
ऋग्वेदकालीन मूर्तिपूजेविषयी विद्वानांत तीव्र मतभेद आहेत. मॅक्समुलर, विल्सन, मॅकडोनाल्ड् आदी पाश्चात्त्य विद्वानांच्या मते, वैदिक काळात मूर्तिपूजा प्रचलित नव्हती.
वेदांची विभागणी व नामकरण
- श्रीकृष्ण पुराणिक
यजुर्वेदाची ‘शुक्ल’ आणि ‘कृष्ण’ ही नावं पडण्यामागील कारणांची चिकित्सा विविध पंडितांनी विविध प्रकारे केली असली तरी त्यातील एक उपपत्ती अशी : शुक्ल-यजुर्वेदामध्ये केवळ ‘मंत्र’ असल्यामुळे तो स्वच्छ आणि शुद्ध म्हणूनच ‘शुक्ल’ आहे, तर कृष्ण-यजुर्वेदामध्ये ‘संहिता’ आणि ‘ब्राह्मण’ या दोन्ही भागांचं मिश्रण असल्यामुळे तो भाग ‘मलिन’ म्हणूनच ‘कृष्ण’ आहे असं म्हटलं गेलं असावं.
ऋग्वेदकालीन मूर्तिपूजेविषयी विद्वानांत तीव्र मतभेद आहेत. मॅक्समुलर, विल्सन, मॅकडोनाल्ड् आदी पाश्चात्त्य विद्वानांच्या मते, वैदिक काळात मूर्तिपूजा प्रचलित नव्हती. भारतीय विचारवंतांत वेंकटेश्वर दास व वृंदावन भट्टाचार्य हे ‘वैदिक काळात मूर्तिपूजा प्रचलित असावी’ असं म्हणतात. वेदांमध्ये देवांच्या मानवी रूपाचं वर्णन आढळत असलं तरी वेदांमध्ये त्यांच्या मूर्तिपूजा ध्वनित करणारी वचनं मुळीच सापडत नाहीत.
ऋग्वेद
ऋग्वेदातील रचना आणि शब्द द्वि-अर्थी आहेत. (ऋग्वेदाचे मंडलानुसार कवी असे - प्रथम मंडल : अनेक ऋषी, द्वितीय मंडल : गृत्समद, तृतीय मंडल : विश्वामित्र, चतुर्थ मंडल : वामदेव, पंचम मंडल : अत्री, षष्ठम मंडल : भारद्वाज, सप्तम मंडल : वसिष्ठ, अष्टम मंडल : कण्व व अंगिरा, नवम मंडल (पवमान मंडल) : अनेक ऋषी, दशम मंडल : अनेक ऋषी).
यजुर्वेद
‘यत् + जु = यजु’. ‘यत्’चा अर्थ गतिशील आणि ‘जु’ म्हणजे आकाश.
याशिवाय ‘यजु’ चा अर्थ आहे कर्म, श्रेष्ठतम कर्माची प्रेरणा. यजु अर्थात् गतिशील आकाश आणि कर्म. यजुर्वेदात यज्ञविधी आणि यज्ञप्रयोग मंत्र आले आहेत. याशिवाय तत्त्वज्ञानवर्णन आलं आहे. तत्त्वज्ञान अर्थात् रहस्यमयी ज्ञान. ब्रह्मांड, आत्मा, ईश्वर आणि पदार्थ यांचं ज्ञान.
या वेदाच्या दोन संहिता (शाखा) आहेत : शुक्ल आणि कृष्ण. वैशंपायन ऋषींचा संबंध कृष्ण शाखेशी आणि याज्ञवल्क्य ऋषींचा संबंध शुक्ल शाखेशी आहे. दोहोंमध्येही धार्मिक अनुष्ठान करण्यासाठीचे मंत्र आहेत.
कृष्ण-यजुर्वेदाच्या संहितेतच ‘ब्राह्मण’ग्रंथातील गद्य भाग दिलेले आहेत, तर शुक्ल-यजुर्वेदासाठी ते ‘शतपथब्राह्मणा’त स्वतंत्रपणे दिलेले आहेत. ‘शतपथब्राह्मण’ हा शुक्ल यजुर्वेदाचा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ होय. ‘याज्ञवल्क्यशिक्षा’ हा ग्रंथ या वेदाच्या पठणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे.
