
- रणधीर शिंदे, saptrang@esakal.com
कवयित्री आणि कथाकार नीरजा यांची ‘थिजलेल्या काळाचे अवशेष’ ही कादंबरी अलीकडंच प्रकाशित झाली आहे. ही त्यांची पहिलीच कादंबरी. गेल्या दोन दशकांतील राजकीय-सामाजिक घटना-घडामोडींतून आकाराला आलेलं कथन या कादंबरीत आहे. मराठीत बाह्यवास्तवाला प्रतिसाद देणारी कांदबरी परंपरा मोठ्या प्रमाणात आहे. या कादंबऱ्या तपशीलभरणाच्या व अतिरिक्त फुगवट्याच्या स्वरूपात आढळतात. नीरजा यांच्या ‘थिजलेल्या काळाचे अवशेष’ या कांदबरीत समकालीन सामाजिक, राजकीय चित्रणाचा बहुमुखी पट आहे. जीवनाच्या चित्रफलकातील गुंतागुंतीचा समाजपट नीरजा यांच्या कादंबरीतून प्रकटला आहे.
ही राजकीय जाणिवांची कादंबरी आहे. सद्यःकालीन भारतीय राजकारणाचे बहुपदरी कोन आणि त्यांच्या कार्यकक्षांचं सखोल चित्र या कादंबरीत आहे. एकल राष्ट्रवादातून निष्पन्न होत असलेल्या असहिष्णू वृत्तीचं चित्र कादंबरीत आहे. राष्ट्रप्रेमी आणि राष्ट्रद्रोही अशा सुलभ विभाजन रंगाचं चित्र आज आपल्या अवतीभोवती आहे.
वाढती असहिष्णूता, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे प्रश्न, बहुलतेला अटकाव घालणारा सत्ता दृष्टिकोन व संस्कृतिप्रेमाचं सर्वत्र भरतं आलं आहे. अशा एकाच काळातील अनेक प्रकारच्या दुविधेचा पट कांदबरीत आहे. भारतीय जीवनातील अंतर्विरोध व पेचांचं अनेकस्तरीय चित्र कादंबरीत आहे. कुटुंबांचे प्रश्न, जातीय-धार्मिक ताणतणाव, पुरोगामी आणि प्रतिगामित्व, तंत्रज्ञान काळातील संवादहीनता, पिढ्यांमधील अंतराय, गरीब सामान्यांचं जगणं, मध्यमवर्गाची हतबलता आणि चळवळींचा ऱ्हास अशा काळधर्माचं चित्र कादंबरीत आहे.
कांदबरीत वीसेक दिवसांच्या कथनकाळातून गेल्या वीस वर्षांचं पालटलेलं ‘भारतचित्र’ दर्शविलं आहे. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील एका बॅचचे विद्यार्थी पस्तीस वर्षांनी एकमेकांना भेटण्यातून बदललेल्या समाजमनाचा कानोसा घेतला आहे. या भेटीचित्रांत बदलत्या भारताचं चित्र आहे. अमेरिकेतील ऑस्टन शहरात राहणाऱ्या नजमा फेसबुकवरून त्यांच्या बॅचच्या मित्र-मैत्रिणींची माहिती मिळवून भेटतात. नजमा या सर्व मित्र- मैत्रिणींच्या घरी दोन-दोन दिवस राहतात. या कुटुंबांचं जग पाहतात. त्यांच्या चर्चांमध्ये सतत भूतकाळाची आणि बदललेल्या वर्तमानाची जाणीव आहे. या सर्व मित्र-मैत्रिणी गेटटुगेदरसाठी दिल्लीत एकत्र जमतात. ते सर्व भारतातील वेगवेगळ्या राज्यांमधले आहेत.
त्यांच्या असतेपणाला विविध जात-समूहांचे संदर्भ आहेत, त्यामुळे त्यास कुटुंब व भारतपाहणीचा संदर्भ आहे. नजमाच्या मित्र-मैत्रिणींच्या घरी राहण्यातून कुटुंब, समाज, वर्ग-जात-लिंगभाव, राजकारण, समाजकारण व सत्ताकारणाचा कानोसा घेतला आहे. मृणाल, जेकब, परोमिता, दिनेश, अमिता, मनोहर, गोवर्धन या मित्र-मैत्रिणींच्या कुटुंबांचं मध्यवर्ती चित्र कादंबरीत आहे. गेल्या वीस वर्षांत आकस्मिक बदललेल्या घटना-घडामोडींचा अस्वस्थ पट कादंबरीत आहे.
