पहिली कमाई (राजीव तांबे)

पहिली कमाई (राजीव तांबे)

शंतनू आणि पालवी आपापसांत काही कुजबुजले आणि म्हणाले : ‘‘एक वेगळी कल्पना सुचते आहे. बाहेर रंगवलेल्या पणत्या दहा रुपयाला विकत मिळतात. समजा टेराकोटाच्या पणत्या आपणच रंगवल्या, तर त्याचा आपल्याला फक्त सहा रुपये खर्च येईल. मग आपण या पणत्या लोकांना वीस रुपयांना विकू आणि होणारा फायदा आपण ठरवलेल्या कामासाठी वापरू.’’

आ  ज सगळ्यांनी बागेतच जमायचं ठरवलं होतं. शंतनू, पार्थ आणि नेहा सगळ्यांच्या आधी आले. नंतर वेदांगी आणि पालवी. अन्वयचा पत्ताच नाही. सगळ्यांनी घरून डबे आणायचे आणि बागेत अंगतपंगत करायची, असा आजचा प्लॅन होता. ठरल्याप्रमाणं संध्याकाळी पाच वाजता सगळे जमले होते; पण एक तास उलटून गेला, तरी अन्वय काही आला नव्हता. आता सगळ्यांना काळजी वाटू लागली. काय करावं?
इतक्‍यात त्यांना लांबून पळतच येणारा अन्वय दिसला. अक्षरश: सगळ्यांच्या जीवात जीव आला. अन्वय धापा टाकतच आला. पार्थनं त्याला पाणी दिलं.

पाणी प्यायल्यावर अन्वय सांगू लागला : ‘‘मी वेळेवर पोचलोच असतो; पण एक वेगळीच घटना घडली आणि मला उशीर झाला. तुम्हाला माहीत आहे, की आमच्या घरासमोरच्या रस्त्यावर मोहनकाकांचं छत्र्या, चपला दुरुस्त करण्यासाठीचं एक छोटंसं खोपटाएवढं दुकान आहे. मला पाहताच ते म्हणाले : ‘अरे जरा दहा मिनिटं दुकानात बसतोस का? मी हॉस्पिटलात जाऊन डबा देऊन येतो.’ मी थांबलो. मग मला कळलं, की त्यांचा मुलगा सिद्धार्थ याला काल रात्री अचानक खूप ताप आला आणि त्याला त्यांनी रात्रीच तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. ते खरोखरच दहा मिनिटांत परत आले..’’
‘‘मग तुला इतका का उशीर झाला?’’
‘‘सिद्धार्थ पाचवीत आहे. माझी जुनी पुस्तकं तर मी त्याला देतोच; पण दरवर्षी दिवाळीला माझी आई मला आणि सिद्धार्थला नवीन ड्रेस घेते. तो कधीकधी अभ्यासाला आमच्या घरी येतो. तो माझा जुना मित्र आहे. मी धावतच हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याला भेटलो आणि माझ्या डब्यातला खाऊ पण त्याला दिला. त्याला खूप आनंद झाला. तो मला तिथून सोडायला तयारच नव्हता; पण मी त्याला तुमची नावं सांगून तिथून पळालो. ते हॉस्पिटल आणि तिथलं ते वातावरण पाहून तर मी खूप अस्वस्थ झालो.’’
शंतनू म्हणाला : ‘‘आपण काही तरी करायला पाहिजे..’’
‘‘हो पण कुणासाठी? म्हणजे हॉस्पिटलसाठी? सिद्धार्थसाठी? तिकडच्या सगळ्या मुलांसाठी? हे मला नाही कळलं.’’ पार्थनं असं विचारताच पालवीला खरं म्हणजे राग आला होता.
मात्र, तेवढ्यात शंतनू म्हणाला : ‘‘वा पार्थ! चांगला प्रश्न विचारलास. तुझं खरं आहे. आपल्याला त्या हॉस्पिटलसाठी, सिद्धार्थसाठी आणि तिकडच्या मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे.’’
‘‘मला वाटतंय, आपण काय करायला पाहिजे...हे मला हळूहळू सुचतंय.’’ नेहानं असं म्हणताच बाकीचेही म्हणू लागले : ‘‘आम्हालाही सुचतंच की हळूमुळू हळूमुळू.’’
पालवी म्हणाली : ‘‘तुझी वाट पाहूनपाहून आता आम्हाला चांगलीच भूक लागलीय रे. आपण थोडासा तरी खाऊ खाऊ या आणि नवीन आयडिया शोधू.’’
दोन्ही हात उंचावत शंतनू ओरडला : ‘‘व्वा! ही आयडिया एकदम बेस्ट आहे.’’
खाऊ खाऊन होताच नेहा म्हणाली : ‘‘मला वाटतं आपलं ठरलं आहेच, की आपल्याला त्या हॉस्पिटलसाठी, सिद्धार्थसाठी आणि तिथल्या मुलांसाठी काही करायचं आहे, तर आपण आत्ता तिथंच जाऊया. सिद्धार्थला भेटू या. त्यालाही आनंद होईल आणि त्याला भेटल्यावर आपल्यालाही काही नवीन सुचू शकेल.’’
पालवी म्हणाली : ‘‘अगदी खरंय तुझं. मुख्य म्हणजे ते हॉस्पिटल मी नेहमी बाहेरूनच पाहिलं आहे. तिथं भेट दिल्यामुळं आपल्याला त्या हॉस्पिटलची ‘तब्येत’ पण तपासता येईल.’’
सगळेच हात उंचावत ओरडले : ‘‘ओके बोके पक्के, तर शंभर टक्के.’’
***

