दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीची मूळ चौकट आणि तिचे सगळे आनुषंगिक संदर्भ हे विविध समाजघटकातील संवाद आणि परस्परसंबंध यावर आधारित असायला हवेत, यावर भर दिलेला दिसतो.
realistic depiction of the life of Dalits dr babasaheb ambedkar
realistic depiction of the life of Dalits dr babasaheb ambedkar Sakal

- अ‍ॅड. निखिल संजय रेखा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीची मूळ चौकट आणि तिचे सगळे आनुषंगिक संदर्भ हे विविध समाजघटकातील संवाद आणि परस्परसंबंध यावर आधारित असायला हवेत, यावर भर दिलेला दिसतो. ते म्हणतात, की लोकशाही हा अंतर्प्रेषण आणि परस्पर देवाणघेवाण यांनी समृद्ध केलेला अनुभव असतो. हे अनुभवजन्य आकलन खऱ्याखुऱ्या लोकशाहीचे ध्येय अधिक उन्नत करते.

येंडलुरी सुधाकर यांनी लिहिलेला आणि नुकताच प्रकाशित झालेला ‘स्पीकिंग सॅंडल्स : नॅरेटिव्हज फ्रॉम द माडिगवाडाज ऑफ ओंगोल’ हा ग्रंथ म्हणजे सद्य परिस्थितीत योग्य वेळी केला गेलेला उचित कथात्मक हस्तक्षेप आहे.

सामाजिक आणि आर्थिक संदर्भात लोकशाही हे आजही आपल्यासाठी मृगजळच ठरले आहे, याचं दाहक स्मरण हे पुस्तक आपल्याला करून देते. यातील साऱ्या कथा परस्परांशी निगडित आहेत. त्या सगळ्याच आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीवरील प्रकाशम जिल्ह्यातील रावि गुंटपल्ली नावाच्या खेड्यात घडतात.

सुधाकर यांनी प्रथमपुरुषी निवेदक योजला असल्यानं या कथांना एक व्यक्तिगत आपलेपणाचा आणि साहजिक सहभावाचा स्पर्श झालाय. माडिगा या अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीतील लोकांच्या दैनंदिन जीवनात अनुभवाला येणाऱ्या सामाजिक वास्तवांचे एक समृद्ध भांडार या कथा आपल्यासमोर खुले करतात. त्या वाचत असताना ही सारी माणसे साक्षात आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात. या कथा आपण प्रत्यक्ष अनुभवू लागतो.

लेखक आपल्या खेड्यात परततो, तेव्हा त्याच्या मनात जुन्या आठवणींची गर्दी उसळते. आपल्या बांधवांच्या नजरेतून या साऱ्या कथांचा कसदार आणि विस्तीर्ण पट तो आपल्यासमोर उलगडतो. कथा वाचल्यावर वाचकाच्या लक्षात येते, की यात दलित जीवनाचे ठोकळेबाज चित्रण मुळीच नाही.

किंवा मुख्य प्रवाहातील चित्रपटात किंवा खपाऊ साहित्यात दाखवतात तशी, कोणा पुराणकालीन तारणहाराने प्रकट होऊनच उद्धरायला हवीत अशी, दयनीय जीवांच्या स्वरूपातील, प्रतीकात्मक पात्रंही या कथांत रंगवलेली नाहीत. तथाकथित सर्वसामान्य कल्पनाशक्तीच्या आकलनापलीकडचंही बरंच काही अस्तित्वात असतं.

ते लक्षात येण्यासाठी, आपल्याला या तुटलेल्या माणसांचं जगणं जाणण्याची इच्छा असलेला फकीर होऊन सुधाकर यांच्या या जगात प्रवेश करावा लागेल. मात्र त्यांची ही जीवनगाथा खास त्यांच्याच अशा समृद्ध संस्कृतीने आणि अनुभवांनी संपन्न झालेली आहे.

