

- रमेश सावंत, rameshns12@gmail.com
अव्याहत विनोदी लेखन करणाऱ्या सुधीर सुखठणकर यांचा ‘पापड आणि फेसबुक’ हा तेरावा विनोदी कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. सुखठणकर यांच्या लेखनाची शैली केवळ शाब्दिक विनोदापुरती मर्यादित नाही, तर ती कोणतेही प्रसंग आणि त्यात सहभागी व्यक्ती यांच्या संगमातून उदयाला आलेली दिसते. मानवी वर्तनातील विसंगती लेखक नेमकी हेरतात आणि त्याभोवती प्रसंगांची गुंफण करतात, त्याची प्रचीती या कथासंग्रहातही येते.
मराठी साहित्यात विनोदी लेखनाची परंपरा पाहता प्रामुख्याने चिं. वि. जोशी, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, द. मा. मिरासदार आदी लेखकांची नावे समोर येतात. जुन्या पिढीतल्या रसिकांसाठी या व अन्य अनेक विनोदी लेखकांनी विपुल विनोदी लेखन केले. त्यांच्या विनोदी साहित्यातून मराठी रसिकांना निखळ विनोद वाचायला मिळाला, ज्यातून निर्भेळ हास्यनिर्मिती होत असे.
प्रसंगनिष्ठ, व्यक्तिनिष्ठ आणि शाब्दिक विनोद यांची उत्तम सांगड घालून लोकांना हसवणे ही एक कठीण कला समजली जाते. जुन्या लेखकांचे विनोदी लेखन आणि आजच्या विनोदी लेखनाची पठडी वेगळी असली तरी त्याला सद्य काळातील आधुनिकतेचा स्पर्श झालेला दिसतो. सध्याच्या काळात जीवनातला ताणतणाव कमी करण्याच्या दृष्टीने विनोदी लेखनाचे महत्त्व आणखीनच अधोरेखित होते.
सामान्य माणसाच्या जीवनातील संघर्ष विनोदी अंगाने टिपणारे लेखक आजमितीस तुरळक राहिले असले, तरी त्यांचे रसिक वाचकही बरेच असल्याचे जाणवते. विसाव्या शतकाच्या अखेरीस लेखन सुरू करून एकविसाव्या शतकात आजही लेखनरत राहिलेल्या विनोदी लेखकांत ज्येष्ठ लेखक सुधीर सुखठणकर हे अग्रस्थानी आहेत. असे अव्याहत विनोदी लेखन करणाऱ्या सुधीर सुखठणकर यांचा ‘पापड आणि फेसबुक’ हा तेरावा विनोदी कथासंग्रह अमित प्रकाशनतर्फे नुकताच प्रकाशित झाला आहे.
विशेष म्हणजे या संग्रहातील चार कथा कोरोनाच्या भीषण संकटग्रस्त काळातील आहेत. खरे तर त्या काळातील गंभीर परिस्थिती पाहता त्यावर विनोद सुचणे दूरची गोष्ट वाटावी, अशी चिंताजनक स्थिती होती, परंतु सुखठणकर यांच्यासारख्या लेखकाच्या पिंडातच मुळी ‘विनोद’ हा अंगभूत गुण आहे. त्यातून सुखठणकर यांच्या लेखनाची शैली केवळ शाब्दिक विनोदापुरती मर्यादित नाही, तर ती कोणतेही प्रसंग आणि त्यात सहभागी व्यक्ती यांच्या संगमातून उदयाला आलेली दिसते.
मानवी वर्तनातील विसंगती सुखठणकर नेमकी हेरतात आणि त्याभोवती प्रसंगांची गुंफण करतात. चटपटीत संवाद हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य. याचे प्रत्यंतर या संग्रहातील ‘विलगीकरणातील भीष्मप्रतिज्ञा’ या पहिल्याच कथेतून येते. या कथेत लेखकाने निवेदनासाठी डायरीचा फॉर्म निवडलेला आहे. कथेच्या निवेदकाच्या मित्राचा, त्याच्यापेक्षा केवळ पाच वर्षांनी मोठा असलेला मामा किरीट आणि त्यांची ‘बैठक’, रतनमामाच्या मुलीचे लग्न, तिथे किरीट आणि त्याची मैत्रीण प्रिया यांच्या प्रेमसंबंधांतून घडणाऱ्या विनोदी घटना आणि प्रसंग यातून झालेला विनोद वाचकाला मनमुराद हसण्यास भाग पाडतो.
