बलात्कार म्हणजे काय असतं गं आई?

माझ्या लेकीनेही असाच प्रश्‍न विचारला. इतक्या लहान वयात या शब्दाचा अर्थ सांगितला पाहिजे का?
Rasika Agashe write girl asked question to mother What is rape
Rasika Agashe write girl asked question to mother What is rapesakal
Summary

दररोज वर्तमानपत्रात, टीव्हीवर बलात्काराच्या बातम्या येतात. त्या वाचून, बघून समाज विसरून जातो; पण अलीकडेच लिहू-वाचू लागणाऱ्या मुलींना या शब्दाचा अर्थच माहीत नसतो, तेव्हा त्यांनी बलात्कार म्हणजे काय, असे विचारले ते काय काय उत्तर द्यायचे? कसे समजावून सांगायचे? माझ्या लेकीनेही असाच प्रश्‍न विचारला. इतक्या लहान वयात या शब्दाचा अर्थ सांगितला पाहिजे का?

एका तेरा वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार होतो. बलात्कार करणाऱ्यांमध्ये तिच्या मावसभावाचा समावेश असतो. पोलिस मुलीला ठाण्यात बोलावतात आणि तिथे ठाणेदार तिच्यावर बलात्कार करतो. नुकतीच लिहू-वाचू शकणारी माझी मुलगी अडखळत ती बातमी वाचायचा प्रयत्न करतेय. हा शब्द तिने अजून ऐकला नाहीये. काय सांगायचा अर्थ? इतक्या लहान वयात या शब्दाचा अर्थ सांगितला पाहिजे का?

बातमीतली पीडित मुलगी १३ वर्षांची होती. या बातम्या आपण सहा महिन्यांच्या मुलीपासून ६० वर्षांच्या म्हातारीपर्यंत, सर्वांबद्दल ऐकतो, वाचतो. छेडछाड, गलिच्छ स्पर्श याचा अनुभव जवळपास सर्व स्त्रियांकडे असतो. काय अर्थ असतो याचा? तर ऐका स्त्रियांनो तुमची कहाणी. एक आटपाट नगर होतं.

‘‘आई आटपाट म्हणजे काय?’’

जिथे जिथे मनुष्य समुदाय राहतो त्याला आटपाट नगर म्हणण्याची परंपरा आहे. तिथे तऱ्हेतऱ्हेचे लोक राहत असत.

‘‘आई, स्त्री म्हणजे काय गं?’’

खरंतर हा अवघड प्रश्न आहे; पण समजावण्याचा प्रयत्न करते. ज्यांना लिंग नावाचा अवयव आहे, त्यांना नर म्हणून संबोधलं जाई आणि त्यांनी पुरुषासारखे वागायचे आहे, अशी व्यवस्था लावली गेली. ज्यांना योनी असा अवयव आहे, त्यांना मादी म्हणून संबोधले जाई. त्यांनी ‘स्त्री’सदृश व्यवहार करावा, असे कुठल्या तरी पुस्तकात लिहून ठेवण्यात आले. स्त्री आणि पुरुष यांची कामे वाटून देण्यात आली. पुरुष हा स्त्रीपेक्षा उजवा आहे, असे एक वाक्य त्या पुस्तकात कोंबले गेले.

‘‘आई, हे कुठले पुस्तक? हे लिहिताना कोणा स्त्रीला विचारले गेले होते काय?’’

छे छे, असे प्रश्न कहाण्यांमध्ये विचारू नयेत. तर या कुठल्यातरी पुस्तकाला अनेक नावांनी संबोधता येते आणि हे पुस्तक कसे सगळ्यात महान आणि जुने आहे, असा या पुरुष समुदायाकडून सांगण्याचा, पटवण्याचा प्रयत्न केला गेला. या व्यतिरिक्त लिंग आहे किंवा योनी, हे स्पष्ट कळत नाही. किंवा लिंग आहे, पण स्त्री असण्याची अनुभूती आहे, किंवा योनी आहे, परंतु स्त्री असण्याची अनुभूती आहे किंवा आणखी काही वेगळे आहे, वाटते आहे, असेही लोकांचे प्रकार होते; परंतु काळ्या-पांढऱ्या ‘बायनरी’ जगात या रंगांना जागा न देण्याची प्रथा होती; पण नंतर त्यांना किन्नर किंवा हिजडा अशा एका मोठ्या गटात टाकून, तो झाकून टाकण्याचा प्रयत्न केला गेला.

