कहाणी ‘उस्ताद’ची!

रणथंबोर व्याघ्र प्रकल्पातील ‘उस्ताद’ नावाचा वाघ अत्यंत धीट, काहीसा रागीट आणि बिनधास्त होता. अतिशय पीळदार आणि भरभक्कम शरीरयष्टी, असे त्याचे वैशिष्ट्य होते.
Ustad Tiger
Ustad Tigersakal

- संजय करकरे

रणथंबोर व्याघ्र प्रकल्पातील ‘उस्ताद’ नावाचा वाघ अत्यंत धीट, काहीसा रागीट आणि बिनधास्त होता. अतिशय पीळदार आणि भरभक्कम शरीरयष्टी, असे त्याचे वैशिष्ट्य होते. तो भारदस्त आणि फोटोजेनिक असल्याने अल्पावधीतच तो हजारो पर्यटकांच्या गळ्यातील ताईत बनला. मात्र, पाच वर्षांच्या काळात व्याघ्र प्रकल्पातील चौघांचा मृत्यू त्याच्या नावावर नोंदला गेला आणि जयपूरच्या प्राणिसंग्रहालयात त्याची रवानगी झाली. तो कायमचा जेरबंद झाला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला. वाघ राहिले तर जंगल राहील. जंगल राहिले तर पाणी आणि संसाधने राहतील. पाणी व संसाधने राहिली तर माणसांचे जीवन सुखकर आहे, हेच अंतिम सत्य आहे.

प्राणिसंग्रहालयात ठेवण्यात आलेल्या ‘त्या’ वाघाच्या मुक्ततेसाठी जयपूर व दिल्लीतील उच्च न्यायालय आणि अखेर सुप्रीम कोर्टातही लढा लढला गेला. दिल्ली-जयपूरसह देशातील विविध भागांत त्याच्या मुक्ततेसाठी प्रार्थना झाली. कँडल मार्च निघाला. मोठे फ्लेक्स, बॅनर्स झळकले. प्राणीप्रेमींनी सह्यांची मोहीम राबवली; मात्र कायदेशीर, निसर्गप्रेमींच्या पाठबळाचे तसेच राजकीय समर्थन मिळूनही अखेरपर्यंत हा वाघ प्राणिसंग्रहालयातच राहिला.

त्याची निसर्गात पुन्हा मुक्तता होऊ शकली नाही. आजची ही कथा आहे, राजस्थानातील रणथंबोर व्याघ्र प्रकल्पातील ‘उस्ताद’ नावाच्या नर वाघाची. या व्याघ्र प्रकल्पातील हा वाघ ‘टी २४’ नावाने ओळखला जात होता. २२ डिसेंबर २०२२ रोजी वयाच्या १७व्या वर्षी जयपूरमधील प्राणिसंग्रहालयात त्याने अखेरचा श्वास घेतला. वॉरेन परेरा नावाच्या एका अनिवासी भारतीयाने ‘टायगर २४’ नावाची अतिशय हृदयस्पर्शी डॉक्युमेंटरी या वाघावर बनवली आहे.

सवाई माधवपूर जिल्ह्यातील रणथंबोर व्याघ्र प्रकल्प वाघांसाठी अतिशय प्रसिद्ध आहे. या व्याघ्र प्रकल्पात २००५च्या सुमारास ‘झुमरू’ नर वाघाच्या मिलनातून, ‘गायत्री’ नावाच्या वाघिणीच्या पोटी ‘उस्ताद’चा जन्म झाला. तीन पिल्लांपैकी एक असलेला ‘उस्ताद’ लहानपणापासूनच अतिशय धीट, काहीसा रागीट आणि बिनधास्त वाघ असल्याचे त्यावेळचे गाईड तसेच पर्यटकांच्या लक्षात आले. त्याच्या अशा बिनधास्त स्वभावामुळेच त्याला ‘उस्ताद’ हे भारदस्त नाव प्राप्त झाले.

