आता माझी पाळी

पाळी ही दर महिन्याला होणारी घटना असल्यामुळे, ती जितकी आपल्या आयुष्याचा भाग आहे, तितकाच आपल्या पुरुषांच्याही आयुष्याचा भाग झाली पाहिजे.
Menstruation of women
Menstruation of womensakal
Summary

पाळी ही दर महिन्याला होणारी घटना असल्यामुळे, ती जितकी आपल्या आयुष्याचा भाग आहे, तितकाच आपल्या पुरुषांच्याही आयुष्याचा भाग झाली पाहिजे.

पाळी ही दर महिन्याला होणारी घटना असल्यामुळे, ती जितकी आपल्या आयुष्याचा भाग आहे, तितकाच आपल्या पुरुषांच्याही आयुष्याचा भाग झाली पाहिजे. कारण ही जितकी लपवू तितका त्रास आपल्यालाच होणार आहे. आता माझी पाळी असं आपण म्हटल्यावर समोरच्यावरही आपल्याला ‘समजून घेण्याची’ पाळी येणार आहेच ना! किंबहुना आली पाहिजे. त्यामुळे पाळीबद्दल बोलताना कोणी निर्लज्ज म्हणालं तरी शांतपणे हसा! कारण यात लाज बाळगण्यासारखं काहीच नाहीये.

स्वतःविषयी लिहिताना अनेक विषय डोक्यात होते. आसपास जे घडत होतं, ते इतकं भीतीदायक किंवा प्रेरणादायी किंवा बोलतं करणारं होतं की, पाळीसारखा विषय सतत डोक्यातून निघून जायचा. कोपऱ्यात पडून राहायचा. कारण ती दर महिन्याला असतेच की! त्याबद्दल काय तत्परता दाखवायची! आणि पाळीबद्दल शास्त्रीय माहिती तर आजकाल शाळांमधूनही दिली जातेच. आता खरंच काही बोलायचं, लिहायचं बाकी राहिलंय का? सगळीकडे पाळीच्या काळातल्या असामाजिक बहिष्काराबद्दलही बोललं गेलंय. ‘बाजूला बसणे’ हा प्रकार माझ्या आसपासच्या जगातून तरी गायब झालाय... बाकीच्या जगाबद्दल खरंतर माहीत नाही. म्हणजे काही काळापूर्वी, एका नातेवाईकांच्या पूजेच्या इथे, पाळी असेल तर त्या खोलीत जाऊ नको, असं एकीने सांगितलं होतं. मला मुळात त्या पूजेतही रस नसल्यामुळे मी पडत्या फळाची आज्ञा शिरसावंद्य मानली होती; पण कुठे तरी खटकलं होतं.

आमच्या घरात लहानपणापासून सॅनिटरी नॅपकिन्स (कापड तेव्हा अनेक शहरी घरातून गायब होत होतं.) हे वाण्याच्या दुकानातून यायचे. म्हणजे वडिलांच्या समोरच यायचे, त्यामुळे लपवाछपवी हा प्रकार नव्हता. घर छोटं असल्यामुळे आईची पाळी ही लपून राहायची नाही. शेजारी, नातेवाईक यांच्याकडे, ज्यांच्याकडे ‘बाजूला बसणे’ पाळतात, त्यांच्याकडे त्या काळात नको जायला, अशी सोयीची भूमिका घेतली जायची. हल्लीच्या काळात माझा संबंध ज्याच्याशी येतो, त्यांनी हा प्रश्न विचारला नाहीये; पण नाटकाच्या ग्रुपमध्ये पाळीबद्दल खुलेपणाने बोलता यावं, अशी भूमिका मी नेहमी घेते. म्हणजे मुलींनाही त्याबद्दल अडचण वाटता कामा नये. मुलांनाही काही प्रश्न असतील, तर मोकळेपणाने बोलता आले पाहिजे, याबद्दल मी कायम आग्रही असते.

एकदा आमच्या फिल्मचं काम सुरू असताना, एका नवीन मुलीकडे पॅड नव्हते. ती बिचारी, मी जाऊन येऊ का जरा बाहेर, असं गुळमुळीतपणे म्हणत होती. काय हवंय, असं विचारल्यावर तिने मला दबक्या सुरात ‘प्रॉब्लेम’ सांगितलं. आणि मी माझी बॅग ढुंढाळायच्या आत एका मुलाने त्याची बॅग शोधायला सुरुवात केली. ती मुलगी बावरली! त्यावर तो शांतपणे म्हणाला, मी शक्यतो ठेवतो एका बॅगेत, कधी कुणाला गरज लागली तर असावं म्हणून. तिला काय, त्या क्षणी मलाच भरून आलं होतं.

