सरी आणि सरासरी

ranjan kelkar writes about monsoonin india
ranjan kelkar writes about monsoonin india

मी भारतीय हवामानशास्त्र विभागात एकूण ३८ वर्षं काम केलं. त्यापैकी पहिली १५ वर्षं मी पुण्यात होतो आणि नंतरची २३ वर्षं मी दिल्लीत काढली. म्हणजेच मी दिल्लीचे २३ उन्हाळे, हिवाळे आणि पावसाळे बघितले. उन्हाळ्यात कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअसच्या वर चढणं किंवा हिवाळ्यात किमान तापमान ३ अंश सेल्सिअसच्या खाली उतरणं यात माझ्यासाठी कालांतरानं काही नावीन्य राहिलं नाही. उत्तर भारतात ती एक नित्याची बाब समजली जाते आणि सामान्य जनजीवन सुरू राहतं. दिल्लीत सगळं वातावरण तापलेलं असताना, ‘लू’ म्हणजे गरम वारे वाहत असताना, थंडगार लस्सी प्यायचा आणि कुल्फी खायचा एक वेगळाच आनंद मी अनुभवत असे. तसंच कडाक्‍याच्या थंडीत आणि दाट धुक्‍यात गुरफटलेलं असताना, देशी तुपात परतलेला आणि भरपूर बदाम- बेदाणे घातलेला गाजराचा हलवा खाण्यात काही निराळीच मजा येत असे.

तरीसुद्धा माझ्या सेवानिवृत्तीनंतर मी पुण्यास स्थलांतर करायचा निर्णय घेतला. त्यामागं हवामान हे एक महत्त्वाचं कारण होतं. पुण्याचं हवामान नेहमीच मध्यम स्वरूपाचं किंवा बेताचं असतं, असा माझा पूर्वीचा अनुभव होता. त्याकाळी पुण्याला ‘पेन्शनरांचं पुणं’ म्हणत असत. पुण्याचं हवामान निवृत्तीनंतरच्या आयुष्याला मानवणारं होतं, हा त्यातला मथितार्थ. मी पुण्यात पूर्वी राहत असे, तेव्हा उन्हाळा फारसा कडक नसायचा, पावसाळ्यात रिमझिम सरी पडायच्या, हिवाळ्यात स्वेटर घालायची गरज क्वचितच भासत असे. उन्हाळ्यात थोडंसं तापमान वाढलं, की वळवाच्या सरी पडायच्या आणि पुन्हा प्रसन्न वाटू लागायचं. माझ्या त्यावेळच्या घरी तर एक पंखासुद्धा नव्हता आणि रेफ्रिजरेटर घ्यायचा तर प्रश्नच नव्हता. 
मात्र, सेवानिवृत्तीनंतर म्हणजे मार्च २०१४ मध्ये मी पुण्यात माझ्या नवीन घरात नव्यानं दाखल झालो आणि लवकरच मला कळलं, की पुण्यासहित महाराष्ट्रावर एक उष्णतेची लाट आलेली आहे. पुण्यात १८ मार्च २००४ रोजी अधिकतम तापमान ४०.१ अंश सेल्सिअस एवढं नोंदलं गेलं, जे माझ्यासाठी पूर्णपणे अनपेक्षित होतं; पण हवामानशास्त्र विभाग हा हवामानाच्या ऐतिहासिक नोंदींचं एक भांडार आहे. मला नंतर समजलं, की ४०.१ अंश सेल्सिअस हे काही पुण्याचं मार्च महिन्यासाठीचं उच्चांकी तापमान नव्हतं. कारण त्यापूर्वी २९ मार्च १८९२ रोजी पुण्यात ४२.८ अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदलं गेलं होतं. अर्थात, त्या एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी जागतिक तापमानवाढीचा शोध लागलेला नव्हता आणि सर्वसामान्य लोकांना आणि शास्त्रज्ञांनाही त्याविषयी काही पूर्वकल्पना नसावी. मात्र, एकूणच तापमानाची तऱ्हा बदलायला लागली आहे, याचा प्रत्यय आला एवढं खरं. गेले काही दिवस होत असलेल्या उच्चांकी तापमानाच्या नोंदी, भिरामधल्या तापमानाचं गूढ आणि त्या पार्श्‍वभूमीवर यंदाचा मॉन्सून सरासरीच्या आसपास येण्याबाबत हवामानशास्त्र विभागाचा अंदाज या पार्श्‍वभूमीवर या गोष्टीची आठवण आली. 

