पुसटत्या व्याघ्रखुणा (रजनीश जोशी)

rajnish joshi
rajnish joshi

जगातल्या वाघांची संख्या कमी होत आहे. भारतातही त्यांचं प्रमाण घटत आहे. पश्‍चिम बंगालमधल्या सुंदरबनमध्ये सन 2070पर्यंत एकही वाघ शिल्लक नसेल, असा एक अंदाज नुकताच प्रसिद्ध झाला आहे. वाघांचा नैसर्गिक मृत्यू कमी आणि शिकारी जास्त होत असल्याचं लक्षात येत आहेत. त्यातही नाहीसे झालेले वाघ अधिक आहेत. व्याघ्र संरक्षणाच्या कितीही योजना आखल्या तरी तस्करांना रोखण्याचीही गरज आहे. हवामानबदलासह अनेक प्रश्‍न निर्माण झाल्यानं व्याघ्रखुणा पुसट होत चालल्या आहेत.

वर्ष असावं 1906. लुईस नावाचा ब्रिटिश अधिकारी हिमाचल प्रदेशातील जंगलात भ्रमंती करत होता. फिरत फिरत तो आज जिथं भाक्रा धरण आहे तिथं आला. पहाडावरून खाली वाहणारं पाणी, हिरवीगर्द वनराई, मधूनच येणारी बर्फगार वाऱ्याची झुळूक यानं तो सुखावलेला. डोंगराच्या कड्यावरून अनिमिष नजरेनं तो खाली पाहत होता. इतक्‍यात एक अद्‌भुत दृश्‍य त्याला दिसलं. पायथ्याशी असलेल्या पाण्याच्या प्रवाहावरून झेप घेऊन एक वाघ पलीकडं जात असल्याचं त्यानं पाहिलं. तो थरारला. वाघाचा डौल, त्याची झेप, त्याची ताकद, सामर्थ्य पाहून तो स्तीमित झाला. त्याचवेळी त्याला त्या जागेचं स्थानमहात्म्यही ध्यानात आलं. पेशानं इंजिनियर असलेल्या लुईसनं हा सगळा परिसर पिंजून काढला. सतलज नदीचं पाणी, हिमालयाचे सुळके, त्यातून कोसळणारे धबधबे या सगळ्याचा विचार करून इथं मोठ्या धरणाची "साईट' असल्याचं त्यानं सिद्ध केलं आणि तत्कालीन ब्रिटिश सरकारला भाक्रा धरणाचा प्रस्ताव दिला. स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरूंनी हे धरण बांधलं. वाघाच्या एका झेपेनं आकाराला आलेलं धरण म्हणून भाक्राच्या इतिहासात नोंद झाली आहे. वाघाची ती झेप लुईसच्या नजरेस पडली नसती तर...!

जॉन स्मिथ नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याची कहाणीही अशीच आहे. वाघाच्या शिकारीसाठी तो भटकत होता. वाघूर नदीच्या आसपास तो आला. वाघ जरी दृष्टीस पडला नाही, तरी वाईट स्थितीतील अजिंठा लेणी त्याच्या दृष्टीस पडली. त्याला यंदा दोनशे वर्षं पूर्ण झाली. वाघामुळं लागलेल्या अशा मौलिक शोधाची यादी आणखीही वाढवता येऊ शकते. मात्र, आता वाघ दिसणंही दुर्मीळ झालं आहे. निरनिराळ्या कारणांनी दिवसेंदिवस मृत्युमुखी पडत असलेले वाघ ही वन्यजीव अभ्यासक, पर्यावरणवादी किंवा निसर्गप्रेमींपुढचीच समस्या नाही; जीवसृष्टीचक्रापुढचाच तो धोका आहे. "जीवो जीवस्य जीवनम्‌' वगैरे गोष्टी खोट्या ठरवत माणूसच सर्वभक्ष्यी होत असल्याचं हे उदाहरण म्हणावं लागेल.

