हीच खरी ‘मर्दानगी’! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हीच खरी ‘मर्दानगी’!
हीच खरी ‘मर्दानगी’!

हीच खरी ‘मर्दानगी’!

sakal_logo
By
रसिका आगाशे

माझ्या आयुष्यात आलेल्या ज्या पुरुषांचे मी गोडवे गात आहे, त्यांनीही पितृसत्ता आणि ‘पुरुषी’प्रवृत्तीवर आसूडच ओढला आहे. आणि पितृसत्तेच्या बंधनातून बाहेर येणं स्त्रियांसाठी जितकं जाचक आहे, तितकंच पुरुषांसाठी अवघड आहे. कारण मानसन्मान सोडून स्त्रीच्या बरोबरीने येऊन उभे राहण्यातच खरी ‘मर्दानगी’ आहे.

बहुतेक स्त्रियांच्या आयुष्यात तीन पुरुष नक्की येतात (असं त्या सांगतात तरी...) बाप, भाऊ आणि नवरा! माझ्या वाट्याला खूप पुरुष आले... बाप, भाऊ, नवरा, मित्र, प्रियकर, काही ओळखीचे, तर काही खूप ओळखीचे... आणि या सर्वांनी माझं आयुष्य सुंदर केलं! जागतिक पुरुष दिनानिमित्ताने त्यांचे आभार मानायची जागा मिळते आहे, ती कशी सोडू मी ?

सर्वप्रथम बाबा! म्हणजे माझे जन्मदाते बाबा आणि विचारदाते बाबासाहेब आंबेडकर. खरंतर विचारसरणी म्हणून बघायला गेलं तर दोघंही दोन टोकाची; पण समतेची वाट मला दाखवली ती या दोघांनीही. अनेकांना जे पुस्तकातून वाचायला मिळतं, ती समानता घरच्या पातळीवर बाबांनी मला दाखवली. घरातली कामाची विभागणी असो, शिक्षण असो, माझ्या बाबतीत मुलगी म्हणून कोणताच दुजाभाव केला नाही. आजही जात, समाजातली जागा, यामुळे मला कसे विशेषाधिकार प्राप्त आहेत आणि तरीही स्त्री म्हणून समाजात मला माझी जागा कशी मिळवायची आहे हे बाबासाहेबांनी शिकवलं.

खरं तर पुण्यात राहणाऱ्या आणि आगाशे नाव लावणाऱ्या माझ्या आयुष्यात बाबासाहेब थोडे उशिराच आले. त्याआधी आले ज्योतिबा आणि महर्षी कर्वे. खरं तर मी सावित्रीची लेक आहे, असे म्हणून घ्यायला मला खूप आवडतं; पण कर्व्यांच्या कन्याशाळेत मी शिकले. आपली शाळा कशी खूप जुनी आहे आणि स्त्री शिक्षणाच्या वाटेवरती कसे दीप इथे उजळले, याची कायम चर्चा असायची आणि ज्योतिबांसारखा नवरा असावा, हे त्या काळातील माझं स्वप्न! बायकोला समजून घेणारा, तिला तिचा अवकाश निर्माण करण्यास साथ देणारा... लग्न ही मध्यवर्ती संस्था असल्याने हे अनेकांचं स्वप्न असतं. खरंतर झिशानच्या रूपाने हे स्वप्न पूर्ण झालं; पण त्यावेळी माझ्या आजूबाजूच्या लोकांना असं वाटत नव्हतं. कारण त्याचा धर्म वेगळा. त्यामुळे आता काय होणार, हा प्रश्न माझ्याव्यतिरिक्त इतर सर्वांना होता.

