'आंतरिक अपूर्णताच ऊर्जा देते' (रामदास पळसुले)

रामदास पळसुले
रविवार, 23 डिसेंबर 2018

आज एक कलाकार म्हणून समाजात वावरताना, अजूनही खूप काही काम करायचं आहे, याची सतत जाणीव होत असते. कुठंतरी एक आंतरिक अपूर्णता वाटत असते. हीच अपूर्णता मला दररोज ऊर्जा देण्याचं काम करते आणि अधिकाधिक रियाज करण्यास भाग पाडते. नावीन्याचा ध्यास मला सतत उत्साही आणि आनंदी ठेवतो. दररोज झटून रियाज करून हातातून उत्तमोत्तम बाहेर पडावं, ही एक तळमळ मला वाटत असते.

आज एक कलाकार म्हणून समाजात वावरताना, अजूनही खूप काही काम करायचं आहे, याची सतत जाणीव होत असते. कुठंतरी एक आंतरिक अपूर्णता वाटत असते. हीच अपूर्णता मला दररोज ऊर्जा देण्याचं काम करते आणि अधिकाधिक रियाज करण्यास भाग पाडते. नावीन्याचा ध्यास मला सतत उत्साही आणि आनंदी ठेवतो. दररोज झटून रियाज करून हातातून उत्तमोत्तम बाहेर पडावं, ही एक तळमळ मला वाटत असते.

घरात शास्त्रीय संगीताची आवड असल्यामुळं लहानाचा मोठा झालो ते याच संगीतमय वातावरणात. माझी आजी शांताबाई गोखले ही प्रसिद्ध कीर्तनकार. मी अनेकदा आजीबरोबर कीर्तनाला जात असे. त्याच काळात माझी बहीण प्रियंवदा नवाथे आणि माझी मावशी रंजना देवल या शास्त्रीय गाण्याचे धडे गिरवत होत्या. त्याचा एकत्रित परिणाम म्हणून वयाच्या चौथ्या वर्षापासूनच मला तबलावादनाची गोडी वाटू लागली. त्या रियाजाला बसल्या की मी हाताला लागेल त्या वस्तूचा - मग ती खुर्ची असो, नाहीतर रिकामा डबा असो - तबला बनवून तिच्यावर ठेका धरत असे. नवीन मराठी प्राथमिक शाळेमध्ये जायला लागलो तसा मी गाणंही गाऊ लागलो. शाळेच्या स्नेहसंमेलनात तर हमखास माझं तबलावादनासह गाणं असायचं. शाळेत मी "गाणारा राजू' म्हणूनच परिचित होतो. तबलावादनाची आवड ओळखून आईनं मला सामंत गुरुजींकडं तबला शिकायला पाठवलं आणि माझं प्रारंभीचं शिक्षण सुरू झालं. सामंत गुरुजींनी केलेल्या संस्कारांमुळं तबलावादनातली माझी गोडी अधिक वाढली. सामंत गुरुजींच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त "भरत नाट्यमंदिर'मध्ये झालेल्या कार्यक्रमात मी तबलावादन केलं होतं. तेव्हा मी अवघ्या आठ वर्षांचा होतो.

अभ्यासात गती असल्यामुळं ज्ञान प्रबोधिनीसारख्या शाळेत प्रवेश मिळाला आणि पूर्ण वेळ अभ्यास, क्रीडांगण, इतर कार्यानुभव यांमध्ये कार्यमग्न झालो. अभ्यासाबरोबरच इतर छंद आणि उद्योग यांच्यात तबलावादन मागं पडलं; पण संगीताशी जुळलेली नाळ सहजासहजी तुटणारी नव्हती. गणेशोत्सवामध्ये ज्ञान प्रबोधिनीचं पथक अग्रेसर असायचं आणि दरवर्षी या पथकामध्ये मला ताशा किंवा ढोल वाजवायची संधी मिळत असे. परमेश्‍वरी संकेत असा असतो, की आपण न ठरवताही आपली एखाद्या ध्येयाकडं वाटचाल अशी सुरू राहते.

शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना, मी तबलावादनाकडं केवळ छंद म्हणून बघत होतो. शालेय शिक्षण संपवून इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असताना फिरोदिया करंडक, स्नेहसंमेलन आदींच्या निमित्तानं माझं तबलावादन सुरू होतं. याच काळात विजय कोपरकर, डॉ. अरविंद थत्ते, धनंजय दैठणकर, सतारवादक सुधीर फडके, संध्या फडके-आपटे, सुभाष कामत यांसारख्या युवा कलाकार मित्रमंडळींबरोबर मला तबलावादनाचा आनंद मिळत होता, त्यांच्या निमित्तानं रियाज होत होता आणि तबल्याशी माझं नातं अधिकाधिक घट्ट होत गेलं. याच काळात सच्चिदानंद फडके आणि आनंद बदामीकर यांचं बहुमूल्य मार्गदर्शन मला लाभलं.

