कधीही दूध न विकणारं गाव

काही गावांना परंपरा असते, त्या परंपरेतूनच त्या गावात काही गोष्टींची जपणूक होत असते. त्या परंपरांना तडा जाऊ नये यासाठी गावातील अनेकजण जिवापाड प्रयत्न करत असतात.
yehalegav gawali village
yehalegav gawali villagesakal
Summary

काही गावांना परंपरा असते, त्या परंपरेतूनच त्या गावात काही गोष्टींची जपणूक होत असते. त्या परंपरांना तडा जाऊ नये यासाठी गावातील अनेकजण जिवापाड प्रयत्न करत असतात.

- रविकुमार मंदाडे saptrang@esakal.com

गावखेडी, शहरांमध्ये महाराष्ट्र वसलेला आहे. या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वेध घेणारं सदर...

काही गावांना परंपरा असते, त्या परंपरेतूनच त्या गावात काही गोष्टींची जपणूक होत असते. त्या परंपरांना तडा जाऊ नये यासाठी गावातील अनेकजण जिवापाड प्रयत्न करत असतात. या परंपरांचा गावातल्या लोकांना अभिमान असतो. काही गावांच्या परंपरा आदर्श असतात, विज्ञानवादी असतात. म्हणजेच शेकडो वर्षांपूर्वी ज्या परंपरांना सुरुवात झाली, त्यांचं महत्त्व आजच्या विज्ञानयुगातही अधोरेखित होतं. ते पटायला लागतं, किंबहुना ते वाढवण्याची गरज विज्ञानाचा पुरस्कार करणाऱ्या धुरिणांना वाटायला लागते. अशीच एक शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा जोपासत असलेलं गाव म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव गवळी. गायीच्या दुधाचा वापर आर्थिक फायद्यासाठी कधीच करायचा नाही, ही या गावची परंपरा...

साधारणपणाने अडीच हजार लोकसंख्या असलेलं येहळेगाव गवळी हे छोटंसं गाव. गावातील घरांची संख्या अवघी अडीचशे. मात्र, गावात जनावरांची संख्या बऱ्यापैकी. साधारण तीनशेहून अधिक गायी आणि दोनशेहून अधिक वासरं, सत्तर बैलजोड्या आणि तीस म्हशी. गावाची दुधाची जेवढी गरज असते, त्याहून कितीतरी पट अधिक दूध गावात उपलब्ध होतं. मात्र एक लिटरही दूध या गावातून विकलं जात नाही. हिंदू संस्कृतीत गायीला माता मानलं जातं. शेकडो वर्षांपूर्वी गावात ठरलं की, आपण गोमातेचं दूध विकायचं नाही. ती परंपरा आजही मोठ्या निष्ठेने पाळली जात आहे. गावातील अडीचशे घरांपैकी दोनशे घरांत किमान एक तरी गाय आहेच. ज्यांच्याकडे गाय नाही, त्यांना हवं तेवढं दूध गायी असणाऱ्या घरांमधून मोफत दिलं जातं. आज राज्यात दुधाच्या भावाचं राजकारण, दुधात होणारी भेसळ असं वाईट चित्र पाहिलं की, दूध न विकणारं गाव म्हणून येहळेगाव गवळीचं आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

ग्रामीण भागातूनही गायींची संख्या कमी झाल्याने गोग्रास म्हणजे गायीसाठी बनवला जाणारा नैवेद्य बनवला जात नाही. येहळेगाव गवळीमध्ये मात्र गायीला चरायला सोडायच्या आधी नैवेद्य दिला जातो. गायीला नैवेद्य दिल्याशिवाय घरामध्ये कोणीही जेवण करत नाही. घरातील महिला स्वयंपाक करताना सुरुवातीलाच गायीच्या नैवैद्यासाठी लहान पोळी बनवतात. विशेष म्हणजे, गावामध्ये काही मुस्लिम घरंही असून, त्यांच्या घरांमध्येही ही परंपरा जोपासली जाते. गावाच्या परंपरेत कुठलाही जात-धर्म आड येत नाही. दररोज सकाळी गायीची पूजा करून नैवेद्य दिल्यानंतरच त्यांना चरायला सोडलं जातं.

गायीची शेवटपर्यंत काळजी

गायीचं दूध जास्त असल्याने, हवं तेवढं दूध काढून उरलेलं सर्व दूध पिण्यासाठी वासराला सोडलं जातं. दुधापासून दही, ताक, लोणी, तूप किंवा खवा बनवला जातो, तोही घरी खाल्ला जातो किंवा मोफत वाटला जातो. त्यामुळे गायीच्या दुधापासून किंवा दुधाच्या विविध पदार्थांपासून आर्थिक फायदा करून घ्यायचा नाही, ही परंपरा पाळली जाते. या गावात घरातील प्रत्येकजण गायीला आपल्या कुटुंबातील सदस्यच मानतो. वृद्ध झाल्यानंतर आईला वृद्धाश्रमात पाठवणारी मुलंही आपल्याला दिसतात. मात्र, येहळेगाव गवळी येथे गाय म्हातारी झाल्यानंतर, किंवा तिने दूध देणं बंद केल्यानंतरही तिला विकलं जात नाही. गाय मरेपर्यंत दारात असते, शेवटपर्यंत तिची काळजी घेतली जाते. गायीचा मृत्यू झाल्यानंतर स्वतःच्या शेतामध्ये गायीचे अंत्यसंस्कार केले जातात.