पुरुषप्रधान ब्राह्मणी समाजव्यवस्थेने निर्माण केलेल्या वर्गीकृत आणि श्रेणीबद्ध विषमतेच्या जाळ्यात पुरते अडकलेले असूनही या अत्यंत भयावह परिस्थितीतूनसुद्धा मार्ग काढत स्वतःचे स्थान शोधण्यात ही पात्रे यशस्वी होतात.

पहिल्या कथेच्या सुरुवातीलाच एक माडिगा गीत येतं. त्यातून आपल्याला त्यांच्या सुंदर संस्कृतीचं विलोभनीय दर्शन होतं. मग आपल्याला त्यांच्या मेजवानीतील ‘संकटी’ नावाच्या एका पदार्थाची ओळख होते. ‘संकटी’ म्हणजे बीफमध्ये मिरच्या घालून केलेले कालवण. हा विवाहपूर्व मेजवानीत वाढायचा एक खास खाद्यपदार्थ आहे.

अशा रीतीने आपण माडिगांच्या जादूनगरीत प्रवेश करतो. नंतर लेखक माडिगा या स्वत:च्या जातीची उत्पत्ती सांगणारी कथा ऐकतो. येथे आपल्या ओळखीच्या कामधेनू या पवित्र गायीच्या कथेची एक वेगळीच आवृत्ती आपल्या कानी पडते.

आजवर आपल्याला ही कथा या स्वरूपात का म्हणून सांगितली गेली नसेल असा प्रश्न वाचकाच्या मनात आल्यावाचून राहत नाही. ती दुसरी तथाकथित लोकप्रिय कथाच का अतिज्ञात आहे? ती लोकप्रिय आवृत्ती कुणी रचली ? लिंग आणि जातीवर आधारित विषमतांचा संबंध आपल्याला गाय आणि आपल्या अन्नकल्पना यांच्याशी जोडता येईल का?

‘शार्पन द ॲक्सेस!’ (कुऱ्हाडींना धार लावा!) या शीर्षकाच्या दुसऱ्या एका कथेतून कट्टर जातिव्यवस्था स्त्रीच्या लैंगिकतेवर कसे प्रभुत्व गाजवते, हे आपल्या लक्षात येते. या कथेत मध्यम जमीनदार जातीचा एक पुरुष एका मजूर माडिगा स्त्रीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करतो.

त्यामुळे दलित स्त्रीला पुरुषप्रधान संस्कृतीच्या अनेकविध छळांना कसे सामोरे जावे लागते, कसे स्वत:ला त्यांच्या अधीन करावे लागते याचे दर्शन येथे घडते. मनुस्मृती, मत्स्यपुराण आणि अन्य असंख्य दुराग्रही भाष्यग्रंथांनी या स्त्रीला जखडून ठेवलं आहे. त्यामुळे तिच्या देहावर तिची सत्ता नाही. कसलंच स्वातंत्र्य तिला उरलेलं नाही.

हे ग्रंथ तिच्या पराधीनतेचे, तिच्या हीन दर्जाचे समर्थन करतात. तिला कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य नाकारतात. तिचा निवडीचा अधिकार नाकारतात. ‘अन्नाला जात असते का?’ अशा शीर्षकाच्या दुसऱ्या एका कथेत जातिव्यवस्थेनं निर्मिलेले हे पद्धतशीर दुष्टाचार समाजाच्या सर्व स्तरात किती खोलवर झिरपलेले आहेत आणि आजही कसे चालूच आहेत, याचं अधिक स्पष्ट दर्शन घडतं.

या कथेत सतत स्थलांतर करणाऱ्या भटक्या जमातीतील लोक माडिगा लोकांनी दिलेलं धान्य स्वीकारायला तयार होत नाहीत. खालील वाक्यातून या माडिगा लोकांच्या भावना नेमकेपणाने व्यक्त झाल्या आहेत ‘‘ बरोबर आहे तुमचं. या देशात फक्त माणसांना मिळालाय जात नावाचा शाप. कुत्र्यांना मुळीच नाही! ती सुटलीत त्यातून!’’