स्वातंत्र्यपूर्व काळात आणि नंतर संस्थानिकांच्या लहरीखातर वाघांच्या शिकारी खूप झाल्या. मात्र, आज वाघांची रोडावलेली संख्या पाहता येत्या काळात भारतातूनही वाघ नामशेष होण्याची भीती व्यक्त होत आहे. तसं पाहायला गेलं तर जगातल्या व्याघ्रबहुल देशातही वाघ नष्ट होत आहेत. चीन, व्हिएतनाम, कंबोडिया, रशिया, इंडोनेशिया, बांगलादेशातून वाघ हद्दपार होत आहेत. ज्या देशात वाघ आहेत, तिथल्या मंत्र्यांची मध्यंतरी एक कॉन्फरन्सही झाली. तीत एकत्रित राबवण्यासाठी काही निर्णय झाले. अशा परिषदांतल्या निर्णयांचं पुढं जे व्हायचं तेच झालं. विकसित देशांची स्थिती याबाबतीत बिकटच आहे.

भारतात सत्तर टक्के वाघ
जगातील वाघांच्या जवळपास 70 टक्के वाघ भारतात असल्याचं सांगितलं जातं. आपल्याकडं एकेकाळी लक्षावधी संख्येनं असलेल्या वाघांची संख्या काही हजारांवर येऊन ठेपली आहे. मागच्या पाच वर्षांत त्यात आणखी घट झाली आहे. शोचनीय बाब म्हणजे वर्षभरात पाऊणशे वाघांचा मृत्यू झाला आहे. भारतात जवळपास पन्नास व्याघ्रप्रकल्प आहेत. वाघांच्या संरक्षणासाठी केंद्र आणि संबंधित राज्य सरकारांच्या वनविभागांनी कोट्यवधीचा निधी ठेवला आहे. लक्षणीय बाब म्हणजे, निधी आणि वाघ दोन्ही खर्ची पडत आहेत. केवळ अनास्था हे तर महत्त्वाचं कारण आहेच; पण जे काही थोडके प्रयत्न केले जात आहेत, त्यात शास्त्रशुद्धतेचा अभाव आढळतो. अभयारण्यातून, जंगलातून वाघ नाहीसे होत आहेत. आणखी एका निरीक्षणानुसार वाघांचे सर्वाधिक मृत्यू व्याघ्रप्रकल्पांतच झाले आहेत.

वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबाच्या जंगलातील सफारीचा आमचा अनुभव बोलका ठरावा. वनविभागाच्या कुटिरात रात्र काढल्यानंतर भल्या पहाटे वाघाच्या मागावर आम्ही निघालो. किर्रर्र दाट काळोख होता. आकाशातल्या चांदण्यांचं लुकलुकणं मनोहारी होतं; पण तेव्हा आकाशाकडं नाही तर जंगलातल्या त्या डौलदार, उमद्या जनावराकडं लक्ष होतं. अर्थातच तो दिसण्याची शक्‍यता धूसर वाटत होती. हळूहळू निवळत गेलेल्या अंधारात गवे, लांडगे, कोल्हे, नीलगायी दिसल्या. चांगलंच फटफटलं; पण वाघोबाची स्वारी आढळली नाही. काही ठिकाणी दाट झाडी, तर कुठं उघडा बोडका माळ. वनविभागानं काही ठिकाणी केलेले कृत्रिम जलसाठे. बरोबर अनुभवी गाईड असूनही "कॉल' येत नव्हता. एका नैसर्गिक तलावाजवळ "चुबूक चुबूक' असा आवाज आला खरा; पण पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगणाऱ्या त्या मगरी होत्या. सुरक्षित अंतरावरून ते दृश्‍य पाहिलं. पुढं दाट बांबूच्या वनातून निघालो. वाघ दिसावा म्हणून सगळेच कासावीस; पण त्याचं दर्शन घडलंच नाही. मध्येच वेळूबनातून फेर धरून सुसाटलेल्या वाऱ्यानं किंचित बासरी वाजवल्याचा भास झाला. मात्र, वाघ नाहीच. ताडोबात जाऊन वाघ न दिसणं आणि दुष्काळी समजल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्‍यात अचानक बिबट्यानं धुमाकूळ घालणं या घटना परस्परपूरक आहेत. केवळ सोलापूरच नव्हे, तर महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये बिबट्यांची दहशत पसरली आहे. वाघांच्या नैसर्गिक अधिवासाचा ऱ्हास झाल्याने ही भटकंती वाढली. अलीकडंच अवनी नावाच्या नरभक्षक वाघिणीची अधिकृत शिकार त्यामुळे करावी लागली. माणसाच्या रक्‍ताची चटक लागलेल्या वाघाला आवरणं कठीण असल्याचं सांगितलं जातं. काही अभ्यासकांच्या मते माणसाचं खारट असलेलं रक्त वाघाला आवडतं. तरीही सर्वसाधारणपणे वाघ माणसाच्या वाटेला जात नाहीत. व्यंकटेश माडगूळकर, मारुती चितमपल्ली यांनी वाघांच्या स्वभावाबद्दल बारीक-सारीक निरीक्षणं तपशिलानं नोंदवली आहेत.