बदललेल्या ‘भारताचं चित्र’ कादंबरीत आहे. एका अर्थाने भारताच्या विखंडित प्रजासत्ताकाची कहाणी मांडण्याचा प्रयत्न या कादंबरीतून केला गेला आहे. बदललेल्या राष्ट्राची कहाणी सांगताना पुरोगामी चळवळींचं अपयश, विकासाचं चुकीचं प्रतिमान, डाव्या चळवळीचं अपयश या अंतर्विरोधांबरोबर सामाजिक न्यायाचा व स्त्री-पुरुष समतेचा प्रश्न आजही दुर्लक्षित असल्याची विचारदृष्टी या कादंबरी चित्रणात आहे. कादंबरी चित्रणात भारतबदलाची दिशा सांगताना प्रत्यक्ष ‘घर किंवा कुटुंब’ काय बोलतं, हे केंद्रवर्ती केलं आहे. मध्यमवर्ग वा उच्च मध्यमवर्गाचं विचारविश्व व जीवनशैलीच्या सादरीकरणातून कादंबरी साकारली आहे.
याबरोबरच स्त्री-पुरुष नात्यांतील गुंत्यांचा आणि स्वभावशोधातून कादंबरीस नवी परिमाणं मिळाली आहेत. कादंबरीला बदललेल्या नातेसंबंधांचा व मूल्यपालटाचा गडद असा संदर्भ आहे. तंत्रज्ञानकाळातील नवी जवळीकता आणि दुरावा, सत्य आणि असत्य यांतील अंतर, शांतता आणि स्फोटकता यांतील संदर्भांची सूत्रं अभिव्यक्त झाली आहेत. नातेसंबंधांतील वरकरणी प्रदर्शन आणि अंतरंगातल्या पोखरलेल्या परात्मतेची चित्रं कादंबरीत आहेत. विचारधारांमधील कडव्या अस्मितांचे रंग आणि प्रत्यक्ष व्यवहारातील ताणतणावांचं चित्र कादंबरीत आहे.
ही कादंबरी प्रथमपुरुषी आणि चर्चात्मक स्वरूपाची आहे. विविध पात्रांच्या ‘बोलण्या’ची ती साकारली आहे. या पात्रांचे विविध विचारव्यूह, समाज-सत्ताकारणाविषयीचे त्यांचे कल आणि त्यांच्या कल्पनांचं प्रकटीकरण करण्यासाठी सबंध कादंबरीचं रूप चर्चात्मक ठेवलं आहे. या विविध चर्चांमधून काळाचा कालस्वभाव व व्यक्तींचं अंतरंग प्रकटतं. मराठीत चर्चात्मक स्वरूपाचा रूपबंध नाटकात मोठ्या प्रमाणात दिसतो.
महात्मा फुले यांच्यापासून गो. पु. देशपांडे यांच्या नाटकांत चर्चात्मक रूपबंध महत्त्वाचा ठरला, तर भालचंद्र नेमाडे यांच्या ‘चांगदेवचतुष्ट्य’मध्ये महाराष्ट्र समाजाचा धांडोळा घेण्यासाठी चर्चात्मक कथनावकाश आहे. श्याम मनोहर यांनीदेखील प्रत्यक्षातील चर्चाविश्वाला कादंबरीच्या केंद्रस्थानी आणून व्यक्ती आणि समाज सादरीकरणाला विविध परिमाणं मिळवून दिली आहेत.
