
ज्ञानेश्वरीचे वेगळे पैलू पुढे आणणारा संशोधक पां. ना. कुलकर्णी
डॉ. स्मिता वि. कुलकर्णी
प्रा. पां. ना. कुलकर्णी यांची ओळख मराठी साहित्यातील एक व्यासंगी संशोधक म्हणून सर्वांना आहे. एक प्राध्यापक म्हणून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले. आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानांनी समाजप्रबोधनही केले. त्यांच्या संशोधनपर लेखनाचा आवाकाही फार मोठा आहे. ज्ञानेश्वरीच्या प्राचीनतम हस्तलिखिताचे सरांनी केलेले संपादन हे त्यांचे थोर संशोधनकार्य आहे.
पां. ना. सरांच्या जन्मशताब्दीचे हे वर्ष आहे. म्हणून या निमित्त्याने त्यांचे स्मरण करणे उचित ठरेल. पां. ना. सरांचा जन्म २५ऑक्टोबर १९२२ रोजी, तेरवाड ( जि.कोल्हापूर) या गावी झाला. सरांच्या आई तेरवाडच्या इनामदार घराण्यातील. हे तेरवाडकर म्हणजे संत एकनाथमहाराजांचे नातू कवी मुक्तेश्वर यांचे वंशज. अतिशय भक्तिमय वातावरण असलेले आजोळ सरांना लाभले. सरांची जन्मतिथी कार्तिकी द्वादशी. म्हणून त्यांचे नाव ठेवले पांडुरंग. सरांच्या वडिलांना पंतमहाराज बाळेकुंद्रीकरांच्या घरी शिक्षणासाठी म्हणून राहण्याचे भाग्य लाभले होते. रोज संध्याकाळी पंतमहाराजांची भजने म्हणण्याचा परिपाठ बेडकीहाळच्या (जि.बेळगावी) त्यांच्या घरी होता. अशा संस्कारसंपन्न वातावरणात त्यांचे बालपण गेले.
पां. ना. सरांचे प्राथमिक शिक्षण बेडकीहाळच्या मराठी शाळेत झाले. तर पुढील माध्यमिक शिक्षणासाठी ते कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड या गावी आले आणि तेथील एस्. पी. हायस्कूलमध्ये त्यांचे पुढील शिक्षण सुरू झाले. बेडकीहाळ, तेरवाड, कुरुंदवाड या तीनही गावांविषयी त्यांच्या मनात विशेष आस्था होती. या आणि अशा लहान गावांमध्ये, साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात सरांचा पुढाकार असे. तेरवाड हे कवी मुक्तेश्वरांचे गाव. त्यांच्या स्मरणार्थ कवी मुक्तेश्वर साहित्य प्रतिष्ठानची स्थापना व्हावी असा आपला मनोदय पां.ना. सरांनी व्यक्त केला.तेव्हा कुरुंदवाडच्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने 'कवी मुक्तेश्वर प्रतिष्ठान, कुरुंदवाड'ची स्थापना करण्यात आली.
सन २००१ पासून या प्रतिष्ठानचे कार्यक्रम ,कुरुंदवाड गावी नियमित होत आले आहेत. त्यामुळे त्या परिसरातील गावांना आजही वाङ्मयाभ्यासाचा लाभ होत आहे. पां.ना. सरांनी संपादित केलेल्या 'ज्ञानेश्वरी नववा अध्याय' या पुस्तकाची अर्पणपत्रिका अतिशय भावपूर्ण अशी आहे. बेडकीहाळ या गावाला त्यांनी हे पुस्तक अर्पण केले आहे.आणि आपल्या मातीशी असलेले अतूट नातेच त्यांनी यातून व्यक्त केले आहे. बेडकीहाळ गावानेही पां.ना.सरांविषयीचा आदरयुक्त जिव्हाळा व्यक्त केला आहे. तेथील के.एम्. महाविद्यालयात 'प्रा.पां.ना.कुलकर्णी स्मृतिदालन' आहे. पां.ना.सरांनी लिहिलेल्या आणि संपादित केलेल्या सर्व ग्रंथांची मांडणी येथे केलेली आहे. सरांची काही छायाचित्रेही या स्मृतिदालनात आहेत.
कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात आपल्या अध्यापनाने अनेक विद्यार्थ्यांना पां.ना.सरांनी विद्यादान केले. सरांचे शिकविणे केवळ वर्गापुरते मर्यादित नव्हते. गीता मंदिर ट्रस्ट, चिन्मय मिशन, दत्ताबाळ मिशन डिव्हाईन, प.पू. रुकडीकर महाराज ट्रस्ट, करवीर शंकराचार्य पीठ अशा कोल्हापुरातील अनेक सांस्कृतिक संस्थांशी सरांचे जिव्हाळ्याचे नाते होते. खेडोपाडी होणाऱ्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात, पंतमहाराज बाळेकुंद्रीकरांच्या भक्तमेळाव्यात, आणि कितीतरी तीर्थक्षेत्रांमध्ये बोलण्यासाठी पां.ना.सर श्रध्देने जात असत. ज्या श्रध्देने ते ज्ञानेश्वरमहाराजांच्या मूर्तीला वंदन करीत, त्याच श्रध्देने ते ज्ञानेश्वरी पारायणाला बसलेल्या समुदायालाही वंदन करीत.त्यांच्या श्रध्देला, व्यासंगाचे पाठबळ होते.
