शाहू ना होते... तो..

rajashree shau maharaj
rajashree shau maharajsakal

शाहू ना होते:.. तो..

"राजवैभव थोर असेल, पण

मी रयतेशी वचनबद्ध आहे

आणि ती वचनबद्धता त्या

वैभवाहूनही थोर आहे."

एखाद्या सत्तेवर राज्य करत असताना असे वाक्य आपल्या तोंडून निघायला मोठे धाडस लागते. राजवैभवाचे वलय प्राप्त असल्यावर आळसात दिवस घालवणारे अनेक राज्यकर्ते होऊन गेले. परंतु, शाहू महाराजांच्या तोंडून निघालेले हे उद्गार माणसाला विचार करायला भाग पाडतात.

सामाजिक न्याय काय असतो, हे सर्वांना पटवून देणारे राजर्षी शाहू महाराज यांची आज जयंती.

बहुजनांना न्याय मिळवून देणारे शाहू महाराज स्वतः मात्र आजही न्यायाच्या बाबतीत उपेक्षितच राहिले. जातीचा मोठा पगडा असलेल्या आपल्या समाजाने त्यांच्या बाबतीत मात्र न्याय केला नाही. जातीव्यवस्थेविरुद्ध मोठा लढा उभा करणार्‍या शाहू महाराजांना ज्या पद्धतीने दलित समाजाने स्विकारले आहे, त्या प्रमाणे मराठा समाजाने त्यांना स्विकारले आहे काय? मराठा समाजातील लोकांनी जो न्याय शिवाजी महाराजांना दिला आहे, तो न्याय शाहू महाराजांना दिला आहे काय? मराठ्यांनी ज्यांना आपले सर्वोच्च नेते मानायला पाहिजे त्याच मराठा समाजाने मात्र शाहू महाराजांना दलितांपुरते मर्यादित केले. आजही मनात प्रश्न निर्माण होतो, मराठा समाज शाहू महाराजांचा खुल्या मनाने स्विकार करेल की नाही?

शाहू महाराजांच्या विचारांचा स्विकार केला असता तर महाराष्ट्रात भीमा कोरेगाव सारख्या जातीय दंगली झाल्या नसत्या, मराठा आणि इतर समाजात परंपरागत हुंडा घेण्याची पद्धत चालत आली नसती, आंतरजातीय विवाह केल्यावर कुणाचा खून झाला नसता, खैरलांजी, हाथरस सारखे प्रकरणे घडले असते काय? एकमेकांच्या आडनावावरून जात शोधण्याची मोहीम आजही राबविली जाते. दलित - सवर्ण वादातून उदगीर मध्ये घडलेल्या घटनेमुळे गावातील 24 कुटुंबांना त्यांचे गाव सोडावे लागले नसते. मातंग समाजातील लोकांनी मंदिरात प्रवेश केल्यामुळे त्यांना वाळीत टाकले नसते. आजही गाव कुसावर दलित लोकांची वेगळी वस्ती असते. शाहू महाराजांच्या महाराष्ट्रात आजही या गोष्टी घडत आहे. खरचं, प्रश्न पडतो शाहू महाराज यांच्या विचारांना स्विकारले कोणी? कदाचित शाहू महाराज फक्त फोटोपुरते मर्यादित राहिलेत.

