Ranggosti Marathi Nature Book : जंगलातील निसर्गविश्वाची हळवी गोष्ट सांगणारं ‘रानगोष्टी’ पुस्तक

Kiran Purandare Nature Writing : जंगलातील वनस्पती, प्राणी आणि पक्ष्यांच्या सहवासातून आलेले अनुभव, निसर्गातील सूक्ष्म बदल आणि चिमणीसह विविध जीवांचे अनोखे जग ‘रानगोष्टी’तून उलगडते.
Ranggosti Marathi Nature Book

Ranggosti Marathi Nature Book

esakal

Updated on

जयदीप पाठकजी - Jaydeep.Pathakji@esakal.com

निसर्गाच्या सान्निध्यात वास्तव्य करून विविध वनस्पती, प्राणी, पक्षी यांचे निरीक्षण करणाऱ्या आणि तेथील अनुभव शब्दबद्ध करणाऱ्या लेखकांची मराठी साहित्याला दीर्घ परंपरा आहे. ज्येष्ठ पक्षी निरीक्षक आणि निसर्गअभ्यासक किरण पुरंदरे हे या परंपरेतील गेल्या काही दशकांतील महत्त्वाचे नाव. भंडारा जिल्ह्यातील पिटेझरी गावात वास्तव्य करणाऱ्या पुरंदरे यांनी पिटेझरीतल्या जंगलझाडीत दडलेल्या विविध अनुभवांवर ‘रानगोष्टी’ हे पुस्तक लिहिले आहे.

गेली अनेक दशके निसर्ग अभ्यासक, संशोधक, शिक्षक, रक्षक आणि लेखक अशा विविध भूमिका बजावणाऱ्या लेखकाने अतिशय संवेदनशीलतेने आणि तरलतेने केलेले हे लेखन ‘मोहाचे दिवस’ या पहिल्याच प्रकरणापासून वाचकाच्या मनाचा ठाव घेते. पक्षिनिरीक्षकाची अभ्यासू दृष्टी, हिरव्यागर्द जंगलातील बारकावे, प्राणी-पक्ष्यांबद्दल असलेली आत्मीयता असे सारे काही पुस्तकातील विविध प्रकरणांतून अनुभवायला मिळते. अशा स्वरूपाचे लेखन करताना तांत्रिक माहितीची लांबलचक वर्णने यामुळे हे लेखन कृत्रिम होण्याचा धोका असतो. मात्र, इथे तसे होत नाही. विविध वनस्पती, प्राणी यांच्यावरचे लेख कुतूहल जागविण्याचे काम करतात. ‘पळस फुलला’, ‘पानझड’, ‘रानातला पाऊस’, ‘धो-धो पावसाच्या नोंदी’ यांसारख्या अनेक लेखांमधून निसर्गाची विविध रूपे अनुभवायला मिळतात. ‘शास्त्राच्या चष्म्यातून दिसणारी चिमणी’ हा लेख चिमणीबद्दल सविस्तर मांडणी करतो. चिमणीची ‘चिऊ’ होते, तेव्हा तिचे एक गोड, गोंडस, गोजिरे आणि काहीसे गरीब रूप आपल्या डोळ्यांपुढे उभे राहते, असे लेखक म्हणतो; पण खरंच चिमणी अशीच असते का, या प्रश्नाचा शोध या लेखात घेण्याचा प्रयत्न करतो. चिमणीचे घरटे कसे तयार होते, याबाबत आपण यापूर्वी वाचलेले असते. मात्र, चिमणी प्रसंगानुरूप नक्की कोणता विचार करते, परिस्थितीशी जुळवून घेताना स्वतःचे अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न कसा करते, याचे वर्णन वाचनीय आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com