मॉन्सूनच्या सवयी
महाराष्ट्र गेले काही दिवस उष्णतेनं होरपळून निघाला आहे. सगळ्यांनाच आता एकच अपेक्षा आहे, की आगामी मॉन्सून वेळेवर यावा आणि पाऊस भरपूर पडावा. मॉन्सून महाराष्ट्रावर यायला अजून सहा-सात आठवडे बाकी असले, तरी लोकांची नजर आतापासूनच मॉन्सूनवर लागलेली आहे. कारण उष्णतेपासून दिलासा देऊ शकतो तो फक्त मॉन्सून. उन्हाळ्यानंतर पावसाळा नियमितपणे येतोच येतो. म्हणून कमाल तापमानाच्या पूर्वीच्या आणि सध्याच्या विक्रमी नोंदी बघून जीव घाबरा होत असला, तरी भविष्याविषयी अवास्तव चिंता करायचं किंवा भीती बाळगण्याचं कारण नाही. मॉन्सून काही वर्षी उशिरा आल्याची उदाहरणं असली, तरी तो एखाद्या वर्षी आलाच नाही, असं आजवर कधीच झालेलं नाही. आगामी मॉन्सून त्याच्या निश्‍चित वेळेनुसार येत आहे, की थोडा उशिरा किंवा काहीशा घाईनं हे आपल्याला लवकरच कळेल.


‘सरासरी’ची सुखद झुळूक
एका तापलेल्या रुक्ष संध्याकाळी शीतल वाऱ्याची एक मंद झुळूक यावी, तशी एक सुखद बातमी हवामानशास्त्र विभागाकडून नुकतीच मिळाली आहे. यंदाचा मॉन्सून ‘नॉर्मल’ म्हणजे नेहमीसारखाच राहण्याची चांगली शक्‍यता आहे, ही ती आल्हाददायक खबर आहे. हवामान खात्याकडून मॉन्सूनच्या पर्जन्यमानाचं दीर्घकालीन पूर्वानुमान दोन टप्प्यांत केलं जातं. पहिलं पूर्वानुमान एप्रिल महिन्याच्या मध्यावर केलं जातं, जे आता प्रकाशित करण्यात आलं आहे. त्यानुसार सबंध देशातलं जून-सप्टेंबर या चार महिन्यांतलं एकूण पर्जन्यमान सरासरीच्या ९६ टक्के राहील, असा अंदाज आहे. हवामान खात्याच्या व्याख्येनुसार त्याला ‘नॉर्मल मॉन्सून’ म्हणता येईल. त्याशिवाय पावसाचं वितरण समसमान राहण्याची चांगली शक्‍यता आहे, असंही सांगण्यात आलं आहे. भारतीय जनतेसाठी, शेतीसाठी- शेतकऱ्यांसाठी आणि अनुषंगानं संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेसाठी हा एक चांगला संकेत आहे. 