डॉ. आंबेडकरांनी आपल्या लेखनात ‘चढत्या श्रेणीतील मानसन्मान’, ‘उतरत्या श्रेणीतील तुच्छभाव’ किंवा ‘अनुकरणाचा संसर्ग’ अशा कल्पना मांडलेल्या आहेत. या कथा वाचताना त्यांच्या अर्थाबद्दल अधिक चिंतन केल्यावाचून राहवत नाही.

आणखी एका कथेचे शीर्षक आहे, ‘मते आणि बीफ’. लेखक या कथेत दलित मतं आणि निवडणुकीचे राजकारण यांच्यातील द्वंद्वात्मकता अतिशय मार्मिक पणे आपल्यासमोर मांडतो. सामाजिक विषमता कायम राखण्यासाठी राजकीय लोकशाहीचा विकृत वापर केला जातो. या साऱ्याच मूळ कारण आपल्याला शिक्षणात - खरं तर त्याच्या अभावात - सापडेल.

हे विधान पाहा ‘‘ अण्णा, आपण माडिगा लोक आपलं डोकंच वापरत नाही बघा. म्हणूनच आपण या शिकाऱ्यांचं सहज सावज होतो...’’ यातून दलितांची होणारी कोंडी आपल्याला दिसते. बहुसंख्याकवादी भारतीय लोकशाहीने त्यांचा ऐतिहासिक विश्वासघात केला आहे.

धर्म आणि जात यांचं नाव घेत निवडणुकीच्या मार्गे येणारी निरंकुश सत्ता येथे राज्य चालवते. दलितांच्या स्वत:च्या राजकीय पक्षासह एकजात सगळेच पक्ष दलितांच्या अज्ञानाचा फायदा घेतच राहतात.

हा संग्रह जातीच्या नावावर केल्या जाणाऱ्या घोर अन्यायाबद्दल तर सांगतोच पण त्याचवेळी माडिगांच्या जातिअंतर्गत लोकाचाराचं, त्यांच्या सकस सौंदर्यशास्त्राचं आणि समृद्ध लोककलांचं मोहक दर्शनही त्यातून घडतं. या कथा म्हणजे जणू माडिगांचं वंशशास्त्रीय चित्रण आहे. एकदा हाती घेतल्यावर हे पुस्तक संपवल्याशिवाय राहवत नाही.

थॉमस पिकेटी हा अर्थशास्त्रज्ञ कॅपिटॅलिझम अँड आयडिऑलॉजी या आपल्या उत्कृष्ट ग्रंथात म्हणतो, “विषमता ही केवळ आर्थिक नसते तर ती विचारधारा आणि राजकारण यांचा एकत्रित परिपाक असते.” सुधाकर यांची ही संहिता तिच्या वैशिष्ट्यपूर्ण परिप्रेक्ष्यातून वाचली तर या साऱ्या बारकाव्यांना ती खोलवर स्पर्श करत असल्याचे जाणवेल. या साऱ्या सूक्ष्म छटा चाणाक्ष वाचकाच्या लगेच ध्यानात आल्यावाचून राहणार नाहीत.

हे पुस्तक म्हणजे स्वतःची नैतिक मूल्ये आणि त्यांचा पाया याबद्दल कसून प्रश्न उपस्थित करण्याचे वाचकांना केले गेलेले एक आग्रही आवाहनच आहे. या स्वरूपाचा हा अगदी ताजा वाङ्मयीन हस्तक्षेप होय. निष्पक्ष आणि खुली मनोभूमिका ठेवून हे पुस्तक वाचणाऱ्या प्रत्येकाला आपल्या स्वत:च्या व्यक्तित्वात या वाचनामुळे आश्चर्यकारक परिवर्तन झाल्याचा अनुभव नक्कीच येईल.

अनुवाद : अनंत घोटगाळकर

(anant.ghotgalkar@gmail.com)

(लेखक हे आयआयटी दिल्ली इथं मानद व्याख्याते असून सामाजिक न्याय मंत्रालय इथं वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com