उंबरठ्याच्या आत!

मागच्या वर्षी नाटक करता येत नाही (लॉकडाऊनमुळे!) म्हणून मी एक चित्रपट बनवला. ‘तिचं शहर होणं’ या नावाचा... सध्या तो विविध फिल्म फेस्टिवलची वारी करत आहे.
उंबरठ्याच्या आत!
Summary

मागच्या वर्षी नाटक करता येत नाही (लॉकडाऊनमुळे!) म्हणून मी एक चित्रपट बनवला. ‘तिचं शहर होणं’ या नावाचा... सध्या तो विविध फिल्म फेस्टिवलची वारी करत आहे.

जगात काय चालू आहे हे माहीत नसते, तोवर आपल्याला सांगण्यात आले तेवढेच ‘सत्य’ आहे अशी मानसिकता तयार होते. जगात काय चालले याची जाणीव करून देणारे चित्रपट पाहिले, की मीही किती उंबरठ्याच्या आतले काम करत आहे याची जाणीव होते. कुणा एकीचा उंबरा स्वयंपाक घराचा, कुणाचा मुख्य दरवाजाचा, कुणी गावाच्या वेशींशी थांबते, कुणी शहराच्या चमचमाटात हरवते. जितके दरवाजे उघडले जातील तितके मोठे क्षितिज गवसते. कान्स वारीच्या निमित्ताने मला हे आकाश पाहता आलं!

मागच्या वर्षी नाटक करता येत नाही (लॉकडाऊनमुळे!) म्हणून मी एक चित्रपट बनवला. ‘तिचं शहर होणं’ या नावाचा... सध्या तो विविध फिल्म फेस्टिवलची वारी करत आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे तीन चित्रपट कान्स आंतरराष्ट्रीय महोत्सवाच्या फिल्म बाजारात पाठवले जातात. त्यात आमचाही सहभाग होता आणि त्यानिमित्ताने मला हा महोत्सव अनुभवता आला.

या सदरात मी स्त्री म्हणून मला काय वाटते, ते वेळोवेळी लिहीत आलेच आहे. स्त्री दिग्दर्शक म्हणून मला काय वाटतेय हे लिहिण्याची ही पहिलीच वेळ! एक किस्सा सांगते- काही वर्षांपूर्वी एका स्त्री कविसंमेलनात मला बोलावण्यात आले होते. बाकीच्या कवयित्री माझ्याहून वीसेक वर्षं तरी मोठ्या होत्या. सगळ्यांच्या कवितांमध्ये स्वयंपाकघरातलं रांधणं, उंबरठ्याबाहेर न पडता येण्याचे दुःख, करियर आणि घरकाम सांभाळताना होणारी तारांबळ याचे दाखले होते. तेव्हा मी काही तरी स्त्रीचे लैंगिक आयुष्य किंवा सीमेवर लढणाऱ्या सैनिकांबद्दल लिहीत होते. त्या सगळ्या माझ्याकडे कौतुकाने बघत होत्या... आणि मी त्यांचे आभार मानले, की त्यांची पिढी लिहिती होती म्हणून माझी, माझ्या पिढीची कविता उंबरठ्याबाहेर पडून जग पाहू शकली.