कृष्ण यजुर्वेद
तैत्तिरीयसंहिता : उद्गम आणि महत्त्व : वैदिक साहित्यात यजुर्वेद आणि सामवेद यांचा यज्ञीय कर्माशी साक्षात् आणि घनिष्ठ संबंध असलेला आढळून येतो. यजुर्वेदाचा उपयोग अध्वर्यू आणि त्याचे सहकारी हे प्रामुख्यानं करतात. यज्ञक्रियेतील प्रत्यक्ष शारीरिक हालचालींचा भाग हा अध्वर्यूकडे असल्यामुळे अध्वर्यूला आणि यजुर्वेदाला कर्मकांडात जास्त महत्त्व असणं स्वाभाविकच आहे.
कृष्ण-यजुर्वेदाच्याही पुन्हा अनेक उपशाखा आहेत. आणि, त्यांपैकी तैत्तिरीयशाखा ही सर्वांगपरिपूर्णस्वरूप मानली जाते. ती आजही उपलब्ध आणि प्रचलित असल्यामुळे तिला विशेष महत्त्व असणं स्वाभाविकच आहे.
सायणाचार्यांनी अनेक वैदिक ग्रंथांवर भाष्य लिहिलेलं असलं तरी यजुर्वेद हा यज्ञकर्माच्या बाबतीत ‘भित्तिस्थानीय’ म्हणूनच अधिक महत्त्वाचा मानून कृष्ण-यजुर्वेदाच्या तैत्तिरीयसंहितेवरच प्रथम भाष्य लिहिलं आहे.
सारस्वतपाठ आणि आर्षेयपाठ : तैत्तिरीय शाखेच्या ‘सारस्वतपाठा’त ‘संहिता’, ‘ब्राह्मण’ व ‘आरण्यक’ या भागांचा समावेश आहे. ‘सारस्वतपाठा’संबंधी पुढीलप्रमाणे पौराणिक कथा आहे : एकदा ब्रह्मसभेत दुर्वासमुनी सामगायन करत होते.
त्यांना पाहून सरस्वतीदेवीनं स्मित केलं. त्यावर क्रुद्ध झालेल्या मुनींनी सरस्वतीला शाप दिला की, ‘तू मर्त्य म्हणून जन्माला येशील.’ मग सरस्वतीनं त्यांचं मन प्रसन्न केलं. नंतर मिळालेल्या वरदानानुसार, सरस्वतीचा जन्म आत्रेयगृहात झाला.
तिला वेदविद् असा पती मिळाला. तिनं विद्यानिधी पुत्राला जन्म दिला. त्याला पित्यानं वेद शिकवला. पित्यानं एकदा त्याला छडीनं मार दिला तेव्हा तो रडू लागला. मग आईनं, म्हणजे सरस्वतीनं, त्याला सर्व वेदांचं अधिपती केलं. पुढं या सरस्वतीपुत्रानं अन्य मुनींना वेदाध्यापन केलं. त्यानं ज्या क्रमानं पाठ दिला त्याला ‘सारस्वतपाठ’ असं नाव आहे.
तैत्तिरीयशाखेच्या दुसऱ्या पाठाला ‘आर्षेयपाठ’ असं म्हणतात. विषयानुक्रमानं केलेली मांडणी हे या पाठाचं वैशिष्ट्य आहे. त्यानुसार ‘संहिता’, ‘ब्राह्मण’, ‘आरण्यक’ यांमधील एका विषयाच्या अनुवाकांची मांडणी एकत्र केली गेली आहे. इथं पाच कांडे असून त्यांना ‘प्राजापत्य’, ‘सौम्य’, ‘आग्नेय’, ‘वैश्वदेव’, ‘स्वायंभुव’ अशी नावं आहेत. त्यांचे अनुक्रमे ‘प्रजापती’, ‘सोम’, ‘अग्नी’, ‘विश्वेदेव’ आणि ‘स्वयंभू’ असे ऋषी आहेत.