नीरजा यांच्या या कादंबरीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे, कादंबरीत भारतातील वेगवेगळ्या भागातील भूप्रदेश आणि समाज संस्कृतीचं चित्रण. या कादंबरीचा स्थळावकाश हा भारतातील विविध राज्यांतील शहरांचा आहे. कलकत्ता, मुंबई, गोवा, केरळ, बंगलोर, पंजाबमधील गावांतील कुंटुंब ही स्थळयात्रा आहे. या कुटुंबांच्या प्रातिनिधिक चित्रणातून भारतबदलाचं चित्र समूर्त केलं आहे. भारतातील बहुविध जीवनशैली, संस्कृतिरंगाचं चित्र कादंबरीत आहे. या विविध प्रदेशांतील कुटुंब संस्कृतिचित्रणात सूक्ष्मता आहे. प्रत्यक्ष ‘घर’ चित्रणकेंद्र केल्यामुळे प्रत्यक्ष घरात घडणाऱ्या घटना-घडामोडींचं विश्वासार्ह चित्रण कादंबरीत आहे. कुटुंबाची जीवनशैली, गाव आणि प्रदेशाच्या स्वभावाचं बारकाईचं चित्रण कादंबरीत आहे. विविध प्रदेशांतील खानपानाचं, आहारपद्धतीचं विस्तृत बारकाव्याच्या चित्रणाने कादंबरीचा चित्रफलक अधिक विस्तृत झाला आहे.
कादंबरीचं नातं मराठीतील वास्तववादी सामाजिक कादंबरी परंपरेशी आहे. बाबा पद्मनजी, वा. म. जोशी, श्री. व्यं. केतकर परंपरेशीदेखील ते नातं दाखवता येतं. त्याचप्रमाणे ‘यमुनपर्यटन’मधील यमू जशी भ्रमंती करत विविध प्रदेशांतील स्त्रियांचे प्रश्न जाणून घेते, किंवा ‘चांगदेवचतुष्ट्य’मधील चांगदेव महाराष्ट्राच्या शैक्षणिक भूगोलातून महाराष्ट्राचं समाजमन न्याहाळतो, तसं नीरजाच्या कादंबरीची नायिका भारतातील विविध प्रांतांच्या समाजपाहणीतून राष्ट्राच्या थिजलेल्या काळाचे अवशेष कादंबरीरूपात मांडते आहे.
त्यामुळे कादंबरीतील मध्यवर्ती पात्र नजमाच्या भारतयात्रेला व भारतपाहणीला महत्त्वाचे संदर्भ प्राप्त झाले आहेत. या ठिकाणी एक बाब लक्षात घ्यायला हवी, स्त्रियांच्या लेखनावर दीर्घकाळ पुरुषदृष्टीची सावली होती, कुटुंबचित्रणाला भर देणारं लेखनही मोठ्या प्रमाणात आहे. स्वातंत्र्योत्तर काळात स्त्रीकेंद्री व स्त्रीवादी विचाराच्या दृष्टीला कादंबरीत केंद्रस्थान मिळालं.
विभावरी शिरूरकर, आनंदीबाई शिर्के यांसारख्या लेखिकांनी समाजचित्रणाचा फलक स्त्रीअनुभवाच्या कक्षा ओलांडून चित्रित केला. त्याप्रमाणेच नीरजाच्या कादंबरीत केवळ स्त्रीविशिष्ट अनुभव कादंबरीच्या केंद्रस्थानी न राहता तो राष्ट्रसमाज चित्रण स्वरूपात येतो, त्यामुळे कादंबरीतील कथनाला बहुपरिमाणकारकता प्राप्त झाली आहे. आजच्या काळाची अनिश्चलता, गोठलेपण आणि दुभंग, मूल्यहीन संभ्रमित गोठवलेपणाचं चित्र कादंबरीचित्रणात आहे. एका अर्थाने विध्वंसाच्या वेदीवर चढण्याआधीच्या अस्वस्थ काळाचं चित्र कादंबरीत आहे. आजच्या अस्मिता ध्रुवीकरणकाळाचं, विचारधारांमधील अंतर्विरोधांचं व तंत्रज्ञानकाळातील संवादहीनतेचं चित्र रेखाटणारी मराठीतील ही महत्त्वाची राजकीय कादंबरी आहे.
पुस्तकाचं नाव : थिजलेल्या काळाचे अवशेष
लेखिका : नीरजा
प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे (०२०- २४४७३४५९)
पृष्ठं : २५५,
मूल्य : ४०० रुपये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.