प्रहारामागची वज्रमूठ (पी. व्ही. नाईक)

retired air chief marshal p v naik
retired air chief marshal p v naik

हवाई दलाचा वापर म्हणजे युद्धाचं शेवटचं टोक हा पारंपरिक युद्धपद्धतीचा दृष्टिकोन आधुनिक काळात मोडीत निघाला आहे. अत्यंत कमी वेळेत पाकिस्तानला नेमका झटका देऊन भारताची सामरिक शक्ती आणि त्याला थेट संदेश देण्यासाठी भारतानं वीस वर्षांनंतर प्रथमच हवाई दलाच्या क्षमतेचा अचूक वापर केला. हा वज्रप्रहार नेमका कसा झाला, त्यासाठी काय काळजी घेण्यात आली, या मोहिमेची वैशिष्ट्यं काय आदी गोष्टींचा वेध.

काश्‍मीरमधल्या प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर पाकिस्तान गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं कुरघोडी करायचा. आपणही तेवढ्यापुरतं प्रत्युत्तर देत होतो. दहशतवाद्यांच्या माध्यमातून छुपं युद्ध करून भारताच्या खोड्या काढण्याचा उद्योग पाकिस्ताननं सातत्यानं सुरूच ठेवला आहे. काश्‍मीर खोऱ्यातल्या उरीच्या लष्करी तळावर झालेला दहशतवादी हल्ला हादेखील याच शृंखलेचा एक भाग होता. उरी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानं पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांच्या विरोधातली कारवाईची व्याप्ती वाढवण्यासाठी "सर्जिकल स्ट्राईक' केला; पण त्यातून पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी कोणता धडा घेतल्याचं दिसत नाही, तसंच तिथलं लष्कर आणि "इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स' (आयएसआय) यांनाही सर्जिकल स्ट्राईकमधून भारतानं दिलेल्या संदेशाचा अर्थ उलगडल्याचं दिसलं नाही. उलट त्यानंतरही जैशे महंमद या दहशतवादी संघटनेनं ता. 14 फेब्रुवारीला केंद्रीय राखीव दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर पुलवामा इथं आत्मघातकी हल्ला केला. त्यामुळं "पाकिस्तानच्या या कुरघोडींना आपण करत असलेला प्रतिकार निश्‍चितच पुरेसा नाही. तो अगदीच तोटका पडत आहे. पाकिस्तानच्या दीर्घकाळ लक्षात राहील असा धडा त्यांना शिकविला पाहिजे,' असं राज्यकर्त्यांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सगळ्यांनाच असं वाटत होतं. पुढचा कोणताही हल्ला करताना पन्नास वेळा विचार करतील, अशा प्रकारे पुलवामा हल्ल्याला प्रत्युत्तर देणं आवश्‍यक झालं होतं. त्यातून पाकिस्तानातल्या दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांवर हवाई हल्ला करण्याचा निर्णय भारताला घ्यावा लागला.
भारतीय लष्करानं गेल्या वर्षी सर्जिकल स्ट्राईक करून प्रत्यक्ष नियंत्रणरेषेच्या खूप जवळ असलेलं दहशतवाद्यांचे लॉंचिंग पॅड उद्‌ध्वस्त केलं होतं. याच लॉंचिंग पॅडवरून दहशतवादी भारतीय हद्दीत घुसखोरी करतात. अशा नेमक्‍या ठिकाणी लष्करानं सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवाद्यांना यमसदनी पाठवलं. त्यात आपले सर्व जवान सुखरूप भारतात परतले. लष्कराला अशा प्रकारची कारवाई फक्त नियंत्रणरेषेच्या जवळच करता येते- कारण त्यांना दहशतवादी तळ उद्‌ध्वस्त करून पुन्हा पटकन आपल्या हद्दीत येणं आवश्‍यक असतं. मात्र, या वेळी पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आपण हवाई हल्ल्याचं अस्त्र बाहेर काढलं. प्रत्यक्ष नियंत्रणरेषेच्या जवळचे दहशतवाद्यांचे लॉंचिंग पॅड उद्‌ध्वस्त करण्यासाठी यापूर्वीच सर्जिकल स्ट्राईक केला होता. त्यामुळं पुलवामा हल्ल्यानंतर भारत तशाच प्रकारचा सर्जिकल स्ट्राईक करेल, अशी एक शक्‍यता त्यांना वाटत होती. या शक्‍यतेच्या पुढं जाणारं लक्ष्य निश्‍चित करणं यावेळी आवश्‍यक होतं.