नामशेष होण्यामागं माणूसच
अरण्यामधल्या आदिवासींच्या समजुतीनुसार, वाघ सूर्योपासना करतात. का, तर दोन पायांच्या प्राण्यापासून रक्षण व्हावं, असं त्यांना वाटतं. माणसाची त्यांना भीती वाटते असं म्हटलं जातं. अशा प्रकारच्या समजुतींच्या गोंधळात न सापडता आपल्याला नेमकेपणानं इतकं तरी सांगता येईल, की वाघ नामशेष होण्याचं मोठं कारण माणूस आहे. डुकरांवर विष पेरून ती जंगलात सोडून वाघांना मारलं जातं. इतकंच नव्हे, तर पाणवठे विषाक्त करून वाघांना मारण्याचे प्रकार झाले आहेत. मानवी वस्तीत घुसून वाघांनी पाळीव प्राण्यांची शिकार सुरू केली आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून वाघांची शिकार होत आहे. वाघाचं कातडं, त्याचे अन्य अवयव यांची तस्करी केली जाते.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्थेनं वाघांच्या मृत्यूची कारणं अनेक सांगितली आहेत. अशास्त्रीय गणना हे त्यातलं एक कारण. मचाणावरून निरीक्षण, विष्ठा, झाडावरचे ओरखडे, पाणवठ्यावरच्या गणना अशा पारंपरिक पद्धतीच्या व्याघ्रगणनेमुळं नेमका आकडा कळत नसल्याचं सांगितलं जातं. त्यासाठी "ट्रान्झिट लाईन मेथड'चा अवलंब केला जात आहे. या शास्त्रीय आणि अत्याधुनिक पद्धतीमुळं अचूक गणना होते. मात्र, परस्परांमध्ये मारामारी करून अनेक वाघ मृत्युमुखी पडल्याचं प्राधिकरणाचं म्हणणं आहे. आपल्या भागात अन्य वाघाची घुसखोरी त्याला चालत नाही. त्यातून होणाऱ्या युद्धात वाघ मरतात. जवळपास 20 टक्के वाघांचा मृत्यू अशा परस्परांतल्या लढायांत झाल्याचं सांगण्यात येतं. बंदीपूर, भद्रा, दांडेली-अनशी या कर्नाटकातील प्रकल्पात वाघांचा मृत्यूदर मोठा आहे. मध्य प्रदेशातलं कान्हा, संजय-दुब्ररी प्रकल्पातही अशीच स्थिती आहे.

सुंदरबनमधली धोक्‍याची घंटा
"सायन्स ऑफ द टोटल एनव्हॉयरमेंट' या कालिकात सन 2070 पर्यंत सुंदरबनात एकही बंगाली वाघ नसेल, असं भाकीत वर्तवण्यात आलं आहे. हवामान बदलाचा मोठा धोका वाघांपुढंही आहे. उघडीबोडकी होत चाललेली जंगलं आणि बेसुमार वृक्षतोड यामुळं प्राण्यांच्या अन्नसाखळीवर परिणाम झाला आहे. पावसाचं प्रमाण घटल्यानं प्राणी, पक्षी आणि वनस्पतींवर परिणाम झाला आहे. महाराष्ट्र सरकारनं 33 कोटी वृक्षलागवडीसारखे उपक्रम हाती घेतले आहेत. एकीकडं वन्यप्राण्यांचा नैसर्गिक अधिवास कायम राहावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दुसरीकडं जंगल सफारी आणि पर्यटनाला चालना दिली जात आहे. परस्परविरोधी निर्णयांमुळं वन्यजीवांची हानी होत आहे. वाघांचं रक्षण करण्यासाठी "सेव्ह टायगर'सारख्या मोहिमा आहेत; पण वनविभागातल्या भ्रष्टाचारासह सरकारी कर्मचाऱ्यांची मानसिकता कशी बदलणार? वाघांची हत्या करून लाभ मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. वाघ राखण्यासाठी सर्व पातळ्यांवरून प्रयत्न व्हायला हवेत, इतकंच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com