प्रेमात असल्यामुळे खरंतर मी त्याच्याबद्दल पुस्तक लिहू शकते, पण या निमित्ताने मला त्याला आणि त्याच्यासारख्या अगदी मोजक्या पुरुषांना ‘थँक यू’ म्हणायला आवडेल. कारण कुठलीही मदत करण्याचा आविर्भाव न घेता, कधीही पेट्रानाईझ (आपण वरच्या दर्जाचे आहोत आणि खालच्यांना सांभाळून घेत आहोत) न करता तो माझ्या बरोबरीने चालू लागला. अनेकदा लोक मला विचारतात, ‘तू लहान मूल, लग्न सांभाळून असं काम करू शकतेस? आणि मी नेहमी म्हणते, माझ्याइतकाच माझा नवरा स्त्री-वादी आहे. आणि जिथे मी उगाचच माझं ‘बाई’ कार्ड वापरायला जाते, तिथे खडसावून वेळप्रसंगी भांडाभांडी करूनही तो मला जागं करत राहतो. त्याचं स्वतःच्या कामाचं, लोकांचं स्वतंत्र जग असताना, तो कधीही माझं आकाश झाकोळून टाकायचा प्रयत्न करत नाहीच, पण अनेकदा मला मुक्तमंच देऊन स्वतः अंधारात राहतो. (कारण आम्ही दोघांनी सुरू केलेल्या उपक्रमात तो अनेकदा स्वतः अंधारात उभा राहून प्रकाश योजना करतो आणि मी मंचावर हार-तुरे स्वीकारत असते!)

नवरा मित्र असण्याचे हे काही फायदे आहेत आणि त्याव्यतिरिक्तही मला खूप मित्र आहेत. मी अजूनही सातत्याने लोकांच्या प्रेमात पडते. त्यांनी माझं आयुष्य खूप समृद्ध केलं आहे. कॉलेजात असल्यापासून मी ग्रुपमधली सहसा एकटी मुलगी होते. नाटकांच्या गटात हे सामान्यतः असं असतंच. माझ्या मित्रांनी मला मैत्रीण न मानता मला मित्र मानलं, याचा कधी-कधी राग आला, तरी त्यांनी मला पूर्णपणे त्यांच्या जगात येऊ दिलं. त्यांच्या चांगल्या-वाईट गोष्टीत, अनुभवात मला सामावून घेतलं. त्यांच्यामध्ये माझं स्त्रीपण पूर्णपणे गळून जाऊ शकतं, असं अत्यंत लिंगभावविरहित अनुभव मला दिला. यानिमित्ताने मला माझ्या समलैंगिक मित्रांबद्दल सांगायलाही आवडेल. कारण त्यांचं आयुष्य, त्यांना होणारा त्रास, आनंद याव्यतिरिक्त एक सहवेदना जगण्याची त्यांची ताकदही अनेकदा मलाच ताकद देऊन गेली.

या व्यतिरिक्त प्रेमचंद यांच्यापासून ते राही मासूम रझा आणि ग्रेसांपासून ते मार्केझपर्यंत किती किती पुरुष लेखकांची नावं घेऊ, ज्यांनी मला फक्त स्त्री-पुरुष नातेसंबंध आणि त्यांच्या लांबी, रुंदी, खोलीबद्दल नाही, तर समानतेच्या वाटेवरून चालत असताना आपल्यातल्या स्त्रीपणाला जोजवणे, त्याचे लाड करणे, मूळात स्वतःवर प्रेम करण्याचं भान या सगळ्यांनी मला दिलं! तुम्ही म्हणाल दर पंधरवड्याला पुरुषी प्रवृत्तीवर, पितृसत्तेबद्दल वाईट-साईट लिहिणारी ही बाई आज अचानक पुरुषांचं कौतुक कसं करायला लागली ? कमाल हीच आहे, की मी ज्या पुरुषांचे गोडवे गात आहे, त्यांनीही पितृसत्ता आणि ‘पुरुषी’प्रवृत्तीवर आसूडच ओढला आहे. आणि या पितृसत्तेच्या बंधनातून बाहेर येणं स्त्रियांसाठी जितकं जाचक आहे, तितकंच पुरुषांसाठी अवघड! कारण सिंहासन सोडून, मानसन्मान सोडून स्त्रीच्या बरोबरीने येऊन उभे राहण्यासाठी, त्यांना त्याचे विशेषाधिकार सोडावे लागणार आहेत आणि खरी ‘मर्दानगी’ यातच आहे. आणि अशा सर्व ‘मर्दांना’ पुरुष दिनाच्या शुभेच्छा..!

beingrasika@gmail.com

loading image
go to top