खरं पाहायला गेलं तर येहळेगाव गवळी येथील ग्रामस्थांची आर्थिक परिस्थिती फार चांगली आहे अशातला भाग नाही. मध्यम आणि गरीब परिस्थिती असंच एकंदरीत गावचं चित्र. जवळपास सत्तर टक्के शेतकऱ्यांची जमीन कोरडवाहू. विहिरीला उन्हाळ्यात पाणी राहीलच याची काही शाश्वती नसते. निसर्ग आणि पावसावरच सर्व अवलंबून; मात्र अशा परिस्थितीतही गायी सांभाळण्याचा आणि त्यांचं दूध न विकण्याचा ग्रामस्थांच्या मनाचा मोठेपणा आणि जपलेली परंपरा आदर्शच म्हणावी लागेल. वर्तमानात आत्मकेंद्री आणि स्वार्थीपणाने जगणाऱ्या माणसाला एक आगळावेगळा धडा या गावाने दिला आहे.

गावात बहुतांश गवळी समाज असला तरीही गावातील इतर समाज, तसंच इतर धर्मीय अतिशय आनंदाने या परंपरेत सहभागी होतात. यात आपापल्यापरीने साहाय्य, सहभाग घेतात. एक प्रकारे सामाजिक सलोखा यातून जोपासला जातो. गावातील प्रत्येकजण श्रीकृष्णाला मनोभावे पूजतो; त्याचंच दर्शन घेऊन कार्य, कर्म करतो. तोच आपल्या पाठीशी उभा आहे, तोच आपला कर्ताधर्ता आहे, असं समजून कार्य करतो. शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला हा कृष्णजन्मोत्सव सातत्याने असाच राहण्यासाठी गावातील सर्व मंडळी वर्षभर झटत असतात.

आगळावेगळा कृष्णजन्मोत्सव

प्रत्येक घरात गो-कूळ असलेल्या या गावात कृष्ण जन्माष्टमीचं महत्त्व नसेल तरच नवल. गावात कृष्णाचं पुरातन मंदिर आहे, त्याच्या जीर्णोद्धाराचं काम सध्या सुरू आहे. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या अष्टमीला गावातील प्रत्येकजण आनंदाने फुलून जातो. जणू हा गावचा वार्षिकोत्सवच असतो. ‘दिवाळीच्या मुळा लेकी आसावली । पाहतसे वाटुली पंढरीची’ अशीच अवस्था येहळेगावच्या लेकींची झालेली असते. शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला हा कृष्णजन्मोत्सव सातत्याने असाच राहण्यासाठी गावातील सर्व मंडळी वर्षभर सतत झटत असतात. लेकीबाळींना साडी-चोळी, आहेर करतात. अष्टमीला सर्व महिला प्रातःकाळी उठून रस्तोरस्ती सडासंमार्जन करून दारासमोर रांगोळी काढतात, घरावर पताका लावतात. राधा-कृष्ण मंदिरातून मिरवणुकीस सुरुवात होते. घरोघरचे देवघरातील बाळकृष्ण घेऊन त्यांची मिरवणूक काढली जाते. मिरवणुकीत भजन, गवळणी म्हणत सर्वांच्या मुखात एकच शब्द असतो, ‘गोपाळकृष्ण भगवान की जय.’ मिरवणुकीत लहान मुली राधा, तर मुलं कृष्ण बनून येतात. जन्माष्टमीचा कीर्तन कार्यक्रम आयोजित केला जातो. मंदिरातील पाळणा सजवून बाळकृष्ण विराजमान केला जातो. कृष्णजन्म साजरा केला जातो. गुलाल उधळतात. पोहे, दही, सुंठवडा यांचा प्रसाद वाटला जातो. सुंठवडा खाऊन मंडळी उपवास सोडतात. दहीहंडीचा कार्यक्रम असतो. दहीहंडी फोडतात. महाप्रसादाचं आयोजन केलं जातं.

गावात दुधाची गंगा वाहतेय; पण दुधाचा व्यवसाय करणारा माणूस या गावात शोधूनही सापडणार नाही. कितीही आणि केव्हाही दूध मागा, मिळेल, तेही मोफत! दूध, गोमूत्र, गायीचं शेण यांपासून आजच्या विज्ञानयुगात विविध औषधी, सौंदर्यप्रसाधनं, खतं तयार होत असताना आणि गायीला अनन्यसाधारण महत्त्व आलेलं असताना शेकडो वर्षांची गायीला पूजण्याची व तिच्यापासून आर्थिक फायद्याचा विचार न करणारी येहळेगाव गवळी येथील परंपरा आजच्या व्यवहारी जगाच्या डोळ्यांत अंजन घालणारीच म्हणावी लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com