कोमलहृदयी आणि कणखरही! (राम नाईक)

ram naik
ram naik

अटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी प्रशासनानं नामी शक्कल लढविली होती. तिला अंतिम मान्यता घेण्यासाठी ती फाइल अटलजींकडं आली. सरकारी तिजोरीतलं धन वाचवण्यासाठी 1996 च्या आधीच्या शहीद जवान कुटुंबांना कोणताही मोबदला दिला जाऊ नये, अशा आशयाचा तो आदेश निघणार होता. अटलजींनी तो अर्थातच अमान्य केला. नामंजुरी देताना त्यांनी फक्त एकच वाक्‍य लिहिलं ः "शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मोबदला देताना जवान कधी शहीद झाला यासाठीची शेवटची तारीखमर्यादा एकच- ती म्हणजे 15 ऑगस्ट 1947.'

डिसेंबर 1980 च्या भर थंडीमध्ये मध्यरात्री दीड-दोन वाजता उघड्या जीपमधून मी फिरत होतो. सोबतीला सहकारी वामनराव परब, प्रकाश मेहता आणि अर्थातच अटलबिहारी वाजपेयी. इतक्‍या मध्यरात्री झोपेवर पाणी सोडून हिंडताना आम्हा तिघांच्याही मनात आमच्या या मनस्वी नेत्याबद्दल अपार आदर व कौतुक दाटून आलं होतं. भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेनंतर अवघ्या आठ महिन्यांत पक्षाचं पहिलं महाअधिवेशन आम्ही त्यावेळी मोकळ्या असलेल्या बांद्रा रेक्‍लेमेशनवर भरवलं होतं. या महाअधिवेशनाला देशभरातून फार तर 15 हजार कार्यकर्ते येतील, असा आमचा अंदाज होता. या साऱ्यांच्या मुक्कामासाठी तंबू उभारले होते. आमचे सारे नेते तिथंच मुक्कामाला होते. कधी नव्हे ती मुंबईत थंडी होती, त्यात तो खाडीचा भाग- त्यामुळं बोचरा वाराही. थंडीपासून तंबू किती बचाव करू शकतील, याबाबत मनात शंका होती. त्यात महाअधिवेशनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. प्रत्यक्षात 58 हजार लोक अधिवेशनाला आले. अक्षरशः उघड्यावर या लोकांच्या झोपण्याची सोय करावी लागली. या पार्श्वभूमीवर मध्यरात्री अटलजी बेचैन होऊन अचानक आपल्या खोलीतून बाहेर आले. कोणाला थंडीचा त्रास होत नाही ना, हे पाहायला हा मनस्वी नेता एकटाच निघाला होता. आम्हीही त्यांच्याच पठडीत तयार होत होतो. त्यामुळे वामनराव जीप हाकायला बसले आणि आम्ही चौघे पाहणीला निघालो.

जनता पक्षातल्या समाजवादी सहकाऱ्यांनी मूळ जनसंघीयांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली नाळ तोडायचा घाट घातला. इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीनंतर राज्यावर आलेल्या जनता पक्षाकडून साऱ्या देशाच्या अपेक्षा होत्या. त्या पार्श्वभूमीवर "तुमचं-आमचं नातं दोन वर्षांचं आहे. ते सांभाळण्यासाठी आम्ही संघाशी असलेली नाळ तोडू शकत नाही,' असा बाणेदार पवित्रा अटलजींनी घेतला. बाहेर पडून भारतीय जनता पक्षाची स्थापना केली. त्या अधिवेशनाच्या सांगता सभेत शिवतीर्थावरून अटलजी गरजले ः "अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा...' हे केवळ टाळीचं वाक्‍य नव्हतं, तर प्रचंड आत्मविश्वास आणि दुर्दम्य इच्छाशक्ती यांची ती अभिव्यक्ती होती. याच अधिवेशनात पाहुणे वक्ते म्हणून आलेले न्या. एम. सी. छागला यांनी भविष्यवाणी केली. ते म्हणाले ः ""माझ्यासमोर भारताचं लघुरूप बसलं असून, शेजारी भारताचे भावी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी बसले आहेत.''
ही भविष्यवाणी सत्यात उतरायला सोळा वर्षं लागली. उलट या अधिवेशनानंतर 1984 मध्ये झालेल्या लोकसभा निवणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला. पक्षाचे अवघे दोन खासदार निवडून आले आणि त्यात खुद्द वाजपेयी यांचाही समावेश नव्हता. पाठोपाठ महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार होत्या. त्यावेळी मी भाजपचा मुंबईचा अध्यक्ष आणि स्वतः आमदारही होतो. पक्ष कार्यकर्त्यांना निराशेच्या सावटातून बाहेर काढायला पुन्हा एकदा अटलजींची शिवतीर्थावर सभा आयोजित केली. भाषणाला उभं राहिल्यावर समोरची प्रचंड गर्दी पाहून पहिलं वाक्‍य ते बोलले ः ""हरलेला अटलबिहारी कसा दिसतोय ते बघायला जनसागर उफाळलाय..'' पराभव कसा स्वीकारायचा याचाही अटलजींनी वस्तुपाठच घालून दिला.