मात्र, माझी संगीतक्षेत्राशी खऱ्या अर्थानं नाळ जुळली ती माझे गुरू तालयोगी सुरेश तळवलकर यांच्यामुळं. माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण होऊन मी केएसबी पंप्स या कंपनीत काम सुरू केलं. तिथं दोन वर्षं काम केलं. त्याच सुमारास सामंत गुरुजींचं निधन झालं. त्यांच्या प्रथम स्मृतिदिनी तळवलकर यांच्या सोलोवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यांचं वादन ऐकून मी पूर्ण भारावून गेलो. तोच माझ्या आयुष्यातला "टर्निंग पॉइंट' ठरला. मनातून एकच इच्छा झाली की बस्स...आता यांचं शिष्यत्व पत्करायचं! कार्यक्रम संपल्यावर गुरुजींना भेटलो. मध्यंतरी तबलाशिक्षणात जवळपास दहा-बारा वर्षांचा खंड पडला होता. गुरुजींनी माझं तबलावादन ऐकलं आणि तबला मुळापासून शिकायची अट घातली; तसंच "तबला छंद म्हणून शिकता येणार नाही, तर गुरू-शिष्य परंपरेनुसारच शिकावं लागेल,' असं सांगितलं. तबल्यावर हात ठेवण्यापासून पुन्हा "श्रीगणेशा' करावा लागणार होता. मधली सगळी वर्षं पुसून टाकायची होती. माझ्यासाठी आणि माझ्या घरच्यांसाठी हा आव्हानात्मक निर्णय होता. मात्र, तबल्याच्या ओढीनं मी खासगी कंपनीतल्या नोकरीला कायमचा राम राम ठोकून तडक मुंबई गाठली. अर्थातच आई-वडील, माझे कुटुंबीय; तसंच इंजिनिअरिंग कॉलेजमधली मित्रमंडळी यांच्या भक्कम आधारामुळंच हा निर्णय घेणं सुकर झालं.

वयाच्या तेविसाव्या वर्षी (जेव्हा मुलांची प्रत्यक्ष व्यावहारिक आयुष्याची सुरवात होते त्या वयात) मी मुंबईमध्ये गुरूकुल पद्धतीनं तबल्याचा "श्रीगणेशा' केला. या काळात आम्हा शिष्यांची दैनंदिनी दोन ओळींत संपेल अशी होती. सकाळी आठ वाजता गुरुजी शिकवायला सुरवात करत असत. ते दुपारी एकपर्यंत चालू असे. दुपारी दोन ते चार विश्रांती, दुपारी चार ते रात्री नऊपर्यंत पुन्हा रियाज. संपला दिवस! या दिवसभरात बाकी कोणत्याही गोष्टींना थारा नव्हता. तो काळ होता सन 1986 ते 1989. फारशी इतर व्यवधानंही नव्हती; पण मी व्यक्तिशः टीव्ही, नाटक, सिनेमा, गप्पाटप्पा यांसारख्या भुरळ पडणाऱ्या गोष्टींपासून अलिप्त होतो. झपाटलेपण म्हणजे काय असतं ते मी या काळात अनुभवलं आहे. मला रात्रंदिवस फक्त आणि फक्त तबला दिसत असे. मी माझ्यामध्ये तबला भिनवून घेतला, असं म्हणायला हरकत नाही. "रियाज आणि रियाज' हा दिनक्रम आम्हा शिष्यांचाच नव्हे, तर गुरुजींचासुद्धा होता. गुरुजी सतत आमच्यासोबत असत. याच काळामध्ये अनेक दिग्गज कलाकारांची ऊठ-बस गुरुजींच्या घरी होत असे. त्यातच गुरुपत्नी पद्माताई तळवलकर यांच्याकडून गायनाचे संस्कार झाले आणि मी या कलाकारांसमवेत सहज म्हणून ठेका वाजवायला लागलो. त्यांच्या उशिरापर्यंत चालणाऱ्या सांगीतिक गप्पांमधून मी समृद्ध होत गेलो. संगीताकडं पाहायची नजर मला मिळत गेली. हळूहळू मी गुरुजींच्या कुटुंबाचा एक भाग झालो. स्वतः गुरुजी गायन, वादन, नृत्य यांच्यासोबत साथसंगत करत असत आणि याव्यतिरिक्त सोलो वादनही करत असत. त्यातूनच माझ्यावरही तसेच संस्कार झाले.

