esakal | पुतनामावशीची कणव
sakal

बोलून बातमी शोधा

Ramesh Jadhav writer about Narendra Modi and Gau Rakshak

वास्तविक गाय हे धार्मिक प्रतीक आहे की एक उपयुक्त पशू या दोन दृष्टिकोनांमधील फरक ही खरी ग्यानबाची मेख आहे. हिंदू धर्मातीलच अनेक समाजघटकांची रोजीरोटी गोवंशावर अवलंबून आहे. गोमांस हे दलित, आदिवासी, ख्रिश्‍चन, मुस्लिम या समाजगटांतील लाखो लोक आणि सर्व धर्मांतील गरीब कष्टकरी समाजाचे अन्न आहे, तसेच गोवंशहत्याबंदीमुळे शेतकरीवर्ग पार कोलमडून गेला आहे.

पुतनामावशीची कणव

sakal_logo
By
रमेश जाधव

स्वयंघोषित गोरक्षक देशभरात घालत असलेल्या उन्मादी धुमाकुळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिठाची गुळणी धरली होती. अखेर त्यांनी या धृतराष्ट्री पवित्र्याचा त्याग करत मौन सोडले आहे.

`गोरक्षणाच्या नावाखाली मनुष्यहत्या करणे मुळीच स्वागतार्ह नाही. गायीचे रक्षण कसे करावे, याबद्दल आपल्या राज्यघटनेनेही मार्गदर्शन केले आहे. पण गोरक्षणाचा कैवार घेतला म्हणजे एखाद्याची हत्या करण्याचा अधिकार मिळतो? याला गोरक्षा म्हणायचे?`` अशा शब्दांत पंतप्रधानांनी स्वयंघोषित गोरक्षकांना समज दिली आहे. यापूर्वी गेल्या वर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातही पंतप्रधानांनी गोरक्षकांची निर्भत्सना केली होती.  "तथाकथित गोरक्षकांनी दुकानदारी सुरू केली असून, रात्री भलतेच धंदे करतात आणि दिवसा गोरक्षणाच्या नावाखाली उच्छाद मांडतात``अशी भावन पंतप्रधानांनी त्यावेळी व्यक्त केली होती. "गोळ्या घालायच्या असतील तर मला घाला, दलितांना त्रास देऊ नका,' असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.

आज वर्षभरानंतर पुन्हा तोच खेळ नव्याने मांडावा लागत आहे. कोल्हापुरात अशा प्रकाराला `फिरून फिरून गंगावेश` असं म्हणतात. देशातला आजवरचा सर्वाधिक शक्तिशाली पंतप्रधान अशी ज्यांची प्रतिमा भक्तगणंगांनी रंगवली आहे, त्या नरेंद्र मोदींचे स्वयंघोषित गोरक्षकांपुढे काही चालत नाही, हे गोरक्षक मोदींना जुमानत नाहीत, असा त्याचा अर्थ काढायचा का, की राजसत्तेचे प्रबळ पाठबळ पाठीशी असल्यामुळेच हे गोरक्षक मोकाट सुटले असून मोदींचा संताप हे केवळ दाखवायचे दात आहेत, अशी संगती लावायची, हा प्रश्न पुन्हा एकदा ठळक झाला आहे. 

स्वयंघोषित गोरक्षकांच्या धुडगुसाकडे पाहिले तर त्यात एक `मेथड इन मॅडनेस` दिसते. त्यांनी प्रामुख्याने मुस्लिम व दलित हा समाजघटक लक्ष्य केला आहे. पंतप्रधान मोदी आज या मुद्यावर जे काही मतप्रदर्शन करत आहेत, ते म्हणजे निव्वळ भावनिक आवाहन आहे. त्यात मुस्लिम, दलितांवरील अत्याचारांमुळे आलेली अस्वस्थता कमी आणि आपली प्रतिमा डागाळू नये याची काळजी जास्त आहे. मोदी राजवटीत धर्मउन्मादी घटक घालत असलेल्या धुडगुसाचे आंतरराष्ट्रीय पातळीवरही पडसाद उमटत आहेत. भारतातील स्थिती परकीय गुंतवणुकीसाठी योग्य नाही, असा संदेश यातून जात आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये मोदींवर म्हणूनच टीका सुरू झाली आहे, त्यामुळे विकासपुरुष ही आपली प्रतिमा जपण्यासाठी मोदींची केविलवाणी धडपड सुरू आहे. 

