नशीब ‘ब्रोकन टेल’चे

रणथंबोर व्याघ्र प्रकल्पातील एका वाघाच्या मृत्यूनंतर त्याच्यावर एक अतिउत्कृष्ट फिल्म करण्यात आली. त्या फिल्ममुळे तो जगभरात पोहोचला. त्या वाघाचे नाव आहे ‘ब्रोकन टेल’.
Tiger
Tigersakal

- संजय करकरे

रणथंबोर व्याघ्र प्रकल्पातील एका वाघाच्या मृत्यूनंतर त्याच्यावर एक अतिउत्कृष्ट फिल्म करण्यात आली. त्या फिल्ममुळे तो जगभरात पोहोचला. त्या वाघाचे नाव आहे ‘ब्रोकन टेल’. त्याची शेपटी वाकडी असल्याने त्याला ‘ब्रोकन टेल’ असे नाव पडले. लहानपणापासूनच तो धाडसी, खोडकर, खेळकर आणि बिनधास्त होता. त्याच्या दंगामस्तीमुळे तो अल्पावधीतच पर्यटकांचे आकर्षण ठरला. २००३ च्या उन्हाळ्यात एक दिवस अचानक तो नाहीसा झाला. अशा बिनधास्त वाघाचा प्रवास ‘ब्रोकन टेल - द लास्ट डेज ऑफ वाईल्ड टायगर’ फिल्ममध्ये चित्रबद्ध करण्यात आला आहे.

साधारण २००० सालच्या सुमारास व्याघ्र पर्यटन मर्यादित होते. त्या सुमारास देशात केवळ २५ व्याघ्र प्रकल्प होते. राहण्याची मर्यादित सुविधा, संसाधनांची कमतरता आणि मार्गदर्शनाचा अभाव असल्याने मोजक्याच निसर्गप्रेमींची पावले जंगलाकडे वळत. छायाचित्रणात डिजिटल युगाचा प्रवेश त्या वेळेस झाला नव्हता.

साहजिकच कॅमेरा फिल्म व स्लाईड्स काढणे केवळ खर्चिकच नव्हते; तर त्याला मर्यादाही होत्या. २००५ नंतर मात्र डिजिटल कॅमेऱ्याने प्रचंड मोठी क्रांती केली. आपण अमर्याद फोटो काढू शकतो, हे स्पष्ट झाल्याने तसेच कॅमेऱ्याच्या किमतीही कमी होऊ लागल्याने छायाचित्रणाचा शौक आणि कॅमेरा आवाक्यात आला.

संगणक क्षेत्रातील रोजगाराच्या भरभराटीमुळे तरुणांच्या हातात पैशासोबतच अत्याधुनिक कॅमेरा आणि भल्या मोठ्या लेन्सही आल्या. बघता बघता वन्यप्राणी, पक्षी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाघाचे छायाचित्रण करण्यासाठी चुरस निर्माण झाली. सोशल नेटवर्किंगच्या विविध माध्यमांमुळे तर त्यावर कळस चढवला गेला.

साधारण २००० साल व त्याही अगोदरच्या सुमारास राजस्थानातील रणथंबोर व्याघ्र प्रकल्पात अनेक परदेशी छायाचित्रकारांनी अतिशय उत्तम फिल्म्सची निर्मिती केली. त्या वेळेस रणथंबोर व्याघ्र प्रकल्प भारतीयांसाठी फार प्रसिद्ध नव्हता; मात्र परदेशातील छायाचित्रकारांना हमखास व्याघ्रदर्शनाची हमी आणि त्याचे छायांकन करण्यासाठी असलेल्या सोयी-सवलतींमुळे त्या व्याघ्र प्रकल्पात तेव्हा अनेक फिल्म तयार केल्या गेल्या.

व्याघ्र प्रकल्पाचे तत्कालीन क्षेत्र संचालक फत्तेसिंग राठोड यांची त्यात महत्त्वपूर्ण भूमिका होती. त्या जंगलातील एका वाघाची आज मी जी गोष्ट सांगणार आहे. त्याचा काळ अतिशय छोटा होता; मात्र त्याच्या मृत्यूनंतर त्याच्यावर तयार करण्यात आलेल्या एका अतिउत्कृष्ट फिल्ममुळे तो जगभरात पोहोचला. त्या वाघाचे नाव आहे ‘ब्रोकन टेल’. रणथंबोर व्याघ्र प्रकल्पाची राणी ‘मछली’च्या पोटी त्याचा जन्म झाला. २००० मध्ये रणथंबोर व्याघ्र प्रकल्पात ‘बांबूराम’ नावाचा एक भलामोठा नर वाघ आपले वर्चस्व टिकवून होता.

