बाईला आम्ही ओळखत नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाईला आम्ही ओळखत नाही

नंदुरबार जिल्ह्यात एका मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला. बापाने मुलीचा मृतदेह ४२ दिवस मिठाच्या खड्ड्यात जतन करून ठेवला. या घटनेनंतर पीडितेला उद्देशून लिहिलेलं पत्र...

बाईला आम्ही ओळखत नाही

नंदुरबार जिल्ह्यात एका मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला. बापाने मुलीचा मृतदेह ४२ दिवस मिठाच्या खड्ड्यात जतन करून ठेवला. या घटनेनंतर पीडितेला उद्देशून लिहिलेलं पत्र...

बाई, तू कोण? कुठची? तुझी जात कोणती? तुझा धर्म कोणता? तू गरीब, श्रीमंत का मध्यमवर्गीय? या सगळ्यावरून ठरणार आहे, की तुझ्या बलात्काराविरुद्ध आम्ही बोलणार आहोत किंवा न्हाई. मुळात तुझी केस दाखल होणार आहे किंवा नाही.

तू नंदुरबारची आदिवासी बाई. बलात्कार करून म्हणे तुला मारून टाकलं आणि तुझ्या घरच्यांनी गेले ४५ दिवस तुझं प्रेत मिठाच्या खड्ड्यात पुरून ठेवलंय. त्यांना न्यायाची आशा आहे; पण ही बातमी सर्वत्र पोहोचणार आहे का? दिल्लीमध्ये तुझ्यासाठी कोणी मेणबत्ती पेटवणार आहे का? दीड महिना पोलिस चौकीत हेलपाटे मारणाऱ्या तुझ्या बापावर कोणी नाटक, सिनेमा बनवणार आहे का? अवघड आहे गं!

मुळात ‘आम्ही’ म्हणजे कुठली एकसंध आकृती नाहीय. आमच्यातच खूप फाटेफुटे आहेत. अगदी पुरोगामी म्हणवला तरी आम्ही लाल, निळे की गांधीवादी? वगैरे प्रश्न आहेतच. तू कोण होतीस? आदिवासी म्हणे सगळे माओवादी असतात. म्हणजे लाल बावटा ना? ए, तू पकडला होतास का गं कधी कुठला झेंडा? का तुला कामातून फुरसतच नाही मिळाली कधी?

तुझा बलात्कार झाला ना, तेव्हा अगं सणवार अगदी लागून आले होते. म्हणजे तसे मी काही साजरे करायच्या भानगडीत पडायचं नाही असं ठरवत होते; पण घरचे गं! ते ऐकतच नाहीत. तसंही ते सगळे खूप लिबरल आहेत. म्हणजे मला काम करू देतात वगैरे... तर कशाला त्यांचं मन मोडा.

अगं मध्यंतरी ना एक गोष्ट वाचनात आली होती. जुनी गोष्ट आहे गं, महाश्वेता देवींची. त्यातही असाच ना आदिवासी बाईचा बलात्कार होतो आणि पोलिसवालेच ते दाबून टाकायचा प्रयत्न करतात, की त्या बायका असतातच अशा.

मग काही पत्रकार तिला शोधून काढतात आणि तिची गोष्ट जगासमोर येते, पण ती काय ते हंसिया, वगैरे घेऊन फिरत असते आणि दोनचार लोकांवर तिने बलात्कारानंतर हमला वगैरे केलेला असतो. त्या पत्रकार समितीतील कोणी तरी तिला बायकांच्या सुधारगृहात, पापड-लोणचीगृहात कामही देऊ करतो. कारण आता तिचं कसं होणार. शीलभंग झालाय ना तिचा, पण ती तिची ती हंसिया घेऊन निघून जाते. कुठे तरी बिहार वगैरे मागास भागातली गोष्ट होती आणि जुनी.

आता २०२२ मध्ये विकसित राज्य आहे गं आपलं महाराष्ट्र. त्यात या गोष्टीची पुनरावृत्ती कशी घडली? म्हणजे मुंबई-पुण्यासारख्या शहरात राहून आदिवासी म्हणजे मुळात कल्पना करणंच अवघड. तू फिरायचीस का गं कोयता घेऊन? असं कोयता घेऊन फिरलं तरच लोक घाबरतात आणि बलात्कार नाही करत का? मीही ठेवते ‘पेपर स्प्रे’ माझ्या पर्समध्ये. म्हणजे शहरात राहत असले तरी रात्री-अपरात्री उशीर झाला तर भीती वाटतेच गं.

