पूर्वतयारी जोरदार हवी

स्टाईल मारणाऱ्या माणसांपेक्षा आपल्याला कधीकधी विचारी माणसांची भुरळ जास्त पडते. आर.अश्विन हा एक तसाच खेळाडू आहे. बाकी खेळाडूंपेक्षा तो जास्त विचार करतो आणि स्वतःमध्ये सतत सुधारणेचा ध्यास धरतो.
rajkot test cricket match ashwin come back interview sport
rajkot test cricket match ashwin come back interview sportSakal

राजकोट कसोटीत, कसोटी क्रिकेटमधील पाचशे बळींची नोंद करणारा अश्विन आता धरमशालाला शंभरावा कसोटी सामना खेळणार आहे. जातिवंत फलंदाज म्हणून क्रिकेट खेळू लागलेल्या अश्विननं खूप नंतर ऑफस्पिन गोलंदाजी करण्यास सुरवात करून मजल मारली आहे. त्याच्याशी विविध विषयांवर संवाद साधला. त्याचे मुद्दे आणि त्यानं मांडलेली मतं मनाला भावली.

प्रश्‍न : तुझ्या घडवण्यात कुणा-कुणाचा वाटा आहे असं तुला वाटतं ?

उत्तर : माझी आई, वडील, माझी पत्नी तसंच माझे लहानपणीचे दोन प्रशिक्षक आणि ब्ल्यू व्ही रामननं मला खूप मदत केली. डब्ल्यू व्ही रामन खूप हुशार आहे. क्रिकेट वरच्या पातळीवर खेळला आहे. त्यानं मला जागं केलं. कित्येक वेळा तुम्ही वयानं लहान असताना प्रशिक्षक जरा जास्त शिस्त पाळणारे आहेत असं वाटते. मागे वळून बघितल्यावर त्या वेळी त्यांनी केलेल्या गोष्टी आणि संस्कार काय काम करून गेले आहेत, याची जाणीव होते.

डब्ल्यू व्ही रामननं मला गोलंदाजाला एका वेळी त्याच्या तंत्रात काय चुका होऊ शकतात आणि त्यावर उपाय कसा शोधायचा हे शिकवलं. कारण गोलंदाज कधीच परिपूर्ण तंत्र वापरू शकत नाही. कधी अ‍ॅक्शन तर कधी चेंडू सोडण्याचा क्षण कधी चेंडू वळवताना होणारी बोटांची हालचाल तर कधी चेंडू टाकून झाल्यावर गोलंदाज वळतो ती कृती, टप्पा-दिशा या सगळ्या गोष्टी एका वेळी जमून फार अभावानं येतात.

मग त्यातील कोणती कृती चुकत आहे हे समजलं, तर गोलंदाज लगेच सुधारणा करू शकतो. सर्वांत महत्त्वाचा धडा त्यानं मला २००९ मध्ये मी चॅलेंजर ट्रॉफी खेळायला जात असताना सराव करत होतो त्या वेळी दिला. सरावादरम्यान डब्ल्यू व्ही रामन आला आणि त्यानं मला समजावलं की जे काही करायचं ते आत्ता कर... तुझ्यात भारतीय संघात जायची क्षमता आहे... फक्त ते यंदाच्या मोसमात कर, कारण बस चुकली तर खूप मागं पडशील.

माझा पहिला कर्णधार सुब्रमण्यम बद्रीनाथलाही मी विसरू शकत नाही. तसेच माझे लहानपणीचे प्रशिक्षक चंद्रशेखर राव जे स्वत: आंध्र प्रदेशकडून रणजी खेळले होते. खूप शिस्तप्रिय माणूस होते ते आणि सी. के. विजयकुमार ज्यांनी माझ्या जडणघडणीत खूप मोठा वाटा उचलला आहे. मी मूळचा फलंदाज होतो. विजयकुमार यांनी मला ऑफ स्पिन गोलंदाजी गांभीर्यानं घ्यायला लावली.