का निवडला हवाई हल्ल्याचा पर्याय?
हवाई दलाची खास वैशिष्ट्यं आहेत. ती लष्कर आणि नौदलाकडे नाहीत. त्यांना त्यांच्या लक्ष्यापर्यंत पोचण्यासाठी वाटेत येणाऱ्या प्रत्येकाला मारत पुढं जावे लागते. देशाच्या सीमेपासून आतमध्ये असणाऱ्या "लीडरशिप' आणि "स्ट्रॅटेजिक' लक्ष्यापर्यंत ही दलं थेट पोचू शकत नाहीत. हे काम फक्त हवाई दल करू शकतं. उड्डाण केल्यानंतर त्याच दिवशी थेट निश्‍चित केलेल्या लक्ष्यापर्यंत पोचण्याची क्षमता हवाई दलाकडे असते. पुलवामा हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रांना लक्ष्य करण्याचा निर्णय झाला. मात्र, लॉंचिंग पॅडप्रमाणं ही केंद्रं नियंत्रणरेषेच्या जवळ नव्हती, तर नियंत्रणरेषेपासून खूप आतमध्ये घनदाट जंगलांमध्ये होती. तिथं लष्कराला पाठवून हल्ला करण्यापेक्षा निश्‍चित केलेलं लक्ष्य वेधण्यासाठी हवाई हल्ल्याचा वापर करण्याचा निर्णय सरकारतर्फे घेण्यात आला.

हवाई दल अत्यंत चपळ असतं. निश्‍चित केलेलं लक्ष्य उडवून क्षणार्धात ही लढाऊ विमानं गिरकी घेऊन आकाशात दिसेनाशीही होतात; तसंच त्यांचा वेगवेगळ्या कारणांसाठी वापर केला जातो. जमीन, जंगल, उंच पर्वतशिखरं अशा कोणत्याही भूप्रदेशात युद्ध करण्याची क्षमता हवाई दलाकडे असते.
रणगाडे असोत, की युद्धनौका- त्यांच्या मारक क्षमतांना काही मर्यादा असतात. त्यांना ठराविक वजनापेक्षा जास्त स्फोटकांचा मारा करणं तांत्रिकदृष्ट्या शक्‍य नसतं; पण एअर स्ट्राईकमध्ये वापरलेल्या "मिराज 2000'मधून आपण दोन हजार पौंडांचा बॉंबगोळा अवघ्या दहा सेकंदांमध्ये आपल्या लक्ष्यावर अचूकपणे टाकला. यातून शत्रूला मोठा झटका बसला. हा "शॉक इफेक्‍ट' फक्त हवाई दल देऊ शकतं. शिवाय, हवाई दलाचा वापर केल्यानं पुलवामा हल्ल्याची आपण किती गांभीर्यानं नोंद घेतली आहे, याचा थेट संदेश पाकिस्तानाला यातून आपण दिला आहे.