‘‘पण हे सगळे कशासाठी आई?’’

प्रजोत्पादन! तर अशा या जगात लिंगवाले आणि योनीवाल्या हे एकत्र येऊन प्रजोत्पादन करू शकतात. या एकत्र येण्याच्या क्रियेला संभोग असे संबोधले जाऊ लागले. खरंतर कुठल्याही दोन व्यक्तींमध्ये होऊ शकतो; पण या सत्यावर पडदा टाकून संभोग हा मुले जन्मण्यासाठीच करावयाचा असतो, असे त्या समाजाच्या मनावर बिंबवण्यात आले.

‘‘पण या सगळ्याचा बलात्काराशी काय संबंध आई?’’

अधीर होऊ नकोस बालिके. बलात्काराचा संबंध या सगळ्याशी आहे. तर चालीरिती, रुढी, परंपरा बनल्या आणि या परंपरा वाढत वाढत जाऊन लग्न नावाच्या संस्थेपाशी येऊन थांबल्या. तोपर्यंत पुरुष हा स्त्रीपेक्षा श्रेष्ठ आहे, हे स्त्री-पुरुष आणि किन्नरांच्याही मनावर कोरण्यात आले. यामध्ये केवळ स्त्री-पुरुष एकमेकांबरोबर संग करू शकतात आणि त्यातही ज्या पुरुषाशी, ज्या स्त्रीचे लग्न करण्यात येईल, तिच्या योनीचा तो एकाधिकार स्वामी असे.

‘‘मग त्या लिंगाचीही एकाधिकारी...?’’

अगं वेडे, एकदा ठरले ते श्रेष्ठ आहे, मग त्यांना कुठलेही प्रश्न विचारावयाचे नाहीत; तर ताकद आणि जोराच्या बळावर संभोग केला जाऊ शकतो, हे या पुरुषांच्या लक्षात आले होते आणि इतक्या वर्षात योनीला योनी न म्हणता, घरची इज्जत, लाज, अब्रू अशा विविध शब्दांनी संबोधित करण्यात येत होते. मग जर समोरच्याचा जाती, धर्म, जमीन अशा कुठल्याही बाबतीत बदला/ सूड घ्यायचा झाला, तर त्याच्या स्त्रियांवर जबरदस्तीने संभोग केला. तिच्या अवयवाचे होणारे नुकसान हा अत्यंत छोटा भाग राहून, तो त्या घराच्या-समाजाच्या इभ्रतीचा भाग बनत गेला. अशा जबरदस्तीपूर्वक होणाऱ्या संभोगास बलात्कार, असे म्हणण्यात येऊ लागले. दिवस गेले, तपं लोटली, शतकानुशतके गेली आणि बलात्काराची बातमी रोज वर्तमानपत्रात येऊ लागली... कधी त्यासाठी निदर्शने केली जातात, कधी ते लपवले जातात. आणि दोन दिवसांनी वाचणाऱ्याच्या आठवणीतून पुसले जातात. याला महत्त्व देऊ नये, ही कहाणी सर्वांनी वाचावी, एकमेकांना ऐकवावी. साठा उत्तराची ही कहाणी सफळ संपूर्ण व्हावी, हीच पुरुषांच्या ईश्वरचरणी प्रार्थना!

‘‘पण आई १३ वर्षांची मुलगी अजून स्त्री झालेली नसते ना गं? मग तिच्यावर कसा बलात्कार करावासा कोणाला वाटत असेल?’’

याचं उत्तर माझ्याकडे नाही. आपल्याकडे असेल तर जरूर कळवा...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com