आचरण मोठ्या उद्योगपतींचं

टाटा उद्योजकीय समूह’ डोळ्यांसमोर येतो. ‘टाटा’ हा भारतातील आजचा सचोटीपूर्ण असा
Ratan Tata
Ratan Tatasakal

- डॉ . गिरीश जाखोटिया

साधारणतः माझ्या विश्लेषणानुसार बहुतेक उद्योजकीय समाजांमध्ये ‘मोठे उद्योगपती’ हे एक टक्काच असतात. बाकी सगळे व्यापारी, छोटे उत्पादक व सेवा पुरवठादार असतात. या गोष्टीचं महत्त्वाचं कारण असं की, बहुतांश व्यापारी हे ऱ्हस्वदृष्टीचा (टॅक्टिकल) व छोटा विचार करतात, तर उद्योगपती हे ‘दूरदृष्टी’ने (स्ट्रॅटेजिक) व मोठा विचार करतात. तुम्ही जर टाटा, बिर्ला, बिल गेट्स, हेन्री फोर्ड इ. मोठ्या उद्योगपतींचा जुजबी अभ्यास जरी केलात तरी तुम्हाला लक्षात येईल की, ही मंडळी मोठा व दूरचा उद्योजकीय विचार कसा करतात.

यांची महत्त्वाकांक्षा मोठी असते, आवाका मोठा असतो आणि हजारो सहकाऱ्यांच्या मदतीने मोठा उद्योग उभा करण्याची मोठी उद्योजकीय कुवत असते. हे एकाच वेळी मोठ्या संपत्तीचे निर्माते, हजारो सहकाऱ्यांचे (कर्मचारी, पुरवठादार, वितरक व भागधारक) नेते, उद्योजकीय तत्त्वज्ञ, औद्योगिक संस्थेचे शिल्पकार, सामाजिक दायित्व मानणारे दानशूर व असंख्य ग्राहकांना आवडणारी असामान्य व्यक्तित्वं असतात.

आपण जेव्हा ‘मोठा उद्योगपती’ म्हणतो, तेव्हा मोठेपणाची व्याख्या ही संख्येने व गुणवत्तेने अशी दोन्ही परिमाणांवर व्हायला हवी. संख्येत व गुणवत्तेतही पुन्हा काही उपप्रकार पडतात. एकूण वार्षिक विक्रीचा आकार, मालमत्तेचा आकार, कर्मचाऱ्यांची संख्या, उत्पादन क्षमता, देशाच्या व जगाच्या विविध भागांमधील अस्तित्व, वेगवेगळ्या उद्योगांचा समूह (कांग्लोमरेट) इ. मोठेपणाच्या सांख्यिकी व्याख्या प्रचलित आहेत. उद्योगपतीच्या शेअर बाजारातील एखाद्या कंपनीच्या एकूण शेअर्सचं बाजारमूल्य (मार्केट कॅपिटलायझेशन) हीसुद्धा मोठेपणाची वित्तीय व्याख्या आहे.

अर्थात, असं मूल्यांकन हे स्थिर नसतं. या सर्व सांख्यिकी व्याख्यांमध्ये ‘विक्री’वर आधारित व्याख्या ही अधिक अर्थपूर्ण आहे, कारण ती उद्योगपती व त्याच्या एकूण उद्योजकीय संस्थेची सांघिक कामगिरी असते. ढोबळमानाने ही विक्री राष्ट्रीय बाजारातील पाच टक्के किमान असावी किंवा एकूण बाजाराच्या किमान चाळीस टक्के हिश्शावर नियंत्रण असणाऱ्या चार-पाच उद्योगपतींपैकी हा एक उद्योगपती असावा.

गुणवत्तेने उद्योगपतीचं मोठेपण ठरविताना काही महत्त्वाचे निकष म्हणजे त्याच्या उत्पादनांची गुणवत्ता ही बाजारातील सर्वोत्तम असावी, त्याची उद्योजकीय कार्यपद्धती ही निर्दोष असावी व त्याच्याकडे आंतरराष्ट्रीय बाजारातील महत्त्वाचे पेटंट्स म्हणजे स्वामित्वाचे हक्क असावेत. ‘उद्योजकीय सचोटी’चे सर्वोत्तम भारतीय मापदंड आपण विचारात घेऊ लागलो की सहजगत्या ‘टाटा उद्योजकीय समूह’ डोळ्यांसमोर येतो. ‘टाटा’ हा भारतातील आजचा सचोटीपूर्ण असा सर्वाधिक मोठा ब्रँड असावा. म्हणजे ‘ब्रँड इक्विटी’ हा मोठा उद्योगपती ठरविण्याचा खूप मोठा गुणात्मक मापदंड आहे. मी जेव्हा जेव्हा भारताबाहेर जातो,