त्या वर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली होती, तेव्हा त्यांना ‘बांबूराम’ वाघाने दर्शन दिले होते. त्या सुमारास त्याचे ‘मछली’सोबत मिलन झाले होते. २००० च्या पावसाळ्यात ‘मछली’ वाघिणीला दोन पिल्ले झाली. दोन्ही पिल्ले नर होती. त्यातील एका पिल्लाची शेपटी वाकडी होती. त्यामुळे त्याला ‘ब्रोकन टेल’ असे नाव दिले गेले. दुसरे नर पिल्लू त्याच्या कानावरील दबलेल्या भागामुळे ‘स्लॅंट इयर’ म्हणून ओळखू लागले.

‘मछली’चे हे पहिले बाळंतपण होते. मुळातच ही वाघीण अतिशय प्रसिद्ध असल्यामुळे तिच्या पिल्लांकडे सर्वांचे लक्ष असणे स्वाभाविक होते. या दोन पिल्लांमधील ‘ब्रोकन टेल’ पिल्लू धाडसी, खोडकर, खेळकर आणि वात्रटही होते. गाडीच्या मागे जाणे, पर्यटकांना आवडतील अशा हालचाली करणे, दंगामस्ती करणे यामुळे अल्पावधीतच ते साऱ्यांच्या नजरेत आले. पर्यटकांचे ते आकर्षण ठरत होते. २००२ च्या सुमारास दोन्ही पिल्ले आईपासून वेगळी झाली.

‘ब्रोकन टेल’ने आईच्याच परिसराला लागून असलेल्या; पण व्याघ्र प्रकल्पाच्या कडेच्या बाजूला आपले घर आणि वर्चस्व बसवले. ‘स्लॅंट इयर’ मात्र वेगळा झाल्यानंतर बेपत्ता झाला. त्यानंतर त्याचा ठावठिकाणा कधीही लागला नाही. पूर्ण वाढ झालेला ‘ब्रोकन टेल’ स्वतःहून शिकार करणे, अस्वलाशी दोन हात करणे यांसह आयुष्याला सामोरे जात होता. २००३ च्या उन्हाळ्यात एक दिवस अचानक तोही रणथंबोर व्याघ्र प्रकल्पातून नाहीसा झाला.

रणथंबोर व्याघ्र प्रकल्पात एक आयरीश फिल्ममेकर कॉलिन पॅट्रिक स्टॅफर्ड जॉन्सन १९९५ पासून फिरत होता. खासकरून ‘बीबीसी’साठी ‘मछली’ वाघिणीवर त्याने वेगवेगळ्या फिल्म बनवल्या होत्या. तिचा मागोवा घेत असतानाच तिची दोन्ही पिल्ले मोठी होऊन गायब झाल्याचे त्याच्या लक्षात आले. व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेर गेल्यानंतर त्या परिसरात सुरू असलेल्या शिकारीमुळे हे वाघ मारले गेले असावेत, असाच समज झाला.

२००३ च्या ऑगस्टमध्ये प्रकल्पापासून साधारण तीनशे किलोमीटर दूरवर कोटा जिल्ह्यातील दारा  अभयारण्यातून जाणाऱ्या रेल्वेमार्गावर एक नर वाघ मरण पावल्याची घटना घडली. काही काळानंतर व्याघ्र प्रकल्प आणि इतर निसर्गप्रेमींच्या असे लक्षात आले, की तो दुसरा-तिसरा कोणी नसून ‘ब्रोकन टेल’ आहे. रणथंबोर व्याघ्र प्रकल्पापासून दारा अभयारण्यापर्यंतचा मार्ग लोकवस्ती, रस्ते, शेती आणि गावांनी भरलेला आहे.