साधारण २००७-०८ नंतर ‘उस्ताद’ रणथंबोर व्याघ्र प्रकल्पातील महत्त्वपूर्ण पर्यटन क्षेत्रात राज्य करू लागला. हा नर वाघ दिसायला अतिशय देखणा होता. गळ्याजवळ आणि मानेखाली वाढलेली त्याची दाढी, जी प्रत्येक वाघाच्या नशिबी असतेच असे नाही ती त्याला होती. या दाढीमुळे त्याचा चेहरा भलामोठा दिसत असे. अतिशय पीळदार आणि भरभक्कम शरीरयष्टी, असे त्याचे वैशिष्ट्य होते. त्याच्या चालीमध्ये दिसणारे पीळदार शरीर पर्यटकांच्या नजरेत न भरले तर नवलच. मुळातच हा नर वाघ भारदस्त आणि फोटोजेनिक असल्याने अल्पावधीतच तो हजारो पर्यटकांच्या तसेच रिसॉर्ट मालकांच्या गळ्यातील ताईत बनला.

रणथंबोर व्याघ्र प्रकल्पाला बफर क्षेत्र फारसे नाही. जे काही बफर क्षेत्र आहे तेथे जंगल नसल्यासारखेच आहे. साहजिकच व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्राला भलीमोठी भिंत बांधून जंगलाचे संरक्षण करण्याचा येथे प्रयत्न केला गेला आहे. या व्याघ्र प्रकल्पातील कोअर क्षेत्रात आजही अनेक जुन्या वास्तू, मंदिरे असल्याने साहजिकच पूजेच्या दिवशी स्थानिक ग्रामस्थांचा मोठा जमाव या मंदिराजवळ बघायला मिळतो.

रणथंबोर व्याघ्र प्रकल्पाला सवाई माधवपूर येथून जंगलात जाणारा रस्ताही ‘उस्ताद’च्याच क्षेत्रातून जात असल्याने साहजिकच दिवसभर पर्यटक, स्थानिक ग्रामस्थ यांची मोठी हालचाल सातत्याने त्याला बघायला मिळत असे. या व्याघ्र प्रकल्पातील तत्कालीन सहायक वनसंरक्षक दौलतसिंग शेखावत यांच्या म्हणण्यानुसार माणसांचा जास्तीत जास्त वावर असलेल्या क्षेत्रातच हा वाघ फिरत होता. माणसांची त्याला चांगली सवय होती.

२००९च्या सुमारास या वाघाचा समोरचा उजवा पाय जखमी झाला होता. तत्कालीन डॉक्टरांनी त्याला बेशुद्ध केले. डार्ट मारल्यानंतर त्याला गुंगीचे अधिक औषधही दिले. त्याच्या पायावर झालेली जखम स्वच्छ करत असतानाच या २२५ किलो वजनाच्या वाघाला जाग आली. जवळ असणाऱ्या डॉक्टरांसह सर्व वनकर्मचारी पळून गेले आणि ‘उस्ताद’ही जंगलात गायब झाला. पुढच्या दोन-तीन दिवसांनंतर तो जंगलात दिसला. कालांतराने त्याच्या पायाची जखमही बरी झाली.

जंगलात ‘उस्ताद’ला ‘नूर’ नावाची सखीही मिळाली. ही वाघीणही आकाराने मोठी होती. २०१०च्या सुमारास व्याघ्र प्रकल्पातील कोअर क्षेत्रात जवळच्या एका गावातील ग्रामस्थ वाघाकडून मारला गेला. तो कोअर क्षेत्रात शौचाला गेल्याचे त्याच्या वडिलांनीच सांगितले. अर्धवट खाल्लेल्या अवस्थेतील त्याचा मृतदेह त्यानंतर मिळाला.

त्या घटनेनंतर साधारण दीड वर्षानंतर आणखी एका ग्रामस्थाचा, जो कोअर जंगलात लाकूडफाटा आणायला गेला होता त्याचाही मृत्यू झाला. बेपत्ता माणसाचा शोध घेत मोठ्या संख्येने ग्रामस्थ फटाके वाजवत, दगड फेकत जंगलात गेले. यावेळेस एक मोठा नर वाघ मृतदेहाजवळ बसल्याचे लक्षात आले. यावेळेस हा मृतदेह खाल्लेला होता. हा वाघ दुसरा-तिसरा कोणी नसून ‘उस्ताद’ होता. यावेळी ग्रामस्थांचा मोठा रोष व्याघ्र प्रकल्पाच्या प्रशासनाला सहन करावा लागला. 