तेव्हा तेव्हा भारतीय उद्योजकतेची ओळख ही ‘टाटा’ या नावाने परदेशी लोक आनंदाने देत असतात. सहकारी क्षेत्रातील सर्वाधिक मोठा भारतीय ब्रँड ‘अमूल’ असावा. अमूलची विक्री, सदस्यसंख्या, उत्पादनांचे प्रकार, गुणवत्ता इत्यादी गोष्टी ‘सहकारी उद्योजकते’चा अभूतपूर्व असा आकार दाखवतात. कुरियन नावाच्या उद्योजकीय अवलियाची ही करामत जगातील मोठमोठ्या ब्रँड्सना जेव्हा मात देते तेव्हा एक भारतीय म्हणून आपला ऊर अभिमानाने भरून येतो. थोडक्यात असं की, सांख्यिकी मोठेपणा हा महत्त्वाचा असतोच; परंतु उद्योगपतीचा गुणात्मक मोठेपणा हा दीर्घकालीन असतो.

मोठा उद्योगपती होण्यातली एक वेगळीच गंमत असते. म्हणजे तुमचा ‘लौकिक’ (गुडविल) उत्तम असेल तर कमी भांडवली गुंतवणुकीनेही तुम्ही मोठे उद्योगपती होऊ शकता. सुझुकी, फोर्ड आणि टाटा या महान उद्योगपतींची आपापल्या बहुतेक कंपन्यांमधील आजची स्वतःची गुंतवणूक ही ५१ टक्क्यांपेक्षा कमी आहे. हे मोठे लोक आपल्या लौकिकाने उद्योगांवर नियंत्रण ठेवतात.

अर्थात, असा लौकिक हा ‘सचोटीपूर्ण उद्योजकीय पराक्रमा’ने निर्माण होतो. जसजशी कंपनी विस्तारत जाते, तसतसे हे उद्योगपती मोठे होत जातात. म्हणजे मोठा उद्योगपती बनण्यासाठी स्वतः खूप मोठा भागधारक असण्याची गरज नसते. तुम्ही इतरांना मोठं केलंत की स्वतःही मोठे होताच. लाखो भागधारक, तितकेच कर्मचारी, वितरक, पुरवठादार व ग्राहक हे मुकेश अंबानीस मोठा उद्योगपती बनवतात. बहुतेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रवर्तक हे मोठे उद्योगपती ठरले, कारण त्यांनी संपत्तीची ‘सामूहिक निर्मिती’ केली. सेवाक्षेत्रातील याबाबतीतील उत्तम उदाहरण म्हणजे नारायण मूर्ती व त्यांची इन्फोसिस ही कंपनी. अझीम प्रेमजींनी विप्रो कंपनीला मोठं केलं आणि स्वतःही खूप मोठे झाले.

या सर्व अत्यंत आदरणीय मोठ्या उद्योगपतींमध्ये एक मोठं साम्य आहे त्यांच्या ‘बिझनेस एक्सलन्स मॉडेल’चं. यांचं आपल्या ग्राहकांकडे पूर्ण आणि सातत्याने लक्ष असतं नि म्हणून ग्राहकच यांना मोठं करत जातो. भारतातील बहुतेक व्यापारी हे मोठे उद्योगपती न बनण्याचं एक मोठं कारण आहे स्वतःकडे संपूर्ण नियंत्रण ठेवण्याचं. यासाठी हे स्वतःच्या मालकीला प्रचंड महत्त्व देतात. म्हणजे हे संपूर्ण मालकी व नियंत्रण स्वतःकडे बाळगत अगदी छोट्या प्रदेशाचे जहागीरदार होणं पसंत करतील; परंतु हजारो - लाखो भागधारकांना सोबतीला घेऊन मोठ्या प्रदेशाचे सम्राट होणार नाहीत.