या सर्वांना टाळत हा वाघ इतक्या दूर कसा पोहोचला हे मोठे कोडेच होते. रेल्वेरुळ दुरुस्त करण्यासाठी ज्या ढकलगाडीचा रेल्वेमार्गावर वापर केला जातो त्यावर ठेवलेला या वाघाचा मृतदेह घेऊन जातानाचे छायाचित्र आजही मनाला वेदना देऊन जाते. यासंदर्भात रणथंबोर येथील गाईड सलीम अली यांच्याशी मी संपर्क साधला. या फिल्ममध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

ते म्हणाले, ‘जंगलात ‘ब्रोकन टेल’ अतिशय खोडकर व बिनधास्त म्हणून प्रसिद्ध होता. त्या वेळेस मुख्यतः पंजाच्या आधारे वाघांची ओळख केली जात असे. वाघाच्या अंगावर असणाऱ्या पट्ट्यांचा त्या वेळेस ओळखण्यासाठी आधार घेतला जात नव्हता. दारा अभयारण्यातून जाणाऱ्या मुंबई ते दिल्ली राजधानी एक्स्प्रेसच्या अपघातात हा वाघ मृत्युमुखी पडला. या वाघाला रेल्वेची धडक लागली नव्हती.

कारण त्याच्या शरीरावर कोणत्याही स्वरूपाची जखम नव्हती. घटना घडली त्या ठिकाणी दोन्ही बाजूला उंच कडे आहे. वेगाने रेल्वे आली त्या वेळेस हा वाघ तेथे असावा. तो समोरच्या बाजूला पळाला; मात्र रेल्वे जवळ आल्याने त्याने बाजूला उडी मारली. त्याच्या डोक्याला दरडीचा मार लागून त्याचा मृत्यू झाला असावा.’

सलीम अली पुढे सांगतात, ‘या घटनेनंतर साधारण चार वर्षांनंतर वृत्तपत्रातील फोटोच्या आधारे आम्हाला हा वाघ ‘ब्रोकन टेल’ असल्याचे लक्षात आले. आम्ही ही माहिती तत्कालीन क्षेत्र संचालक जी. व्ही. रेड्डी यांना सांगितली. त्यानंतर हा मृत्युमुखी पडलेला वाघ ‘ब्रोकन टेल’ असल्याचे जाहीर करण्यात आले. या फिल्मसाठी मी एक वर्ष अगोदर या ‘ब्रोकन टेल’च्या संभाव्य मार्गाची कॉलिनसोबत रेकी केली होती. या फिल्मला आतापर्यंत जागतिक स्तराचे ३६ पुरस्कार प्राप्त झाले आहेत.’

२००५ च्या सुमारास कॉलिन पुन्हा एकदा रणथंबोरमध्ये चित्रीकरणासाठी आले होते. त्या वेळेस त्यांनी ‘ब्रोकन टेल’च्या प्रवासाचा मागोवा घेण्याचे ठरवले. कॉलिन यांना निर्माता मिळत नव्हता. अखेर तो मिळाल्यावर २००९ मध्ये प्रत्यक्ष फिल्मच्या चित्रीकरणास सुरुवात झाली आणि एका वर्षात ते पूर्ण झाले. या वेळी कॉलिन व सलीम अली या दोघांनी घोड्यावरून रणथंबोर ते दारापर्यंतचा प्रवास केला.

यादरम्यान ते दोनशेहून अधिक लोकांशी थेट बोलले. वनरक्षक, गावकरी, वाघांची शिकार करणारे, ज्या रेल्वेची धडक लागून हा वाघ मरण पावला त्या इंजिन ड्रायव्हरसह अनेकांशी संवाद साधत त्यांनी हा प्रवास केला. त्यांचा हा प्रवास ‘ब्रोकन टेल - द लास्ट डेज ऑफ वाईल्ड टायगर’ या फिल्ममध्ये चित्रबद्ध केला गेला आहे.

ही फिल्म तयार करण्यापूर्वीच कॉलिंग यांच्याजवळ ‘मछली’ तसेच लहानांपासून मोठा होत असलेल्या ‘ब्रोकन टेल’चे प्रचंड फुटेज तयार होते. या सर्वांची गोळाबेरीज करत त्यांनी ही फिल्म बनवली आहे. संरक्षित क्षेत्राबाहेर पडलेला वाघ कसा जगतो, त्याच्यापुढे किती संकटांची मालिका येते, मनुष्यवस्ती तसेच विविध विकासकामांना तो कसा टाळण्याचा प्रयत्न करतो याचे भावपूर्ण चित्रण या फिल्ममध्ये आहे.

