अमूर्त शैलीतील चित्रकथा

रमेशचंद्र पाटकर यांची साहित्यसंपदा महत्त्वाचा दस्तावेज आहे. ‘ऐसपैस’ मात्र वाङ्‍मयकार म्हणून त्यांची वेगळी ओळख अधोरेखित करणारा आहे.
rameshchandra patkar aispais literary book highlights is distinct identity as literary writer
rameshchandra patkar aispais literary book highlights is distinct identity as literary writersakal

रमेशचंद्र पाटकर हे ‘सत्यकथे’च्या काळातील महत्त्वाचे कथाकार. तेव्हापासून आत्तापर्यंत लिहिलेल्या वेगवेगळ्या कथांचा एक संग्रह ‘ऐसपैस’ नावाने अलीकडेच प्रकाशित झाला आहे. या कथा वाचताना शब्दसौंदर्याचा खुप सुंदर प्रयोग पाटकर यांनी केला. त्या कथा उत्सुकता वाढवतात, गुंतवतात आणि वाचकांना ताणून न धरता पटकन पूर्णविराम घेतात. कुठेही रेंगाळत नाहीत; पण एका गोष्टीत अनेक धागे गुंफून एखाद्या अमूर्त चित्रात गुरफटावे, तसे यातील अनेक कथेतले पदर आश्‍चर्यचकित करतात. त्या अर्थाने या अमूर्त शैलीतील चित्रकथा वाटतात.

पाटकर यांची आजवर अनेक महत्त्वाच्या विषयांवरची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. भारतीय आणि पाश्‍चात्त्य कलेचा इतिहास त्यांनी लिहिला आहे. भगतसिंग यांची निवडक भाषणे व लेखनाचा अनुवाद केला. ‘नाविकांचे ऐतिहासिक बंड’ हे महत्त्वाचे पुस्तक त्यांच्या नावावर आहे.

आधुनिक शाहीर आणि कामगार रंगभूमी, मराठी नियतकालिकांतील दृश्‍य कलाविचार, इप्टा : एक सांस्कृतिक चळवळ, चित्रकार अमृता शेरगिल, भारतीय स्वातंत्र्यलढा आणि गदर आंदोलन अशी त्यांची अनेक पुस्तके महत्त्वाचा दस्तावेज ठरली आहेत. या पार्श्वभूमीवर आता प्रकाशित झालेला ‘ऐसपैस’ हा कथासंग्रह वाङ्‍मयकार म्हणून त्यांची वेगळी ओळख अधोरेखित करणारा आहे.

‘ऐसपैस’मध्ये एकूण १२ कथांचा समावेश आहे. त्या वेगवेगळ्या धाटणीच्या आहेत. प्रत्येक कथेत भेटणाऱ्या व्यक्तिरेखा त्यांच्या - त्यांच्या जगण्याचे कॅनव्हास रंगवणाऱ्या आहेत. या छोट्या-छोट्या कथेतील छोट्याछोट्या वाक्यांमधून मोठा आशय सांगत जातात. ‘महादेवाचा बाप पक्का... हो, अगदी पक्का... म्हणजे कच्चा नव्हताच तो.’ हे ‘सगळंच काही सांगायला हवं?’ या कथेतील शब्दरचना. असे वेगवेगळे प्रयोग कथेगणिक येतात. त्यातली गंमत सांगतात. ‘मध्यरात्र उलटून गेल्यावर’ या कथेची सुरुवात ‘मध्यरात्र उलटून गेलेली. खड्डे पोटाशी धरून रस्ता आडवा झालेला’ अशी होते. परिच्छेदागणिक ही मध्यरात्र भेटत जाते. नंतर-नंतर ‘दिवस वर येत चाललेला’, ‘गजबज घोंगावू लागली’, ‘दिवस मध्यान्ही आला’, ‘तापमान वाढू लागलं’, ‘सावल्यांसोबत दिवस सरकत राहिला’ हा कथागोष्टीशी जोडलेला काळाचा प्रवास मांडला आहे.