वीस वर्षांनंतर हवाई दलाचा वापर
भारतानं सन 1971 च्या युद्धात हवाई दलाचा वापर केला होता. पूर्व पाकिस्तानपासून बांगलादेश वेगळा करताना पूर्वेकडच्या; तसंच त्यानंतर पश्‍चिम आघाडीवरही हवाई दलाचा प्रभावी वापर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केला होता. त्यानंतर सन 1999 मध्ये कारगिल युद्धात पाकिस्तानविरुद्ध पुन्हा हवाई दल वापरण्यात आलं. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी नियंत्रणरेषा न ओलांडण्याची सूचना केली होती. त्यावेळी उत्तुंग हिमशिखरांवर पाकिस्ताननं केलेली घुसखोरी परतवण्यासाठी हवाई दलानं आकाशात भराऱ्या घेतल्या होत्या. त्यामुळं सन 1971 नंतर म्हणजे 48 वर्षांनंतर प्रथमच भारतीय हवाई दलानं नियंत्रणरेषा ओलांडून पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रांवर हल्ला केला.

असा होता तीनही दलांचा समन्वय
युद्धकाळात किंवा एअर स्ट्राईकसारख्या मोहिमांमध्ये तीनही दलांमधील समन्वय महत्त्वाचा असतो. या मोहिमेध्येही निश्‍चितपणे तो होता. पाकिस्तानातल्या दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांवर हल्ला करण्यासाठी उड्डाण केलेली "मिराज 2000' ही लढाऊ विमानं आणि हवाई दल हे सतत एकमेकांशी संपर्कात होतेच; पण त्याच वेळी लष्कर आणि नौदल हेदेखील सतर्क होते. मिराज ज्या मार्गावरून उड्डाण करणार होती, त्या मार्गावरच्या लष्कराच्या सर्व तळांना सज्ज करण्यात आलं होतं. जमिनीवरून आकाशात मारा करणारी आयुधं काही अंशांमध्ये जमिनीकडं झुकवण्यात आली होती. आपलंच विमान पडू नये, ही काळजी त्यातून घेतलेली होती. लष्करी गुप्तचर संस्थांकडून; तसंच नागरी गुप्तचर यंत्रणांकडून वेळोवेळी मिळालेली माहिती तीनही दलांना पाठवली जाते.

असं केलं लक्ष्य निश्‍चित
दहशतवादी तळांवर हल्ला करताना तो नेमका कुठं करायचा, याची अचूक माहिती मिळवण्याचं काम गुप्तचर यंत्रणा करत असतात- कारण हल्ला करण्याच्या ठिकाणी दहशतवादी असले पाहिजेत, तरच त्याचं महत्त्व आहे. हे काम माणसाशिवाय होऊ शकत नाही. बालाकोट, मुज्जफराबाद आणि चाकोटी या तीनही ठिकाणचं लक्ष्य या पद्धतीनं निश्‍चित करण्यात आलं होतं. हे लक्ष्य निश्‍चित केल्यानंतर मानवी गुप्तचर यंत्रणांबरोबरच "इलेक्‍ट्रॉनिक इंटेलिजन्स'चा वापर केला जातो. त्यासाठी आधुनिक काळात अद्ययावत तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते. त्यात उपग्रहांतून घेतलेली छायाचित्रं उपयुक्त ठरतात. हल्ला करण्याच्या ठिकाणी काही हालचाली होत आहेत का, तिथं वाहनं आहेत का या गोष्टींतून त्या भागात काहीतरी हालचाली सुरू आहेत, याचा अंदाज आपल्याला येतो. ही सगळी माहिती घेतल्यानंतर त्या भागात शत्रूनं कोणती रडार लावली आहेत, शत्रू कोणत्या प्रकारे पाळत ठेवतो, तो किती सतर्क आहे, रडारची फ्रिक्वेंन्सी काय आहे, त्यांना कोणत्या माध्यमातून निष्क्रिय (जॅम) करता येईल, तिथलं हवामान कसं आहे, दृश्‍यमानता कशी असेल याची खडान्‌खडा माहिती घेतली जाते.