व्याघ्र प्रकल्पांना जोडणाऱ्या जंगलाच्या सलगतेबाबत तसेच त्याच्या संचार मार्गावर असलेल्या धोक्यांबाबत मोठा प्रकाश या फिल्ममध्ये टाकण्यात आला आहे. खरे तर २०१० च्या सुमारास वाघांच्या भ्रमणमार्गावर फारसे बोलले जात नव्हते; मात्र आता या भ्रमणमार्गाचे महत्त्व काय आहे, हे ‘ब्रोकन टेल’सारखेच व नंतरच्या काळात अनेक वाघांनी केलेल्या स्थलांतरामुळे अधोरेखित झाले आहे.

आजही विदर्भासह अनेक जंगलांतून जाणाऱ्या रेल्वे मार्गांवर जेव्हा वाघाचा मृत्यू होतो त्या वेळेस मला ‘ब्रोकन टेल’ची कायम आठवण येते. २०११ मध्ये इंटरनॅशनल वाईल्ड लाईफ फिल्म फेस्टिवलमध्ये या फिल्मला तीन पुरस्कारांनी गौरविण्यात आले. या महोत्सवात जगभरातील ३० देशांतील ५१० वन्यजीवांवरील फिल्म आल्या होत्या. त्यात ‘ब्रोकन टेल’ला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट संवर्धन चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट सादरकर्ते म्हणून कॉलिंग यांना गौरवण्यात आले.

डेव्हिड अॅटनबरो यांना मागे टाकून कॉलिंग यांना या वर्षी हा पुरस्कार मिळाला. काही वर्षांपूर्वी मी ही फिल्म बघितली होती. ‘ब्रोकन टेल’वर लेख लिहिण्याच्या निमित्ताने या फिल्ममधील आठवणींना उजाळा मिळाला. शेपटीचे हाड वाकलेल्या या वाघाला जिवंतपणी खूप प्रसिद्धी मिळाली नाही. जर तो रणथंबोरच्या जंगलात नंतरच्या काळात जगला असता, तर निश्चितच त्याला त्याच्या आईसारखीच प्रचंड प्रसिद्धी मिळाली असती. मात्र मृत्यूनंतर ज्या मोजक्यांच्या नशिबी प्रसिद्धी येते, त्यात या वाघाचा समावेश आहे.

एक आठवण...

मला आठवते माझी रणथंबोर व्याघ्र प्रकल्पाची पहिली भेट. २००० पूर्वीची ती भेट होती. मुंबईतील सुप्रसिद्ध छायाचित्रकार गोपाळ बोधे, त्यांच्या मित्रांसोबत या व्याघ्र प्रकल्पात आले होते. मी व माझा मित्र विक्रम शिंदेसह आम्ही सहा जण बोधे यांच्यासोबत एका जिप्सीमध्ये होतो. दुपारच्या सफारीमध्ये आम्ही जंगलात फिरत असताना आम्हाला एका वाघिणीने दर्शन दिले. आम्हा सहा जणांपैकी पाच जणांच्या गळ्यात कॅमेरे होते.

जंगलातील उजव्या बाजूने वाघीण चालत येऊन आमच्यासमोरील रस्ता पार करून डाव्या बाजूच्या जंगलात निघून गेली. आम्ही पाचही जण कॅमेऱ्याच्या आयपीएसमध्ये डोळे घालून, वाघाचा चांगला फोटो कसा येईल, याची खटपट करत होतो. वाघीण निघून गेल्यावर विक्रम म्हणाला, ‘वाघीण पाण्यात बसून होती. तिचे पोट ओले होते.’ आम्ही पाचही जणांनी एकमेकांकडे बघितले. आमच्या कोणाच्याही लक्षात ही बाब आली नव्हती.

कॅमेरा नसल्याने केवळ विक्रमने डोळ्याने वाघिणीकडे बघितले होते. वाघाचा चांगला अँगल कसा मिळेल, यातच आम्ही पाचही जण मश्गुल होतो. कॅमेऱ्यातील स्लाईड रोल डेव्हलप झाल्यानंतर, साधारण एका महिन्यानंतर हातात स्लाईड आल्यानंतर वाघिणीचे पोट ओले होते, हे लक्षात आले...

तात्पर्य, निसर्ग टिपण्यासाठी डोळे महत्त्वाचे, कॅमेरा नाही!

sanjay.karkare@gmail.com

(लेखक निसर्ग अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com