राजपूत चित्रशैली

भारतीय चित्रपरंपरेत ललित कलांचं एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान असून, या कलांमुळं भारतानं जगाच्या चित्रसृष्टीतही वेगळेपणा निर्माण केला आहे.
Rajput style
Rajput styleSakal
Updated on

- प्रा. अर्चना अंबिलधोक

भारतीय चित्रपरंपरेत ललित कलांचं एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान असून, या कलांमुळं भारतानं जगाच्या चित्रसृष्टीतही वेगळेपणा निर्माण केला आहे. राजस्थान हा वाळवंटी प्रदेश असूनही ‘राजपूत चित्रशैली’नं अथवा ‘राजस्थानी चित्रशैली’नं अतिशय कोमल अशा चित्रकला, शिल्पकला, संगीत, नृत्य आदी कलांमध्ये स्वतःची विशेषता जोपासली आहे. मानवी जीवन समृद्ध करणाऱ्या याच शैलीचा आढावा या भागात आणि याच्या पुढच्या भागात घेऊ या.

दृक् आणि श्राव्य माध्यमांमध्ये राजपूत शैलीनं दिलेलं योगदान महत्त्वपूर्ण आहे.

चौसठि दीवा जोइ करि, चौदह चंदा माँहि।

तिहि घर किस कौ चाँदना, जिहि घर गोविंद नाँहि।

चौदा विद्या आणि चौसष्ट कला मनुष्याला आत्मसात असल्या तरीसुद्धा ईश्वरभक्तीशिवाय या कलांमध्ये आणि विद्यांमध्ये कमालीची निपुणता येऊ शकत नाही, अर्थातच मानवाचं कल्याण होऊ शकत नाही, असा आशय संत कबीरांच्या या दोह्यातून व्यक्त होतो.

संगीत, नृत्य, काव्य आणि चित्रकला या प्रमुख ललित कलांमध्ये सौंदर्य, माधुर्य, सहजता, सरलता व ईश्वरभक्तीचे अनेक विषय उत्कृष्ट पद्धतीनं व्यक्त झालेले दिसतात. कलेचा प्रमुख हेतू हा मनुष्याला आत्मिक व ऐहिक समाधान देत भौतिक सुख-दुःखाच्या फेऱ्यांतून बाहेर काढून अलौकिक आनंद व रसानुभूती देण्याचा प्रयत्न करणं हा होय. चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला यांच्या संयोगानं मानवी स्वभावांचा, भावनांचा उत्कृष्ट परामर्श घेतला गेलेला प्रत्ययास येतो.

सोळाव्या शतकाच्या प्रारंभी जैन ग्रंथांचं स्थान राजपूत कलेनं घेतलं. गुजरात हे या कलेचं मुख्य केंद्र होतं. परकीय आक्रमणामुळं गुजराती वैभव धुळीस मिळाल्यानंतर काही महत्त्वाचे ग्रंथ राजस्थानात नेण्यात आले. तिथंच राजपूत शैलीचा विकास झाला.

राजस्थानात सापडलेल्या नाण्यांवर असणाऱ्या मनुष्य, पशू, पक्षी ,सूर्य ,चंद्र, धनुष्य, बाण, स्तूप, स्वस्तिक, नदी या प्रतीकांवरूनच या चित्रकलेची प्राचीनता स्पष्ट होते. सोळाव्या शतकाच्या प्रारंभी उगम पावलेल्या राजपूत कलेचं स्वरूप एकोणिसाव्या शतकापर्यंत अधिकाधिक विकसित होत गेलं.

राजपूत लघुचित्रशैली प्रामुख्यानं ‘राजस्थानी’ व ‘पहाडी’ अशा दोन शैलींमध्ये विभागली गेली आहे. राजस्थानी शैली ही बुंदी, किशनगढ, बिकानेर, जोधपूर, तलवार आदी ठिकाणांहून उदयास आलेली दिसून येते, तर पहाडी शैली ही कांग्रा, बसवली, गढवाल, गुलेर, चंबा या हिमालयाच्या पहाडी प्रदेशांमध्ये विकसित झाली.

रामायण, महाभारत, श्रीमद्भगवद्गीता, भागवतपुराण, गीतगोविंद, रागरागिणी, बारहमासा यांतल्या कथांच्या आधारे रेखाटलेल्या प्रसंगांत आणि व्यक्तिचित्रांत राजस्थानी शैलीची वैशिष्ट्यं आढळतात. या चित्रांमधलं रंगलेपन सपाट असून त्यांत लाल, पिवळा, केशरी, निळा, पांढरा आणि काळा या तेजस्वी रंगांचा भडक वापर केलेला दिसून येतो. या तेजस्वी रंगांचा वापर करूनदेखील ही चित्रं त्यांनी व्यापलेली जागा, रंगच्छटा, तोल, मांडणी यांमुळे आकर्षक भासतात.