हल्ला रात्री करणार असल्यानं त्या भागातले डोंगर कसे आहेत, ते रात्री कसे दिसतात, हल्ल्याच्या आजूबाजूला नागरी वस्ती आहे का, हे सर्व तपशीलवार पाहिलं जातं. जेणेकरून या हल्ल्याची झळ इतरांना बसणार नाही, याची काळजी यात घेण्यात येते. त्याच वेळी या लक्ष्याच्या शेजारी शत्रूच्या हवाई दलाचे कोणते विमानतळ आहेत का, हेही पाहिलं जातं. हल्ला सुरू असताना ते पटकन्‌ उड्डाण करून प्रतिहल्ला करू शकतील, त्यासाठी किती वेळ लागेल, तिथं कोणत्या प्रकारची लढाऊ विमानं आहेत, त्यांची सज्जता किती आहे अशी माहिती गोळा करण्यात येते. त्यामुळं लक्ष्य निश्‍चित करण्यापूर्वी त्याची आणि तिथल्या पर्यावरणाची सविस्तर माहिती मिळणं आवश्‍यक असतं. या माहितीवरून दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रांना लक्ष्य करण्यात आलं.

हल्ल्याची पूर्वतयारी
दहशतवाद्यांचं प्रशिक्षण केंद्र हे लक्ष्य निश्‍चित झाल्यावर त्यावर नेमका हल्ला कसा करायचा, याची तयारी करणं आवश्‍यक असतं. प्रशिक्षण केंद्राचं बांधकाम कसं केलं आहे, ते कितपत मजबूत आहे, त्यानुसार त्यावर कोणता बॉंब परिणामकारक होईल, हे ठरवलं जातं. काही बॉंब हे पृष्ठभागावर पडून फुटतात, काही बॉंब हवेतच फुटून जमिनीवर लांबपर्यंत पडतात. त्यामुळं ट्रूप्सचं मोठ्या प्रमाणात नुकसान करता येतं. विमानातून टाकलेला बॉंब आधी जमिनीत जातो आणि मग फुटतो, अशा प्रकारचे बॉंब हे शत्रूचे बंकर उद्‌ध्वस्त करण्यासाठी वापरतात. त्यामुळं दहशतवाद्यांचं प्रशिक्षण केंद्र टिपण्यासाठी नेमका कुठला बॉंब वापरायचा, यावरही चर्चा झाली असेल. त्यातून लेझर गाइडेड बॉंम्ब वापरण्याचा निर्णय झाला असणार. "मिराज 2000' आणि "सुखोई 30' या लढाऊ विमानांमध्ये हे एक हजार किलो वजनाचे बॉंब वाहून नेण्याची क्षमता आहे. त्यापैकी त्यांनी "मिराज 2000' हे हल्ला करण्यासाठी निवडलं, तर "सुखोई' हल्ल्याच्या वेळी हवाई संरक्षणासाठी वापरण्यात आले.

या हल्ला करण्यासाठी जाणाऱ्या विमानांना हवेतल्या हवेत इंधन भरता येईल, अशी सुविधा आवश्‍यक असते. विशेषत: शत्रूच्या प्रदेशात आतमध्ये जाऊन हल्ला करताना याची गरज जास्त असते. "ए व्हॅक' (एअरबॉन वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टिम) आवश्‍यक असते. या हल्ल्याच्या वेळी "ऍडव्हान्स अर्ली वॉर्निंग' ही प्रणाली वापरण्यात आली होती. त्याच वेळी शत्रूची रडार, इमेजिंग यंत्रणा जॅम करण्यासाठी काही विशिष्ट विमानं ताफ्यात समाविष्ट केली जातात. त्यातून हल्ला करणाऱ्या विमानांचा मार्ग सुकर होते. इतकी काळजी घेऊनही शत्रूनं विमानांवर प्रतिहल्ला करण्यासाठी उड्डाण केलंच, तर "एअर डिफेंन्स एस्कॉर्ट' हे त्याला परतवून लावते. याशिवाय शत्रूची दिशाभूल करण्यासाठी शत्रूच्या वेगवेगळ्या लक्ष्यांच्या दिशेनं उड्डाण करणारी वेगवेगळी विमानं असतात. त्यामुळं नेमका कुठं हल्ला होत आहे, हे शत्रूला नेमकेपणानं कळत नाही. अशी दिशाभूल करणाऱ्या विमानांचं वेगळं पथक असतं.