पुरोगामी महाराष्ट्राचा विचार केल्यावर, फुले - शाहू - आंबेडकर आपल्या डोळ्यासमोर येतात. परंतु, सुशिक्षित लोक जात व्यवस्थेचे भूत मानगुटीवर घेऊन बसल्यामुळे आजही त्यांचे नाव घ्यायला तयार नाही आहेत. हे जाती व्यवस्थेचे भूत इतके जबरदस्त होते की, काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील पुरोगामी विचारवंत 'फुले - आंबेडकरांचा' महाराष्ट्र म्हणायचे. हीच मंडळी जेव्हा कोल्हापूर मध्ये यायची तेव्हा 'शाहू' नाव समाविष्ट करायचे. याचाच अर्थ असा की, महाराष्ट्रात शाहू महाराजांना कोल्हापूरच्या बाहेर 'फुले - आंबेडकर' यांच्याबरोबरीने काहीही एक स्थान नव्हते. परंतु, जेव्हा उत्तरप्रदेश राज्यात कांशीराम आणि मायावती सत्तेत असताना त्यांनी 'फुले - आंबेडकरांच्या' सोबत राजर्षी शाहू महाराजांना स्थान द्यायला सुरुवात केली तेव्हा महाराष्ट्राला शाहू महाराजांचे स्थान काय आहे महाराष्ट्राला कळले आणि 'फुले - शाहू - आंबेडकर' असे रूढ झाले. तोपर्यंत, महाराष्ट्र झोपला होता काय? असा प्रश्न पडतो. शाहू महाराजांनी महाराष्ट्रात जन्म घेऊन सुद्धा त्यांचा वाट्याला उपेक्षा आली. यापेक्षा दुर्दैव काय असू शकते?

फ्रेंच शिक्षक सर फ्रेजर यांच्या मार्गदर्शनाखाली शाहू महाराजांनी उदारमतवादाचे शिक्षण घेतले आणि भारतभर प्रवास केला. स्वातंत्र, समता, बंधुता आणि न्याय ही लोकशाहीमधील मुल्य खऱ्या अर्थाने रुजविण्यासाठी शाहू महाराजांनी प्रयत्न केले. अस्पृश्य जातीमधील गंगाराम कांबळेला, हॉटेल उभे करण्यास प्रोत्साहन देऊन सामाजिक न्याय काय असतो, हे शाहू महाराजांनी पहिल्यांदा दाखवून दिले. यावरच, शाहू महाराज थांबले नाहीत, तर अस्पृश्य जातीतील गंगाराम कांबळेच्या हॉटेल मध्ये चहा सुद्धा पिला. शाहू महाराजांचे हेच विचार मराठ्यांनी स्विकारले असते तर, कदाचित त्यांनी आपल्या घरी दलितांसाठी चहा पिण्यासाठी वेगळे कप, बश्या आणि भांडे ठेवले नसते. आजही, मराठा समाजातील लोक फुटक्या कपात दलितांना चहा देतात. मराठ्यांचे असे व्यवहार पाहिले की असे वाटते, कुठला राग आहे जो अजूनही अशा स्वरुपात बाहेर पडतो?

महाराष्ट्रात माळी समाजाने महात्मा जोतिबा फुले यांना आपले दैवत मानले, दलितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपले दैवत मानले परंतु, मराठा समाजाचे काय? मराठा समाजाने अजूनही शाहू महाराजांना आपले दैवत मानले नाही. शाहू महाराजांचा मराठा समाजाने अजुनही स्विकार का केला नाही? कदाचित मराठा समाजाला शाहू महाराजांना स्विकारणे तितकेसे सोपे नाही. कालही नव्हते आणि आजही नाही. शाहू महाराज शिवाजी महाराजांच्या इतके मराठ्यांना थोर वाटत नसावे. शाहू महाराज मराठा समाजाला आजही अडचणींचे वाटतात. याचे, उदाहरण म्हणजे मराठ्यांच्या घरी फार कमी प्रमाणात शाहू महाराजांचा फोटो भिंतीवर दिसतो आणि दलितांच्या घरी मात्र 'फुले - शाहू - आंबेडकर आणि शिवाजी महाराज' असे सगळ्यांचे फोटो दिसतात. म्हणजे, आपले विचार इतके मागासलेले झाले का की, आपण फोटो सुद्धा आपल्या घरी लावू शकत नाही का? तेहतीस कोटी देवांची श्रद्धा बाळगणारा मराठा समाज मूर्तिमंत आणि कीर्तिमान शाहू महाराजांना कधी स्विकारणार?