‘एल्‌ निनो’ काय म्हणतोय?
‘एल्‌ निनो’ हा स्पॅनिश शब्द, ज्याचा मूळ अर्थ बाळ येशू असा आहे. तो आता मराठी भाषेत प्रचलित झाला आहे. त्याचा संबंध दक्षिण अमेरिकेतल्या पेरू देशाच्या पश्‍चिम किनाऱ्यावरच्या प्रशांत महासागराच्या तापमानाशी आहे. दर दोन-तीन वर्षांनी किंवा कधीकधी पाच-सहा वर्षांनीही हे तापमान डिसेंबर महिन्यात म्हणजे ख्रिसमसच्या सुमारास वाढतं आणि या तापमानवाढीचे स्थानिक आणि जागतिक परिणाम घडून येतात. त्याचा एक विपरीत परिणाम भारतीय मॉन्सूनच्या पर्जन्यमानावर होत असल्याचा इतिहास आहे. मात्र, डिसेंबरमध्ये ‘एल्‌ निनो’ किती तीव्र असेल किंवा ‘एल्‌ निनो’ऐवजी ‘ला नीना’ उद्भवेल, याचं भाकित मार्च-एप्रिल महिन्यांत करणं अवघड असतं, ही मोठी समस्या आहे. ‘ला निना’ या स्पॅनिश शब्दाचा अर्थ सुकन्या आहे. ‘ला निना’ प्रक्रियेत प्रशांत महासागराचं तापमान घटतं आणि त्याचा भारतीय मॉन्सूनवर चांगला परिणाम होतो. भूतकाळात जेव्हा-जेव्हा ‘ला निना’ उद्भवला होता, तेव्हा-तेव्हा आपल्या मॉन्सूनचा पाऊस चांगला झाला होता; पण ‘एल्‌ निनो’च्या सगळ्या वर्षांत मात्र भारतावर दुष्काळ पडला नव्हता. शिवाय, मॉन्सून दर वर्षी न चुकता येतो; पण ‘एल्‌ निनो’ आणि ‘ला निना’ या अधूनमधून घडणाऱ्या घटना आहेत. म्हणून ‘एल्‌ निनो’ आणि भारतीय मॉन्सूनचं पर्जन्यमान यांच्यात सरळ संबंध जोडता येत नाही. 
तरी पण हल्लीच्या काळी ‘एल्‌ निनो’ आणि ‘ला निना’ या प्रक्रियांवर वाजवीपेक्षा अधिक भर दिला जात असल्याचं आपण पाहत आहोत. ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि ब्रिटनमधल्या हवामानशास्त्रीय संस्था ‘एल्‌ निनो’ची काही प्राथमिक लक्षणं दिसू लागताच भारतीय मॉन्सूनविषयीची भाकितं करायला लागतात. गेल्या वर्षी असंच झालं होतं आणि परदेशी भाकितं नंतर चुकीची ठरली होती. ज्या परदेशी संस्थांना भारताविषयी कुठलीही जबाबदारी नाही आणि ज्यांना भारतीय हवामानाचं सखोल ज्ञानही नाही, त्यांची भाकितं ऐकून सर्वसामान्य भारतीयांनी उगीचच चिंतेत पडू नये. 
काही वर्षांपासून भारतात काही खासगी कंपन्याही मॉन्सूनचा दीर्घकालीन अंदाज देऊ लागल्या आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागानं आपला अंदाज देण्याआधीच हे खासगी अंदाज जाहीर केले जातात. बहुधा त्यांचा वैज्ञानिक आधार काय आहे, हे स्पष्ट केलं जात नाही; पण ‘एल्‌ निनो’ला मध्ये आणून मॉन्सूनच्या भवितव्याविषयी भाष्य केलं जातं. 

आयएमडीचे अचूक अंदाज
हवामानशास्त्र विभागाचे (आयएमडी) अंदाज अलीकडच्या काळात खूप सुधारले आहेत यात काही शंका नाही. मार्च महिन्याच्या सुरवातीसच आयएमडीनं जाहीर केलं होतं, की या वर्षीचा उन्हाळा नेहमीपेक्षा अधिक तीव्र भासण्याची शक्‍यता आहे आणि तसंच घडत असल्याचं आपण पाहत आहोत. मागच्या आठवड्यात बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं होतं. त्याचं चक्रीवादळात रूपांतर होऊन ते चक्रीवादळ म्यानमार देशाच्या किनाऱ्याच्या दिशेनं जाईल, असा अंदाज आयएमडीनं वर्तवला होता- तो अगदी अचूक ठरला. त्या चक्रीवादळामुळं भारतात कोणतीही हानी झाली नाही.
या पार्श्वभूमीवर हवामान खात्यानं मॉन्सूनच्या पावसाचं प्रमाण आणि वितरण दोन्ही गोष्ट ‘नॉर्मल’ म्हणजे सरासरीइतक्‍याच राहतील, असा जो अंदाज वर्तवला आहे, तो विश्वासार्ह मानायला हरकत नाही. मॉन्सूनचं पूर्वानुमान करणं हे देशाकरिता फार महत्त्वाचं कार्य आहे आणि ते सशक्त विज्ञानावर आधारलेलं असलं पाहिजे. खासगी कंपन्यांनी या क्षेत्रात केवळ एक स्पर्धक म्हणून उतरू नये- कारण त्यामुळं अर्थबोध व्हायच्या ऐवजी सर्वसामान्य जनतेची दिशाभूल व्हायची शक्‍यता जास्त आहे. 