आणि अटलजींचा परिचय 1953 पासूनचा. तेव्हा मी अवघा 19 वर्षांचा होतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दुसऱ्या वर्षाच्या संघशिक्षा वर्गात एका रात्री हिंदी काव्यगायनाचा कार्यक्रम होता. 27 वर्षांच्या तरुण अटलजींच्या कवितेमुळं आम्ही उपस्थित तरुण स्वयंसेवक भारावून गेलो. त्या भारावून जाण्याला एकोणिसाव्या वर्षी जी सुरवात झाली, तिला आज अटलजीच पूर्णविराम देते झाले. खरं तर कविता, कला माझा प्रांत नव्हे. मात्र, अटलजींच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वातल्या कवीनं सतत प्रेरणा आणि दिशा दिली. 1969 मध्ये मी उत्तम पगाराची-कंपनी सेक्रेटरीपदाची नोकरी सोडून भारतीय जनसंघाचं पूर्णवेळ काम करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मनात अटलजींच्या काव्यपंक्ती होत्या ः
आँखों में वैभव के सपने, पग में तूफानों की गति हो
राष्ट्रभक्ति का ज्वार न रुकता, आए जिस - जिस की हिम्मत हो


अटलजींच्या कविमनाच्या एकटा मी नव्हे, तर सारेच प्रेमात पडलो होतो. संघटना वाढवण्यासाठी सायकलवरून हिंडणारे अटलजी माझ्या ज्येष्ठांनी पहिले, तर प्रकृतीची जराही पर्वा न करता अथक दौरे काढून भारतभ्रमण करणारे अटलजी मी स्वतः जवळून पहिले आहेत. धकाधकीच्या दौऱ्यातही त्यांना मुंबईत आल्यावर एखादं तरी मराठी नाटक वा चित्रपट पाहिल्याशिवाय करमायचं नाही. डॉ. जब्बार पटेल यांना विनंती करून अटलजींसाठी "उंबरठा'चा खास खेळ झाल्याचं मला आठवतंय. मराठी त्यांना चांगलीच समजत असे. पु.लं.च्या "ती फुलराणी'वर तर ते बेहद्द फिदा होते. मात्र, त्यांचं केवळ मनोरंजनासाठीचं रसिकत्व नव्हतं. मला आठवतंय, 1972 मध्ये भिवंडीतल्या दंग्यानंतर अटलजी मुंबईत आले होते. सारी परिस्थिती बघून ते अतिशय बेचैन होते. त्या रात्री सुधीर फडके यांना मी तुमच्याकडे जेवायला येतो म्हटलं. बरोबरच्या आम्हा साऱ्यांना बाबुजींनी त्यांच्या घरी नेलं. स्वयंपाक होत होता, तोवर अटलजींनी बाबुजींना "गीतरामायण' ऐकवायला सांगितलं. जेवणं झाली. अटलजींनी बाबुजींना विनंती केली ः ""भिवंडीतल्या घटनांनी मन खूप बेचैन झालंय. झोप येणं कठीण आहे. गीतरामायण आणखी गाल, तर कदाचित मनःशांती मिळेल.'' रात्रभर मग एक जगावेगळी मैफील रंगली. बाबुजी गात होते, हळवे अटलजी ऐकत होते....
अटलजींच्या या कोमल हृदयाची कितीदा प्रचिती घेतली. गोवा मुक्तिसंग्रामातले एक स्वातंत्र्यसैनिक हेमंत सोमण आणि अटलजी या दोघांची त्यांच्या तरुण वयात संघशिक्षा वर्गात दोस्ती जमली होती. कालौघात या दोन मित्रांच्या कित्येक दशकं भेटीगाठी झाल्या नाहीत. अटलजी पंतप्रधान झाल्यावर त्यांना भेटायची सोमण यांना तीव्र इच्छा झाली. मी दोघांची गाठ घालून द्यावी, असं सुचवलं गेलं. मला वाटलं, मी सुदाम्याला कृष्णाघरी घेऊन जातोय. प्रत्यक्षात अटलजींनी पुढं होऊन ज्या आवेगानं सोमणांना असं जवळ घेतलं, जणू श्रीराम- भरत भेटीचा प्रसंग!