भारत देशात आरक्षण ही संकल्पना शाहू महाराजांनी पहिल्यांदा लागु केली. आपल्या संस्थानात असणार्‍या मागास वर्गाला आणि खऱ्या अर्थाने जे आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत, अशांसाठी शाहू महाराजांनी 50 टक्के आरक्षण 1920 मध्ये लागू केले होते. या, घटनेला आपल्याला ऐतिहासिक म्हणावे लागेल. कदाचित, याच कारणांमुळे, वेगवेगळया नावांनी मराठ्यांच्या असलेल्या संघटनांमध्ये शिवाजी महाराज, जिजाऊ यांच्यासोबत क्वचितच नाव शाहू महाराजांचे येते. शाहू महाराजांचा स्विकार केला तर आपल्याला, आरक्षणाचे समर्थन करावे लागते आणि म्हणूनच अनेक मराठ्यांना शाहू महाराज अडचणींचे वाटतात. मराठे, हे चांगले जाणून आहेत आरक्षणाचे समर्थन केले तर, मराठ्यांचे आपल्याला संघटन करता येत नाही. परंतु, आज सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले तेव्हा मराठ्यांना आरक्षण देण्यात यावे यासाठी मूक मोर्चाची सुरुवात ही, शाहू महाराजांच्याच कोल्हापूर मधून करावी लागली हे विसरून चालणार नाही. मुळात आज मराठ्यांना आरक्षणाची गरज भासू लागली म्हणून शाहू महाराज आठवावे असे तर नसेल ना? आणि यदा कदाचित असे असेल तर याच्या इतके दुटप्पी काहीच नाही आहे, असे नाईलाजाने का होईना म्हणावे लागेल.

शाहू महाराजांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रात काम केले, त्यानुसार तर मराठ्यांचे शाहू महाराज सर्वोच्च दैवत असायला पाहिजे होते. शाहू महाराजांनी, सामाजिक बंधुभावाचा सलोखा निर्माण केला. दलितांचा उद्धार, शिक्षण, उद्योग, क्रिडा, कला आणि आरोग्य, शेती क्षेत्रात आमूलाग्र असे बदल घडवून आणले. गोरगरीब असणार्‍या जनतेला, दिन दुबळ्यांच्या, उपेक्षित घटक, मागासवर्गीय, आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणार्‍या घटकांसाठी शाहू महाराज राब राब राबलेत. सर्व क्षेत्रात कार्य करणारे भारतातील शाहू महाराज एकमेव लोकनेते होते. शाहू महाराजांचा काळच असा होता की, अस्पृश्यांना स्पर्श शिवणे म्हणजे पाप मानले जायचे. अस्पृश्यासंबंधी असे विचार फक्त ब्राह्मण लोकच करायचे नाहीत तर मराठे व तत्सम अनेक जाती सुद्धा त्यास अपवाद नव्हत्या. या सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करून शाहू महाराजांनी अस्पृश्यता-निवारण चळवळीत भाग घेऊन प्रत्यक्षरित्या कृती केली. शाहू महाराज म्हणायचे, "माझे राज्य गेले तरी बेहत्तर, अस्पृश्यो उद्धाराचे कार्य मी थांबविणार नाही." आणि याच कारणामुळे शाहू महाराजांना दलित लोक आपले उद्धारक मानतात.

शाहू महाराज नसते तर, कदाचित बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार सुद्धा झाले नसते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 31 जानेवारी 1920 रोजी 'मुकनायक' हे साप्ताहिक प्रकाशित केले. परंतु, आर्थिक अडचण उद्भवल्यानंतर 'मुकनायक' बंद पडले. शाहू महाराजांना ही बाब कळताच क्षणाचाही विलंब न करता तात्काळ 2500 रूपयांची मदत केली. 'करवीर' राज्यात (त्या काळी राज्य), 'कागल' जहागिरीतील 'माणगाव' येथे अस्पृश्यांची पहिली परिषद शाहू महाराजांच्या प्रेरणेतून आणि आर्थिक मदतीतून आयोजित केली होती. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते आणि याच परिषदेत शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे नेते आहेत असे जाहीर केले. शाहू महाराजांचे आणि डॉ बाबासाहेबांचे संबंध सर्वश्रुत आहेत.