तसेच काहीसे चित्रपटाच्या बाबतीतही. माझा चित्रपट म्हणजे एका उच्च-मध्यमवर्गीय स्त्रीची आपले चौकटीतील आयुष्य मोडून शहर होण्याची गोष्ट आहे... यात राजकारण आहे, समाजकारण आहे. माझ्या मागच्या पिढीतल्या स्त्री दिग्दर्शकांनी दिलेले हे बळ आहे... ही संख्या खूप कमी असली तरीही. ‘कान्स’ला जाऊन मी जेव्हा जगभरातून आलेल्या दिग्दर्शकांचे, विशेषतः स्त्री दिग्दर्शकांचे चित्रपट पाहत होते, आतून-बाहेरून हलून जात होते. त्यांच्या गोष्टी, त्यांचं तांत्रिक ज्ञान हे भारावून टाकणारं होतं आणि या सगळ्यापेक्षा महान म्हणजे त्यांची नजर! खूप फिल्म्सबद्दल बोलता येईल खरं तर; पण Love According to Dalva या बेल्जियम चित्रपटाने अगदीच भंजाळून टाकलं. एम्मॅनुएल निकोट हिचा हा पहिलाच चित्रपट. एका लहान मुलीवर तिचा सख्खा बाप अत्याचार करत असतो आणि तिला ते प्रेम वाटत असतं. लहानपणीच ती एका स्त्रीप्रमाणे राहायला लागलेली असते. तिचा शैशवापर्यंतचा उलट प्रवास ही या चित्रपटाची गोष्ट! यातली कमाल म्हणजे त्या मुलीप्रमाणेच प्रेक्षकांनाही सुरुवातीला हे प्रेमच वाटतं आणि जेव्हा त्या मुलीला काळतं की आपला बाप आपला लैंगिक वापर करून घेत होता, तेव्हाच ते प्रेक्षकांनाही जाणवतं! एखाद्याचं कसं कंडिशनिंग केलं जाऊ शकतं, याचा हा उत्तम नमुना!

स्त्री म्हणून आपले नेहमीच कंडिशनिंग केले गेले आहे. जगातल्या अर्ध्या गोष्टी आपण करूच शकत नाही, हा न्यूनगंड निर्माण केला गेला. असेच वागायचे असते, बोलायचे असते हे ठाम सांगण्यात आले आहे आणि जोवर बाकीच्या जगात काय चालू आहे हे माहीत नसते, कळत नसते तेव्हा आपल्याला सांगण्यात आलेले आहे तेवढेच ‘सत्य’ आहे अशी मानसिकता तयार होते. अशा प्रकारचे चित्रपट पहिले, की मीही किती उंबरठ्याच्या आतले काम करत आहे याची जाणीव होते. कुणा एकीचा उंबरा स्वयंपाक घराचा, कुणाचा मुख्य दरवाजाचा, कुणी गावाच्या वेशींशी थांबते, कुणी शहरच्या चमचमाटात हरवते. जितके दरवाजे उघडले जातील तितके मोठे क्षितिज गवसते. या कान्स वारीच्या निमित्ताने मला हे आकाश पाहता आलं!

‘कान्स’च्या बाजारात एक अमेरिकेतली बाई मला माझ्या चित्रपटाबद्दल विचारत होती. बोलता बोलता मी तिला म्हटलं, ‘‘माझी जात, वर्ग यामुळे मला काही अधिकार आहेत, ताकद आहे (प्रेव्हिलेज!), पण स्त्री असल्यामुळे अधिकार नसणे, ताकद नसणे काय असते हे मी अगदीच समजू शकते!’’ त्यावर त्या अमेरिकन बाईंनी मला जवळपास मिठीच मारली. बराच वेळ हातात हात घेऊन उभी राहिली आणि काही क्षणासाठी आम्ही जगाच्या दोन कोपऱ्यांतल्या बायका एकमेकींचे स्त्री असणे सोसत उभ्या होतो!

एक काळ होता जेव्हा मी मला फक्त लेखक, दिग्दर्शक किंवा नट म्हणवायचे. कामाची विशेषणे लिंगविरहित असावीत, असे काहीसे वाटायचे; पण आता...? मी कदाचित लेखक, दिग्दर्शक, नट काहीही काम केले तरी माझे स्त्री असणे विसरूच शकत नाही. मी कुठल्याही क्षेत्रात काम केले तरी माझे स्त्री असणे, आपला समाज मला विसरू देणार नाही. मग परत तेच, ज्या स्त्री जन्माला नशीब मानून बायकांनी डोकी आपटून घेतली, तोच स्त्रीपणा लपेटून मला जर नवी नजर मिळत असेल तर का नाही मिरवावी! स्त्री दिग्दर्शिका ही माझी नवीन ओळख आवडून घेण्यासाठी ‘कान्स’पर्यंत मात्र नक्की जावे लागले हं!

raskinbond@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com