उत्तर प्रदेशात गोमांस बाळगल्याच्या नुसत्या संशयावरून अखलाख हत्याकांड घडले आणि गुजरातमधील उना येथे मेलेल्या गायींचे कातडी सोलण्याचे काम करणाऱ्या दलितांना गोरक्षक दलाने अमानुष मारहाण केली होती. त्यावरून गुजरात पेटला होता. तिथे दलितांनी एकत्र येऊन आंदोलनाचा बिगुल फुंकला होता. संपूर्ण देशभरात सरकारच्या विरोधात जनमत तयार होण्यास सुरूवात झाला होती. रोहित वेमुला आणि कन्हैयाकुमार प्रकरणांमुळे मोदी सरकारची छी-थू झाली होती. दलितांविषयी या सरकारचा दृष्टिकोन द्वेषमूलक आहे ही जनमानसातील धारणा उना प्रकरणामुळे अधिकच पक्की झाली. दलितविरोधी प्रतिमा पक्षाचे नुकसान करणारी ठरेल, हा धोका गहिरा होत असल्यामुळे मोदींनी त्यावेळी सारवासारवीची भाषा केली होती. आता मुस्लिम समुदाय ठरवून लक्ष्य केला जात आहे. मुस्लिमविरोधी प्रतिमा भाजपसाठी नुकसानकारक नव्हे तर फायद्याचीच आहे, पण तरीही परकीय गुंतवणुकीसाठी हे वातावरण त्रासदायक ठरू शकते, हे ओळखून मलमपट्ट्या करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळेच मोदींना आता कंठ फुटला आहे. 

वास्तविक गाय हे धार्मिक प्रतीक आहे की एक उपयुक्त पशू या दोन दृष्टिकोनांमधील फरक ही खरी ग्यानबाची मेख आहे. हिंदू धर्मातीलच अनेक समाजघटकांची रोजीरोटी गोवंशावर अवलंबून आहे. गोमांस हे दलित, आदिवासी, ख्रिश्‍चन, मुस्लिम या समाजगटांतील लाखो लोक आणि सर्व धर्मांतील गरीब कष्टकरी समाजाचे अन्न आहे, तसेच गोवंशहत्याबंदीमुळे शेतकरीवर्ग पार कोलमडून गेला आहे. जुनी बैले विकून नवीन जनावरे खरेदी करण्याचे आर्थिक चक्रच या कायद्यामुळे संपुष्टात आले. त्याशिवाय बीफ उद्योग, चामडी उद्योग आणि इतर पूरक उद्योगांचे मोठे नुकसान झाले; पण संघ परिवारातील संघटनांना गोरक्षणाच्या नथीतून हिंदू विरुद्ध मुस्लिम असे ध्रुवीकरण करण्यात रस आहे. मोदी या मूळ प्रश्नाला हात न घालता प्रामाणिक गोरक्षक आणि दुकानदारी मांडलेले गोरक्षक असा फरक करून बुद्धिभेद करत आहेत.

मोदींना खरोखरच चाड असेल तर त्यांनी विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या गुंडगिरीला आळा घालण्याची आणि गोरक्षक दलांवर बंदी घालण्याची हिंमत दाखवावी. गोरक्षकांना राजकीय पाठिंबा असल्यामुळेच त्यांच्यात हत्तीचे बळ संचारले आहे, त्यामुळे केवळ धार्मिक सलोख्याचे आवाहन नव्हे, तर ठोस राजकीय इच्छाशक्ती हेच त्यावरचे उत्तर आहे. ही इच्छाशक्ती न दाखवता मोदी बळींविषयी व्यक्त करत असलेली कणव म्हणजे खरे तर मगरीचे अश्रू आहेत. 
(लेखक अॅग्रोवनचे उपवृत्तसंपादक आहेत.)

loading image