मला कल्पना आहे की, हा मोकळेपणा सगळीकडे नाहीये. पाळी शक्यतो लपवण्याची गोष्ट आहे. हल्ली तर मला कसा त्रास होतं नाही, हे दाखवणं एक नवीन आभूषण होऊन बसलंय. म्हणजे जिला त्रास होतो, तिच्याकडे हीन दृष्टीने पाहणं, हा घराबाहेर काम करणाऱ्या वर्गामध्ये एक नवीन प्रकार सुरू झाला आहे. अनेक सॅनिटरी पॅडच्या जाहिराती या ‘त्या चार दिवसांत’ अमुक पॅड वापरल्यामुळे कसे तुम्ही डोंगर चढू शकता आणि वेगाने धावू शकता, याबद्दल असतात. पॅड लावल्यामुळे डोंगर चढायला ताकद येणार नाहीये! डाग, हो तोच कुप्रसिद्ध डाग लागणार नाहीये फक्त! बाकी जो त्रास व्हायचा तो होणारच आहे!

पाळीचा त्रास हा प्रत्येकीला वेगवेगळा होत असतो. अनेक जणींना विविध ऋतूंमध्ये विविध प्रकारचा त्रास होत असतो. किती पुरुषांना माहितीये, की आपली आई, बायको, बहीण, मैत्रीण यांना कसा आणि किती त्रास होतो? या काळात काय केलं तर त्यांना बरं वाटणार आहे, हे किती जणांना माहितीये? आणि किती जण हे अंमलात आणतात? याबरोबर हाही प्रश्न महत्त्वाचा आहे, की किती मुली, स्त्रिया हा काळ आपल्या आयुष्यातील पुरुषांबरोबर शेअर करतात? म्हणजे या काळात होणारे शारीरिक, मानसिक त्रास, यातना आणि आनंदही आपल्या नवऱ्याबरोबर, भाऊ, मित्र यांबरोबर वाटून घेतात? किती जणींना हे अजूनही काहीतरी लाजिरवाणे आहे, असं वाटतं? तहान लागणे, भूक लागणे, झोप येणे यांसारखीच पाळी येणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे.

मला याची पूर्ण कल्पना आहे, की आपल्या समाजात जिथे, आया-बहिणी अनेकदा मला भूक लागली आहे, मला अमुक खावंसं वाटतंय, असं सांगू शकत नाहीत, तिथे त्या माझी पाळी आली आहे किंवा येऊ घातली आहे, मला आरामाची गरज आहे, असं बोलू शकणार आहेत? म्हणूनच मला बोलावंसं वाटतंय. कारण हा काळ जसा त्रासदायक असतो, तसा मजेशीरही असतो. शरीरामध्ये हार्मोन्सचा हलकल्लोळ माजलेला असतो. अनेकदा कंबरेत दुखत असतं, पाय भरून आलेले असतात. मन अगदी हलकं हलकं झालेलं असतं! कधी एकटं रहावंसं वाटत असतं, कधी संग हवा असतो. कधी कुणाला तरी घट्ट मिठी मारून बसावंसं वाटत असतं, तर कधी समोरच्याला हाकलून लावावंसं वाटत राहतं! कधी कधी खूप लैंगिक इच्छा दाटून येतात... कधी उगाचच रडावंसं वाटतं. शरीरातील फक्त रक्त नाही, विविध भावनाही फुटून फुटून बाहेर येत राहतात. मी तर पाळीच्या आधी अनेकदा माझ्या नवऱ्याला सांगते, की आज, उद्यात भांडले विनाकारण, तर फार मनावर घेऊ नकोस, पाळी येणार आहे. आणि कारण असेल काही महत्त्वाचे, तर दोन दिवसांनी बघू!

आणि अगदी खरं सांगते, यावर माझा नवरा हसतो आणि चक्क माझे लाड पुरवतो! छे, माझा नवरा काही परग्रहावरून आलेला नाहीये. आमच्या शिक्षणाच्या दिवसात, जेव्हा तो अजून नवरा झाला नव्हता, तेव्हा एकदा माझा प्रयोग होता नाटकाचा. तो मोकळा होता म्हणून पहिल्यांदा त्याला मी पॅड्स आणायला सांगितले होते. त्याचा तो चेहरा माझ्या अजूनही लक्षात आहे. पूर्णपणे गांगरून गेला होता तो! पण लावली सवय हळूहळू! तो सुरुवातीला या विषयावर बोलतानाही लाजायचा आणि उत्तर भारतीय मुलींपेक्षा मराठी मुली या जास्त पुढारलेल्या, पुरोगामी असतातच, या विश्वासाने मी मात्र कायम मोकळेपणाने बोलत राहिले. पाळी ही दर महिन्याला होणारी घटना असल्यामुळे, ती जितकी आपल्या आयुष्याचा भाग आहे, तितकाच आपल्या पुरुषांच्याही आयुष्याचा भाग झाली पाहिजे. कारण ही जितकी लपवू तितका त्रास आपल्यालाच होणार आहे. आता माझी पाळी, असं आपण म्हणल्यावर समोरच्यावरही आपल्याला ‘समजून घेण्याची’ पाळी येणार आहेच ना! किंबहुना आली पाहिजे. त्यामुळे पाळीबद्दल बोलताना कोणी निर्लज्ज म्हणालं तरी शांतपणे हसा! कारण यात लाज बाळगण्यासारखं काहीच नाहीये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com