जोरकस रेखांकनातून तालबद्ध हालचालींतल्या स्त्री-पुरुषांच्या आकृती तुलनात्मक दृष्टीनं बुटक्या असल्या तरी त्या मोहक व आकर्षक आहेत. विशाल नेत्र, भव्य व सपाट भालप्रदेश, अणुकुचीदार नासिका, रंगीबेरंगी पोशाख, वस्त्रांचे विविध पोत, पारदर्शकता आदींचं उत्कृष्ट रेखाटन राजस्थानी कलेत प्रत्ययास येतं. राजस्थानी चित्रकला ही किशनगढ शैली, बुंदी शैली, मेवाड शैली, जोधपूर शैली आदी प्रमुख प्रकारांत विस्तारली.

किशनगढ शैली

राजस्थानातल्या अजमेर जिल्ह्यात किशनगढ हे ऐतिहासिक ठिकाण आहे. ही राठोड-राजपूत घराण्याची राजधानी असून राजा किशनसिंह यांनी हे शहर वसवलं, म्हणून त्याला किशनगढ हे नाव पडलं. जोधपूर, जयपूर, अजमेर, शहापूर हे जिल्हे त्याच्या अखत्यारीत होते. हा प्रदेश अरवली पर्वतानं व्यापलेला आहे. किशनसिंह हे कृष्णभक्त होते. त्यामुळं त्यांच्या कारकीर्दीत

कृष्णलीलांवर आधारित अनेक चित्रांची निर्मिती झाली. त्यांचे वारस राजा सावंतसिंह हे विज्ञाननिष्ठ होते. त्यांनी दिल्लीला भेट दिली असता चित्रकलेचे अनेक नमुने त्यांनी हाताळले. मुघलसम्राट फारुख यांच्याकडं असलेल्या चित्रांमधल्या उभट मानवाकृतींची त्यांच्यावर छाप पडली. याचा परिणाम किशनगढ शैलीतल्या चित्रांमध्ये दिसून येतो. त्यांनी आपल्या चित्रांत ‘कलाशाळा’ (Art School) रेखाटली आहे.

मुघल शैलीतल्या तीव्र तांबड्या छटा, झाडांची आलंकारिक रचना, पोशाखाच्या रंगांमधला उठाव, वस्त्रांवरची नक्षी आणि पारदर्शकता ही वैशिष्ट्यं किशनगढ शैलीत आढळतात. साधेपणा व सहजता ही या चित्रशैलीची वैशिष्ट्यं आहेत.

बनीठनी राधा या राजा सावंतसिंह यांच्या दरबारी असणाऱ्या कवयित्री व गायिका होत्या. त्यांनी अनेक चित्रांवर आधारित काव्यं रचली असल्यामुळं त्यांनाच राधा समजून सावंतसिंह यांनी त्यांच्यावरती अनेक चित्रं रंगवली. त्या चित्रशैलीलाच ‘बनीठनी राधा’ असं संबोधण्यात येऊ लागलं.

आकर्षक बांधा, मोत्याचे अलंकार, केसात माळलेला मोत्यांच्या माळा, कानातली आभूषणं, मोकळे सोडलेले केस अशी अनेक वैशिष्ट्यं या चित्रांत दिसतात. किशनगढ शैलीतल्या चित्रांमध्ये राधा आणि कृष्ण यांना ‘आत्मा आणि परमात्मा’ या रूपात दाखवण्यात आलं आहे.

यांपैकी नौकाविहाराच्या दृश्यामध्ये सजीवता आणि गतीचा भास दिसून येतो. काळा, पांढरा, सोनेरी, चंदेरी, हिरवा अशा सर्व रंगांचा मुक्त वापर या चित्रात आढळतो. चित्रातल्या रेषा अतिशय कोमल, नाजूक, लयदार आणि प्रभावी आहेत. या शैलीतलं उत्कृष्ट चित्र म्हणजे दीपपल्लिका. एका सज्जात प्रियकर आणि प्रेयसी बसलेले असून ते दिव्यांची आरास पाहत आहेत.

या चित्रात सोनेरी आणि काळा या रंगांचा वापर कुशलतेनं करण्यात आलेला असून त्यामुळं हे चित्र मोहक दिसतं. करड्या रंगाचा वापर करून रात्रीचा परिणाम साधण्यात आला आहे. अधूनमधून वापरलेल्या गुलाबी आणि निळ्या रंगच्छटा या चित्रातला गहिरेपणा वाढवतात. दूरवर पसरलेल्या सरोवरामध्ये लाल रंगाच्या नौका चित्रातल्या अवकाशात लक्ष वेधून घेतात.

(लेखिका ह्या कोल्हापूरमधल्या कनिष्ठ महाविद्यालयात इंग्लिशच्या अधिव्याख्याता असून, भारतीय सौंदर्यशास्त्राच्या अभ्यासक आहेत, तसंच कोल्हापूरमधल्याच एका कलासंस्थेच्या सचिव आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.