‘एक तरी बाटली मिळवावी’ ही कथा टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली असूनही भारी गंमत आणणारी आहे. कोरोना काळात टाळेबंदीमुळे दुकाने बंद असल्याने कथेतील निवेदकावर त्यांच्या ‘पियक्कड’ नातेवाईकासाठी ‘बाटली’ मिळवण्याची आपत्ती ओढवते. ती मिळवण्याच्या नादात त्याला कोणकोणत्या विचित्र प्रसंगांना सामोरं जावं लागतं आणि शेवटी त्याची काय अवस्था होते, हे मुळातून वाचण्यातच मजा आहे!
अनेक गैरसमजांची फोडणी दिल्यामुळे कथा बहारदार झालेली आहे. या संग्रहातील चारही कथांतून कोरोना काळातील प्रत्येक पैलूवर विनोदाच्या अंगाने कथासूत्र मांडण्यात लेखक यशस्वी झाला आहे. याचे प्रत्यंतर ‘घरून काम आणि काजू उसळ’ या कथेत येते. अशाच प्रकारे ‘पुतण्याला जेव्हा जाग येते’ या कथेतदेखील ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाच्या निमित्ताने झालेला विनोद रेखाटताना लेखकाने आपल्या लेखनकलेचे कौशल्य पणाला लावल्याचे दिसते.
कोरोना काळातील या कथा वास्तवावर आधारित असल्यामुळे भविष्यासाठी त्या दस्तावेज ठरू शकतात. ‘दाखवायचे दात’ या कथेत प्रोफेसर माणिकनवरे आणि राघवेंद्र यांचं द्वंद्व, गमतीजमती विविध घटनांतून छान साकारल्या आहेत. या कथा विनोदी असल्या तरी त्यांना आजच्या परिस्थितीची आणि समस्यांची पार्श्वभूमी आहे. उदाहरणार्थ ‘नानाकाका की जय’मधील ‘पाठकोरे’ या अनोख्या आडनावाच्या व्यक्तीला समस्त पाठकोरेंचं संमेलन भरवण्याची इच्छा होते.
त्यातून पुनर्विकासाचा एक वेगळा कोन या कथेला मिळतो. ‘पापड आणि फेसबुक’ या कथेत बालाजी आणि शामराव यांची पापड वाळवण्याच्या कामातून उद्भवणारी रंजक आणि विनोदी कहाणी आहे. इस्पितळात रुग्णांच्या सोबतीला कुटुंबसदस्याची वानवा ही आजची एक गंभीर समस्या. ‘हिंग्याचं बिल’ या खुमासदार कथेचा नायक या समस्येचा अनपेक्षितपणे बळी ठरतो. हा सगळा घटनाक्रम मजेशीर आहे. अन्य कथांचे विषयदेखील ‘आजचे’ आहेत.
या संग्रहातील प्रत्येक कथेत लेखक विनोदी बाजाचे वैविध्य टिकवून ठेवण्यात यशस्वी झालेला दिसून येतो. काळाप्रमाणे विनोदी साहित्यातील विनोदाचे स्वरूपदेखील बदलते, याचा प्रत्यय सुखठणकर यांच्या कथा वाचताना येतो.
आजकालच्या गतिशील जीवनातील कंटाळवाणी आणि बेजार करणारी कहाणी मनातून हद्दपार करायची असेल, तर अशा ताज्या विनोदी लेखनाचे स्वागत करायला हवे. केवळ शाब्दिक विनोदावर भर न देता दैनंदिन जीवनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकत कथेच्या सूत्रात गुंफणारे लेखक सुखठणकर या कथांतून वाचकांना आकर्षित करतात. त्यामुळे हा विनोदी कथासंग्रह रसिकांनी अवश्य वाचावा आणि त्यातील निखळ विनोदाचा मनसोक्त आस्वाद घ्यावा असाच आहे.
कथासंग्रह : पापड आणि फेसबुक
कथाकार : सुधीर सुखठणकर
प्रकाशक : अमित प्रकाशन
पृष्ठसंख्या : १८२
मूल्य : ३६० रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.