शुक्ल यजुर्वेद
वेद म्हणजे काय? ‘ऐहिक कर्मे’ व ‘पारलौकिक फल’ यांचा संबंध दाखवणारं ज्ञान ज्या ग्रंथांतून प्राप्त होतं त्या ग्रंथांचा जो प्रतिपाद्य विषय, त्याला ‘वेद’ ही संज्ञा प्राप्त झाली. ‘श्रीमद्भागवता’त (९.१४.४९) मध्ये म्हटलं आहे की, ‘एक एव पुरा वेदः प्रणवः सर्ववाङ्मयः’. फार पूर्वी वेद (ग्रंथ) एकच होता.
पुढं मनुष्याची बुद्धी थोटकी होत गेल्यामुळे कुणा एकाला संपूर्ण वेदांचं अध्ययन करणं दुरापास्त होऊ लागलं. बादरायण श्रीव्यासांनी ही अडचण जाणून त्याचे चार भाग केले आणि एकेका शिष्याला एकेका वेदामध्ये पारंगत करण्याची व्यवस्था केली, ती अशी: पैल ऋषीला ऋग्वेद, वैशंपायनाला यजुर्वेद, सुमंताला सामवेद व जैमिनीला अथर्ववेद.
असे वेद त्यांनी शिष्यांना शिकवले. यांपैकी पहिले तीन म्हणजे ‘ऋक्’, ‘यजु’ व ‘साम’ हे मुख्यत्वे यज्ञप्रक्रियेशी संबंधित असून ‘अथर्व’ या वेदात विषयबाहुल्य असल्याचं आढळतं. बहुधा त्याचा मुख्य विषय ‘यज्ञ’संस्कृतीला धरून नसल्यामुळे त्याला इतर तीन वेदांच्या मानानं गौण स्थान दिलं गेलं आहे.
श्रीमद्भगवद्गीतेतही भगवान श्रीकृष्णांनी फक्त तीन वेदांचा उल्लेख केलेला आहे. ऋग्वेदात प्राधान्येकरून गुण व गुणी यांचं विज्ञान, त्यांचं मुख्यत्वे वर्णन आढळतं, तर यजुर्वेदात यज्ञकर्म हा मुख्य विषय आढळतो. सामवेदात ‘उपासना’ हा मुख्य विषय आहे.
श्रीव्यासांनी वेदांचे चार विभाग केल्यानंतर पुढं शिष्यपरंपरेनं प्रत्येक वेदाच्या अनेक शाखा झाल्या; पण यजुर्वेदाचे दोन भेद झाले आणि दोन्ही भेदांच्याही पुन्हा अनेक शाखा झाल्या. ऋग्वेदाच्या २१ शाखा झाल्या असा उल्लेख बऱ्याच ठिकाणी पहायला मिळतो; पण त्यापैकी दोनच शाखा सध्या अस्तित्वात आहेत असं म्हणतात. यजुर्वेदाच्या दोन्ही भेदांच्या शाखांबद्दल निरनिराळे उल्लेख आढळतात. यजुर्वेदाच्या एकूण १०९ शाखा होत्या असा उल्लेख ‘मुक्तिकोपनिषदा’त आहे; पण कृष्ण-यजुर्वेदाच्या ८६
शाखा व शुक्ल यजुर्वेदाच्या १५ शाखा आहेत असे उल्लेख ‘कूर्म’, ‘ब्रह्मांड’ व ‘स्कंद’ या पुराणांमध्ये आढळतात. श्रीव्यासांनी वेदांचे जे चार भाग केले त्यांना ‘ब्रह्मपरंपरा’ असं म्हटलं जातं. मूळ वेद ब्रह्मदेवनिर्मित मानले जातात. त्यांच्यानंतर वशिष्ठ, त्यांचे पुत्र शक्ती, मग पाराशर व त्यानंतर व्यास अशी ही परंपरा असल्यामुळे चारही वेदांचं वर्गीकरण ही ‘ब्रह्मपरंपरा’ मानली जाते.