हल्ल्याचा सराव
लक्ष्य निश्‍चित केलं, त्यासाठी आवश्‍यक यंत्रणा ठरली, त्यापुढचा टप्पा असतो तो सरावाचा. हल्ला करायच्या ठिकाणचं प्रारूप उभं केलं जातं. लक्ष्याचं छायाचित्र, "थ्री डी इमेज', उपग्रहांकडून आलेली छायाचित्रं, माणसांनी केलेली निरीक्षणं यांच्या मदतीनं हल्ला करायच्या लक्ष्याचं प्रारूप उभं केलं जातं. त्यावर वैमानिक सराव करतात. कारण, हे लक्ष्य नेमकेपणानं हेरून, त्यावर बॉंब टाकून, तितक्‍यात वेगानं परत फिरण्यासाठी वैमानिकांकडं फक्त वीस सेकंद असतात. त्यातही डोंगर आहेत. शत्रूच्या रडार यंत्रणेत दिसू नये यासाठी या डोंगराचा कसा वापर करावयाचा आणि हे सगळं रात्रीच्या गर्द काळोखात करायचं, यासाठी सराव अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यानंतर एअर स्ट्राईक केला जातो.

असा केला हल्ला
प्रत्यक्ष हल्ला करताना चार "सुखोई' सर्वांत आघाडीवर होती. त्यांनी पुढं जाऊन बॉंबहल्ला करणाऱ्या "मिराज 2000' विमानांचा मार्ग मोकळा केला. लेझर गाइडेड बॉंबचा वापर करून दहशतवाद्यांचं प्रशिक्षण केंद्र उडवण्यात आलं.

लेझर गाइडेड बॉंबच का वापरला?
लढाऊ विमान स्वत: लक्ष्यावर लेझर किरण टाकतं. त्या लक्ष्यावर पडून ते लेझर किरण परततात. त्यानुसार त्यावर बॉंब टाकला जातो. काही वेळा दुसरं विमान लक्ष्यावर लेझर टाकतं आणि मग हल्ला करणाऱ्या विमानातून त्यानुसार बॉंब टाकला जातो. आपल्याला फक्त दहशतवाद्यांचं प्रशिक्षण केंद्र उडवायचं होतं. नागरी वस्ती किंवा लष्करी तळावर हल्ला करायचा नव्हता. त्यामुळं अचूकता आवश्‍यक होती. ती साधण्यासाठी लेझर गाइडेड बॉंबचा वापर करण्यात आला.

बॉंब हल्ल्यानंतर काय केलं?
सर्जिकल स्ट्राईकमध्ये लष्करानं दहशतवाद्यांना मारलं, हे आपण दाखवू शकतो; पण एअर स्ट्राईकमध्ये उंचावरून केलेल्या हल्ल्यामुळं जमिनीवर नेमकं काय झालं, याबाबत उत्सुकता असते. त्यामुळं बॉंब टाकल्यानंतर नेमकं काय घडलं, हे टिपण्यासाठी विमानाचा स्वत:चा कॅमेरा असतो. पहिलं विमान गेल्यानंतर त्या जागी येणारं दुसरं विमान छायाचित्र टिपतं. "अनमॅंड एरियल व्हेईकल'च्या माध्यमातूनही काळोख्या रात्रीही वीस-तीस हजार फुटांवरून जमिनीवरचं छायाचित्र काढता येतं.

(शब्दांकन : योगीराज प्रभुणे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com