त्यांनी शाळेतून मी कॉलेजमध्ये जात असताना बोलावून सांगितलं होतं, की ऑफ स्पिन गोलंदाजीवर लक्ष दे... लिहून देतो मी, की तू एक दिवस भारतीय संघासाठी खेळणार. या सगळ्यांचं योगदान मी विसरू शकत नाही.आणि अर्थातच तामिळनाडू क्रिकेट संघटना आणि एन श्रीनिवासन यांनी वेळोवेळी मला खूप प्रोत्साहन दिलं.

तुझ्या आयुष्यातला महत्त्वाचा कालखंड कोणता ? त्यातही लक्षात राहणारे दिवस कोणते ?

: तामिळनाडू रणजी संघात जरा चमक दाखवल्यावर माझी निवड चॅलेंजर्स ट्रॉफीसाठी झाली. तिथे माझा कर्णधार युवराज सिंग होता. त्यानं मला खूप प्रोत्साहन दिलं. अगोदर मला आयपीएलसाठी चेन्नई सुपर किंग्ज् संघात घेतलं गेलं. खूप काही शिकायला मिळालं मला तेव्हा, कारण सोबत संघात मुरलीधरन होता.

२०१० मध्ये मला ५ जूनला भारतीय संघातून पहिला एक दिवसीय सामना खेळायची संधी मिळाली. त्यानंतर मी सतत संघासोबत होतो. खेळलो नाही जास्त पण भारतीय ड्रेसिंग रूमचं वातावरण काय असतं याचा अंदाज घेतला. २०११ मध्ये वेस्ट इंडीज समोर मला कसोटी पदार्पण करायला मिळालं.

गंभीर, सेहवाग, द्रविड, तेंडुलकर, लक्ष्मण, युवराज सिंग, धोनी या संघातून मला खेळायला मिळालं. पहिल्या डावात मोठी आघाडी घेऊन आम्ही सामना जिंकलो. दुसऱ्या डावात मी सहा बळी घेतले होते. एकदिवसीय संघातून मी संधी मिळाल्यावर बऱ्यापैकी ठसा उमटवत राहिलो आणि मला २०११ मध्ये विश्‍व करंडक स्पर्धेत संघात घेतलं गेलं.

स्पर्धेला सुरुवात झाल्यावर धोनी सतत मला सांगायचा, की योग्य वेळी तुला खेळवणार. वेस्ट इंडीज समोरच्या सामन्यात मी खेळलो. खरी मजा तेव्हा आली, जेव्हा मला गतविजेत्या ऑस्ट्रेलियन संघासमोर उपांत्यपूर्व सामना खेळायला ११ जणांच्या संघात निवडले गेलं. धोनीच्या डोक्यात काहीतरी ठोकताळे होते.

त्यानं मला चक्क नवा चेंडू टाकायला दिला आणि म्हणाला ‘‘याच साठी तुला संघात घेतलं आहे... मला खात्री आहे तूच योग्य गोष्ट करून देणार’’ मला, धोनीने सामन्यात नवा चेंडू मला टाकायला देताना सांगितलं. अगदी खरं सांगू, मला दडपण, अपेक्षांचं ओझं या परिस्थितीत खेळायला, कामगिरी करून दाखवायला खूप आवडतं.

त्या सामन्यात मी पहिली विकेट शेन वॉटसनची काढली, त्याचबरोबर शतक करणाऱ्या रिकी पाँटिंगलाही बाद केले. तो सुवर्णकाळ स्वप्नवत होता. आम्ही सगळे जिंकायच्या ध्येयानं पछाडलो होतो. मी काय, विराट काय पहिल्यांदाच विश्‍व करंडक स्पर्धा खेळलो आणि आपण जिंकलो. सगळंच कमाल होतं.

तू सतत सुधारणा म्हणजे स्वतःमध्ये बदल करत गेलास का ?

