esakal | नावीन्याचा ‘श्रीगणेशा’
sakal

बोलून बातमी शोधा

Shri Ganapati

नावीन्याचा ‘श्रीगणेशा’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आज शाळेत खूपच उत्साही आणि प्रसन्न वातावरण होतं. सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी एकदम आनंदात होते. त्याचं कारणही तसंच होतं बरंका! आज की नाही त्यांच्या शाळेत शाडूच्या मातीचे गणपतीबाप्पा घडवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती आणि त्याला सर्वांनी अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला होता. शाळेच्या छोट्या पटांगणात शाडूच्या मातीचे पाच-सहा ढीग तयार करून ठेवण्यात आलं होतं. बाजूला बादलीत पाणीही ठेवण्यात आलं होतं. कार्यशाळेची वेळ सकाळी ९ वाजताची होती. परंतु मुलांचा उत्साह इतका होता, की सकाळी ८ वाजल्यापासूनच आपापल्या जागा पकडून ठेवण्यासाठी एक स्पर्धाच लागली होती.

बरोबर नऊ वाजता कार्यशाळेला सुरवात झाली. आधी शाडूच्या मातीचं प्रत्येकाला वाटप करण्यात आलं. त्यानंतर बोलावलेल्या तज्ज्ञ पाहुण्यांनी शाडूच्या मातीतून गणपतीबाप्पाची मूर्ती का घडवायची याचं प्रयोजन सांगितलं आणि या आपल्या कृतीमुळे आपण पर्यावरण राखण्यास कसं मदत करणार आहोत आणि निसर्गाची हानी रोखण्यास कशी मदत करणार आहोत, ते सविस्तर उदाहरणासहित समजावून सांगितलं. त्यानंतर त्यांनी गणपतीबाप्पाची मूर्ती कशी घडवायची याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं. आलेल्या मूर्तिकारांनी सर्व विद्यार्थ्यांना मूर्ती घडवताना मन कसं प्रसन्न होतं ते सांगितलं. बोलता बोलता ते मुलांसमोर काही मूर्ती घडवून दाखवत होते. त्यांनी बरोबर काही साचेही आणलेले होते. त्याचंही वाटप करण्यात आलं. ज्यांना जसं हवं तसं त्यांनी मूर्ती घडवायची होती.

प्रत्येकानं घडवलेली मूर्ती आपल्या घरी नेऊन गणेशोत्सवात तिची प्रतिष्ठापनाही करण्यास हरकत नव्हती. फक्त एकच अट घालण्यात आली होती, ती म्हणजे ही मूर्ती कुठल्याही ओढ्यात, नदीत, तलावात, तळ्यात, समुद्रात विसर्जन न करता घरातल्या घरात एका बादलीत पाणी घेऊन विर्सजित करावी किंवा त्या त्या ठिकाणच्या पालिकांनी उपलब्ध करून दिलेल्या हौदातच विसर्जन करावी. त्यामुळे पर्यावरणाचं होणारं नुकसान टळणार होतं. केदार तर आज इतका खूश झाला होता, की काही विचारू नका. गेली दोन-तीन वर्षं तो त्याच्या आई-बाबांच्या मागे लागून त्यांना गणपतीबाप्पाची शाडूच्या मातीची मूर्ती घडवण्यासाठी हट्ट करत होता. नेमकं आज शाळेतल्या या कार्यशाळेमुळे त्याचं हे स्वप्न पूर्ण झालं. त्याच्या या इच्छाशक्तीमुळे या कार्यशाळेत त्याच्या हातून बाप्पाची त्याला हवी तशी मूर्ती घडवली गेली होती. त्याच्या आनंदाला आता पारावरच राहिला नव्हता.

केदार घडवलेली मूर्ती घरी घेऊन आला. ती आई-बाबांना दाखवल्यावर दोघांनी त्याचं खूप कौतुक केलं. त्याला जवळ घेऊन मायेनं त्याचे मुके घेतले. बाबांनी तर लगेचच सायकल काढून त्याला बाजारात नेलं आणि बाप्पाची मूर्ती रंगवण्यासाठी सर्व सामान घेऊन दिलं. मग काय केदारच्या आनंदाला उधाणच आलं. त्यानं अतिशय सुबकपणे बाप्पाची मूर्ती रंगवली. गणेशोत्सवात तिची अतिशय मनोभावे प्रतिष्ठापना केली. सात दिवसांनी गौरीबरोबर तिचं घरातल्या घरातच बादलीत विसर्जन केलं. त्यानंतर ती जेव्हा पूर्णपणे विरघळून गेल्यावर ती माती पुन्हा एका भांड्यात जतन करून ठेवली आणि काही दिवसांनी पुन्हा एकदा तिच्यापासून बाप्पाची सुबक अशी मूर्ती घडवली. केदारनं आता संकल्पच केला होता, की इथून पुढे दरवर्षी बाप्पाची मूर्ती घरीच घडवायची. ती घरीच विसर्जित करायची. पुन्हा तिच्यापासून निवीन मूर्ती घडवायची आणि आपल्या परीनं पर्यावरण राखण्यास मदत करायची. तुम्ही काय करणार?

-रवींद्र कामठे

loading image
go to top