त्यादिवशी जिमीमुळेच तो अतिप्रसंग टळला

रेश्‍मा दास
रविवार, 11 ऑगस्ट 2019

तीन वर्षांपूर्वी आलेला असाच अनुभव नात्यांची गुंफण घालून गेला. डिग्री संपली आणि कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये मल्टिनॅशनल कंपनीमध्ये एचआर डिपार्टमेंटमध्ये जॉइन झाले.

‘‘आप मूँहमाँगी दुआ
हम अनसुनी फरियाद हैं’’

गाणे संगीत लहरीसोबत ठेका धरत पुढे निघून गेले आणि विचार या ओळीभोवती पिंगा धरू लागले. ‘उपेक्षित’ किंवा नको असताना अस्तित्वात आलेला किंवा असूनही नसल्यासारखा... असे कितीतरी टोचत आणि भेदत जाणारे शब्दार्थ घुमू लागले.

कधी कर्ण आठवला
कधी एकलव्य
कधी ऊर्मिला
कधी ययाती

तर कधी असंख्य अनाथ बाळे आणि निराश्रित आई-बाप... उपेक्षित असणे शाप असावा कदाचित.

तीन वर्षांपूर्वी आलेला असाच अनुभव नात्यांची गुंफण घालून गेला. डिग्री संपली आणि कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये मल्टिनॅशनल कंपनीमध्ये एचआर डिपार्टमेंटमध्ये जॉइन झाले. चांगल्या पदावर असल्याने काही सहकारीवर्गही चांगलाच मिळाल्याने खूपच खूष होते. साधारण दोन शिफ्टमध्ये काम होते. कधी फर्स्ट तर कधी सेकंड शिफ्टमध्ये काम चालू असायचे. आय. टी. पार्कमध्ये तसा गजबजाट कमीच. पण, सर्व शिस्तीत चालायचे.

सेकंड शिफ्ट संपली. साधारण अकरा-सव्वाअकरा वाजल्याने रात्री रस्त्यावर वाहने तुरळकच दिसत होती. पावसाळ्याच्या दिवसांत गर्दी कमीच. पाऊस सुरूच होता. 

रस्ता दररोजचाच. गेले दोन महिने कंपनीची बस आम्हा सर्वांना सोडवायला, घ्यायला होती म्हणून निशा माझी मैत्रीण व मी एकाच स्टॉपवर चढायचो, उतरायचो. चांगली गट्टी जमली होती तिची न माझी. आमच्या नंतरच्या स्टॉपला अंधारेकाका आणि जिमी. जिमी तसा इतरांपेक्षा वेगळा होता. आपण इतरांप्रमाणे नाही, या जाणिवेने सतत विचारमग्न आणि एकटा असायचा. गप्पाटप्पा मस्त मजा करीत दीड-दोन तासांचा प्रवास सुखकर व्हायचा.

त्या दिवशी निशाच्या बहिणीचे लग्न असल्याने ती आली नव्हती. अंधारेकाका आजारी असल्याने रजेवर होते. आणि जिमी त्याच्या मित्राकडे-राहुलकडे जाणार म्हणून माझ्या आधीच्या स्टॉपवर उतरला. बस जरा पंधरा मिनिटे एखादा किलोमीटर पुढे गेली. नेहमीप्रमाणे गप्पा नव्हत्या. संपूर्ण बसमध्ये मी एकटीच मोबाईलवर मेसेज वाचत बसले होते. तेवढ्याच ब्रेक लागून बस थांबली. आजूबाजूला अंधार-काळोख. ‘‘काय झालं’’ म्हणून मी विचारेपर्यंत ड्रायव्हर उठून माझ्याकडे येताना दिसला. मी उठून जोराच्या आवाजात, ‘‘बस का थांबवली? चला उशीर होतोय. हे काय चाललंय?’’ विचारत होते. पण, त्याच्या डोळ्यांत मला घाणेरडी वासना दिसली. मी जोराजोरात ओरडू लागले. दरवाजाकडे आणि इमर्जन्सी एक्‍झिटकडे धावू लागले. तो दरवाजा बंद करून मला अडवत होता. मी जोराजोरात ओरडत ‘हेल्प’, ‘मदत करा’ म्हणून खिडक्‍यांच्या काचा आपटू लागले. अंधारात सुनसान रस्त्यावर कोणीही नव्हते. थरकाप उडाला. मी भयाण घाबरले. क्षणात आई-बाबा दिसू लागले. रडून धावा करू लागले. पण, त्याला सापडत नव्हते. बसण्याचे शीट्‌स हातापायाला लागून दुखत होते. पण, त्याच्या हाती लागत नव्हते. 

जिवाच्या आकांताने ओरडत होते. ‘वाचवा’, ‘हेल्प, हेल्प’ बसच्या मागून कोणीतरी पळत येणारी सावली दिसली. अस्पष्ट-स्पष्ट. बसच्या मागच्या दरवाजावर लाथा मारून, ओरडून, दरवाजा तोडून आत येणारा जिमी होता. त्याने ड्रायव्हरला बेदम मारले. फोन करून पोलिसांना आणि मित्रांना बोलावले. राहुलही होता त्यामध्ये. 

पोलिस स्टेशनची कार्यवाही होऊन मला जिमी आणि राहुलने माझ्या घरी सोडले. पुढचे आठ दिवस मी त्या धक्‍क्‍यातच होते. राहुलसाठी जिमी त्या दिवशी मागच्या स्टॉपला उतरला. पण, राहुल पुढच्या स्टॉपला थांबला होता. चुकून चुकणे कधीकधी बरोबर असते. 

हळूहळू सावरले. अतिप्रसंग टळला. जिमीमुळे माझ्यावरचे संकट टळले होते. आई-बाबांना भेटायला राहुल आणि जिमी आले होते. सुट्टीच होती रक्षाबंधनाची. आणि योगायोगाने रविवार. जिमीने रक्षाबंधनाचा संरक्षक अर्थ निभावला होता. राहुलसोबत मी आज जिमीलाही राखी बांधली. राहुलने सांगितले होते तो तृतीयपंथी आहे. समाजबाह्य गोष्टी समाजानेच स्वीकारल्या पाहिजेत. निदान साशंक न राहता समजुतीने तरी स्वीकाराव्यातच.

राखी बांधताना माझ्या डोळ्यांत जाणिवेचे पाणी होते, तर त्याच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे. ते पाणी त्या गाण्याच्या ओळी पुसून गेले आणि आजही तीन वर्षांनंतर प्रत्येक राखीपौर्णिमेला आणि भाऊबिजेला ओवाळणीच्या दिव्यातून प्रकाश बनून चमकत राहील. माझ्या अखेरच्या श्‍वासापर्यंत. 

जिमी ओवाळणी गिफ्ट देत होता आणि त्याच्या गिफ्टला रिटर्न गिफ्ट मी पुटपुटले...

जिमी,
तू म्हणजे पवित्र नातं 
समंजस, निखळ, निःस्वार्थ
निस्सीम विश्‍वासाचा
दादा, मला एवढाच कळतो अर्थ.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reshma Das Article Aboute Jimi