: खूप काळापर्यंत मला कळत नव्हतं की मी वेगळा आहे. थोडं विचित्र आहे. मी इतर मुलांसारखा सरळ साधा नव्हतो. माझी चौकस बुद्धी जरा जास्तच होती. लहान शाळेत मी अभ्यासात उत्तम होतो. मोठ्या शाळेत गेल्यावर माझ्या अभ्यासात आणि पर्यायाने मार्कात कमी झाली.

कारण एकच होते मी सतत क्रिकेटचा विचार करत असायचो. विचार कसला... वेड म्हण ना. सांगून खोटं वाटेल पण घरात मी अभ्यास करायची एक अट होती ती म्हणजे टीव्हीवर क्रिकेट सामना लागलेला हवा, त्याची कॉमेंटरी सतत ऐकू यायला हवी.

माझ्या वडिलांनी ती मान्य केली. आठवीपासून ते इंजिनिअरिंगच्या शेवटच्या परीक्षेपर्यंत हे असंच होतं. पण मी पालकांना मला मिळणाऱ्या गुणांवरून बोलायची कधी संधी दिली नाही. कुटुंबाच्या सहलीलाही मी तसंच करायचो... टीव्ही वर सामना बघत अभ्यास करायचो. इतकंच काय माझ्या जवळच्या मित्रांना सुरुवातीला त्याचा त्रास झाला आणि नंतर त्यांनाही त्याचीच सवय झाली. असं केल्यानं शाळेपेक्षा कॉलेजमध्ये माझा अभ्यास आणि प्रगतिपुस्तक सुधारलं.

क्रिकेटच्या बाबतीत तेच होतं. थोडा वेगळा प्रकार होता. मला सतत वाटायचं की काही ना काही बदल मी सतत गोलंदाजीत करत राहिलो नाही... सुधारणा करत राहिलो नाही... नवीन क्लृप्त्या शोधल्या नाहीत तर मी मागं पडेन. माझ्या गोलंदाजीतील धार नाहीशी होईल. मग झालं काय की दोन सामन्यांत मी एकाच शैलीनं कधीच मारा केला नाही.

फलंदाजांना जिथं आवडत तिथेच आघात करायचा मला मोह पडायचा. मला कळून चुकलं होते की बाकीच्यांपेक्षा मी वेगळा आहे... तेच वेगळेपण मी माझ्या क्रिकेट सुधारणेला वापरून पुढे सरकलो. म्हणूनच मी फलंदाजाला मनात काय चाललं आहे हे ओळखून जाळ्यात सापडवायचा प्रयत्न करतो. त्यासाठी मनावर ताबा मिळवायला मी प्राणायाम, ध्यानधारणा करू लागलो आहे गेल्या पाच वर्षांत.

तुझं मूल्यमापन तू कसा करतोस?

: बाकीच्यांपेक्षा मी थोडा वेगळा आहे, हे मी मान्य केलं आहे. अजून एक गोष्ट मला समजली आहे की ज्यांना सर्वोत्तमतेचा ध्यास असतो, ते थोडे झंगड असतातच. त्यांची सतत प्रयोग करायची, सुधारणा करायची भूक वेगळी असते.

त्यामुळं माझ्या वेगळ्या स्वभावाची किंवा कार्यपद्धतीची कोणी चेष्टा केली तरी मला राग येत नाही आता. मी खूप निवांत असतो माझ्या विचारात. मी कोण कसा आहे याचा ऊहापोह करत बसत नाही तसंच कोणी मी कसा आहे ते करू नये. चांगली कामगिरी केल्यावर माझं कौतुक होतं तसेच खराब खेळल्यावर टीका होते, मला दोन्ही मंजूर आहे.

प्रथम श्रेणीचे क्रिकेट खेळले पाहिजे, असं तुला वाटतं का ?

: कोणत्याही खेळाडूनं प्रथम श्रेणीचे सामने खेळायला पाहिजेत, हे बीसीसीआयने सांगण्याची गरज पडली याचंच मला आश्चर्य वाटत आहे. प्रत्येक खेळाडूचं प्राधान्यक्रम, विचार वेगळे असतात मला मान्य आहे. तो हक्कं आहे सगळ्यांना.