सगळे जण सिद्धार्थला भेटायला गेले. त्याला खूप म्हणजे खूपच आनंद झाला. त्या मुलांच्या वॉर्डमध्ये आणखी १९ मुलं होती. कुणाचं ऑपरेशन झाल्यामुळं ती झोपून होती, तर काही एकच हात किंवा पाय प्लॅस्टरमध्ये असल्यानं बसून होती. काहींच्या दोन्हा हातांना किंवा काहींच्या एका डोळ्याला बॅंडेज बांधलेलं होतं. सगळीच मुलं त्रासलेली आणि कंटाळलेली होती. काही मुलं वेदना होत असल्यानं फारच चिडचिडलेली होती. या मुलांच्या बाजूला त्या मुलांचे नातेवाईक ओढलेल्या चेहऱ्यानं बसलेले होते. एका विचित्रच दु:खी अस्वस्थतेचा ठणका सगळ्या वॉर्डभर जाणवत होता.
सिद्धार्थला समजावून आणि त्याला शुभेच्छा देऊन मुलं बागेत परत आली.
खरं म्हणजे आता सगळ्यांचे ‘आयडिया जनरेटर’ फुल स्पीडमध्ये सुरू झाले होते. ‘आता आपण काय-काय करू शकतो,’ याचा वेगवेगळा प्लॅन प्रत्येकाच्या डोक्‍यात सुरूच झाला होता.
‘‘आता आपल्याला काहीतरी कमाई करावी लागेल आणि या कमाईतूनच आपण त्यांना मदत करू,’’ पालवीनं असं म्हणताच सगळे त्या दिशेनं विचार करू लागले. शंतनू आणि पालवी आपापसात काही कुजबुजले आणि म्हणाले : ‘‘एक वेगळी कल्पना सुचते आहे. बाहेर रंगवलेल्या पणत्या दहा रुपयाला विकत मिळतात. समजा टेराकोटाच्या पणत्या आपणच रंगवल्या, तर त्याचा आपल्याला फक्त सहा रुपये खर्च येईल. मग आपण या पणत्या लोकांना वीस रुपयांना विकू आणि होणारा फायदा आपण ठरवलेल्या कामासाठी वापरू.’’

