राजेश खन्ना हे खरे रोमँटिक सुपरस्टार

आशीष उबाळे
Monday, 14 September 2020

राजेश खन्ना हे चित्रपटसृष्टीचे खरे रोमँटिक सुपरस्टार. त्यांच्या एका मागोमाग एक हिट चित्रपटाच्या वादळात काही हिरोंचा अस्त झाला आणि काही थोड्या काळासाठी बाजूला फेकले गेले. कारण त्याची लोकप्रियताच तेवढी अफाट होती.

हिंदी चित्रपट नायकाचा प्रवास नायक ते हिरो हा खरं तर अशोक कुमारपासून सुरू झाला आणि रणवीर सिंग, आयुष्यमानपर्यंत येऊन ठेपलाय... अशोक कुमार, दिलीप कुमार, देवानंद यांचा काळ हा तसा चित्रपट सृष्टीतला सूवर्ण काळ मानला गेला. कारण चित्रपट माध्यम लोकांना आवडू लागले. चित्रपटातला नायक हा लार्जर दॅन लाईफ वाटायला लागला. समाजातील सर्वसामान्य पुरुष हिरोंमध्ये स्वत:ला बघायला लागला तर स्त्रिया हिरोईनमध्ये. तेव्‍हापासून चित्रपटातल्या हिरोंची स्टाईल समाजात रूढ होऊ लागली.

देवानंद यांची फुगा असलेली केशरचना तर बरीच वर्षे चालली. कसे कसे फुगे काढायचे...देवानंद यांनी एक विदेशी ग्लॅमर चित्रपटात आणले. राज कपूर यांनी सुरुवात केली होती तशी. पण जास्त वापर देवानंद यांच्या चित्रपटात झाला. म्हणून मी त्यांना बॉलिवूडचा जेम्स बॉन्ड म्हणतो. त्यांचे चित्रपट पण तसेच होते. हे नंतर बरेच वर्षे चालले. त्यानंतर आले राजेश खन्ना.

राजेश खन्ना हे चित्रपटसृष्टीचं एक रोमँटिक स्वप्न होतं. आधीच्या हिरोंना सगळ्या स्तरातून पाठिंबा होता. पण राजेश खन्ना यांनी स्वत:चा एक खास महिलांचा प्रेक्षक वर्ग तयार केला. राजेश खन्ना आले तेव्‍हा समाज हा स्वातंत्र्यानंतर बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाला होता. भारत प्रगतीकडे जात होता. तेव्‍हा पण सावकारी होती पण समाजात काही सूक्ष्म बदल होत होते. लव्‍ह मॅरेजला हळूहळू समाजमान्यता मिळू लागली होती आणि त्याच काळात राजेश खन्ना सारखा चॉकलेट हिरो, रोमँटिक हिरो जन्माला आला आणि एक वादळ निर्माण झाले चित्रपटसृष्टीत. त्यांच्या रोमँटिक इमेजवर तरुणी फिदा होत्या.
त्यांचे किस्से तर खूप आहेत. त्यांची कार ज्या रस्त्याने जायची तिथे मुलींचा कायम गराडा असायचा. राजेश खन्ना हे चित्रपटसृष्टीचे खरे रोमँटिक सुपरस्टार. त्यांच्या एका मागोमाग एक हिट चित्रपटाच्या वादळात काही हिरोंचा अस्त झाला आणि काही थोड्या काळासाठी बाजूला फेकले गेले. कारण त्याची लोकप्रियताच तेवढी अफाट होती.

पण या सगळ्या वादळात एक हिरो नेहमीच स्थिर राहिला आणि ते होते धर्मेंद्र. ते ब्लॅक ॲण्ड व्‍हाइट जमान्यापासून एकाच लाटेवर होते. कधी सुपर हिट झाले नाही आणि फ्लॉपही झाले नाही. कारण त्यांच्या चित्रपटाची दुसऱ्या हिरोंच्या चित्रपटाशी कधीच तुलना झाली नाही. धर्मेंद्र यांच्या चित्रपट प्रवासात अशोक कुमार, देवानंद, राज कपूर, दिलीप कुमार, राजेश खन्ना, विनोद खन्ना असे सगळे येऊन गेले पण त्यांनी आपले स्थान कधीच सोडले नाही. कारण त्यांचा एक नियम होता की या नंबर एकच्या शर्यतीत उतरायचे नाही. आपण आपले काम करीत राहायचे. त्यांचे चित्रपट एकदम टिपिकल मसाला चित्रपट होते. सुरुवातीचे त्यांचे चित्रपट रोमँटिक होते. मग रोमँटिक आणि विनोदी सोबत ॲक्शन असा फॉर्म्यूला ठरला असायचा. धर्मेंद्र हे सगळ्यात सुंदर चेहऱ्याचे आणि उत्कृष्ट शरीरयष्टीचे हिरो होते.

त्या काळात जगातल्या पहिल्या पाच सर्वांगसुंदर पुरुषांमध्ये धर्मेंद्र होते. त्यांचे ते हसणे, रेखीव दात, धारदार नाक सोबत पंजाबी रांगडेपणा आणि स्वभावाने एकदम दयाळू, असे हे काँबिनेशन होते. यामुळे धर्मेंद्र हे सगळ्यांना म्हणजे कॉमन मॅनला आपलेसे वाटले. मुली स्वत:च्या स्वप्नातला राजकुमार राजेश खन्नामध्ये शोधत होत्या तर कॉमन मॅन हा स्वत:ला परिपूर्ण धमेंद्रमध्ये. त्यांच्या केसांची स्टाईल, त्यांचे टाईट कपडे, एक फॅशन बनली होती. नंतरच्या म्हणजे अलीकडच्या काळात फिट हिरो ही संकल्पना आली. पण याची सुरुवात धर्मेंद्र यांनी केली होती.

आता तर सगळेच जीममध्ये पडले असतात. खाण्या पिण्याचे नखरे असतात. पण धमरपाजी एकदम बिनधास्त. मस्त व्‍यायाम आणि भरपूर खाणे पिणे. अजूनही फिट आहेत. बाकीच्यांना बरची दुखणी आहेत पण धर्मेंद्र खरे ही-मॅन. राजेश खन्ना हे सुपरस्टार पद निर्माण करणारे पहिले हिरो. त्यांच्या काळात समाजात लव्‍ह मॅरेज हे प्रकार वाढीस लागले, अगदी लक्षात येईपर्यंत. आता ही कॉमन गोष्ट झाली आहे. पण चित्रपटाचा परिणाम कसा कसा समाजावर होत जातो हे याचे उदाहरण.

या एका सुपरस्टारनंतर दुसऱ्या सुपरस्टारचा जन्म झाला. त्याला सगळे अँग्री यंग मॅन म्हणू लागले. आजही ते त्याच पदावर आरूढ आहेत आणि ते एकमेव शहेनशहा आहेत. त्यांचा काळ सुरू झाला आणि चित्रपटाच्या व्‍यवसायाची व्याख्या बदलली. त्या सुपरस्टार, शहेनहाचे नाव अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन हे राजेश खन्नांच्या लोकप्रियतेच्या काळात स्वत:ला या क्षेत्रात पुढे आणत होते आणि मग त्यांचा उदय झाला ते आजतागायत प्रकाशमान आहेत. त्यांच्याविषयी आपण पुढच्या भागात बघूया. कारण त्यांच्या सुपरस्टार होण्याने समाज बदलला, राजकारण बदलले, सिनेमाची आर्थिक गणितं बदलली म्हणूनच त्यांना शतकातला महानायक म्हणतात !

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajesh Khanna was a romantic super star