ही ‘स्वमग्न’ राहण्याची पारंपरिक मानसिकता ज्यांनी सोडली ते मोठे होत गेले. ‘मोठा उद्योगपती’ आपण जेव्हा बनतो, तेव्हा अनेक जणांचं आपण भलं करू शकतो. मोठी रोजगारनिर्मिती करणं, नवनवे प्रॉडक्ट्स विकसित करून ग्राहकांना आनंद देणं, मोठ्या आकारामुळे ( इकॉनॉमी ऑफ स्केल) कमी किमतीत आपलं प्रॉडक्ट उपलब्ध करून देणं, सरकारी तिजोरीत भरपूर प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष करभरणा करणं, सार्वजनिक इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करण्यासाठी सरकारला सक्रिय मदत करणं, हजारो छोट्या पुरवठादारांना व वितरकांना उद्योजकतेत पुढे नेणं, आपल्या कुटुंबातील पुढच्या पिढीच्या सर्व स्त्री-पुरुष सदस्यांना उद्योजकीय नेतृत्वाची संधी (सक्सेशन प्लॅनिंगद्वारे) उपलब्ध करून देणं, सामाजिक बांधिलकी (सीएसआर) जपत मागासलेल्या समाजांच्या उन्नतीसाठी भरीव कार्य करणं,

नवनवीन संशोधनं करत शेकडो पेटंट्स मिळविणं व त्याद्वारे जागतिक पटलावर आपल्या देशाला गौरवांकित करणं, विविध परदेशांमधील आपला उद्योजकीय पसारा वाढवत परदेशी चलन आपल्या देशाला मिळवून देणं व सोबतीला भारतीय उद्योजकतेचे सांस्कृतिक आयाम जगाला दाखवून देणं, परदेशी तंत्रज्ञान व वैश्विक उद्योजकीय व्यवस्थापनाच्या प्रगत पद्धती भारतीयांना उपलब्ध करून देणं, संपत्तीची सामुदायिक निर्मिती करत छोट्या गुंतवणूकदारांचीही संपत्ती वाढविणं आणि सातत्याने नवनवे उद्योग उभे करीत प्रगतीच्या नव्या सामूहिक वाटा निर्माण करणं... अशी कितीतरी सुंदर व समाधान देणारी उद्दिष्टं ‘मोठा उद्योगपती’ बनण्याच्या प्रेरणेला आणखीन मोठी बनवू शकतात.

‘मोठा उद्योगपती’ बनण्याची काही अस्वीकारणीय उदाहरणं आम्ही टाळली पाहिजेत. सर्वस्वी सरकारी कृपेने मोठे झालेल्या उद्योगपतींची देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याची कामगिरी ही शंकास्पदच असते. रशिया, चीन, मलेशिया, द. आफ्रिका, इटली, इराण इ. देशांमधील मोठ्या उद्योगपतींच्या सरकार-पुरस्कृत मक्तेदाऱ्या या सर्वश्रुत आहेत. काही उद्योगपती छोट्या उद्योजकांचं हित मारून मोठं होतात. कामगार, पुरवठादार, वितरक इत्यादींचं शोषण करून मोठं झालेल्या उद्योगपतींची बरीच उदाहरणं आहेत.

कायद्यातील पळवाटा वापरून, कायदे बदलून घेऊन, बँकांची कर्जं थकवून वा बुडवून, जॉइंट व्हेंचरमधील भागीदारांना फसवून, पर्यावरणाचा ऱ्हास करून व भूमिपुत्रांचं शोषण करून काही उद्योगपती अल्पावधीत खूप मोठे झाले. यातील बऱ्याच उद्योगपतींची कामगिरी ही वरवर कायदेशीरच दिसते; परंतु ती सचोटीपूर्ण नसते. पूर्वजांची प्रचंड इस्टेट असलेले सरंजामदार किंवा राजकारण्यांचा काळा पैसा हा भांडवल म्हणून वापरणारे उद्योगपती आकाराने मोठे तर होतात; परंतु उद्योजकीय अर्थाने दीर्घायुषी होत नाहीत.

यास्तव ‘उद्योजकीय लवचिकता’ व ‘उद्योजकीय भ्रष्टाचार’ यामधील सीमारेषा नीटपणे समजली पाहिजे. ‘उद्योजकीय नीतिशास्त्र’ समजून घेणारा उद्योगपती हा खऱ्या अर्थाने मोठा होतो, कारण तो निरंतरपणे सर्वांच्या हृदयावर राज्य करीत असतो. मित्रांनो, पुढील लेखात आपण पाहणार आहोत मोठा उद्योगपती बनण्याचे विविध प्रकार!

(सदराचे लेखक हे व्यवस्थापकीय, उद्योजकीय व वित्तीय सल्लागार आहेत. देशात व परदेशात त्यांनी विविध विषयांवर दोन हजाराहून अधिक व्याख्याने दिली आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com