अटलजीचं ममत्व, सकोमलता प्रत्यक्ष अनुभवण्याचं भाग्यही मला लाभलं. 1994 मध्ये कर्करोगानं मला ग्रासलं. न सांगता, सवरता एवढा मोठा नेता माझ्या तीनखणी घरात दाखल झाला. अचानक आल्यानं अटलजींच्या आदरातिथ्यात आपण कमी पडलो, अशी खंत मला आणि पत्नीला वाटत होती. त्यावेळी विचारपूस करताना, ""बरं झाल्यावर जो पहिला कार्यक्रम कराल त्याला मी येईन,'' असं मनाला उभारी देणारं आश्वासन अटलजींनी दिलं. तसे ते आलेही आणि संपूर्ण जगावर आपल्या वक्तृत्वाची अमोघ मोहिनी घालणारा हा जननायक त्या दिवशी फक्त एकाच "राम नाईक' या विषयावर बोलला. बोलता-बोलता म्हणाले ः ""घरं सगळ्यांची असतात; पण त्याला घरपण असतं का? रामभाऊंचं घर भले छोटंसं आहे; पण सगळीकडे किती टापटिप. घरातल्या माणसांमुळं येणाऱ्या घरपणाचा आदर्श नमुना आहे ते घर.'' आम्हा उभयतांचे डोळे आजही त्या भाषणाच्या आठवणीनं पाणावतात. कधी निरीक्षण केलं अटलजींनी आणि इतके महिने लक्षात ठेवून सांगितलं! आपल्या कार्यकर्त्यांबद्दल हातचं न राखता आपुलकी बाळगणारे होते अटलजी! याच सभेत अटलजींनी मला माझ्या उर्वरित आयुष्यासाठीचा मंत्र दिला. म्हणाले ः ""विचार करा- मृत्यूच्या दारातून का परत आलात? भारतमातेची सेवा करण्यासाठीच, ईश्वरानं बोनस आयुष्य दिलं आहे, हे लक्षात ठेवा.'' त्यांनी दाखवलेल्या मार्गानं मी आजही चालतो आहे.
अटलजींनी पंतप्रधान म्हणून कधीच एकतर्फी निर्णय घेतले नाहीत. अटलजींच्या मंत्रिमंडळात विविध विषयांवर चर्चा होते, याचा सुरवातीला पत्रकारांना आणि प्रशासनाला मोठाच धक्का बसायचा. सर्व सहकाऱ्यांची मतं ऐकून त्यावर साधक-बाधक विचार होत असे. एवढंच नाही, तर जनहितासाठी प्रसंगी स्वतःच्या मतालाही मुरड घालून होणाऱ्या निर्णयावर प्रभावी अंमलबजावणी करण्याची निकोप लोकशाही वृत्ती अटलजींमध्ये होती. सहकारी मंत्र्यांच्या कामात ढवळाढवळ केली नाही, तरी त्यांचं बारीक लक्ष असे. प्रत्येक मंत्र्यानं आपला मतदारसंघही जपला पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. शक्‍य त्या सर्व शनिवार-रविवार मी मुंबईला जाताना दिसल्यावर ""बाकीच्यांना मतदारसंघ नाहीत, तुम्हाला एकट्यालाच आहे वाटतं,'' अशी कौतुकानं थट्टाही करीत. वेळ पडली, की ते भक्कमपणे पाठीशी उभे राहत. तत्कालीन सोव्हिएत युनियनशी साखलीन इथल्या पेट्रोलियम उत्पादन सहभागासाठी निविदा भराव्यात असा माझा आग्रह होता. बहुतेक सहकारी मंत्र्यांनी याबाबत विरोधाचा सूर लावला. रशियाबद्दलचे पूर्वग्रह हेच त्याचं कारणही होतं. मी पेट्रोलियम मंत्रालयाची याबाबतची भूमिका सांगितली. त्यावर अटलजींनी मला माझं वैयक्तिक मत विचारलं. आपण ही संधी सोडता कामा नये, असं मला वाटतंय हे लक्षात येताच ""हमने रामभाऊ पर भरौसा रखकर निर्णय लेना चाहिये,'' असं सांगून संपूर्ण मंत्रिमंडळाची सहमती मिळवली. अल्पावधीतच नऊ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक वसूल होऊन आता देशाला त्याचा फायदा होतो आहे.