अधिक संशोधनाची आवश्‍यकता
मॉन्सूनचं दीर्घकालीन पूर्वानुमान अचूकपणे करण्याचं काम कधीच सोपं नव्हतं आणि आजही ते सोपं नाही. हा एक निरंतर संशोधनाचा विषय आहे. त्याचं कारण मॉन्सूनची प्रक्रिया ही एक जागतिक स्तरावरची प्रक्रिया आहे. भारतीय मॉन्सूनचे नातेसंबंध अक्षरशः जगाच्या कानाकोपऱ्यांत पसरलेले आहेत. असे अनेक संबंध शोधून काढले गेलेले आहेत हे खरं; पण बहुतेक संबंध मॉन्सूनच्या चार महिन्यांच्या कालावधीत प्रचलित असतात आणि त्यांचा पूर्वानुमानासाठी उपयोग करता येत नाही, ही एक समस्या आहे. त्याशिवाय बरेच सहसंबंध सांख्यिकी स्वरूपाचे असतात. सांख्यिकी सहसंबंध कधीही शंभर टक्के खरे नसतात. ते कालानुसार दुरावत जातात आणि अंती निरुपयोगी ठरतात. मग त्यांना पूर्वानुमान करणाऱ्या मॉडेलमधून काढून टाकावं लागतं. 

अलीकडच्या काळात मॉन्सूनचं पूर्वानुमान करणाऱ्या सांख्यिकी मॉडेलमध्ये वापरात असलेल्या घटकांची संख्या कमी-कमी होत चालली आहे. काही वर्षांपूर्वी आयएमडी एक ‘१६- पॅरामीटर’ मॉडेल वापरत असे. त्यात सोळा घटक वापरले जात होते. त्याच्या जागी आलेल्या नव्या मॉडेलमध्ये घटकांची संख्या दहा झाली. मग ही संख्या आठवर आली आणि सध्या ही संख्या सहा इतकीच राहिली आहे. त्याशिवाय ‘एल्‌ निनो’ या एकाच घटकावर अवास्तव भर देण्याकडं जो हल्लीचा कल आहे, तो बरोबर नाही. कारण ‘एल्‌ निनो’ आणि भारतीय मॉन्सूनचे पर्जन्यमान- अर्थात दुष्काळ- यांच्यातला परस्परसंबंध एकास-एक असा नाही. म्हणून ‘एल्‌ निनो’व्यतिरिक्त मॉन्सूनचे काही अन्य सहसंबंध शोधून काढण्याचे प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. आधीच्या ‘१६- पॅरामीटर मॉडेलमध्ये मध्य भारतामध्ये उन्हाळ्यात तापमान किती नोंदलं गेलं होतं, हे लक्षात घेतलं जात असे; पण आता मॉन्सूनचं पहिल्या टप्प्याचं पूर्वानुमान एप्रिल महिन्यातच दिलं जात असल्यामुळं ते शक्‍य होत नाही. अजूनसुद्धा ज्या वर्षी उन्हाळा कडक असतो, त्या वर्षी नंतर पाऊस चांगला पडतो, अशी एक समजूत सर्वसामान्य जनतेत आहे. हे खरं आहे की नाही हे पडताळून पाहणं आणि उन्हाळ्याची तीव्रता आणि येणाऱ्या मॉन्सूनचा पाऊस यांतला सहसंबंध नव्यानं प्रस्थापित करणं कदाचित लाभदायक ठरेल.   
मॉन्सूनच्या दीर्घकालीन पूर्वानुमानाकडं आपण बारकाईने पाहिलं, तर त्यात पर्जन्यमानाच्या टक्केवारीला एक अधिक-उणे (+/-) आकडा जोडलेला असतो, असं दिसून येईल. तो बहुतेक चार किंवा पाच टक्के असतो. उदाहरणार्थ, २०१७चं पूर्वानुमान सरासरीच्या ९६ +/- ५ टक्के आहे. याचा अर्थ म्हणजे या विशिष्ट मॉडेलनं केलेल्या पूर्वानुमानात +/- ५ टक्के चूकभूल असू शकेल. म्हणजे या वेळचा पाऊस अगदी ९६ टक्केच पडेल असं नाही. कदाचित तो ९१ टक्के राहील किंवा कदाचित तो १०१ टक्के राहील. ही जी चूकभूल देण्याघेण्याची प्रथा आहे, ती १९८८पासून तशीच सुरू आहे. तिचा अर्थ एवढाच आहे, की सांख्यिकी सहसंबंध कधीच शंभर टक्के दृढ नसल्यामुळं मॉडेलमध्ये अजूनही उणिवा आहेत आणि पूर्वानुमानित आकड्यांत अनिश्‍चितता आहे. ही अनिश्‍चितता जेव्हा कमी होईल किंवा सर्वस्वी दूर होईल, तेव्हाच पूर्वानुमानित आकड्यांचा काटेकोरपणे वापर करता येईल आणि अंदाजाचा खात्रीशीरपणा वाढेल. हे काम कठीण आहे; पण त्यादृष्टीनं प्रयत्न करायची नितांत गरज आहे. 