शाहू महाराजांच्या कार्याचा अभ्यास केला तर, कधीही संपणार नाही इतका त्यांचा कार्याचा आवाका मोठा आहे. स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह कायदा, देवदासी प्रथेचे उच्चाटन, महिला संरक्षण कायदा, आंतरजातीय विवाह करण्यास प्रोत्साहन देऊन असे अनेक परिवर्तनवादी कार्य करण्याचे त्यांनी धाडस दाखविले. आजही उच्च कुलीन मराठा समाजामध्ये आंतरजातीय विवाह क्वचितच होतात. त्या काळी उपेक्षित असलेल्या स्त्री वर्गासाठी शाहू महाराजांनी अनेक कार्यांच्या माध्यमातून त्यांना पुढे नेण्याचे काम केले. शिक्षण घेऊन आज अनेक स्त्रिया ह्या उच्च पदावर कार्यरत आहेत. परंतु, मराठा आणि तत्सम समाजातील सुशिक्षित स्त्रिया जेव्हा एकच नवरा सात जन्म मिळावा म्हणून वडाला फेर्‍या मारतात तेव्हा मात्र, खरच विचार करण्यास आपण प्रवृत्त होतो. शिक्षण घेऊन जर स्त्रिया, अशा भाकड कथांवर विश्वास ठेऊन वागत असतील तर मग शिक्षणाला काही अर्थ उरेल काय? वडाला फेर्‍या मारण्यापेक्षा शाहू महाराजांनी, किंवा अन्य नेत्यांनी स्त्रियांसाठी काय कार्य केले याचा विचार समस्त स्त्रियांनी करायला नको ?

रात्रंदिवस प्रजेच्या सुखासाठी झटणारे शाहू महाराज यांच्या जीवनात सुद्धा अनेक भयंकर प्रसंग घडले. ब्राम्हण वर्ग त्यांना क्षत्रिय मानत नव्हता तर शूद्र मानत होता. यातूनच 1899 साली कोल्हापुर वेदोक्त प्रकरणाने कोल्हापूर ढवळून निघाले. शाहू महाराज हयात असतानाच त्यांच्यावर 'स्वराज्यद्रोही' असा आरोप करण्यात आला. शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्यात नेहमीच तुलना केली जाते. खरे 'लोकमान्य' राजा तर शाहू महाराजांना म्हणायला हवे. परंतु, इतिहास साक्ष आहे ब्राह्मण आणि भट यांनी कधीच मागास राहिलेला समाज पुढे जावे म्हणून कार्य केले नाही. म्हणून तर, शाहू महाराज शूद्र आहेत अशी बोंब उठवली. पण शाहू महाराज इतक्या उदारमनाचे होते, त्यांनी हे मनाला लाऊन न घेता शूद्र समाजासाठी काय करता येईल याचा विचार त्यांनी केला. शाहू महाराजांनी कार्य केले ते काही मराठा समाजाला डावलून केले नाही, जे आज मराठा त्यांचा इतका द्वेष करतो. क्षत्रिय म्हणून शाहू महाराजांना नाकारले तरी, 1919 मध्ये शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव म्हणून कानपूर येथे, कृमी क्षत्रिय सभेने त्यांना 'राजर्षी' पदवी बहाल केली. शाहू महाराजांनी अज्ञानी असणार्‍या बहुजनवर्गाला जागृत करण्याचे बाळगलेले व्रत शेवटपर्यंत कायम ठेवले.

