esakal | टर्निंग पॉइंट : ‘रयत’ने मला घडविले
sakal

बोलून बातमी शोधा

टर्निंग पॉइंट : ‘रयत’ने मला घडविले

टर्निंग पॉइंट : ‘रयत’ने मला घडविले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

-प्रसाद मेनकुदळे, उपायुक्त, आयकर विभाग.

पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खेड्यापाड्यातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून गावोगावी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळांची उभारणी केली. या शाळांमधून शिक्षण घेऊन ग्रामीण भागातील कित्येक मुले आज देशाच्या विविध कानाकोपऱ्यात प्रशासकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यातीलच एक म्हणजे ‘रयतने मला घडविले’ असे सांगणारे सोलापूर आयकर विभागाचे उपायुक्त (आयआरएस) प्रसाद मेनकुदळे.

मूळचे शिखर शिंगणापूर येथील असलेले मेनकुदळे कुटुंब सध्या महूद (ता. सांगोला) येथे वास्तव्यास आहे. प्रसाद मेनकुदळे यांचे आई-वडील दोघेही रयत शिक्षण संस्थेत माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे प्रसाद यांच्यावर लहानपणापासूनच कर्मवीर भाऊराव पाटील व रयतमधील शिक्षणाचा चांगलाच प्रभाव होता. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या देवापूर शाळेतून घेतले. खऱ्या अर्थाने स्पर्धा परीक्षेची पायाभरणी येथूनच झाली असे ते आवर्जून सांगतात. रयतमधील गुरुकुल तसेच सक्तीने रात्र अभ्यासिका, शिक्षकांचे वैयक्तिक लक्ष यामुळे बाहेरच्या शिकवणीची गरज तर भासलीच नाही. उलट रयतमधील अशा विविध उपक्रमांमुळे तासन्‌ तास बसून अभ्यासाची सवय निर्माण झाली. विद्यार्थी दशेतील वैयक्तिक विकासाचे चांगले धडे मिळाले. इतर मुलांप्रमाणे आपल्याही मुलाने बॅंकेत अथवा अधिकारी म्हणून काम करावी अशी प्रांजळ इच्छा.

परंतु मुलाला आवडेल त्या क्षेत्रात नोकरी कर म्हणून पाठिंबादेखील होता. घरून असलेला पाठिंबा शिक्षणाची आवड असलेल्या प्रसाद यांनी राहुरी कृषी विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या कृषि महाविद्यालय, पुणे येथे पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. याकाळात एमपीएससी, यूपीएससीतून यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख पाहुणे व माजी विद्यार्थी या नात्याने पुण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी प्रभाकर देशमुख व चंद्रकांत दळवी हे सतत कॉलेजवर येत असत. त्यांच्या या व्यक्तिमत्त्वाचा चांगलाच प्रभाव प्रसाद यांच्यावर पडला. व प्रशासनाबद्दलचे आकर्षण अधिकच वाढले. त्यामुळे काही झाले तरी अधिकारी व्हायचे हे मनाशी त्यांनी पक्क करून पदवीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असताना स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.

परंतु वाढती स्पर्धा व संघर्ष, वेळ, काळ याचे संपूर्ण भान त्यांना असल्याने, प्लॅन बी तयार ठेवून स्पर्धा परीक्षेचा मार्ग धरला. अभ्यास करण्यासाठी मित्रांचा चांगला ग्रुप तयार झाला. सर्वच एकमताने यूपीएससीच्या पुढील अभ्यासासाठी दिल्लीला जाण्याचे ठरले. येथे रात्रं-दिवस ते अभ्यास करण्यासाठी धडपडत असत. सणासुद- लग्न या घरगुती कार्यक्रमांना सुट्टी दिली होती. प्रसाद हे एकुलते एक असल्याने, दिवाळीच्या सणाला आई-वडिलांचा फोन यायचा शेजारची पोरं गावाकडे आली आहेत. तू पण ये, परंतु मनात निश्‍चय केलेला ज्यादिवशी अधिकारी होईल त्याचदिवशी आपली दिवाळी अन्‌ दसरा साजरा होणार.

या ध्येयासाठी वाहून घेतलेल्या प्रसाद यांना यूपीएससीच्या पहिल्या प्रयत्नात अपयशास सामोरे जावे लागले. परंतु ‘प्लॅन बी’ तयार असल्याने खचून न जाता अभ्यास सुरूच ठेवला. या काळात त्यांना बॅंकींग क्षेत्रातील दिलेल्या परीक्षेत यश मिळाले. तसेच त्यांची सेंट्रल इंटिलीजेन्स ब्युरो येथे देखील निवड झाली होती. परंतु कर्तव्यावर हजर होण्यासाठी कालावधी असल्याने त्यांनी दुसऱ्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली, परंतु यशाने पुन्हा हुलकावणी दिली. अखेर तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ‘आयआरएस’ या पदाला गवसणी घातली. अन्‌ गावाकडे एकच जल्लोष सुरू झाला. मेनकुदळे या शिक्षक दाम्पत्याचा लेक आयकर विभागाचा अधिकारी झाला. गावभर झालेल्या चर्चेने आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. विशेष म्हणजे त्यांची पहिली नियुक्ती सोलापुरात सहाय्यक आयकर आयुक्त म्हणून झाली होती. सध्या सोलापुरातच ते आयकर उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत.

- शब्दांकन : अक्षय गुंड

loading image
go to top