खरं तर म्हणून तुझ्याशी बोलावंसं वाटतंय. म्हणजे मीपण बाईच ना. कुणी तरी अंधारात कुठे तरी पकडेल, अगदी गर्दीतही हात लावेल कुठे तरी ही भीती वाटतेच; पण तू फारच मागास भागातली गं बाई. त्यांनी तुला मारूनच टाकलं. आता कसं करायचं? आणि याविरोधात काही चळवळ वगैरे उभी राहिली, म्हणजे सोशल मीडियावर, तर मी नक्की काळा चौकोन किंवा मेणबत्ती वगैरे ठेवेन डीपी! किंवा कविताही लिहीन त्या नराधमांविरुद्ध एखादी. काय माहीत बाई, तुझं नशीब थोर असेल आणि गाजली जर तुझी गोष्ट तर एखादी वेब सिरीज वगैरेही बनेल येत्या काळात! मग तुझी गोष्ट पोहोचेल जास्त लोकांपर्यंत!

पण या सगळ्यातून काय होतं गं? अगदी तुझ्या बलात्काऱ्यांना पकडलं, अगदी मोठ्यात मोठी शिक्षा जरी दिली तरी तू काही परत येणार नाहीस. हल्ली तर बलात्काऱ्यांना सोडतात आणि त्यांचं हार-तुऱ्यांनी स्वागतही करतात गं! मला ना खरं तर वेळच नाहीय. म्हणजे विषयाचं गांभीर्य कळतंय मला; पण काय आहे ना, हल्ली कोर्टातसुद्धा दुर्मिळात दुर्मिळ गुन्हा आहे असं सिद्ध करावं लागतं! म्हणजे नुसत्या बलात्कारात मोठी शिक्षा देण्यात स्वारस्य नाहीय... जरा रॉड वगैरे असेल तर त्यांना जरा ते ‘घृणित’ कार्य वगैरे वाटतं!

म्हणजे तुला कळतंय ना? तुझी बातमी लवकरच पहिल्या पानावरून मागे कुठे तरी जाणार आहे. अजून टीव्हीवर मी त्याचा आक्रोश पहिला नाहीय. मग अवघड आहे बाई तुझं! आणि कसंय ना गं, या पंचेचाळीस दिवसांत कोणावरच बलात्कार झाले नाहीत असं नाहीय ना. त्यांची तर बातमीसुद्धा झाली नाहीय धड; पण हो, तुझ्या बापाला सलाम!

सध्या इतकंच. आता गणपती गेलेत गं आणि शहरात राहतो म्हणून काय आम्हाला स्वयंपाक सुटलाय का? त्यात पाहुणे! आणि आता हां हां म्हणता देवी येतील. जरा नवरात्रीची तयारी करायची आहे गं. बाई म्हणजे कसं देवीचं रूप. तिची पूजा कशी करायची यावरही कविता-लेख वगैरे लिहायचेत ना! आदिवासींमध्ये देतात का गं बाईला देवीचा दर्जा? आमच्यात देतात! अगं आणि त्यात राणी गेली ना, इंग्लंडची! त्यांनी राज्य करून त्रास दिला आपल्याला; पण आता तिच्याबद्दलही जरा लिहायचं बरं! अगं राणी होती ती! आता बघ कसं आहे... तिच्याबद्दल आम्हाला सगळं माहीत आहे, त्यामुळे आम्ही शोक व्यक्त करू शकतो!

तुझ्याबद्दल काहीच माहीत नाही गं!

कसा शोक व्यक्त करावा आम्ही!

तुझी...

तुझ्याचसारखे दोन स्तन आणि एक योनी असणारी! यापेक्षा जास्त काय माहीत असावं लागतं गं खरं तर!

beingrasika@gmail.com

Web Title: Rasika Agashe Writes Women Rape Murder Crime Letter

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..