कदाचित, शाहू महाराजांना मराठ्यांनी एकाच नजरेतून पाहिले नसते तर काही वेगळी परिस्तिथी समाजात राहिली असती. डॉ. बाबासाहेबांनी जेव्हा मराठ्यांचा सुद्धा आरक्षणाच्या गोटात समावेश केला होता तेव्हा मराठ्यांनी स्वतःहून आम्हाला आरक्षण नाही पाहिजे म्हणून विरोध केला. परिणामी, आज आरक्षण मिळावे म्हणून किती बाबींना सामोरे जावे लागते आहे. मराठ्यांनी आरक्षण जरूर घ्यावे, पण सुडाच्या भावनेतून नव्हे तर खरंच आपल्याला आरक्षणाची गरज आहे का या भावनेतून त्याकडे बघावे. नाहीतर, दलितांना आरक्षण आहे आणि आम्हाला आरक्षण नाही असाही विचार करणारा एक वर्ग आहे. मुद्दा, हा आहे की दलितांना आरक्षण आहे तर किती दलित आरक्षणाने पुढे गेलेत? हाही मुद्दा अभ्यासाचा आहे.

नुकतीच खासदार संभाजी राजे यांनी प्रकाश आंबेडकर यांची पुण्यात मध्ये भेट घेतली. संभाजी राजे आणि आंबेडकर यांच्या झालेल्या या भेटीला, इतिहासाच्या दृष्टिकोनातून पाहिले जात होते. एकमात्र आहे, आंबेडकर तेव्हाही आरक्षणाच्या समर्थनात होते आणि आताही समर्थनात आहेत.

शाहू महाराज आरक्षणाचे जनक होते, पण त्याही पुढे जाऊन त्यांनी तळागाळातील लोकांसाठी कार्य केले. शाहू महाराजां सारखा प्रतिभावान आणि बुद्धिमान राजाचे कार्य समजून घेण्यास आपण आजही कमी पडतो आहोत. मराठ्यांनी शाहू महाराजांना आरक्षणाच्या मुद्द्यावरून का नाकारले? किंवा त्यांनी दलितांचा उद्धार केला म्हणून नाकारले का? असे प्रश्न आजही प्रश्न पडतात. शाहू महाराजांना मराठ्यांनी नाकारले तरी बहुजन वर्गाने मात्र शाहू महाराजांना योग्य तो न्याय दिला असे म्हणायला काही हरकत नाही.

मराठ्यांनी शाहू महाराजांनी केलेल्या कार्याचा अभ्यास करायला हवा. शाहू महाराजांवर नाराज असलेला मराठा समाज, आज तरी त्यांचे विचार स्विकारतील का? स्वतःच्या घरात शिवाजी महाराजांच्या फोटोसोबत शाहू महाराजांचा फोटो आपल्या घरात लावतील काय? शाहू महाराजांचे विचार आपल्या येणार्‍या पिढीला कुठलाही आकस न बाळगता पटवून दिले तर, कदाचित तेंव्हाच आजच्या जन्मदिनी वाहिलेली त्यांना खरी आदरांजली ठरेल.

शेवटी,

अगर 'शाहू' ना होते

तो क्या होता

हमारी स्वतंत्रता का?

बाबासाहब का?

बहुजनों का?

सामाजिक स्थितीयों का?

'शाहू' आये और जिने की उम्मीद को चार चाँद लगा गये |

ओ नही रहे

ओ चल बसे

उन का 'शाहू'राज दिलों में जिंदा हैं |

इंसानियत की राह पर चलने वालो की

'शाहू' तुम गीत मेरे, 'शाहू' सौगात की आस हमारे

आरक्षण,

संरक्षण,

आत्मरक्षण

'शाहू',

क्रांती के साथ

'शाहू',

क्रांती के बाद

हर प्यार बरसाने वालों के साथ

'शाहू'

'शाहू'

महाराज

महाराज...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com