" शिक्षण आणि साहित्य यांमुळे व्यक्तिव्यक्तीबरोबरच सगळा समाजही उन्नत होतो", असे सरांचे सांगणे असे. म्हणूनच असे साहित्य निर्माण करणाऱ्या लेखकांना आणि असे साहित्य वाचणाऱ्या वाचकांनासुध्दा त्यांनी गौरविले. ज्ञानदान ही सरांची जीवननिष्ठा होती. आपल्या ज्ञानाला त्यांनी कधी बंदिस्त ठेवले नाही. कितीतरी विद्यार्थी, अभ्यासक, जिज्ञासू श्रोते, सांस्कृतिक मंडळांचे कार्यकर्ते सरांकडून मिळालेल्या ज्ञानसंस्कारांचा अभिमानाने उल्लेख करतात. ज्ञानदानाचे हे कार्य मेघवृष्टीइतक्या स्वाभाविकपणाने आणि निरपेक्षपणाने सरांच्याकडून होत असे.
कोल्हापुरात होणाऱ्या काही कार्यक्रमांना श्रोता म्हणूनही पां.ना. सर तितक्याच जबाबदारीने जात. काही नवे, चांगले ऐकायला लोकांना आवडते. तेव्हा असे कार्यक्रम नियमितपणे सादर करण्यासाठी एखादे व्यासपीठ असावे असे त्यांना वाटायचे.तेव्हा त्यांच्या मार्गदर्शनाने कोल्हापूरचे वाङ्मय चर्चा मंडळ सुरू झाले. सरांच्या साहित्यिक परिवारात डॉक्टर, इंजिनिअर, बॅंकेतील अधिकारी, गायक अशा विविध व्यक्तींचा समावेश असे. या सर्वांच्या मनातील सुप्त साहित्यिकाला पां.ना. सरांची प्रेरणा मिळाली आहे.
संत साहित्य हा पां.ना. सरांच्या अभ्यासाचा , चिंतनाचा विषय. 'संतसाहित्य ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ठेव आहे' असे सर सांगत. असे संस्कारक्षम साहित्य प्रत्येकाला आत्मसात करता यावे म्हणून ते आपल्या लेखनामधून, व्याख्यानांमधून त्याचा उल्लेख सातत्याने करीत असत. संतांच्या थोर कार्याविषयी सरांनी म्हटले आहे, `` समाजातील विषमतेची शल्ये कमी करायची असा संतांचा प्रयत्न होता. सामंजस्याची, सलोख्याची भूमिका संतसाहित्यातून व्यक्त होते. संतसाहित्यातील हा आशय नव्या पिढीला समजावून द्यावयास हवा." संतसाहित्यातील मूल्यांनुसार सरांचे आचरण होते.
महाराष्ट्रातील मठमंदिरांमध्ये, खाजगी संग्रहात, केवळ बासनात गुंडाळून पडलेल्या हस्तलिखितांचा शोध घेऊन, त्यांचे अभ्यासपूर्ण संशोधन पां. ना. सरांनी केले आणि या ग्रंथांना नवजीवन दिले. या त्यांच्या संशोधनकार्यामुळे नामवंत अभ्यासकांनी त्यांच्याविषयी ऋण व्यक्त केले आहे.
ज्ञानेश्वरीच्या आजवर उपलब्ध प्रतींमधील आद्य प्रतीची प्राप्ती पां. ना. सरांना, त्यांच्या या शोधाशोधीतूनच झाली. कोल्हापुरातील श्रीमहालक्ष्मी देवीचे वहिवाटदार असलेल्या प्रधान घराण्यातील श्री. भालचंद्र प्रधान यांच्याकडे जुन्या हस्तलिखितांचा संग्रह होता. तो पाहण्यासाठी सरांना बोलावण्यात आले होते. हळुहळू एकेक पोथी उघडायची, व्यवस्थित पाहून तिची नोंद करून ठेवायची, असा धांडोळा घेत असताना, सरांना ज्ञानेश्वरीचे हे हस्तलिखित मिळाले. शके १४९० असा स्पष्ट कालोल्लेख या पोथीत होता.
ज्ञानेश्वरीच्या आजवर उपलब्ध असलेल्या प्रतींमधील सर्वांत प्राचीन प्रत, हे या प्रतीचे वैशिष्ट्य आहे. जवळ जवळ दोन तपांनी पां.ना. सरांचे हे लेखनकार्य पूर्ण झाले. (इ.स.१९७२ते १९९२). कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने ग्रंथप्रकाशनाचे उत्तरदायित्व स्वीकारले. डेमिसाईज अशा या ग्रंथाचे नेत्रसुखद मुद्रण नवरंग ऑफसेट, कोल्हापूर यांचे आहे. ९फेब्रुवारी १९९३ रोजी शिवाजी विद्यापीठाच्या शाहू सभागृहात प्रा.पां.ना.कुलकर्णी संपादित 'ज्ञानेश्वरी' या ग्रंथाचा प्रकाशनसोहळा संपन्न झाला. कुलगुरू डाॅ.अप्पासाहेब वरुटे माजी सर न्यायाधीश यशवंतराव चंद्रचूड आणि बाबामहाराज सातारकर यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन झाले.
याच कार्यक्रमात पां. ना. सरांनी ज्ञानेश्वरीचे हे प्राचीनतम आणि अत्यंत महत्त्वाचे हस्तलिखित भालचंद्र प्रधान यांच्या संमतीने, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. अप्पासाहेब वरुटे यांच्या स्वाधीन केले. पुणे विद्यापीठांतर्गत संत नामदेव अध्यासनाकडून स्वामी स्वरूपानंद पुरस्कार पां.ना.सरांना देण्यात आला. कोल्हापूर महापालिकेकडून करवीरभूषण या सन्मानाने सरांना गौरविण्यात आले.
- डॉ. स्मिता वि. कुलकर्णी (पुणे). मोबा. ९८२३३६४०८३
Web Title: Researcher Who Brought Forward Different Aspects Of Dnyaneshwari P N Kulkarni
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..