तिसऱ्या घटनेनंतर (२५ ऑक्टोबर २०१२) मात्र व्याघ्र प्रकल्पात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली. व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र सहायक रस्त्याच्या कामासाठी मजुरांना घेऊन जंगलात गेले होते. ते मजुरांपासून थोडे दूर झाले असतानाच एका वाघाने त्यांच्यावर झडप घालून त्यांना जंगलात नेले. त्यांच्या आवाजाने सोबत असलेले आणखी एक क्षेत्र सहायक व मजूर ज्या ठिकाणी वाघाने त्यांना ओढून नेले होते तेथे आले.

सर्वांनी ज्या भागामध्ये वाघाने क्षेत्र सहायकाला ओढून नेले होते तेथे दगडफेक करून, आवाज करून त्याला पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला; मात्र वाघ मोठ्याने गुरगुरत त्यांच्या अंगावर आला. जवळच असलेल्या एका जिप्सीला बोलवून या सर्वांनी वाघाच्या ताब्यातील व्यक्तीला सोडवण्याचा पुन्हा प्रयत्न केला; मात्र वाघाने जिप्सीवरही चाल केली.

त्या घटनेनंतर अनेक वनकर्मचारी गाड्यांसह घटनास्थळी आले. व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक साहू यांच्यासह अनेक जणांनी वाघाच्या ताब्यात असलेला क्षेत्र सहायक घिसू सिंग यांना ताब्यात घेतले. तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या वेळी हा वाघ पुन्हा एकदा ‘उस्ताद’ असल्याचे स्पष्ट झाले.

८ मे २०१५ या दिवशी व्याघ्र प्रकल्पात पुन्हा एकदा वाघाचा हल्ला झाला. यावेळेस व्याघ्र प्रकल्पाचा वनरक्षक रामपाल सैनी जे एका चौकीवर कार्यरत होते, त्यांचा मृत्यू झाला. या वनरक्षकालाही ‘उस्ताद’ने मारल्याचे स्पष्ट झाले. ३ जुलै २०१० ते ८ मे २०१५ अशा पाच वर्षांच्या काळात रणथंबोर व्याघ्र प्रकल्पात चार माणसांचा मृत्यू या वाघाच्या नावावर नोंदला गेला. त्यातील दोन जण व्याघ्र प्रकल्पाचे वनकर्मचारी होते.

अखेरच्या मृत्यूनंतर मात्र संपूर्ण व्याघ्र प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांत कमालीचा असंतोष निर्माण झाला. त्यांनी व्याघ्र प्रकल्पात काम करणार नसल्याची भूमिका घेतली. या घटनेनंतर मोठ्या हालचाली झाल्या. १६ मे २०१५ रोजी म्हणजेच चौथ्या मृत्यूच्या अवघ्या आठ दिवसांत ‘उस्ताद’ला बेशुद्ध करून जयपूरच्या प्राणिसंग्रहालयात हलवण्यात आले.

साधारण नऊ वर्षे व्याघ्र प्रकल्पात निर्विवादपणे आणि बिनधास्तपणे वावरणारा हा अतिशय देखणा अन् पर्यटकांच्या गळ्यातील ताईत असणारा वाघ जेरबंद झाला. या घटनेनंतर मात्र निसर्गप्रेमींनी मोठा रोष व्यक्त केला. राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाची मंजुरी न घेताच या वाघाला पकडले, या माणसांच्या मृत्यूला ‘उस्ताद’ जबाबदार नाही... कशावरून ‘उस्ताद’नेच या माणसांना मारले?

व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात सर्व घटना घडल्या आहेत, व्याघ्र प्रकल्पाचा व सरकारी अधिकाऱ्यांचा नाकर्तेपणा, त्यांची भूमिका, विशिष्ट स्वयंसेवी संस्थेचे म्हणणे ऐकून केलेली कारवाई यासह अनेक आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत गेल्या. या वाघाच्या मुक्ततेसाठी मग कोर्टाची पायरी चढली गेली. ‘सेव्ह उस्ताद’सारखे कॅम्पेन विविध ठिकाणी राबवले गेले.

सर्वोच्च न्यायालयाने २०१६ मध्ये एका निर्णयात या वाघाला जेरबंद करण्याचा जो निर्णय व्याघ्र प्रकल्पाने घेतला तो योग्य होता, असे सांगितले. त्यानंतर २०२२पर्यंत ‘उस्ताद’ जयपूरच्या दोन एकर क्षेत्र असलेल्या प्राणिसंग्रहालयातच राहिला. वयाच्या १७व्या वर्षी त्याचा तेथेच मृत्यू झाला. सुमारे सात वर्षे तो या ठिकाणी होता. ज्यावेळेस ‘उस्ताद’ला प्राणिसंग्रहालयात पाठवण्यात आले त्यावेळेस तो नऊ वर्षांचा म्हणजे ऐन उमेदीत होता.