‘बेपत्ता’ ही कथा ‘तिसरी’चे काय झाले असेल, या उत्सुकतेपोटी भरभर पुढे घेऊन जाते. कथा संपते तेव्हा अस्वस्थ करते. ‘हरवलेला दात’ ही कथा आजोबा-नातवाच्या नात्यातील गहिरेपण अधोरेखित करणारी आहे. ‘माझीही एक सायंकाळ’ ही कथा मुंबईतल्या लोकलचा जीवघेणा प्रवास चितारणारी आहे. हे स्वकथन करताना पाटकर म्हणतात, ‘‘गाडीचा हा प्रवास नेहमीचाच. म्हणजे उपनगरात माझ्या जन्माची पुनर्स्थापना झाली तेव्हापासूनचा. उकाड्याच्या दिवसांत उठता-बसता डोळ्यांसमोर मरण. थंडीच्या किंवा पावसाच्या दिवसात फाटलेल्या छत्रीसारखी देहाची लक्तरं उघड्या डोळ्यांनी अंगावरून मिरवणं. गाडीतून देहाची ही मिरवणूक सतत अंतर कापत असते. सवय झाली की वेदनेचं जसं सोयरसूतक वाटत नाही, तसं या लंब्याचौड्या अंतराचं...’’ मुंबईकरांच्या वाट्याला रोज येणाऱ्या या प्रवासाचं वर्णन पाटकरांनी खुप ताकदीनं मांडलं आहे. हा प्रवास वाचताना अनेक व्यक्तिरेखा भेटतात. त्यात ‘एका पैशात आशीर्वाद देणारा भिकारी’ भेटतो. याच प्रवासादरम्यान ही कथा कार्यालयातील गरुड बेळगावकरकडे घेऊन जाते. लग्न जुळवून देणार भामटाही भेटतो. ‘दवाखान्यात गर्दी आहे, आयुष्य वाढवण्यासाठी जमली आहेत,’ अशी काही निरीक्षणं विचार करायला लावणारी आहेत. ‘अत्तरविक्याची गोष्ट’, ‘आजी, चाफा आणि मांजर’, ‘ही एक गोष्ट त्याची किंवा माझी’, ‘काय झालं?’, ‘ऐकू येतं?’, ‘पैसा झाला खोटा’, ‘ब्ल्यू नाईल’ अशा अनेक कथा या संग्रहात आहेत. यातील काही कथा साध्यासोप्या अर्थाने कथा वाटतात, तर काही ललितलेखांची शैलीने मानवी जवीनातील तरल भावस्पर्श उमटवतात.

रमेशचंद्र पाटकर यांच्या वाङमयीन प्रवासाचा पट आणि साहित्यविषयीच्या जाणिवांचा श्रीमंतपणा प्रस्तावनेत अधोरेखित झाला आहे. लोकवाङ्‍मयगृहाने प्रकाशित केलेल्या या कथासंग्रहाचे मुखपृष्ठचित्र स्वत: रमेशचंद्र पाटकर यांचेच आहे. त्यातून या कथासंग्रहातल्या कथेतील अमूर्तशैलीच अधोरेखित केल्याचे दिसते. लघुकथेसाठी प्रख्यात असणारे सआदत हसन मंटो यांच्या कथांचा अनुवाद पाटकर यांनी ‘मायाबाजार’ या नावाने केलेला आहे. लघुकथेचे हेच बीज पाटकर यांनी स्वत: लिहिलेल्या अनेक कथांमध्ये दिसते. कथा छोट्या असल्या तरी त्याचा कॅनव्हास मात्र मोठा आहे. शब्दयोजनेची गंमत आहे. काही कथा वाचताना त्या थेट एक गोष्ट न राहता अनेक विषयांची गुंतागुंत आहे. या गुंतागुंतीत अडकणे, हा एक ‘ऐसपैस’ असा वेगळा वाचनानंद आहे.

रमेशचंद्र पाटकर यांचा ‘ऐसपैस’ हा कथासंग्रह अलीकडेच प्रकाशित झाला. कथा छोट्या असल्या तरी त्याचा कॅनव्हास मात्र मोठा आहे. त्या कथा उत्सुकता वाढवतात, गुंतवतात. कुठेही रेंगाळत नाहीत. एका गोष्टीत अनेक धागे गुंफून एखाद्या अमूर्त चित्रात गुरफटावे, तसे यातील अनेक कथेतले पदर आश्‍चर्यचकित करतात. त्या अर्थाने या अमूर्त शैलीतील चित्रकथा वाटतात. हा एक ‘ऐसपैस’ असा वेगळा वाचनानंद आहे.

mahendra.suke@esakal.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com