कारगिल विजयामध्ये अटलजींच्या कणखर नेतृत्वाचा भाग आहे हे खरंच; पण त्या निमित्तानं त्यांच्या संवेदनशीलतेची आणि जागरुकतेची जी प्रचिती आली, ती अविस्मरणीय आहे. कारगिल युद्धकाळात माझ्या मतदारसंघातले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक वासुदेव पै निवर्तले. त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनास मी गेलो. त्यांचा मुलगाही माझा कार्यकर्ता. अजून तेरावाही व्हायचा होतं; पण पै वहिनींनी आपले सर्व सुवर्णालंकार काढून मला दिले आणि सांगितलं ः ""कारगिल शहिदांच्या कुटुंबीयांसाठी अटलजींना द्या.'' आम्ही सारेच त्या दानानं स्तीमित झालो. दिल्लीला परतल्यावर माझ्याकडून ते दागिने घेताना अटलजी गहिवरले. त्याच वेळी "युद्धकाळात भारतीय स्त्रियांनी असं दान केलं आहे; त्या सोन्याचं पुढं काय होतं,' त्याची त्यांनी विचारणा केली. दुर्दैवानं बांगलादेश युद्धापासून मिळालेल्या सुवर्ण देणग्या रिझर्व्ह बॅंकेत पडून होत्या. अटलजींनी तात्काळ त्याच्या योग्य विनियोगाची तरतूद केली.

जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल त्यांना विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडे एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी प्रशासनानं नामी शक्कल लढविली होती. तिला अंतिम मान्यता घेण्यासाठी ती फाइल अटलजींकडं आली. सरकारी तिजोरीतलं धन वाचवण्यासाठी 1996 च्या आधीच्या शहीद जवान कुटुंबांना कोणताही मोबदला दिला जाऊ नये, अशा आशयाचा तो आदेश निघणार होता. अटलजींनी तो अर्थातच अमान्य केला. नामंजुरी देताना त्यांनी फक्त एकच वाक्‍य लिहिलं ः "शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मोबदला देताना जवान कधी शहीद झाला यासाठीची शेवटची तारीखमर्यादा एकच- ती म्हणजे 15 ऑगस्ट 1947.'
निखळ राष्ट्रभक्ती धमन्यांतून वाहणाऱ्या अटलजींचं सानिध्य, सहवास व सहकार्य मला लाभलं. मी भाग्यवंतच; पण तरीही अटलजींच्याच शब्दात सांगायचं, तर आज त्यांच्या माघारी वाटतंय ः
हाट में छोड अकेला
एक- एक कर मित चला
जीवन बीत चला

आज अटलजी नाहीत; पण ज्या लखनौचं अटलजींनी लोकसभेत प्रतिनिधित्व केलं, पंतप्रधान म्हणून ज्या लखनौ राजभवनात अनेकदा ते राहिले, त्याच वास्तूचा आज मी रक्षक आहे. ते ज्या कक्षात राहायचे तिथं जाऊन तिथल्या अदृश्‍य चैतन्याला वंदन करण्यावरच आता समाधान मानावं लागेल...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com