या काळामध्ये चांगलं गायन-वादन ऐकण्याचेसुद्धा संस्कार मिळाले. मी रोज काही ना काही नवीन ऐकत असे. मग ते एखादं शास्त्रीय गायन असो, तंतुवादन असो किंवा कथक नृत्याचे बोल असोत. मला व्यक्तिशः गायन, वादन आणि नृत्य या तिन्ही प्रकारांबरोबर साथसंगत करताना आनंद मिळतो.

हे करत असताना, माझ्या वयाची सत्ताविशी पूर्ण झाली होती आणि आता कुठं माझी संगीताच्या क्षेत्रामध्ये नव्यानं सुरवात होत होती. कलेच्या क्षेत्रात मी आकंठ बुडलेला होतो, तरीदेखील व्यावहारिक जीवनातली कर्तव्यं आणि जबाबदाऱ्या टाळता येत नाहीत. या भावनेनं मुंबईहून पुण्याला परतलो. माझा जिवाभावाचा मित्र श्रीकांत शिरोळकर याच्यासमवेत पोटापाण्याचा उद्योग सुरू केला. याच सुमारास विजय कोपरकर यांच्यामुळं जितेंद्र अभिषेकी, तर गुरुजींमुळं रोहिणीताई भाटे यांच्यासारख्या दिग्गजांबरोबरच्या साथसंगतीनं करिअरची सुरवात झाली. हळूहळू बऱ्याच नामवंत कलाकारांसमवेत मी साथसंगतीला जाऊ लागलो. जोडीला व्यवसाय सुरू होता; पण मन मात्र तबल्याच्या ओढीनं झपाटलेलंच राहिलं. शनिवार आणि रविवार मी न चुकता गुरुजींकडं शिकायला जात राहिलो. व्यवसाय की तबला, हा निर्णय घ्यायची वेळ जेव्हा सात-आठ वर्षांत आली तेव्हा स्वाभाविकपणे मी तबल्याची निवड केली. सन 2000 पासून फक्त तबला आणि तबलाच. माझ्या सुदैवानं माझी पत्नी मोहना समजूतदार असल्यामुळं तिनं माझ्यातल्या कलाकाराला प्रोत्साहन देऊन मला उत्तम साथ दिली. तिला असलेल्या सरकारी नोकरीमुळं प्रापंचिक जबाबदाऱ्यांचा भारही हलका झाला.
पुण्याला परतल्यावर हळूहळू बस्तान बसत गेलं. त्या काळात महाराष्ट्रात माझ्या पिढीचं नामांकित तबलावादन अवघं बोटांवर मोजण्याइतकं होतं, त्यामुळं कार्यक्रम मिळू लागले. तत्कालीन पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रामध्ये गुरू म्हणून नियुक्ती झाली; तसंच सन 1997 पासून दरवर्षी अमेरिका आणि कॅनडा इथं नियमितपणे कार्यक्रमासाठी बोलावणी येऊ लागली. गेली पंचवीस-तीस वर्षं संगीताच्या क्षेत्रात काम करताना "प्रत्येक कार्यक्रम हा पहिला कार्यक्रम आहे,' ही भावना मनात ठेवून उत्तमोत्तम सादरीकरण करण्याचा माझा प्रयत्न असतो. कार्यक्रमातल्या मुख्य कलाकाराच्या कलेचा आस्वाद घेत वादन करणं महत्त्वाचं असतं, असं माझं मत आहे आणि त्यामुळं माझा आनंद द्विगुणित होत असतो.
कोणत्याही कलाकाराला सोलो तबलावादन आवडतं. प्रत्येक तबलावादक शिकतो तेव्हा तो सोलो वादनाच्या दृष्टीनंच शिकत असतो. तबल्याला स्वतःची अशी भाषा आहे. तबल्यातदेखील 11-12 मुळाक्षरं आहेत. मात्र, त्यांच्या वेगवेगळ्या संयोगांतून विविध शब्द मिळतात. त्या शब्दांच्या एकत्रीकरणातून निरनिराळ्या रचना मिळतात. इतका खोल, कलात्मक विचार दुसऱ्या कोणत्याही तालवाद्याच्या बाबतीत झालेला नाही. सोलो वादनातून तुम्हाला तुमची सर्व गुणवत्ता, सगळी कौशल्यं श्रोत्यांपुढं अभिव्यक्त करता येतात. सोलोमध्ये कलाकार परंपरेच्या चौकटीत राहून स्वतःच्या कल्पनाशक्तीनं, तयारीनिशी, वेगानं; पण तितकंच सुस्पष्ट वाजवत असेल, समतोल साधत असेल, तरच ते सादरीकरण श्रोत्यांना भावतं, त्यांच्यापर्यंत पोचतं, आकर्षक ठरतं. त्यासाठी कसदार आणि पुरेसा सराव होणं गरजेचं असतं.

