची यादी जाहीर केली, त्यामध्ये राजश्री पाटील यांचेही नाव होते.

राजश्री (9422413269) मला सांगत होत्या, माझे वडील बाबासाहेब महल्ले सरपंच संघटनेचे पहिले संस्थापक-अध्यक्ष. त्यामुळे घरामध्ये नेतृत्व कसे करायचे आणि ते विकसित करण्यासंदर्भात कुठली सामाजिक मूल्य वापरायची याची शिकवण बाबांकडून असायची. माझी आई पुष्पाताई महल्ले मला नेहमी सांगायची, एक स्त्री आपल्या कुटुंबाप्रती सजग राहिली तर ती समाजाप्रतीही उत्तमपणे सजग राहू शकते. आज गाव पातळीवर काम करणारी ती प्रत्येक स्त्री जी कष्टातून काहीतरी उभे करते त्या स्त्रीमध्ये मला माझी आई दिसते. जिद्दीच्या जोरावर छंदाला विकसित करणे, स्वतःमधले नेतृत्वगुण विकसित करत ते समाजासाठी उपयोगाला आणणे आणि आपुलकी, जिव्हाळा, प्रेम, माणसं जोडणं हे सगळे बाळकडू मी माझ्या आई आणि वडिलांकडून शिकले.

राज्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये फिरत असताना मी राजश्री पाटील यांचे भाषण ऐकले आणि मला जगण्याची नवी उमेद सापडली; असे म्हणणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. संभाषण कौशल्यामध्ये राजश्री यांचा हातखंडा जबरदस्त आहे. महिलांचे संघटन उभे करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे, हे राजश्री यांचे आवडते क्षेत्र. या क्षेत्रामध्ये राजश्री यांनी राज्यभरात एक मोठी चळवळ उभी केली. राजश्री यांना खेळातही आवड आहे, त्यांनी खेळात शेकडो मुलींना उभे करण्याचा विडा उचलला. शिक्षणाप्रती ज्या उत्साही आणि हुशार मुली आहेत, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्या मुलींचे पालकत्व स्वीकारण्याचे काम राजश्री यांनी केले. मुली आणि महिलांसाठी शिक्षणाची, सहकाराची, बचत गट अशा कितीतरी चळवळीचा केंद्रबिंदू राजश्री आहेत.

राजश्री अत्यंत भावुक होऊन मला सांगत होत्या, माझी आई आणि बाबा हे दोघेजण माझ्यासाठी जीव की प्राण होते, आज ते माझ्यासोबत नाहीत याचे दुःख मनाला सतत बोचत असते. आज मी कुठलेही चांगले काम करताना, ते काम पाहताना त्यामध्ये मला माझ्या आई-बाबांची छबी दिसते. राजश्री यांच्या घरून निघताना माझ्या मनामध्ये अनेक विचार येत होते, एक महिला वाटेल तशी, वाटेल ती चळवळ निर्माण करू शकते आणि त्या माध्यमातून लाखो हातांना काम देऊ शकते. राजश्री यांच्यासारखी छबी महाराष्ट्रातल्या काही स्त्रियांमध्ये जरी झाली तर आमचा महाराष्ट्र त्या तमाम सावित्रीच्या विचारांचा, राजश्री यांच्या कृतीचा महाराष्ट्र म्हणून पुढे येईल, बरोबर ना..!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com