या दरम्यानच्या काळात ‘नूर’सोबत ‘उस्ताद’चे मिलन होऊन तिची दोन बाळंतपणेही झाली होती. त्यातील पिल्ले नंतरच्या काळात सरिस्का व्याघ्र प्रकल्पात हलविण्यात आली. जंगलातील वैभव असणारा हा वाघ माणसांना का मारू लागला, याबाबत अनेकांनी विचार व्यक्त केले आहेत. काही तज्ज्ञांच्या मते या वाघाला उपचार करण्याबरोबरच त्याच्या गळ्यात कॉलर लावण्यासाठी अनेक वेळा पकडण्यात आले.

त्यामुळे या वाघाचा नैसर्गिक स्वभाव बदलला असावा. माणसांच्या मागे जाणे, गाडीवर चाल करून जाणे, दबा धरून बसणे यांसारखे लहान-मोठे प्रसंग या वाघाबाबत घडले; मात्र ते प्रकाशझोतात आले नाही, असेही म्हटले जाते. ‘टायगर २४’ या फिल्ममध्ये वॉरेन परेरा यांनी रणथंबोर व्याघ्र प्रकल्पातील अनेक प्रश्नांना अतिशय स्पष्टपणे चित्रबद्ध केले आहे.

वन्यप्राण्यांसाठी राखून ठेवलेल्या कोअर क्षेत्रात माणसांची सातत्याने सुरू असणारी घुसखोरी, तेथील माणसांचा वावर, बफर क्षेत्राचे महत्त्व, वन्यप्राण्यांसाठी लागणारी पुरेशी जागा, माणसाच्या मृत्यूनंतर होणाऱ्या उद्रेकासह अनेक बाबी या फिल्ममध्ये आहेत.

खरोखरच आपण वाघ या प्रजातीवर प्रेम करतो का प्रसिद्ध पावलेल्या वाघांवर प्रेम करतो, हा मोठा प्रश्नच आहे. वाघाची प्रजाती वाचली पाहिजे, त्याचे संरक्षण आणि संवर्धन झाले पाहिजे, याबाबत कोणाचेही दुमत नाही; मात्र अलीकडच्या काळात ज्या पद्धतीने समाजमाध्यमांवर बोकाळलेले आपले वन्यप्राणीप्रेम ‘दर्शवणे’ यावरच अधिक जोर दिला जातो, हे अनेक उदाहरणांतून पुढे आले आहे.

म्हणजेच ‘Conserving a species, not individual’ म्हणणे अधिक सयुक्तिक ठरते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, वाघाने, वन्यप्राण्यांनी जंगलातच राहावे, हा अट्टाहास आपण करतो. तो गावाजवळ आल्यानंतर आपण त्रस्त होतो, तशा बातम्या वृत्तपत्रातून येतात; मात्र आपण किती वेळा त्याच्या घरात जातो याबद्दल कोण बोलणार? जंगले, विविध वन्यप्राण्यांचे अधिवास ज्या पद्धतीने आक्रसत आहे, वन्यप्राण्यांचे घर नष्ट होत आहे, याबद्दल आता अधिक बोलण्याची गरज आहे.

मला ‘टायगर २४’ ही फिल्म बघत असताना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील रामदेगी परिसरात असणारे मंदिर आणि त्या परिसरात असणारा माणसांचा वावर यांची वारंवार आठवण झाली. या परिसरात असणारी वाघीण आणि तिची पिल्ले आता मोठी झाली असून ती स्वतंत्रपणे माणसांच्या सान्निध्यात फिरू लागली आहेत. या परिसरातही काही घटना घडल्या असून व्याघ्र प्रकल्प प्रशासन तसेच ग्रामस्थांनीही किती सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे हे लक्षात येते.

वाघ राहिले तर जंगल राहील, जंगल राहिले तर पाणी आणि संसाधने राहतील. पाणी व संसाधने राहिली तर माणसांचे जीवन सुखकर आहे, हेच अंतिम सत्य आहे.

sanjay.karkare@gmail.com

(लेखक निसर्ग अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com