नैसर्गिक परिवर्तनशीलता
निसर्गात आणि विशेषतः हवामानात- त्यातही विशेषकरून, मॉन्सूनच्या पर्जन्यमानात एक नियमितता आहे तशीच एक अनियमितताही आहे, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. मात्र, ती अनियमितता मर्यादित आहे. निसर्ग क्वचितच आपल्या सीमांचं उल्लंघन करतो. हवामानशास्त्रांपुढं आव्हान आहे ते याच ठिकाणी. कोणतेही दोन मॉन्सून सगळ्याच दृष्टीनं एकसारखे नसतात. प्रत्येक मॉन्सूनचं आगमन निराळ्या दिवशी होतं, प्रवास वेगळ्या मार्गाने होतो, त्याची प्रगती निराळ्या गतीनं होते, त्याच्या पावसाचं वितरण वेगळ्या स्वरूपाचं असतं. असं का होतं, हे जेव्हा हवामानशास्त्रज्ञांना पूर्णपणे अवगत होईल, तेव्हाच या विविध वैशिष्ट्यांचं पूर्वानुमान करणं त्यांना शक्‍य होईल आणि तेव्हाच मॉन्सूनच्या पूर्वानुमानाचा आपल्याला खराखुरा लाभ घेता येईल.
नैसर्गिक परिवर्तनशीलतेचा अर्थ हा, की काही वर्षं असं होईल आणि काही वर्षं तसं होईल; पण मॉन्सूनच्या सरासरी स्वरूपात काही आमूलाग्र बदल घडून येणार नाही. आपण हवामानबदलाविषयी बोलतो, तेव्हा मात्र आपण कायमस्वरूपी बदलाविषयी बोलतो. हे बदल चिंताजनक आहेत आणि त्याविषयी अधिक संशोधन करणं अगत्याचं आहे. परंतु, मागील १००-१२५ वर्षांच्या पावसाच्या नोंदी आपण पाहिल्या, तर निदान सध्या तरी मॉन्सूनच्या सरासरी पर्जन्यमानात कोणताही कल दिसून येत नाही. म्हणजे त्यात दीर्घकालीन वाढ नाही आणि घटही नाही. आतापुरती तरी ही एक समाधानाची गोष्ट आहे. 

यंदाच्या मॉन्सूनच्या दीर्घकालीन पूर्वानुमानाच्या दुसऱ्या टप्प्याचं पूर्वानुमान आणि केरळवरच्या त्याच्या आगमनाचा अंदाज हवामान खात्यातर्फे नंतर जाहीर होईलच; पण दरम्यानचा उन्हाळा आपल्यासाठी सुसह्य राहील, अशी आपण आशा आणि अपेक्षा करूया.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com