माझा विचार वेगळा आणि सरळ साधा आहे. क्रिकेट तुम्ही खेळलाच नाहीत तर क्रिकेटमध्ये प्रगती होणार कशी मला सांगा. मी तर म्हणेन प्रथम श्रेणीचं सोडा, संधी मिळाली तर क्लब क्रिकेटही खेळायला हवे. लोक मला क्रिकेट वेडा म्हणतील, म्हणूदेत मला नाही फरक पडत.

लक्षात घे की आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना महान खेळाडूंसोबत घालवलेल्या भन्नाट क्षणांची सोबत जन्मभर असेल. पण मला ते क्षण का उपभोगायला मिळाले... मी शक्य त्या सर्व सामन्यात खेळलो... भरपूर सराव केला, माझ्या खेळात सुधारणा होण्यासाठी धडपडलो म्हणूनच ना? मोठ्या सामन्यात काहीही करायचं असेल तर ते सरावात किंवा इतर सामन्यात करून बघून तावून सुलाखून पक्के झाल्यावर मगच तुम्ही त्याचा वापर मोठ्या सामन्यात करू शकता ना ?

मग सामने न खेळून कसे चालेल ? उदाहरण देतो मला डावखुरे फलंदाज स्विप मारून चक्रावून सोडत होते. मग उपाय शोधायला मी कंपन्यांच्या स्पर्धेत जाऊन डावखुरी फलंदाजी करत ६० धावा करून डाव्या हातानं खेळणाऱ्या फलंदाजाला काय करावं लागतं, कोणत्या कोनातून तो फिरतो आणि त्याला कोणत्या टप्प्यावर आलेला चेंडू स्विप मारायला त्रास होतो याचा अभ्यास फलंदाजी करून केला.

खेळाडू म्हणून तुझ्या प्रवासाकडं कसं पाहतोस ?

: खूप उतार-चढाव असलेले माझे खेळाडू म्हणून आयुष्य गेले आहे. प्रवास मात्र सुंदर झालाय. खूप मजा आलीय मला. मला कल्पना आहे की बरेच लोक मला क्रिकेट वेडा म्हणायचे... अजून म्हणतात. मी अति महत्त्वाकांक्षी आहे असेही म्हणतात. मला इतकेच म्हणायचे आहे, की होय मी आहे महत्त्वाकांक्षी... होय मला सर्वोत्तमतेचा ध्यास आहे.

त्यासाठी मी जे काही करतो ते वेडेचाळे वाटतीलही. माझी त्याला हरकत नाहीये. पण मला सांगा की जर टोकाचा प्रयत्न केलाच नाही तर कसे चालेल. मला उंच उंच उडायचे आहे... कल्पना आहे की मला कदाचित अपयश येईल पण निदान की लांब उंच उडून खाली पडेन... निदान मला कळेल तरी की प्रामाणिक प्रयत्न केले.

माझ्यात फरक असा झालाय की आता मी कोणाला तू का नाही जोरात प्रयत्न करत विचारायला किंवा सांगायला जात नाही. ती त्याची इच्छा होती ही माझी इच्छा आहे. जर शर्यतीत भाग घ्यायचा असेल, तर त्याचा योग्य अभ्यास करून पूर्वतयारी जोरदार करायलाच हवी ना ?

सरतेशेवटी मी इतकेच सांगेन, की मला जसे माझ्या आई-वडिलांनी माझ्या मनासारखे जगून, तयारी करून सर्वोत्तम बनण्यासाठी प्रयत्न करायचे स्वातंत्र्य दिलं, तसे तुम्ही तुमच्या मुलांना कृपा करून द्या. त्यांना बांधून ठेवू नका. त्यांना उडू देत, धडपडू देत कारण त्यातूनच शिकून ते मोठे होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com