‘‘पण विकत घेणारी माणसं म्हणतील - ‘बाजारात दहा रुपयांना मिळणाऱ्या पणत्या आम्ही तुमच्याकडून वीस रुपयांना का म्हणून घेऊ?’ म्हणजे कुणी त्या घेणारच नाही..’’
पार्थला थांबवत शंतनू म्हणाला : ‘‘बरोबर आहे तुझं; पण आपण त्यांना आधी किंमत न सांगता, आपण काय काम करणार आहोत ते सांगू. म्हणजे मग त्यांना पटेल आणि ते वीस रुपये देतील..’’
नेहा म्हणाली : ‘‘नुसतं सांगून नाही पटणार त्यांना.’’
पालवी म्हणाली : ‘‘एकदम बरोबर आहे तुझं. आपण त्यांना सांगू, की ‘दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळी नऊ वाजता आम्ही शासकीय रुग्णालयातल्या मुलांच्या वॉर्डात जाणार आहोत. जाताना तिथल्या मुलांसाठी काही गोष्टी घेऊन जाणार आहोत. यासाठीच आम्हाला या पैशाची गरज आहे. तुम्हीही त्या दिवशी मुलांच्या वॉर्डात या. त्यांना खूप आनंद होईल.’’
‘‘म्हणजे ही आपली ‘पहिली कमाई’ आपण आजारी मुलांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलविण्यासाठी वापरू,’’ असं अन्वयनं म्हणताच सगळे ओरडले : ‘‘ओके बोके पक्के, तर काम शंभर टक्के.’’
वेदांगी म्हणाली : ‘‘उद्या संध्याकाळी हॉस्पिटलला जाऊन मी तिथल्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना भेटीन. आपण आधी परवानगी घेऊन ठेवू. त्यांच्या नियमात बसतील अशाच वस्तू मुलांना देऊ.’’
पार्थ म्हणाला : ‘‘मला वाटतं, आपण हॉस्पिटलसाठीच अशा काही गोष्टी करू, की आपोआपच त्याचा फायदा तिथल्या मुलांना नेहमीच होत राहील.’’
‘‘हो! पण काय करायचं..?’’
‘‘सांगतो. आपण आपल्याकडची आणि आपल्या मित्रांकडची मिळून शंभर गोष्टींची पुस्तकं जमवूया. ही पुस्तकं फक्त मराठीच नाहीत, तर निरनिराळ्या भाषांतली असतील. कारण तिथं दाखल होणाऱ्या मुलांच्या मातृभाषा वेगवेगळ्या आहेत. म्हणजे मुलांच्या वॉर्डात मुलांचं मस्त वाचनालय सुरू होईल. काही वेळा मुलं वाचतील, तर काही वेळा मुलांचे पालक त्यांना वाचून दाखवतील.’’
पालवी म्हणाली : ‘‘आपण मुलांना खेळायला खेळ देऊया..’’
‘‘खेळ? पण आजारी मुलं, बॅंडेज बांधलेली मुलं क्रिकेट, फुटबॉल कसं काय खेळणार?’’
‘‘कमालच आहे! जगात फक्त हे दोनच खेळ आहेत का? मुलांना खेळता येतील असे बैठे खेळ आपण त्यांना देऊ. आपण त्यांना बुद्धिबळ देऊ, पत्ते देऊ, सापशिडी देऊ, ल्युडो देऊ...’’ पालवी बोलायची थांबली.
वेदांगी म्हणाली : ‘‘आपण पाहिलं तेव्हा खूप लहान मुलं पण तिथं होती. त्यांना हे कुठलेच खेळ खेळता येणार नाहीत किंवा पुस्तकं पण वाचता येणार नाहीत. अशा मुलांसाठीही आपण काही केलं पाहिजे.’’
‘‘वेदांगी तू खूप चांगला मुद्दा मांडलास. आपण अशा लहान मुलांसाठी चित्रांची पुस्तकं तर घेऊच; पण आपण त्यांच्यासाठी काही नवीन खेळही तयार करू...’’ अन्वयला थांबवत नेहानं विचारलं : ‘‘ते कसं काय शक्‍य आहे?’’
‘‘आपण मुलांसाठी मोठ्या चित्रांची जिगसॉ पझल्स तयार करू. वर्तमानपत्रांत किंवा मासिकात प्रकाशित झालेलं एखादं रंगीत मोठं चित्र घ्यायचं. ते जाड पुठ्ठ्यावर चिकटवायचं. मग त्याचे सात तुकडे करायचे; पण हे तुकडे असे करायचे, की एका तुकड्याच्या खाचेत दुसरा तुकडा बसेल. हे सातही तुकडे योग्य प्रकारे जोडले, की चित्र तयार होईल.’’ अन्वयच्या बोलण्यावर सगळेच खूश झाले.
‘‘आपण सापशिडी आणि ल्युडो घरीच कागदावर रंगवून तयार केले, तर आपले पैसे वाचतील. त्यातून आपण आणखी काही मुलांना देऊ शकू.’’
पार्थला थांबवत वेदांगी म्हणाली : ‘‘मला आणखी एक गोष्ट सुचते आहे. माझ्याकडं लहानपणीच्या बाहुल्या, टेडी, ससे आणि हरणं खूप आहेत. तिथली इटुकली पिटुकली मुलं खेळतील की त्याच्याशी.’’
शंतनू म्हणाला : ‘‘बस बस. आता आपला प्लॅन तयार झाला आहे आणि आपल्या हातात आता खूपच कमी दिवस आहेत. आता आपण आपापली कामं वाटून घेऊ आणि सुरू करू...तरच...’’
सगळेच हात उंचावत म्हणाले : ‘‘तरच...ओके बोके पक्के, काम शंभर टक्के.’’

पालकांसाठी गृहपाठ :

  •   ‘सुटी म्हणजे फक्त स्वत:साठीच मजा, दिवाळी म्हणजे फक्त माझेच लाड’ याच्या पलीकडं पाहण्यासाठी मुलांना तुमच्या ‘तशा’ कामातूनच प्रेरित करा. मुलांना त्यांच्या कल्पना मांडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य द्या.
  •   मुलांनी सांगितलेल्या कल्पनांपैकी काही कल्पना अगदीच भोंगळ असतील, तर काही वेगळ्या असतील. अशा वेळी तुम्हाला खटकलेल्या कल्पनांविषयी मत न मांडता, तुम्हाला आवडलेल्या कल्पनांविषयी बोला. तुम्हाला काय आवडलं आहे, तेही स्पष्टपणे सांगा. मुलं त्यांच्या कल्पनांमध्ये सुधारणा करायला तयार असतात, याचा तुम्हाला त्यावेळी अनुभव येईल.
  •   ‘समाजाचं पालकत्व स्वीकारणारे पालकच मुलांना आपले वाटतात,’ ही चिनी म्हण फार महत्त्वाची आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com