वर म्हटल्यानुसार, श्रीव्यासांकडून ज्यांच्याकडे यजुर्वेद आला त्या वैशंपायन ऋषींचे एक शिष्य याज्ञवल्क्य हे होत. याज्ञवल्क्यांचा एकदा वैशंपायन यांच्याशी विवाद झाल्यामुळे ‘सर्व वेद परत करून माझा आश्रम सोडून जा’ अशी आज्ञा त्यांनी याज्ञवल्क्यांना केली. याज्ञवल्क्यांनी वैशंपायन यांच्याकडून घेतलेली सर्व विद्याच आपल्या स्मृतीतून पुसून टाकली.
मग पुढं बराच काळ तपश्चर्या करून याज्ञवल्क्यांनी सूर्यनारायणाला प्रसन्न करून घेतलं. त्यांनी आदित्याला प्रार्थना केली की, ‘मला कुणा मानवाकडून विद्या नको, मला आपणच वेद शिकवावा.’ त्यानुसार सूर्यनारायणानं त्यांना चारी वेद शिकवले, अशी आख्यायिका आहे.
‘विष्णुपुराणा’त म्हटलं आहे की, सूर्यनारायणानं याज्ञवल्क्यांना वेद शिकवताना ‘वाजिन्’ (म्हणजे घोड्याचं) रूप घेतलं होतं, म्हणून वेदांची पुढं ‘आदित्यपरंपरा’ झाली असं मानलं जातं.‘वाजिन्’ रूपानं वेद शिकवले गेल्यामुळे त्या वेदसंहितेचं ‘वाजसनेय संहिता’ असं नामाभिधान झालं.
‘वाजसनेय संहिता’ असा उल्लेख केवळ यजुर्वेदासंदर्भातच पाहायला मिळतो. इतर वेदांच्या संबंधात (वाजसनेय) असा उल्लेख आढळत नाहीत. याज्ञवल्क्यांना जरी चारी वेद मिळाले तरी त्यांनी यजुर्वेदाचाच प्रसार केला असं दिसतं. त्यांच्या या आदित्यप्राप्त यजुर्वेदाच्या संहितेला ‘शुक्ल-यजुर्वेद’, तर यजुर्वेदाच्या पूर्वापार संहितेला ‘कृष्ण-यजुर्वेद’ असं म्हटलं जाऊ लागलं.
कृष्णवेदाचं दुसरं नाव ‘तैत्तिरीय संहिता’ कशामुळे?
तर...याज्ञवल्क्यांच्या तेजस्वी बुद्धिमत्तेमुळे पूर्वी त्यांनी वैशंपायनांकडून जो यजुर्वेद ग्रहण केला होता तशा प्रकारे वैशंपायनांच्या इतर कोणत्याही शिष्यानं तो आत्मसात केला नव्हता. म्हणून जेव्हा वैशंपायनांनी याज्ञवल्क्याला ‘सर्व वेद ओकून टाक’ असं सांगितलं तेव्हा इतर शिष्यांनी वैशंपायनांकडे एक इच्छा व्यक्त केली.
याज्ञवल्क्यानं जो वेद आत्मसात केला होता तो सर्व त्याच्याकडून जाणून घ्यायचा आहे ही ती इच्छा. याज्ञवल्क्यांना आश्रम सोडून जाण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्या आठ दिवसांत आपल्याकडे असलेलं (यजुर्वेदाचं) सर्व ज्ञान याज्ञवल्क्यांनी वैशंपायनांच्या इतर शिष्यांमध्ये वाटून टाकलं.
याज्ञवल्क्यांनी त्यागलेला यजुर्वेद हा - तित्तिर पक्षी जसा दाणे वेचून घेतो त्याप्रमाणे - इतर सर्व शिष्यांनी वेचून घेतला, अशी आख्यायिका असल्यामुळे त्या आख्यायिकेच्या उपमेनुसार यजुर्वेदाच्या मूळ संहितेचं पुढं ‘तैत्तिरीय संहिता’ असं नामकरण झालं.