मी सोलो तबलावादन करत असलो, तरी मला स्वतःला साथसंगतही तितकीच आवडते. कारण तीदेखील तितकीच आव्हानात्मक असते. तिथं लय तुमची नसते, ताल तुमचा नसतो. दुसऱ्या कलाकारासोबत जुळवून घेऊन, स्वतःला मुरड घालत आणि दर्जेदार सादरीकरण करताना, तुमच्या तालमीचा कस लागत असतो. माझ्या सुदैवानं गायन, वाद्यवादन, शास्त्रीय नृत्य, फ्युजन अशा सर्व प्रकारच्या संगीताला पूरक असं तबलावादन करता येईल, अशा पद्धतीनं गुरुजींनी माझ्यावर संस्कार केल्यामुळं सादरीकरण करणं सहज, सोपं जातं.

आज एक कलाकार म्हणून समाजात वावरताना, अजूनही खूप काही काम करायचं आहे, याची सतत जाणीव होत असते. कुठंतरी एक आंतरिक अपूर्णता वाटत असते. हीच अपूर्णता मला दररोज ऊर्जा देण्याचं काम करते आणि अधिकाधिक रियाज करण्यास भाग पाडते. नावीन्याचा ध्यास मला सतत उत्साही आणि आनंदी ठेवतो. दररोज झटून रियाज करून हातातून उत्तमोत्तम बाहेर पडावं, ही एक तळमळ मला वाटत असते.

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या रूपानं एक असं श्रद्धास्थान असतं, की जिथं मनुष्य नतमस्तक होत असतो. गुरूच्या नुसत्या आभासी, मानसिक अस्तित्वानं एकलव्यासारखे शिष्य तयार झालेले आहेत. इतकी गुरूच्या सान्निध्यामध्ये शक्ती आहे. त्यामुळंच आज विज्ञानयुगात, एकविसाव्या शतकात गुरू आणि शिष्य ही परंपरा अजूनही टिकून आहे. संगीताच्या क्षेत्रामध्ये तर या गुरूचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरू-शिष्य परंपरेमध्ये शिष्याची प्रगती ही शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक या तिन्ही पातळ्यांवर होते. शारीरिक पातळी म्हणजे फिजिकल रियाज. दररोज केलेल्या रियाजानं वेगवेगळ्या बोलांवर नियंत्रण प्राप्त होऊन वादनात येणारी सहजता. बौद्धिक पातळी म्हणजे आपल्या शास्त्रीय संगीतातलं शास्त्र आणि अपरंपार असलेली विद्या आत्मसात करणं. मात्र, विद्यार्थी-कलाकार होण्याकरिता मानसिक पातळीवरचा विकास अत्यंत महत्त्वाचा आहे. मानसिक पातळीवरचा विकास म्हणजे शरीरानं आणि बुद्धीनं आत्मसात केलेल्या शास्त्र, तंत्र आणि विद्येचं कलेमध्ये रूपांतर होणं. विद्यार्थ्यांपासून कलाकार होण्यापर्यंतची प्रक्रिया ही गुरू-शिष्य परंपरेमध्ये होऊ शकते. यामध्ये मानसिक पातळीवर होणारा विद्यार्थ्याचा विकास हा गुरूंच्या सहवासामधून मिळणाऱ्या संस्कारांनी होऊ शकतो.
आता गुरू-शिष्य परंपरेला नजरेसमोर ठेवून मी, शिरीष कौलगुड, अनिता संजीव आणि श्रीकांत शिरोळकर यांच्या सहकार्यानं "आवर्तन' गुरुकुलाची सन 2016 मध्ये स्थापना केली. या उपक्रमात माझे गुरुजी तळवलकर, उल्हास कशाळकर, उदय भवाळकर, शमाताई भाटे, सुचेताताई चापेकर हे आनंदानं सहभागी झाले. सध्या या गुरुकुलामध्ये जवळपास नव्वद विद्यार्थी या दिग्गज गुरूंकडून तालीम घेत आहेत.

माझ्या सांगीतिक कारकीर्दीमध्ये मला अनेक दिग्गज कलाकारांसमवेत साथसंगत करायची संधी मिळाली. तबला सादरीकरणाच्या निमित्तानं भारतात आणि भारताबाहेर अनेक महोत्सवांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये हजेरी लावता आली, हे माझं भाग्यच. आज तीस वर्षांनंतर मागं वळून पाहताना मला तसाच अजूनही रियाजात रमलेला "मी' दिसतो, यातच मी समाधानी आहे. पुढच्या वाटचालीसाठी आपणा सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद राहोत ही ईश्‍वरचरणी प्रार्थना.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ramdas palsule write article in saptarang